अध्याय 26 (Adhyay 26)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
पंतांची कथा - अपना तकिया छोडना नही
ह्या जगात प्रत्येकालाच एका आधाराची गरज आहे. प्रत्येक जण स्वत:शीच युद्ध खेळत आहे. प्रत्येकाची जीवननौका ह्या भवसागरात डुचमळत आहे. पैलतीरी जाण्यासाठी धडपडत आहे. प्रत्येकालाच एक हक्काचा आणि कधीही दगा न देणारा हात हवा आहे. ... आणि हे सारेच पुरवणारा एकमेव कोण असेल तर तो सद्गुरूच ! बाकी कुणीही नाही. केवळ भाग्यवंतांनाच सद्गुरुलाभ होतो. कथेतील पंत हे त्यातीलच एक. साईबाबांकडे येण्याआधीच सद्गुरूप्राप्ती झाली आहे.
प्रत्येकालाच नेहमी प्रश्न पडतो. "माझा सद्गुरू असताना मी दुसऱ्या ठिकाणी कशाला जाऊ ?". बरोबरच आहे. आज आपल्याला बापू मिळालेला असताना आपण कुठे दुसरीकडे धाव घेतो ? पण ह्याचा अर्थ दुसरीकडे कुठेही जाऊच नये असा होत नाही. आज बापूंकडे येत असतानाही आपण स्वामी समर्थ, साईनाथ, श्रीराम, कृष्ण, विठ्ठल यांची भक्ती करतोच की ! ह्याचा अर्थ आपण बापूंना सोडले असा होत नाही. काही काही जणं फारच अतिशयोक्ती करताना दिसतात. मी बापू सोडून दुसरे काहीच करणार नाही ! असो.
बेसिकली हे सद्गुरूतत्व एक आहे. साईनाथ सुद्धा "सबका मालिक एक" असे म्हणतातच. सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति". हा त्रिविक्रम म्हणजेच सद्गुरूतत्व विविध देह धारण करून धरणीवर येत असतं. फक्त "त्या" योग्य सद्गुरूला आपण ओळखले पाहिजे.
पंतही असेच उचित सद्गुरुंच्या छायेखाली होते. साईनाथाना हे आधीच माहीत होते. एक खरा सद्गुरूच हे जाणू शकतो. म्हणून बाबांनी पंतांची त्यांच्या गुरूची भक्तीच दृढ केलेली आपण बघतो.
योगीदादा म्हणतात -
बापूपायी ठेवू
एकविध भाव
नको धावाधाव
अन्य कोठें
बऱ्याच वेळा आपण जीवनात उगाचच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असतो. आपल्याला काही आजारपण आल्यास विविध डॉक्टरांची opinions घेतो. इथे इलाज कामी नाही आला, चला दुसरीकडे. तिथे नाही तर तिसरीकडे. हे चालूच राहते.
बापू नेहेमी सांगतात. "आपला बाप तो आपला बाप." एक तर खरा सद्गुरू लाभणे हे महतभाग्य. म्हणूनच एकदा का सद्गुरूने आपले बोट पकडले, तर आपण ते बोट सोडून दुसरीकडे शोधाशोध करणे म्हणजे समोर गोड्या पाण्याचा तलाव असताना तहान लागल्यावर दुसरा तलाव शोधण्यासाठी वणवण भटकल्याप्रमाणे आहे.
... आणि आपण हे असे भटकू नये असेच ही ओवी आपल्याला सांगत आहे. असे भटकावेसे वाटणे हाच आपला आपल्या सद्गुरूंवरील अविश्वासाचा मुख्य पुरावा आहे.
जो जो जयाचा गुरु असावा।
त्याचेचि ठायीं द्दढ विश्वास बसावा ।
अन्यत्र कोठेंही तो नसावा ।
मनीं ठसावा गुह्यार्थ हा ॥१२ / १७६॥*
कोणाची कीर्ति कितीही असो ।
आपुले गुरूची मुळींही नसो ।
परी स्वगुरु-ठायींच विश्वास वसो ।
हाचि उपदेशो येथिला ॥१२ / १७८॥
मुळे शास्त्रीची कथा. अध्याय १२ मधील वरील ओव्या आपल्याला बरेच काही सांगून जातात.... मूळेंना बाबांनी मुळ्यांचे गुरू घोलपनाथ ह्यांच्या पायाशीच दृढ केले आहे.
नको येरझारा
बहूमूर्ती पाशी
अनिरुद्ध एकचि
भार वाहे
म्हणजेच, पंतांच्या कथेवरून खालील काही गोष्टींचा उलगडा झाला.
१) साईनाथ कधीही त्यांच्याकडे येणाऱ्यास त्यांचा गुरू सोडण्यास सांगत नाहीत , त्यांचे आराध्य सोडण्यास सांगत नाहीत आणि त्याची गरजही नाही कारण सद्गुरूतत्व एकच आहे.
२) साईनाथांकडे आलो तरी कुणाला त्याचा गुरू सोडण्याची किंवा गुरूकडे पाठ फिरवण्याची गरज नाही. उलट स्वतःची गुरूभक्ती वाढावी यासाठीच साईनाथांची भक्ती करणे उपयोगी ठरणार आहे.
३) आपल्या गुरूंची भक्ती अधिक चांगल्याप्रकारे कशी करायची याचे मार्गदर्शन साईनाथांकडून प्राप्त होते.
४) आधीच म्हंटल्याप्रमाणे एका उचित गुरूंचा भक्त बाबांकडे आला तर ते गुरू कोपणार नाहीत. किंवा बाबांचा एक भक्त वाढला ह्याचा बाबांना काही फायदा झाला असे नाही. जो खरा गुरू आहे , तो साईनाथांकडे त्यांचा भक्त गेल्यास कोपणे शक्यच नाही , उलट तो अधिक प्रसन्न होईल की माझा शिष्य उत्तम ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त करण्यास गेला आहे , ज्यायोगे त्याची प्रगती वेगाने होईल. शिष्याची प्रगती गुरूला आनंदीत करणारी असते.
५) "अपना तकिया छोडना नहीं |" हे स्पष्टपणे सांगणारे साईनाथ काय कुणाला त्याचा गुरू किंवा त्याचे आराध्य सोडण्यास सांगतील का ? उलट जर कुणी एखाद्या गुरूचा भक्त असून व गुरूची कृपा प्राप्त झाली असून त्या गुरूकडून त्याची काही अडचण सुटली नाही किंवा गुरूची कृपा माझ्यावर नाही असा चुकीचा समज धरून साईनाथांकडे आला असेल तर साईनाथ पुन्हा त्याच्या गुरूंची भक्तीच त्याच्या जीवनात रूजवतील.
साईचरित्रात अनेक उदाहरणे आपण पहातो. मुळेशास्त्री, रामोपासक डॉक्टर, रामभक्त मद्रासी बाई, स्वामी समर्थांचे भक्त असलेले पितळे आणि भाई. ह्या प्रत्येक भक्ताला त्यांच्या त्यांच्या सद्गुरुठायीच दृढ होण्याचा अनुभव बाबांनी दिला.
ह्या कथेचे सार हेच आहे की हा सद्गुरू मानवी देहाच्या चौकटीत बसणारा नाही. मुळात हा सगळ्या नियमांच्या पलीकडील आहे. तो "एक" आहे. तोच हा अनिरुद्ध.
रामकृष्ण एक जरी दोन काया
ऐसा विठूराया अनिरुद्ध ...
--------------------------------
पितळे कथा
जनम जनम का नाता
है तेरा मेरा
याद राहा प्रभू तुमको
मै भूला बिसरा
आपण एकदा ह्या सद्गुरूचे जेव्हा बोट धरतो, तेव्हा आपल्याला जरी त्याचे विस्मरण झाले, तरी "तो" आपल्याला कधीच विसरत नाही. आपण मानव फार दगाबाज असतो. गरज सरो अन वैद्य मरो अशीच आपली तऱ्हा असते. पण हा मात्र कायम आपला सच्चा मित्र, सखा असतो. तो कायम आपली आठवण ठेवतो. आपण physically जरी बरेच दूर असलो, तरीही त्याचे आपल्यावर सदैव लक्ष असतेच.
पितळेच्या वडिलांची पुण्याई आणि त्यांची स्वामी भक्ती यामुळे पितळे कुटुंबाच्या तीनही पिढ्या धन्य झाल्या. आधी स्वामी म्हणून आणि आता साई म्हणून त्यांना सद्गुरू लाभला. स्वामींनी दिलेल्या दोन रुपयाचे जरी पितळेंना विस्मरण झाले असले, तरी हा बाबा ते विसरला नाही. आपल्या प्रत्येकाच्याच अनेक जन्मांची त्यांना माहिती असते.
ही कथा म्हणजे सद्गुरूंची "मी तुला कधीच टाकणार नाही" ह्या ग्वाहीचा दाखलाच. प्रत्यके वेळेस त्या सद्गुरुतत्वाने उचित सद्गुरुंकडेच त्यांचा मार्ग वळवला. चिडीच्या पायाला दोर बांधणे ह्याचे उत्तम उदाहरण.
मग कुणी म्हणेल की एवढी सद्गुरुकृपा असताना पितळेच्या मुलाला असा रोग झालाच कसा ? आणि त्याला काहीच उपाय कसा सापडला नाही ? असे कसे झाले ?
=> आपण जे काही कर्म करतो, त्याचे त्याप्रमाणे फळ प्राप्त होतच असते. ते कुणालाच चुकलेले नाही. साक्षात स्वामी समर्थांनी दिलेली अतिपवित्र नाणी पितळेंची लहानपणी खेळायची वस्तू बनली. ह्या कर्माचे फलित म्हणूनच त्यांच्या मुलाला असाध्य फेफऱ्याचा आजार जडला. आणि तो बराही होईना.
=> पण असे असतानाही सद्गुरुतत्व त्यांच्या घराण्यावर कोप धरून बसले नाही की त्यांना टाकलेही नाही.
=> कर्मगतीने जरी त्यांना फळ भोगणे भाग असले, तरीदेखील त्या संकटाचे संधीत रूपांतर करून बाबांनी पितळेना योग्य मार्गाला लावले आणि आपल्याकडे खेचून घेतले. हे आहे "त्या"चे लाभेवीण प्रेम.
स्वामी समर्थ आजोबांचा देऊळबंद सिनेमा आपण प्रत्येकानेच पाहिला असेलच. परदेशात मोठ्या हुद्द्यावर असलेला एक अहंकारी नास्तिक (सद्गुरू मार्गापासून भरकटलेला) शास्त्रज्ञ भारतात पाचारण केला जातो. त्याचे आईवडील हे कट्टर स्वामी भक्त. हा शास्त्रज्ञ कसाही जरी असला, तरी स्वामींनी त्याला योग्य मार्गाला लावलाच. त्यात त्याचे बरेच हेलपाटेही झाले. पण ते ही त्याच्या भल्यासाठीच. शेवटी त्याला सद्गुरुतत्तवाच्या ताकदीचा अंदाज आलाच. स्वामींनी त्यालाही आपल्याजवळ ओढलेच.
=> कर्मगतीने वाट्याला आलेले भोग हे सद्गुरूकृपेमुळेच सौम्य होऊ शकतात आणि त्यावर उपाय सापडतो. एवढी ताकद फक्त ह्या बाबाचीच. म्हणूनच बाकी कुणीच ह्या रोगावर उपाय सांगू शकले नाही.
पितळेंना सद्गुरुत्तवाचे आधीच विस्मरण झाले असल्यामुळे एका सामान्य दिसणाऱ्या मानवाच्या रूपात सद्गुरू बघणे हे त्यांच्यासाठी अवघडच होते. साईनाथांची कीर्ती ऐकून ते बाबांकडे गेले. पण मनात अजून पक्का विश्वास आणि श्रद्धा नव्हती. ह्यामुळेच प्रत्यक्ष बाबांसमोर येऊनसुद्धा पितळेना अनुभव येऊ शकला नाही. बाबा बरे करतील आणि करू शकतील ह्या विश्वासाचा अभाव होता.
साईनाथांसमोर येऊन तर चक्क त्या मुलाची परिस्थिती अजूनच बिकट झाल्यासारखी वाटली. पितळेचे सारे कुटुंबीय घाबरले. आईला आपले लेकरू म्हणजे जीव की प्राण असते. त्याला झालेले दुःख आणि पीडा ती सहनच करू शकत नाही. मुलाची तब्येत अजूनच बिघडल्यामुळे तिच्या मनात वेगवेगळे कुतर्क येऊ लागले.
साईनाथाच्या समोर कसला रोग टिकू शकणार ? फेफऱ्यालाच फेफरं आणणारा हा बाबा ! ह्याच्यासाठी अशक्य ते काय ! पण तरीही हा बाबा पितळ्यांची परीक्षा बघत होता. आपल्याला मुलाला झालेला त्रास कोणती आई सहन करू शकेल ? बाबा हे जाणतोच. आणि म्हणूनच तो रागावला नाही, तर त्यांना उपाय दाखवला. पुढे बाबांच्या शब्दाचे आज्ञापालन केल्यामुळे पितळे कुटुंबियांना हा साई कोण आहे ह्याची जाणीव झाली.
पितळेंकडे स्वामींनी दिलेल्या दोन रुपयांचे झालेले विस्मरण म्हणजे त्यांनी गमावलेली श्रद्धा आणि विश्वास. ह्यामध्ये साईनाथानी दिलेली ३ नाणी म्हणजेच त्यांच्या जीवनात साई त्रिविक्रमाने त्याच्या तीन पावलांनी केलेला प्रवेशच; ज्याद्वारे पितळेंचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि पुढे येणारा भविष्यकाळ ह्या त्रिविध तत्तवांवर साईने कार्य केले.
ह्या सद्गुरुतत्वाला शरीराचे काहीच बंधन नाही. स्वामी असो वा साई ते सद्गुरुतत्व "एक" आहे. स्वामी आणि साई हे दोघे भिन्न नाहीत याचाही दाखला ह्या कथेद्वारे मिळतो. नाण्यांची खरी गोष्ट समजल्यावर तर हे कुटुंबीय धन्य धन्य झाले. बाबांची त्यांच्या भक्तांना योग्य मार्गाला आणण्याची तऱ्हाच न्यारी. पुरते अचंबित करून सोडले पितळेंना.
असेच साईनिवास मधील दाभोलकर कुटुंबीय बापूनी साईनाथानी दिलेल्या ३ वस्तू परत मागताना अचंबित झाले असतील. साक्षात साईनाथ आपल्या घरी आला आहे आणि त्याचे प्रत्यक्ष दर्शन होताना काय वाटले असेल ना ! मस्तच !
शेवटी एवढेच समजले. आपण कितीही जरी भरकटलो, तरी हा बापू आपल्याला ताळ्यावर आणणारच आहे. आणि आपलेच नाही, तर आपल्या पुढील पिढयांनासुद्धा उचित मार्गावरच ठेवणार आहे. हेच त्या त्रिविक्रमाचे गुणाकार स्वरूपातील प्रेम !
------------------------------
गोपाळ आंबडेकरांची गोष्ट - आत्महत्या
हल्लीच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्येची खबर ऐकली. खूपच धक्का बसला. "का वागला बरे असे तो?" या विचारांनी मनात थैमान घातले होते. आत्महत्या करण्याचा, एवढा टोकाचा निर्णय घेण्याची खरंच आवश्यकता आहे का? यावरून एक लक्षात येते ते म्हणजे:-
*पैसा, प्रसिद्धी, सगळ्या सुख सोयी सुविधा असूनही आज माणसाला नैराश्य असू शकतं हे अगदी प्रकर्षाने जाणवले.*
कारण...
*बापू नेहमी म्हणतात, "पैशाने सुखसोयींची साधने विकत घेता येतात. सुख नाही."*
रामदास स्वामींनी म्हटलेच आहे:-
*जगी सर्व सुखी असा कोण आहे...*
*बेसिकली ह्या कलियुगात प्रत्येक माणसाला एका आधाराची गरज आहे. एक असा मित्र, एक असा हात जो कायम आपल्याला सांभाळेल, गरजेच्या वेळेस आपल्या सोबत असेल, वेळेला मदतीला तत्क्षणी उभा राहील, सुख-दुःखात एक हक्काचा सोबती असेल, काय योग्य आणि काय अयोग्य यातील फरक एका बापाप्रमाणे समजावून सांगेल... आपल्या जीवनाची गाडी रुळावर आणेल. ... कोण हा मित्र ? ...*
*हाच तो - "सदगुरू" !!... जो आज बापूंच्या रूपात केव्हाच आपल्याला लाभलाय.*
हा सद्गुरू आपली कशी काळजी घेतो हे साईचरित्रातील २६ व्या अध्यायात आंबडेकरांच्या गोष्टीवरून कळते. सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली. आशेचा किरणच कुठे दिसत नव्हता. सर्वत्र अंधार. खूपच वैतागून गेले आणि शिरडीला येउन आत्महत्येचा विचार पक्का केला.
कंटाळले ते जीवितास।
वृत्ति झाली अत्यंत उदास।
पुरे आतां हा नको त्रास।
सोडिली आस जीविताची
॥१२५॥
करूनियां ऐसा विचार।
होऊनियां जिवावरी उदार।
विहिरींत उडीघा लावयातत्पर।
आंबडेकर जाहले॥१२६॥
*परंतु बाबा हे कसे होऊ देतील ? आत्महत्येचा विचार मनात येताच हातात स्वामी समर्थ महाराजांची पोथी हाती पडली. महाराज त्यात म्हणतात - "भोग हे भोगूनच संपवावे."*
करूनि आत्महत्येचा निर्धार ।
पाहूनियां रात्रीचा प्रहर ।
जाऊनि एका विहिरीवर ।
केला शरीरपात तेणें ॥१३६॥
इतुक्यांत महाराज तेथें आले ।
स्वहस्तूं तयास बाहेर काढिलें ।
‘भोक्तृत्व सारें पाहिजे भोगिलें’ ।
उपदेशिलें तयास ॥१३७॥
आपुल्या पूर्वकर्माजोग ।
व्याधि कुष्ठ क्लेश वा रोग ।
जाहल्यावीण पूर्ण भोग ।
हत्यायोग काय करी ॥१३८॥
हा भोग राहतां अपुरा ।
जन्म घ्यावा लागे दुसरा ।
म्हणूनि तैसेच साहें कष्ट जरा ।
आत्महत्यारा होऊं नको
॥१३९॥
वाचूनि ही समयोचित कथा ।
थक्क जाहले आंबडेकर चित्ता
जागींच वरमले अवचिता ।
बाबांची व्यापकता पाहूनि
॥१४०॥
*बापू म्हणतात - "जो प्रारब्धाचे भोग टाळण्यासाठी आत्महत्या करेल त्याला पुढचा जन्म अतिशय वाईट येईल. त्याला या जन्मीचे भोग व आत्महत्या केल्याचे पातक दोन्ही फार वाईट पद्धतीने भोगावे लागते व त्यातून कोणीच वाचवू शकत नाही."*
*बघा, बापू असोत, साईनाथ असोत किंवा स्वामी समर्थ... हा सद्गुरु आपली किती काळजी घेत असतो. कारण सद्गुरुतत्व एकच आहे. बेसिकली आपणच आपल्या चुकांमुळे निर्माण केलेल्या प्रारब्धरूपी भोगांना हा सद्गुरूच सौम्य करू शकतो आणि आपल्यावर सुखाची सावली धरू शकतो.*
*आपल्याला प्रारब्ध बदलणे आवश्यक आहे. प्रारब्ध म्हणजे माझे मन!*
आपण आपली परिस्थिती बदलू शकत नाही पण आपली मन:स्थिती निश्चित बदलू शकतो. कारण हा *मन:सामर्थ्यदाता* आहे.
*आज श्रद्धावानांना भय नाही. सगळे बापू भरोसेच चालू आहे. आज बापूंनी आपल्याला मन:सामर्थ्य प्रदान केले आहे. जीवनाची लढाई लढण्याकरिता आवश्यक असणा-या सर्व गोष्टी प्रदान केल्या आहेत. बाप पाठीशी भक्कमपणे उभा आहे मग आत्महत्येसारखा विचार आपल्या मनात येणे दूरान्वयाने शक्य नाही.*
*नंदाई म्हणते - "जीवन संपवणे सोपे आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगून दाखवा."*
*माझा बापू ... बापू हा आसरा*
*जेव्हा जीव होई ... जीव होई घाबरा ...*
हा बापू आपल्या प्रत्येकालाच अगदी अलगद सांभाळतो. ह्या कलियुगात कुणावर कधी काय वेळ येईल सांगता येत नाही. अगदी प्रत्येकालाच आधार हवा आहे. आणि *आजच्या युगात आधार देणारा एकमेव मित्र माझा बापूच!*
मीनावैनींनी हे कधीच ओळखले आणि म्हणूनच त्या अभंगात म्हणतात:-
*जे आले ते तरुनी गेले*
*जे न आले ते तसेच राहीले*
*अनिरुद्धाचा झाला तो उरला*
*दुजा दु:खातची रुतला*
*बापूच्या प्रत्येक मित्राच्या आयुष्यात रामराज्य येणारच! कारण माझ्या जीवनातील रावणाचा वध माझा अनिरुद्ध राम करणारच आहे. १०८%*
0 comments:
Post a Comment