Movie Reviews

Deool Band Movie - Beyond 5 Stars

23:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments

या जगामधे विज्ञान आणि अध्यात्म यांचा नेहेमीच परस्परविरोधी संबंध लावण्यात येतो.विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ नेहेमीच अध्यात्माची शक्ती, तिची ताकद नाकारताना दिसतात. पण अशा वेळेस जिथे विज्ञानाची मर्यादा संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. असा हा अमर्याद परमेश्वरी कृपेचा स्त्रोत आपले कार्य चोख पार पाडतोच. साधारण अशाच धाटणीवर आधारीत असलेला ’देऊळ बंद’ हा चित्रपट अध्यात्म-विज्ञान यांच्या परस्पर जुगलबंदीचे अगदी परफेक्ट चित्रण दाखवतो. 

अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेला एक बुद्धीमान भारतीय शास्त्रज्ञ बॉम्ब डिटेक्ट करणारे एक अतिप्रगत सॉफ्ट्वेअर बनवण्याकरता भारतात पाचारण केला जातो. विज्ञान आणि फक्त विज्ञानावरच श्रद्धा असल्यामुळे हा कट्टर नास्तिक असतो. देवाची भजने, सत्संग याचा मुळातच तीटकारा असल्यामुळे राहण्यासाठी देण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समधील देवाच्या देऊळाला तो पोलिसांच्या मदतीने कुलुप ठोकतो. पण या सगळ्यामधे त्याने बनवलेल्या सॉफ्ट्वेअरचा पासवर्डच तो गमावून बसतो, आणि यानंतर सिनेमाला मस्त रंग चढतो. या पासवर्डसाठी त्याने झिजवलेले अनेक तीर्थक्षेत्रांचे उंबरठे, अगदी पावलोपावली देवाने उभारलेले प्रसंग, देवाने केलेल्या योजना, मुळातच नास्तिक असल्यामुळे त्या शास्त्रज्ञाच्या प्रश्नांना देवाने दिलेली सडेतोड उत्तरे, या पासवर्ड शोध मोहिमेत वाटेत आलेला प्रत्येक प्रसंग, आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणार्‍या त्याच्या आईशी झालेली त्याची भेट, त्याच्या मागावर असणार्‍या आतंकवाद्यांपासून देवाने केलेले त्याचे रक्षण, आणि शेवटी त्याला गवसलेला पासवर्ड हे चित्रण अतिशय रंजक, पवित्र आणि रमणीय आहे. हाच कट्टर नास्तिक पुढे देवाचे अस्तित्व, त्याची ताकद मान्य करतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. "इफ सायन्स इज अ व्हेईकल, देन स्पिरिच्युऍलिटी ड्राईव्हज्‌ इट" हे त्याचे उद्गारच सारं काही सांगून जातात. शास्त्रज्ञांनी ज्या गोष्टींचे शोध लावले, त्याची मुळात निर्मितीच त्या देवाने केली आहे हे शेवटी त्याला पटतं आणि आपली चूक उमगते. 

नास्तिकतेवर आस्तिकता नेहेमीच भारी पडते. देवाचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरीही हा चित्रपट पाहून प्रत्येक नास्तिक हा जरूर आस्तिक होईल आणि देवाच्या नक्की प्रेमात पडेल. उत्तम कलाकार, त्यांचा सुंदर अभिनय, एक अतिशय वेगळा पण जबरदस्त विषय या सगळ्यामुळे हा चित्रपट अगदी हीट झाला आहे. तर असा हा देवाच्या अद्भुत, अतर्क्य, अगम्य लीलेचा आस्वाद घ्यायला लावणारा हा एक सुंदर सिनेमा आवर्जुन पाहण्यासारखा आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, चित्रपटांना जसे स्टार रेटींग दिले जाते, तसे या चित्रपटाला द्यायचे झाले, तर अनेक स्टार्सही कमीच पडतील. असा हा ५ स्टार्सच्या पलीकडला सिनेमा पाहण्याची संधी कुणीही दवडू नये.     

Movie Trailer :
           

You Might Also Like

0 comments: