अध्याय २१ (Adhyay 21)

11:04:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


विनायकराव ठाकूर कथा 


रस्ता नही आसान 
देना पडता है इम्तिहान 
आते है कई तुफान ... 


भक्ती ही बाभूळवनीची वाट आहे. सद्गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. सद्गुरू बऱ्याच वेळा आपली परीक्षा घेतो. ते ही अर्थात भक्ताच्या प्रगतीसाठीच. विनायकरावानी खूप मेहेनतीने मामलतदारीचे पद मिळवले होते. तसेच बदल्या होत असताना प्रवासाकरता सुद्धा अगदी खूपच कष्ट घ्यावे लागतात. चक्क रेड्यावर बसून नाणेघाट ओलांडून त्यांनी त्यांची कामगिरी फत्ते केली. बाबांना कष्ट केलेले आवडतात. जो माणूस आपल्या ध्येयासाठी आणि उन्नतीसाठी झिजतो, त्याला बाबांनी हात दिला नाही आणि आपल्या जवळ ओढले नाही असे कसे बरे होईल ?        


मुळात विनायकराव हे श्रद्धाळू होते. कष्टकरी होते. मेहेनत करायची तयारी होती. बेळगावजवळ बदली झाल्यावर कानडी आप्पांच्या दर्शनालाही ते कामातून वेळ काढून गेले. एक successful व्यक्तिमत्व असतानाही भक्तीमार्गात जाण्यासाठी त्यांचे मन आसुसलेले होते. कानडी आप्पानी त्यांना साईनाथांकडे जाण्याचा पुढील मार्ग दाखवला. खरा सद्गुरू हा असाच असतो. त्यांना फक्त भक्ताची प्रगती झालेली बघायची असते. 

इथे एक महत्तवाचा मुद्दा लक्षात आला. कानडी आप्पा स्वतः एक सद्गुरू असूनही ते निश्चलदासकृत विचारसागर स्वतः ग्रंथ वाचत आहेत. मी सद्गुरू आहे म्हणजे मला सगळे ज्ञान आहे, मग मला काहीच वाचायची काहीच गरज नाही असे म्हणाले नाहीत. 

बापूसुद्धा स्वतः अनेक ग्रंथ वाचतात, इंटरनेट च्या साहाय्याने नवनवीन माहिती मिळवून जगाच्या बरोबर किंबहुना जगाच्या दोन पावलं पुढेच राहतात. स्वतः साक्षात "मूर्तिमंत ज्ञान" असतानाही एक मानव म्हणून जन्माला आल्यावर मानवाचे सारे नियम पाळून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालतच राहतात. त्यामागे कुठल्याही प्रकारची जादू अथवा अमानवी शक्ती न वापरून एका मानवाप्रमाणेच प्रयास करतात. एक डॉक्टर असून या वयातही होमिओपॅथी शिकतात. IT मधील expert माणसेही बापूंबरोबरच्या सेमिनारमध्ये त्यांच्या ज्ञानाने अवाक होतात. मला हे हे येत नाही हे सांगताना त्यांना काहीच लाज वाटत नाही. त्याऐवजी ती गोष्ट शिकून, त्यावर मेहेनत घेऊन बापू त्यात प्रभुत्व मिळवतात.    

"आधी केले मग सांगितले" हे तत्व अवलंबिताना दिसतात. कानडी आप्पा विचारसागर ग्रंथ स्वतः वाचत होते. मगच त्यांनी विनायकरावाना तो वाचायचा उपदेश दिला.    

ज्याप्रमाणे साखरेचा कुठलाही गोड पदार्थ खाल्ला तरी जिभेवर मधुरताच येते, अगदी तसेच सद्गुरूचे आहे. कानडी अप्पा काय किंवा साईनाथ, हे सद्गुरूतत्व हे एक आहे. म्हणूनच कानडी आप्पानी सांगितलेल्या गोष्टी साईनाथ जाणतातच. तसेच त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचीच शिकवण पुढे समजून आयुष्यात कशी अमलात आणायची हे खूप सोप्या शब्दात साईनाथांनी समजावून सांगितले आहे. 

आपल्याला जे जे काही समजले आहे ते ते सारे इतरांना समजावणे ह्यामुळेच आपल्याकडील ज्ञानात भर पडते. बाबांनी ठाकूरांना शिरडी मधेही ह्या ग्रंथाचा भावार्थ समजावून सांगण्यास सांगितलेले आहे.     

आपण पुष्कळ वेळा केवळ म्हणायचे म्हणून पठण किंवा पारायण करतो. ग्रंथवाचन करायचे तर आहेच, पण कसेतरी भरभर उरकून संपवून टाकायचे असेच आपले चालू असते. म्हणजेच, ग्रंथातील ओव्या, त्यामागील भाव समजून न घेता नुसतेच घोकंपट्टी करणे होय. ह्याने काय होणार ? ना आपल्याला समाधान ना वाचण्याचा आनंद. तसेच, त्यामागील शिकवण काय हेच कधीकधी आपल्याला समजत नाही. 

तसेच कधीकधी ग्रंथवाचनामागील भाव तर समजला, पण ते आचरणातच आणले नाही, तर त्याचाही काय फायदा ? साईचरित्राचा भावार्थ लिहिताना पुष्कळ वेळा आपण असा भाव लिहितो, जो समोरच्यावर impression तर पाडेल, पण जर real life मध्ये वागताना मी जर तसे वागतच नसेन, तर त्या भावार्थ लिहिण्याचा काय फायदा ? विनायकरावांच्या कथेतून बाबांनीही आपल्या वाचकाना अशीच शिकवण दिलेली दिसते.   

विनायकरावांची ठाण्याला बदली झालेली असताना चांदोरकारांशीही त्यांची गाठ पडली. हे त्या बाबाचेच बोलावणे. पण मनात खटल्याचे विचार. त्याचा निकाल लावायची इच्छा. म्हणूनच साईदर्शन मिळण्यास उगाचच दिरंगाई झाली. जो साईनाथ आपल्या केवळ कटाक्षाने अशा अनेक खटल्याचे त्याक्षणी निकाल लावू शकतो, त्याच्याकडेच जाण्यास उशीर झाला. 

मानवाच्या मनातही असे अनेक खटले चालू असतात. असंख्य प्रश्न असतात. त्यांचा निकाल लागायला वर्षानुवर्षे जातात. मनाचे स्वास्थ्य बिघडते. कधी कधी आपल्याला खोटे दोषी ठरवले जाते, आरोपीच्या पिजऱ्यात उभे केले जाते. कधी कधी आपण दोषी असतो. त्याचा पश्चात्ताप होत असतो. अशा अनेक खटल्यांचा निकाल लावून मन:शांती केवळ हा साईनाथच प्रदान करू शकतो. पण हेच आपल्याला समजत नाही. 

हा बाबा आपल्याला गोड पाण्याची नदी दाखवत असताना आपण ग्लासातील पाण्यामागे धावतो. खटल्यासाठी एखादवेळेस पुन्हा येता आले असते, परंतु ही साईनाथाकडे जाण्याची सुसंधी समोर दिसत असताना सोडता कामा नये. नाहीतर तेलही गेलं तूपही गेलं हाती राहीलं धुपाटणं अशी गत होते. पण .... हा साईनाथ असे कधीच होऊ देत नाही. सारे दरवाजे बंद झाले असे कधीच होत नाही. आपल्याला फक्त उघडलेला नवा दरवाजा शोधायला हवा. विनायकरावांनी हाच दरवाजा शोधला. 

ते हातावर हात ठेऊन स्वतःला दोष देत तसेच बसले नाहीत. लगेच शिरडीला गेले पण. नाना भेटले नाहीत. विरस झाला. पण आता नाना जरी नव्हते, तरीही साईकृपेने दुसऱ्या व्यक्तीने त्यांची साईभेट घडवून आणलीच. आयुष्यात काहीही होवो, थांबायचे नाही. ह्याने आपले बोट पकडलेले आहेच. त्यावर फक्त विश्वास ठेऊन मार्गक्रमण करायचे. हा नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतो.      

"ओम शांती ओम" या चित्रपटातील एक वाक्य आठवले.  

अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है... 

.... आणि ठाकूरना बाबा भेटलेच ! कानडी आप्पाच्या सांगण्यानुसार ही भेट होणारच होती. हेच त्यांचे नाथसंविध होते. हा बाबा सुद्धा आपल्याला भेटायला तेवढाच उत्सुक असतो. आपल्याला कवेत घ्यायला. हेच त्याचे आपल्यावरील अफाट प्रेम !

आ गले अपने मुझको 
तू ही लगाले...  तू ही लगाले
प्यार करना बापू मुझे 
तू ही सिखा दे ... 




---------------------------------


 अनंतराव पाटणकर कथा 

                             

आपल्याला सगळ्याचे "ज्ञान" असावे असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. त्यानुसार मानव ज्ञान मिळवतोदेखील. काही क्षणापुरते त्याचा त्याला अभिमान आणि आनंद होतोही. पण हा आनंद कायम टिकत नाही. अगदी कितीही जरी ज्ञान मिळवले, तरीही मन:शांती मिळत नाही. आणि मन:शांती नसेल, तर सुख मिळत नाही. काहीतरी चुकचुकल्यासारखे वाटते. मनाचे समाधान केवळ सद्गुरुचरणी शरण गेल्यावरच प्राप्त होऊ शकते. कारण सद्गुरू हाच मनसामर्थ्यदाता आहे.  
   
मन हे गुरुचरणी विश्राम 
शांती सुखाचे धाम ... 


बेसिकली आपण सारेच सर्वसामान्य मानव आहोत. आपले ज्ञान मिळवायची क्षमताही मर्यादितच आहे. हा सद्गुरू म्हणजेच मूर्तीमंत ज्ञान. ज्ञान मिळवणे हे चांगलेच आहे. त्याने मानवाचा विकासच होतो. पण त्यामुळेच गर्व होण्याची सुद्धा शक्यता असते. कुठल्याही गोष्टीची विपुलता मानवाचे चित्त विचलित करते. त्याने मनाची शांती मिळत नाही. पाटणकरांचेही असेच झाले असावे.            

ही कथा पाटणकरांचा ज्ञानार्थी ते भावार्थी हा प्रवास सांगते. ज्ञानाला भक्तिमार्गाची, सद्गुरूची जोड मिळाली की अशक्याचे शक्य होते. अख्खे आयुष्य पालटून जाते. सद्गुरूला तर भक्तांकडून कसलीच अपेक्षा नसते. "एक विश्वास असावा पुरता ... " असला की आयुष्य आनंदाने भरून जाते. ज्ञानी पंडित, शास्त्रांमध्ये चतुर असण्याची काहीच आवश्यकता नाही. 

न लगे साधनसंपन्नता 
न लगे षशास्त्रचातुर्यता 
एक विश्वास असावा पुरता 
कर्ता हर्ता गुरू ऐसा ..   

केवळ पुस्तकी ज्ञान असून काहीच फायदा नाही. त्याने काहीच प्राप्त होत नाही. हा सद्गुरू नेहेमी प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देत आला आहे. कारण त्यानेच मानवाचा विकास होतो. बापू नेहेमी म्हणतात, "परावलंबी जीवन आणि पुस्तकी विद्या कधीच कामी येत नाही."   
जे एवढे ग्रंथ, उपनिषदे वाचूनसुद्धा मिळाले नाही ते या 
साईनाथाच्या केवळ एका दर्शनाने पाटणकरांना मिळाले. समाधान मिळाले. 

पिपा म्हणे सोडा दंभ 
ह्याचे पायी सर्व सुख 

आता साईनाथांनी सांगितलेल्या कथेतील काही बारकावे बघूया. 

थोडक्यात साईनाथांनी पाटणकरांना सौदागर व्हायला सांगितले. सौदागर हा असा माणूस असतो की जो स्वतःच्या फायद्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतो. बाबांनी सांगितलेल्या कथेत ह्या सौदागाराने स्वतःचा अभिमान सोडून अगदी घोड्याच्या ९ लेंड्याही स्वतःच्या पदरात बांधल्या. लेंडूक म्हणजे किती घाणेरडे आणि किळसवाणे ! ते ही एक नाही... चक्क नऊ ! पण ते ही हा सौदागर घ्यायला धावला. तत्पर होता. त्याला त्याची किळस वाटली नाही किंवा लाजही वाटली नाही. बापूनी सांगितलेले -> स्वार्थी बना ... याचा अर्थ लक्षात आला याद्वारे.    

बाबांचे बोल म्हणजे काय ! बाबांनी सगळेच spoon feeding केले नाही. पाटणकरांना विचार करायला लावले. त्यांच्या बुद्धीला चालना दिली. पण एवढ्या शास्त्रांचा, ग्रंथांचा अभ्यास करूनही त्यांना ह्या कोड्याची उकल झालीच नाही. याकरताच सद्गुरुभक्ती आणि प्रेम हवे. पण तेच दादा केळकरांसारख्या सामान्य भक्तीमार्गातील भक्ताला याचा लगेच अर्थ समजला. 

घोडा आणि लेंड्याचा अर्थ पाटणकरांना त्यांनी समजावून सांगितला. 
ग्रंथराजामध्ये  या नवविधा भक्तीचे सुंदर वर्णन केले आहे. ते जरूर वाचावे. त्याद्वारे आपल्याला प्रत्येक भक्ती नीट समजू शकेल.    


आपण करीत असलेले हे साई चरित्राचे वाचन ही एक प्रकारची श्रवणभक्तीच आहे. नवविधा भक्तीची पहिली पायरीच आहे. मातृवात्सल्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे भगवान परशुराम हे बालक असल्यापासून श्रवणभक्तीच करीत आहेत. आईचे शब्द - "माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहाते" हे परशुराम फक्त श्रवण करीत आहेत.       

बाबांनीही दुसऱ्या दिवशी अगदी प्रेमाने सांगितलेले समजले का ते विचारले आहे. बघा, बाबांच्या केवळ एका दर्शनाने आणि उपदेशाने पाटणकरांमध्ये केवढा फरक पडला आहे. बाबांच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही हे मनात समजले आहे.      

ह्या सद्गुरुंकडे जाचक नियम नाहीत. नियम असतील तर ते केवळ प्रेमाचेच. ह्या प्रेमामुळेच सद्गुरू भक्तांना अधिकाधिक सवलती देत राहतो. मानवाची मर्यादित क्षमता लक्षात घेता नवविधा भक्तीमधील ९ च्या ९ भक्ती जीवनात अवलंबिणे हे खूपच कठीण आहे. म्हणूनच हे जाणून मानवाने ९ पैकी एक जरी भक्ती मनापासून केली, तरीही हा परमात्मा सर्व नवविधा भक्तीचे फळ आपल्या पदरात टाकतो ! ह्याच्यासारखा हाच. बाकी कुणीच नाही... आणि बनूही शकत नाही.           

बेसिकली हा सद्गुरू म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान. ज्ञानाचा मूळ स्रोत. पाटणकरांनी जे पुस्तकी ज्ञान वाचले -> त्याचे प्रॅक्टिकल, याची देही याची डोळा उदाहरण म्हणजेच हा सद्गुरू साईनाथ ! म्हणूनच साईकृपा झाल्यावर त्यांचे मन शांत झाले. एवढी पुस्तके, ग्रंथ वाचण्यापेक्षा या साईनाथाला वाचले असते, तर सगळेच प्राप्त झाले असते.    

ग्रंथ वाचुनी ज्ञानी भारंभार 
वेडे झाले ज्ञानी नर 
मंत्रगजर करिता नित्य 
ज्ञान मागे धावे सत्य 

पिसाला कचरा ब्रह्माण्ड 
आपुला आनंद अनिरुद्ध 

नुसते ज्ञान असणे म्हणजेच कोरडेपणा. अशा रूक्ष मनोभूमीत सद्गुरूभक्तीबीज कसे रुजणार ? यासाठीच या बाबाचे प्रेमाचे पाणी हवे. तरच आपल्या बीजाचे मोठ्या वृक्षात रूपांतर होऊ शकते. अन्यथा नुसते मिळवलेले ज्ञान काहीच कामाचे नाही.      

बांध माझ्या मना 
घट्ट तुझ्या पदा ... 



Superb drawing by Dr Vibhute : 





ह्या आकृतीचा आधार घेऊन आपण अजून भावार्थ लिहू शकतो.  







---------------------------------


 पाठीमागून निंदा करणाऱ्या वकिलांची कथा 



सुकाराचे लेकुरे मस्त वोरडा घातिला 

चिखलाच्या नंदनवनी त्यासी आनंद जाहला

दुसऱ्याच्या पाठीमागून त्याची निंदा करणे हा प्रत्येकाचाच अगदी आवडीचा छंद असतो. अगदी छान वाटतं तसं करताना. नुसतं दुसऱ्याविषयी वाईट बोलायला नाही, तर वाईट ऐकायलासुद्धा अगदी कानावर छान संगीत चालू असल्याप्रमाणे ऐकणारा ती निंदा ऐकत असतो. कथेतील वकील सुद्धा हेमाडपंतांसमोर साईंच्या एका प्रेमळ भक्ताची आणि मग खुद्द बाबांचीही निंदा करीत आहेत. 

वकीलांच्या मनात नक्की काय आहे तेच समजत नाही. बाबांचे दर्शन घेतले, दक्षिणा पण दिली. बाजूला बसूनही राहिले. पण बापू म्हणतात त्याप्रमाणे माणसाचा एक तर विश्वास असतो किंवा नसतो. ह्या वकिलांसारखी माणसे नेहेमी त्रिशंकूसारखेच असतात. मधेच लोंबकळत असतात. बाबा तर हवा आहे. बाबांचे कृपाछत्र सुद्धा हवे आहे. पण at the same time मनात सदा संशय सुद्धा आहे. बाबांवरचा अविश्वास मधेच डोके वर काढतो. बाबाना अजून नीट ओळखलेलेच नाही. 

पण हा बाबा सारेच जाणतो. ह्याच्यापासून काहीच लपून राहात नाही. ह्याची नजर कुठे जात नाही अशी कोणतीच जागा नाही. 
            
तुम्ही कुणी कुठेही असा 
परंतु एवढे मात्र नीट स्मरा 
की तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा 
मज निरंतरा लागती ... 

बाबांच्या आडून (?) हे वकील जे काही बोलत होते ते ते सारे बाबांना समजलेच. त्यांच्याकडे प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब असतो. बाबांनी बरोबर त्या वकिलाची खरडपट्टी काढली आहे. वकीलही बाबा आपल्यालाच बोलले आहेत हे बरोबर समजले आहेत आणि खजीलही झाले आहेत. 

पुष्कळ लोक जे या बाबाचे भक्त म्हणवतात त्यांनी ह्या बाबाला बघायला गेलं तर ओळखलेच नाही. अधिवेशनात एकदा बापू म्हणालेले. दर्शनाला समोर येताना चेहेऱ्यावर अगदी प्रेमाचा भाव आणणारा भक्त मानतल्या मनात "ह्याला काय कळतंय" अशा अविर्भावात होता. बापूंनी त्याचे नाव न घेता भर अधिवेशनात खरडपट्टी काढलेली. ह्या वकिलांचाही असाच काहीसा प्रकार झालेला. 

वकील म्हणजे समोरच्याच्या चुकाच काढणारे असतात. वादावादीत कसे जिंकायचे हे ह्यांना चांगले माहीत. समोरच्या व्यक्तीच्या नाड्या ओळखून त्यावर बरीच चर्चा करणे हा तर यांच्या profession चाच एक भाग. त्यामुळेच कदाचित हे वकील त्या भक्ताविषयी वाईट बोलत असावेत. 

या कथेत हेमाडपंतांना सुद्धा मानले पाहिजे. खरेच सॅल्यूट !


१) ह्या कथेत नुसता 'वकील' असा उल्लेख केला आहे. त्यांची बदनामी केली नाही. साईंचे चरित्र करोडो लोक वाचणार आहेत. जर हेमाडपंतांनी त्यांच्या विशेषनामाचा उल्लेख केला असता, तर वकिलांनी जे कथेत केले, तेच हेमाडपंतांनी केले असते.   

२) हेमाडपंतांचे मन खूपच मोठे आहे. साईनाथांच्या निंदेत थोडे सुद्धा सहभागी होते हे ओपनली सांगत आहेत. लपवून ठेवले नाही. crystal clear. आपण प्रत्येक जण  स्वतः किती चांगले आहोत हेच लोकांना दाखवायला आणि सांगायला धडपडत असतो. पण हेमाडपंतांनी आपण कुठे चुकलो हे उघडपणे सांगत आहेत. यामागे त्यांनी जी चूक केली तशी चूक बाकीच्यांनी करू नये हीच त्यांची इच्छा होती. 

हे वकील फक्त साईनाथाची किंवा त्या भक्ताची निंदा करीत नव्हते, तर त्या भक्ताच्या साईनाथावरच्या विश्वासाचीदेखील थट्टा करीत होते. हा साईनाथ अगदी कुठलाही रोग दूर करू शकतो. हाच तो साईनाथ ज्याने शिरडीत महामारी शिरूच दिली नाही. हाच तो साईनाथ ज्याने भिमाजी पाटलाचा क्षयरोग बरा केला. डोळ्यात बिब्बे घालून डोळ्याची सूज नाहीशी केली. एवढेच नाही तर शाम्याच्या अंगातले विष केवळ त्यांच्या शब्दांनी उतरवले. 

.... आणि अशा साईनाथासमोर हे वकील त्यांच्या अकलेचे तारे तोडत होते. बाबावरच्या विश्वासाने जीवनात अनेक चमत्कार घडतात. ह्या विश्वासावरच सारे अवलंबून आहे. ह्याच विश्वासाने चांदोरकरांनी लावलेली मातीही उदीचे काम करू लागली. मग त्या भक्ताच्या विश्वासाने काय त्याचा आजार बरा होणार नाही ? आजाराकरता औषधपाणी हे करायलाच हवे. त्यात काहीच वाद नाही. पण याच औषधाला सद्गुरूकृपेची जोड जर मिळाली तर अशक्याचे शक्य होऊ शकते. हेच त्या वकिलाला समजले नाही.                    


या कथेत आपण काय करावे यापेक्षाही आपण काय करू नये हे कळते. हे ही तितकेच महतवाचे आहे. हे साईचारित म्हणजे एक प्रकारची पाठशाळाच आहे. ज्यामध्ये आपला जीवनविकास होणार आहे. ही साईमाउली आपले बोट धरून आपल्याला शिकवणारच आहे आणि पैलतीरी नेणारच आहे.                         









            






0 comments: