Movie Reviews

३१ डिसेंबरची जत्रा

02:58:00 Nandan Bhalwankar 0 Comments

आज ३१ डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस.... ३१ डिसेंअर म्हंटले की सर्वांना आठवतो तो उत्साह, जल्लोश. आदल्या रात्री ऑफिसमधून बसने घरी जात असताना साधारण असाच काहीसा विचार माझ्या मनात आला. आणि त्याच क्षणी माझ्या समोर आली ती जत्रा. रस्त्याच्या उजवीकडे ही जत्रा अगदी उत्साहात चालू होती, सगळे जण आनंदात दिसत होते. Giant Wheel, Rainbow, Round fast train अशा काही राईड्स्‌ अगदी समोरच दिसल्या. पाहूनच मला उत्साहाचे भरते आले. 


अगदी खूप वर्षांपूर्वी मी Giant Wheel मधे बसलो होतो. काय धम्माल आली होती तेव्हा. ’अरे तू लहान आहेस का?’,’अशा जत्रांना जायला वय काय तुझं?’,’जत्रेत तू एकटाच जाणार काय?’ यासारखे अनेक प्रश्न मला लोकांनी केले होते. पण या पलीकडे जाऊनही आपल्याला त्या जत्रेतून मिळणारा आनंद कैक पटींचा आहे, त्यामुळे बाकीचे काय म्हणतील हा विचार मी पहिल्यांदी बाजूला सारला आणि मी त्या जत्रेत जायचचं असा मनात ठाम निर्धार केला. 

इथे ’आयुष्यावर बोलू काही’ (Aayushyawar Bolu Kahi) ह्या अल्बममधील गाणं आठवलं - 
मला ऋतुंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा 
वेळ पाहूनी खेळ मांडणे ना मंजूर

आपण बर्‍याचदा मला काय हवे आहे हे विचार करण्यापेक्षा लोक काय म्हणतील हा विचार करत असतो. यापेक्षा मला आनंद कुठल्या चांगल्या गोष्टीपासून  मिळणार असेल, तर मी बाकी कुठला विचार का करायचा? मला त्या जत्रेत जाण्याची इच्छा झाली आणि मी गेलो. अगदी मनात आल्यावर लगेच एकटाच गेलो आणि खरं सांगतो, काय धम्माल आली तिथे मला...

शिरल्या शिरल्या समोरच दिसले ते जायंट व्हील. त्या अजस्त्र पाळण्यात बसताना पोटात गोळाच येतो. खालून पाहताना पार गगनाला भिडलेला तो पाळणा बघून एक क्षणभरच मनाचा थरकाप उडाला, पण मी त्यात बसायचं ठरवलं होतं आणि मी त्यात बसलोच. तो अवाढव्य पाळणा आणि त्यात बसलेली ती ’केविलवाणी’ माणसे पाहून थोडी भिती वाटली, पण तीसुद्धा एक क्षणच. त्यानंतर जो तो झुला अफाट आकाशात गेला तो पार क्षितीजाच्या रेषेलाच जाऊन भिडला असे जाणवायला लागले, हळुहळू जमीनीवरील माणसे आणि जत्रेतील बाकीचे खेळ छोटे छोटे होत गेले... आणि परत तो झुला आता जमिनीच्या दिशेने गोल गोल फिरू लागला. बापरे, त्या क्षणाला काय वाटले म्हणून सांगू! माझ्या पोटातील एक एक अवयव माझ्या गळ्यात येतोय की काय असे मला वाटू लागले. पण ते फीलींग भन्नाट होतं, सॉल्लिड होतं. असे बरेच राऊंडस्‌ जेव्हा त्या पाळण्याने घेतले तेव्हा एकदम भारी वाटत होतं. आणि शेवटी तो झुला हळुहळू थांबला. त्यातून बाहेर आल्यावर मला मी एखादा स्टंट केलाय की काय असे मला जाणवू लागले. पण तो स्टंट लै भारी होता. मी एकदाच नाही, तर परत एकदा झपाटून मी त्या झुल्याची सफर अनुभवली. खूप मजा आली मला. दिवस एन्जॉय केला मी. 


मी जेव्हा त्या मोठ्या झुल्यावर होतो तेव्हाच तेथे वरती बसून मी जत्रेतील खालचे खेळ पाहून घेतले होते. पुढे कुठे जायचे हे तेव्हाच मी मनाशी निश्चित केले. त्यानुसारच मी पुढच्या खेळाकडे गेलो. ती एक मोठ्ठी वर्तुळाकार राईड होती. सर्वजण एका खळग्यात बसले की ते यंत्र चालू होणार होतं आणि वायूवेगाने ते गोल गोल फिरणार होतं. त्या आकाशझुल्यामधे आणि याच्यात एकच फरक होता, तो झुला आकाशात होता तर हे यंत्र जमिनीवरच गोल गोल गिरक्या घेत होते पण प्रचंड वेगाने. येथेही आधीच्याप्रमाणेच मजा आली. अगदी शब्दांत सांगता न येणारी मजा. एक वेगळीच अनुभुती या जत्रेतून मला मिळत होती. 

पुढे कशाकशात बसू असे मला झाले. तिथे एक रेनबो पाळणा होता. समुद्राच्या अजस्त्र लाटांवर जशी एक मोठी नौका हेलखावे खाईल, त्याप्रमाणे हा झुला जमिनीवर सारखे हेलखावे खात होता. यामधेही तेच. अगदी तोच थरार. ती भन्नाट अनुभुती. या जत्रेत फिरताना माझे वेळेचे भान हरपले होते, शेवटी मला घरून फोन आला आणि मी जागा झालो. आपल्याला आता ती जादूई दुनिया सोडावी लागणार या विचाराने किंचीत नरवस व्हायला झाले, पण त्या जत्रेत मी परत जाऊ शकतो या विचारानेच मला एक वेगळाच आनंद झाला. जणू काही तो भरभरून वाहणारा आनंद मी पोत्यात अगदी कोंबून कोंबून भरला आणि त्या जत्रेत एक कटाक्ष टाकून मी निघालो, तिथे परत जाण्यासाठी.     

You Might Also Like

0 comments: