Movie Reviews

दृष्यम्‌

00:40:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हल्ली बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, विनयभंग यांसारख्या बर्‍याच घटना आपल्या कानावर येतात. वर्तमानपत्रे , न्यूज चॅनेल्सदेखील अशा बातम्या प्रसारीत करताना आपल्याला पहायला मिळतात. या आशयाचे अनेक चित्रपटही येऊन गेले आहेत. पीडीत स्त्री, आरोपी, कोर्ट, मिडीया हे सगळं चक्र त्यात अगदी परफेक्ट मांडलेलं दिसतं. हे सगळं पाहिल्यावर नकळतच आपल्याला चीड येते, संताप होतो आणि वाईट कृत्य करणार्‍या आरोपीला चांगलीच शिक्षा व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते. पण विचार करा, ज्या स्त्रीवर अत्याचार झाला आहे, तीच्या घरातील अख्खी फॅमिली अशा प्रसंगी तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली आणि त्या आरोपीला पार टोकाची शिक्षा दिली तर? ’दिव्याखाली अंधार’ या म्हणीप्रमाणे तो आरोपी पोलिस खात्याच्या अगदी उच्च पदाला असणार्‍या इन्स्पेक्टर जनरलचाच मुलगा निघाला तर? तर पुढे काय होते ते पाहण्यासाठी ’दृष्यम्‌’ हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आपण जरूर बघायला हवा. 



’दृष्यम्‌’ मधील नायक हा एक केबल टी.व्ही. ऑपरेटर असून तो, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली अशा मध्यमवर्गीय परिवारातला, अत्यंत साधा, सज्जन आणि आपल्या फॅमिलीवर जीवापाड प्रेम करणारा पिता असतो. शाळेतर्फे एका नेचर कॅम्पला गेलेल्या त्याच्या मोठ्या मुलीचे बाथरूममध्ये लपविल्या गेलेल्या कॅमेरामधे व्हिडिओशूट घेतले जाते. हे शूट घेणारा हलकट मुलगा तिला ब्लॅक्मेल करतो आणि तिला अपरात्री घराबाहेर बोलावतो. या प्रकरणाने अधीच घाबरलेली अशी ती आणि तिची आई यांची त्या मुलाशी झटापट होते आणि यातच ती मुलगी या आरोपी मुलाला ठार करते. दुसर्‍या दिवशी तिच्या वडिलांना झाला प्रकार समजतो आणि पोलिसांपासून हा सारा प्रसंग लपविण्यासाठी सगळे पुरावे नष्ट करतो. जरी ते दोषी नसले, तरी हा आरोपी मुलगा नेमका पोलिसखात्याच्या इन्स्पेक्टर जनरलचा एकुलता एक मुलगा निघतो. आपल्या बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी मग ती इन्स्पेक्टर जनरल संपूर्ण पोलिस फोर्स ला हाताशी घेते, आणि मग या चित्रपटाला अफलातून रंग चढतो. एक निराधार, खरी, सज्जन फॅमिली आणि पूर्ण पोलिस दल यांची झालेली टक्कर, सिनेमातील नायकाने उभारलेले पुरावे, आकस्मिक धक्के देणारे प्रसंग, आपल्या हातून झालेल्या त्या आरोपी मुलाचा खून लपविण्यासाठी त्याने रचलेला डाव हे अगदी सॉल्लिड आहे. प्रेक्षक संपूर्ण चित्रपट अगदी स्वत: जगतो, त्या सिनेमातील फॅमिलीचा एक घटकच बनतो. अफलातून स्टोरी, पात्रांचा लाजवाब अभिनय, उत्तम चित्रीकरण यामधे प्रेक्षक अगदी चित्रपट संपेपर्यंत दंग होऊन जातो. पार चित्रपटाच्या शेवटपर्यंत आपण स्तब्ध होऊन हा सिनेमा बघत राहतो. सिनेमामधे शेवटी येणार्‍या ट्विस्ट ला तर तोडच नाही. असा थ्रिलर आणि हीट सिनेमा आपण नक्कीच बघायला हवा. 

हल्ली सोशल मिडीयाची ताकद आपण सर्वजणच जाणतो. क्षणात एक गोष्ट वार्‍यासारखी पसरते. एक स्त्रीची अब्रू हेच तिचे सर्वोच्च आभूषण असते. या चित्रपटातील आरोपी जेव्हा तिचे व्हिडीओशूट सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देतो, तेव्हा त्या मुलीची झालेली निराधार अवस्था बघवत नाही. पण अशा वेळेस आरोपीला मिळालेला धडा हा योग्यच वाटतो. मध्यमवर्गीय माणूस जेव्हा पेटून उठतो, तेव्हा काय होऊ शकते याचा अंदाजही हा सिनेमा आपल्याला देतो. अशा अप्रतीम आणि अफलातून स्टोरीचा चित्रपट आपण कुणीही चुकवता कामा नये.    



You Might Also Like

0 comments: