Adhyay 22 (अध्याय २२)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
मिरीकर कथा
प्रत्येक मानवाला सतत एकच चिंता सतावत असते. ती म्हणजे भविष्यकाळाची. पुढे काय वाढून ठेवले आहे हे साईनाथ सोडून कुणीच १०८ % बरोबर सांगू शकत नाही. भविष्यकाळात कुठल्याही मानवाची दृष्टी पोहोचूच शकत नाही. ती ताकद फक्त बाबाचीच. आणि म्हणूनच भविष्यात येणारी संकटे, आपत्ती हा बाबा आधीच जणू शकतो आणि मोठी आई मशीदमाईच्या कृपेने वर्तमानातच ती संकटे निवारण्याची सोयही अगदी लीलया करतो... जशी मिरीकरांची केली.
मग कुणी म्हणेल की ज्योतिषीसुद्धा हे करू शकेल. पण इथे मोठा फरक हा आहे की साईनाथ नुसते भविष्य पाहू शकत नाही, तर ते बदलूही शकतो. हातावरच्या रेषाही अगदी क्षणात बदलणारा हा बाबा. इतकी पॉवर कुणाकडे असणार? मिरीकरांवर सर्परूपी संकट येणार आहे हे बाबांनी आधीच जाणलेले, आणि म्हणूनच आधीच शाम्याला तिथे पाठवून मिरीकरांना सोबत म्हणून धाडले.
पिपा जाणतो हाच निवारा
तारक हा आम्हा ...
मिरीकरांवर नुसते संकट येणार नव्हते, तर गंडांतर / अपमृत्युचा योग होता. अतिशय वाईट आणि तेवढाच काळजाचा थरकाप करणारा शब्द ! पण देव तारी त्याला कोण मारी ? मोठी आई आणि बाबांना मिरीकरांना वाचवायचे असल्यावर साप काय किंवा अजून कोण त्यांच्या भक्ताला कशी हानी पोचवू शकेल ? नाही का ?
बाभूळवनीच्या पायवाटी गालिचा तू मखमली
रणरणत्या वाळवंटी गरूडपंख सावली
असा कसा तूच एक धावणारा
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ...
बाळासाईबांस हा कांहीं । मुळींच उलगडा झाला नाहीं ।
तंव बाबा वदती “आतां पाहीं । द्वारकामाई ती हीचे ॥४७॥
हीच आपुली द्वारकामाता । मशिदीचे या अंकीं बैसतां ।
लेंकुरां देई ती निर्भयता । चिंतेची वार्ता गुरेचि ॥४८॥
मोठी कृपाळू ही मशीदमाई । भोळ्या भाविकांची ही आई ।
कोणी कसाही पडो अपायीं । करील ही ठायींच रक्षण ॥४९॥
एकदां हिचे जो अंकीं बैसला । बेडा तयाचा पार पडला ।
साउलींत हिचे जो पहुडला । तो आरूढला सुखासनीं ॥५०॥
अभय हस्त शिरीं ठेविती । जावया निघती मिरीकर ॥५१॥
द्वारकामाई / मोठी आई :
मोठी आई / मशीद माई. आई, माई आपल्या प्रत्येकाचाच लाडाचा आणि हक्काचा शब्द ! साईनाथांनीसुद्धा "माता, माई" हा शब्द उच्चारला आहे. 'आई' ह्या शब्दातच सारे काही आले. बाकीच्या सगळ्या नात्यांपेक्षा "आई" हे नाते वेगळेच ! एकदम खास !
हा साईनाथ आपला सख्खा बाप. त्या नात्याने ही मोठी आई मशीदमाई म्हणजे आपली आज्जी. आपण सारी नातवंडे तिला दुधावरची साय. 'अति'प्रिय. सारीच लाडाची.
आईच्या कुशीत बाळ जे निजत
ते सदा निश्चिन्त पूर्वा म्हणे ...
आपण जेव्हा आपल्या आईच्या कोषात असतो, तेव्हा अगदी बिनधास्त असतो. अगदी साऱ्या चिंता, काळज्या त्या क्षणी दूर झालेल्या असतात. निर्भयता म्हणजे काय हे जाणवते. काहीही झाले तरी आपली आई आहे ... हा ठाम विश्वास कुठे ना कुठे मनात असतो. मस्त relaxed वाटतं तेव्हा. आईच्या कुशीत सारे काही प्राप्त होते.
तशीच आईची मांडी. प्रत्येकाचीच हक्काची जागा. लहानपणी बाळ असल्यापासून ते मोठे झाल्यावर डोके ठेवायची जागा. चिंता काळज्यांनी ग्रासलेले डोके जेव्हा आईच्या मांडीवर ठेवताक्षणीच स्वर्गसुख लाभल्यासारखे वाटते. सारे काही मिळाले असे वाटते.
जर एक सामान्य मानवी माता तिच्या लेकरांवर एवढे प्रेम करीत असेल, तर मग ही जगत् जननी मोठी आई केवढी माया करीत असेल ! ती तर आदिमाता ! तिचे प्रेम तर तिच्यासारखेच अफाट, अनंत ! आपल्या लेकरांवर आलेले संकट पाहून स्वत: त्याला सामोरे जाणारी, लेकरांवर होणारे घाव स्वतःच्या अंगावर झेलणारी, अगदी कुठल्याही संकटाला आणि अरिष्टाला त्या क्षणी नष्ट करण्याचे सामर्थ्य बाळगणारी, बाळ जरी चुकले तरीही त्याला क्षमा करून त्यावर मायेची आणि कृपेची छाया धरणारी ही केवळ मोठी आईच !
इतुके सोपे जीवन केले
बसल्या जागी देव आले
आपल्याला काय करायचे आहे ? फक्त त्याचे बोट घट्ट पकडायचे आहे. मग आपली जबाबदारी ही आपली न राहाता "त्या"ची होते. तोच आपला भार वाहतो. साईनाथाला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू केले की मोठ्या आईची छाया आपोआपच प्राप्त होते.
आता आपण या कथेतील साईनाथांनी केलेल्या कृतीचा भावार्थ आणि त्यामागील काही महतवाच्या गोष्टी जाणून घेऊया.
१) बाबांना प्रत्येक जीवाबद्दल खडानखडा माहिती असते. त्यांची history, Geography आणि सगळेच पाठ असते. त्यामुळेच बाबा भविष्यात येणारे संकट वर्तमानातच सांगत आहेत. धोक्याची सूचना देत आहेत.
२) बाबांनी नुसती धोक्याची घंटा वाजवली नाही, तर त्याचा ताबडतोप उपायही केला आहे. त्या क्षणी. इतका फास्ट केवळ हा साईनाथच. त्या क्षणी मिरीकरांचे बाबांनी सारे नाथसंविध लिहिले आहे.
३) बाबा अगदी प्रेमाने आणि काळजीने मिरीकरांना समजावून सांगत आहेत आणि धीर देत आहेत. संकट जरी असले, तरी "मी" आहे हे आश्वासित करीत आहेत. सूचितदादांचे "काळजी करू नका" हे वाक्य ज्याप्रमाणे आपल्या मनातील सारे भय,चिंता दूर सारते, तसेच हे बाबांचे वाक्य जाणवते.
कशासी दुःख धरिता तुम्ही
कशासी चिंता करीता
बापू म्हणतो साईनाथ हा
भक्तजनांचा त्राता
४) बाबांनी नुसते भविष्यच नाही सांगितले, तर त्यातील अगदी बारीक गोष्टीही आपल्या हाताने मिरीकरांना दाखवल्या. जणू काही भविष्याचा चित्रपटच मिरीकरांच्या डोळ्यासमोर दाखवला आहे.
५) बाबांनी मिरीकरांसोबत उदीचे संरक्षक कवच आणि आपला हस्त त्यांच्या माथ्यावर ठेऊन त्यांना पूर्णपणे चिंतामुक्त केले आहे.
त्याचा हस्त शिरावरी
कैसी उरेल आता भीती
६) सर्प भेट होणे हा गंडांतराचा योग असतानाही हा साईनाथ स्वतः आपल्या भक्तांचे नाथसंविध ठरवतो आणि अगदी लीलया ते टाळतो.
शब्द ह्याचा खरा
घेई संकटी उडी
तारी भक्त हा आपुला
जरी कोसळल्या दरडी
७) बाळासाहेब मिरीकर हे काकासाहेबांचे चिरंजीव. काकासाहेब हे खरेच श्रेष्ठ भक्त. बाळासाहेब तेव्हा नुकतेच साईभक्तीमार्गात रुळू लागले होते. चिथळीच्या दौऱ्यावर आलेले असताना ते साईदर्शनाला आले. मुद्दाम वेळ काढून ते साईभेटीस आलेले नाहीत. तरीही बाबांनी त्यांना वाचवले.
काकासाहेबांची पुण्याई आणि सेवा भक्ती बाळासाहेबांच्या कामी आले. हा साईबाबा नुसते आपल्या भक्ताचा नाही, तर त्याच्या फ़ॅमिलीमधील प्रत्येकाचाच भार वाहात असतो याचे ही कथा उत्तम उदाहरण आहे.
८) पुढील कथा बाबांना आधीच दिसत असल्यामुळे मिरीकरांना संकंटकाळी सोबत आणि आधार म्हणून माधवरावाना पाठवले. साप मारण्यातही माधवरावांचा नक्कीच हात असणार.
आपल्या जवळ एक श्रद्धावान असणे ही एक प्रकारची positivity च आहे. बाबांनी माधवराव रूपी मिरीकरांना शुभ स्पंदनेच पाठवली आहेत.
त्या काळी आतासारखे दिवे नव्हते. अंधुक प्रकाश असायचा. त्यात रात्री आणि सर्प, विंचू आणि तत्सम पटकन दिसून येणे हे खरेच कठीण. म्हणून एकाशी एक सोबती असावा म्हणूनही बाबांनी शाम्याला चिथळीस पाठवले असावे.
आता आपण माधवराव यांचा ह्या कथेशी असलेला संबंध आणि त्यामागील भावार्थ पाहू.
१) माधवराव, बाबांचा लाडका "शाम्या". आज्ञापालनाचे याची देहि याची डोळा उदाहरण. बाबांनी चिथळीला जा असे सांगितल्याबरोबर ताबडतोब जायला निघाले.
आपल्या प्रत्येकाचे पुढचे प्लान्स ऑलरेडी ठरलेले असतात. त्यात जरा जरी काही चुकले तर लगेचच आपला मूड ऑफ होतो. पण शाम्यासाठी मात्र साई आणि त्यांचा शब्द हीच कायम पहिली प्रायॉरीटी आहे. खरेच ग्रेट !
कथेतील प्रत्येक step ला शाम्या बाबांची आज्ञा घेत आहे. बाबांची आज्ञा म्हणून चिथळीला जायला निघाले, मिरीकरांनी नको म्हंटले ते ही बाबांना येऊन सांगितले. पुन्हा मिरीकर हो बोलले, पुन्हा बाबांची आज्ञा घेतली.
२) मिरीकरांना जसे गंडांतर आहे, त्याप्रमाणेच शाम्यालाही पुढे सर्पदंश होणार आहे हे बाबांना आधीच माहीत आहे. अशा परिस्थीतीत त्यांच्या गाठीशी अधिक पुण्य असावे याकरता मिरीकरांसोबत त्यांच्या जीवघेण्या प्रसंगातून वाचवण्याच्या रूपात त्यांच्यापाशी आधीच पुण्यसंचय करून घेतला ! ह्या पुण्यामुळे पुढे सर्पदंश झालेला असताना शाम्याला खूप मदत मिळाली. बाबांचे प्लॅनिंग ते ! तूफान !
अजून एक महत्तवाचे म्हणजे आपण मिरीकरांप्रमाणेच "बाबाचा शब्द बाकी कुठलाच विचार न करता लगेचच ऐकला पाहिजे" हे विसरून जातो.
पिपा सांगे खास
बात ह्याची ऐका
शब्द ह्याचा ऐका
तोचि निका ..
ह्याचे न ऐकता आपले कर्मस्वातंत्र्य पुढे दामटवणे आणि बुद्धीचा योग्य वापर न करणे हाच साईनाथाच्या भाषेत "टवाळपणा". पण तरीही हा आणि ती मोठी आई आपल्याला टाकत नाही. समजून घेते. शाम्याला मिरीकरांनी जरी स्वतःबरोबर नेले नसते, तरीही ती मोठी आई आणि हा बाबा त्यांच्या मदतीला धावलाच असता.... पण मिरीकरांना "बाबांचे ऐकायला हवे" हे सुचणे हीच त्या मोठ्या आईची कृपा. तीचे आपल्या प्रत्येकावर लक्ष असतेच.
सर्प म्हणजे काय ?
१) सर्प हा नागमोडी वळणे घेत घेत चालतो. हेच ते आपले वाकडे विचार करणारे मन. शंका, कुशंका, कुतर्क, वाईट विचार यांनी खचाखच भरलेले. सर्पासारखे विषारी आणि सतत वाईट आणि वाकडा विचार करणारे. अशा या मनाला ठेचायलाच हवे. बुद्धीचा लगाम घालायलाच हवा. कथेतील माधवराव म्हणजेच बुद्धीचा लगाम. म्हणूनच बाबांनी त्यांना मिरीकरांसोबत पाठवलं होतं.
२) सर्प हा सहसा दृष्टीस पडत नाही. आणि आला तर अचानक समोर येतो. हेच ते आयुष्यात अचानक येणारे भयावह संकट. जीवघेणे. पण बाबा हे आधीच जाणतो आणि भक्तांच्या आयुष्यात बरोबबर fielding लावतो.
३) हा सर्प आपल्या आजूबाजूला असूनही आपल्या लक्षात येत नाही. आवाज न करता, आपल्यालाही पत्ता लागू न देता आपण बेसावध असताना आपल्यावर हल्ला करणारी धूर्त लोकं म्हणजेच हा सर्प. अशांपासून कायम सावध असणे गरजेचे आहे.
४) आपण निर्माण केलेल्या प्रारब्धाचा सर्प असाच आपल्या आयुष्यात डोकावत असतो. आपल्याला छळत असतो. ह्या सर्पाला मारायला हा महागारुडी साईनाथच हवा.
मारित्याप्रेक्षा तारीत्याची ताकद ही नेहेमीच मोठी असते. positivity ही negativity वर नेहेमीच भारी पडते. म्हणूनच मिरीकरांच्या इतक्या जवळ येऊनही साप त्यांचे काहीही वाकडे करू शकला नाही. आयुष्यात अशी सर्परूपी अनेक संकटे येतात. पार हादरवून टाकतात. पण जो ह्या अनिरुद्धाचा आहे तोच तरतो.
अनिरुद्धाचा झाला तो उरला
दूजा दुःखातची रुतला
----------------------------
नाना डेंगळे आणि बुट्टी कथा
सद्गुरू आणि ज्योतिषी मधील फरक आपण वर बघितलाच. नानांनी बुट्टीना नुसती धोक्याची सूचना दिली. धोक्यातून सुखरूप बाहेर येण्याचा मार्ग किंवा तो धोका टाळण्याचा कुठलाच उपाय सांगितला नाही. पण ... साईनाथांनी नुसता धोका ओळ्खलाच नाही, तर त्यावर उपायही केला. अगदी ताबडतोब. त्यांचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. बुट्टी वाचणारच होते.
ज्योतिषीनी सांगितल्यामुळे फक्त बुट्टीच्या मनात भीती आणि चिंता उत्पन्न झाली. बाकी काहीच झाले नाही. पण बाबांच्या आश्वासक आणि धीराच्या शब्दांनी बुट्टींच्या मनातील साऱ्या चिंता त्या क्षणी नष्ट झाल्या. यासाठीच आयुष्यात सद्गुरू हवा. कर्मगतीने गंडांतर येणारच होते. पण जो सद्गुरू छायेत आहे त्याचा सारा योगक्षेम सद्गुरू वाहतात.
अगदी कितीही जरी म्हंटले, तरी ज्योतिषी हा एक सामान्य मानवच. त्याची ताकद आणि भविष्य बघण्याची कला ही मर्यादितच असणार. शिवाय ते कितपत अचूक असेल हे ही सांगता येत नाही. पुन्हा माणूस म्हंटला की त्याच्या मनात कधी काय येईल त्याचाही भरवसा नाही. कदाचित स्वतःचा फायदा साधण्यासाठीही फसवले जाण्याची शक्यता सुद्धा दुर्लक्षित करता येत नाही. पण सद्गुरुंचे सारेच निराळे. नियम हे प्रेमाचेच. खरा सद्गुरू कधीच स्वतःचा फायदा बघत नाही. फक्त भक्तांसाठी, त्यांच्या भल्यासाठी झटत असतो. समोरची व्यक्ती किती संकटात आहे, त्याची काय अवस्था होईल, तो पुढे जगेल वा मरेल याच्याशी ज्योतिषीला काहीच बांधीलकी नसते. परंतु सद्गुरूला प्रत्येक भक्त हा तितकाच आप्तमित्र असल्यामुळे तो स्वतः या सगळ्यात जातीने लक्ष घालत असतो. कारण हा सद्गुरु त्रिविक्रम स्वतःच प्रेमस्वरूप आहे.
इथे साईनाथांनी बापूसाहेबांनी न सांगता देखील त्यांच्या मनातील भीती बरोबर ओळखली आहे. हा साईनाथ सर्वसाक्षी असल्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट याच्या नजरेत येतेच. नानांनी काय सांगितल्यामुळे काय झाले आहे हे त्यांना पक्के ठाऊक आहे. म्हणूनच स्वतःच बाबांनी पुढे येऊन बापूसाहेबांच्या मनातील साऱ्या चिंता दूर सारल्या आहेत.
कोई मुझसे प्यार करे ना करे
वो बेहद प्यार करता है
मै चूप भी रहू तब भी वो मेरी
खामोशी भी पढ लेता है ...
ज्योतिष हे एक शास्त्र आहे. त्यात सांगितलेल्या गोष्टी ह्या खऱ्या असतात की नसतात याबाबत प्रत्येकाची मतमतांतरे असतीलही; पण सद्गुरूचे आपल्या भक्तांवर सदैव लक्ष असते आणि कठीण प्रसंगातून सद्गुरू बाहेर काढतोच. मग कुठचे गंडांतर असो वा नसो.
इथे अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गंडांतरासारखे महाभयानक योग सुद्धा साईनाथाच्या ताकदीपुढे फिकेच. ह्या बाबाने एकदा वाचवायचे ठरवले की अगदी कुणी कितीही षडयंत्र केले तरी त्याचा काहीच फरक पडत नाही.
पुढे ह्या कुयोगाला बापूसाहेबांना सामोरी जावे लागलेच. प्रत्येकालाच असेच आपल्या प्रारब्धाशी लढावे लागते. पण सद्गुरूंची साथ असेल तर हे कुयोग असले तरी मनुष्याची सहीसलामत सुटका होते.
साप म्हंटले की प्रत्येकाचीच फे फे उडते. तशीच बुट्टींचीही उडाली. गंडांतर येणार हे तर माहीत होते. पण सापाच्या रूपात ते येईल असे त्यांच्या मनातही आले नसेल. संकटे ही अशीच घाला घालतात. आपल्या ध्यानीमनीही नसताना हल्ला करतात. बुट्टी शौचाला गेले होते तेव्हाच नेमका हा सर्प आला.
लहानू दगडाने ठेचायला जाणार होता, पण बुट्टीच "काठी आणा" असे बोलले. पण तेवढ्यात तो साप कुठेसा शिरून दिसेनासा झाला. बुट्टींसोबत सापाचेही प्राण वाचले. ह्या साईनाथाला प्रत्येक जीव सामानच. हा ब्रह्माण्डाचा स्वामी आहे. इथे बाबांनी एका दगडात दोन पक्षी मारलेले आढळतात. बुट्टीचे तर गंडांतर टळलेच, पण त्यासोबत सापही मेला नाही. साप मारण्याचे पातकही बुट्टीना लागले नाही. सगळेच सुरळीत झाले.
आपण हिंदी मध्ये "साप भी मरे और लाठी भी ना टुटे" ही कहाणी ऐकली असेल. इथे तर सापही मेला नाही, पळून गेला आणि लाठी तर उगारावीच लागली नाही. संकटाने वार करण्याआधीच पोबारा केला. सुंठीवाचून खोकला गेला. सारेच सुरळीत झाले. हा साईनाथ कित्ती गोष्टीना manage करतो ना ! ग्रेट !
विचार करूया. आपल्याला गंडांतर आहे हे ऐकून किती हादरायला होईल ! पण जर या बाबावर मनात ठाम विश्वास असेल, तर ही चिंता लांब पळून जाते.
माझा बापू बापू हा आसरा
जेव्हा जीव होई घाबरा
शब्द सावळ्याचा खरा
घेई संकटी उडी
तारी भक्त हा आपुला
जरी कोसळल्या दरडी ...
हा साईनाथ किती सहज बोलून गेला ना ... गंडांतर असले तरी तुला काहीच भीती नाही. कुणामध्ये एवढी हिंमत आणि पॉवर आहे असे बोलायची ? ह्या बाबाचा उपाय quick, 108% effective आणि आपण वाचणार ह्याची full guarantee. बापूही मध्ये बोललेले. तुमचा जर विश्वास असेल, तर तुमच्या बाजूला अगदी अणुबॉम्ब जरी फुटला तरी तुम्हाला काहीही होणार नाही !
एवढे आश्वासन आजकाल कोण देणार आहे आपल्याला ?
तुझ्यासारखा तूच देवा
वेळोवेळी संकटातूनी तारीसी मानवा ...
केशवा माधवा ..
----------------------------
अमीर शक्कर कथा
हा साईनाथ आपल्या भक्ताचे चांगले करण्यासाठी अगदी झटत असतो. आपले भले कशात आहे हे त्या भक्ताला जरी कळत नसले, तरी ह्या बाबाला बरोबर माहीत असते... आणि भक्तांचे चांगले करण्यासाठी हा त्या भक्ताला चांगली अद्दलसुद्धा घडवू शकतो. कथेतील अमीर ला तर बाबांनी असा काही धडा दिला की तो उभ्या आयुष्यात विसरणार नव्हता.
... पण यामागे अमीरचा संधीवाताचा त्रास पूर्णपणे जावा हीच इच्छा होती. बघा !साईनाथांची आज्ञा पाळली जावी आणि अमीर संकटमुक्त व्हावा याकरता खुद्द हा बाबाच सगळी खेळी खेळून अमीरच्या डोक्यात प्रकाश पाडत आहे.
बेसिकली सगळे काही हा बाबाच करतो.
१) संकटमुक्त होण्यासाठी मार्ग दाखवतो
२) त्या मार्गावरून आपण चालावे ह्याची काळजी घेतो
३) आणि जर का ही आज्ञा पाळण्यात मध्ये काही विघ्न आलेच, तर ते दूर करण्याचेही काम हा बाबाच करतो !
ह्या साईनाथाने कुणाला वाचवायचे ठरवले की तो माणूस कसाही करून वाचणारच ! अमीर शक्कर सुद्धा त्यातलाच एक.
पहिल्यांदी आपण अमीर बद्दल थोडेसे जाणून घेऊ.
१) नावच बघा. अमीर. नावातच श्रीमंती. आडनाव शक्कर. सुखसमृद्धीचे प्रतीक. एकंदरीतच काहीही कमी नाही.
२) अख्खे कोराळे गाव वंशपरंपरेने ह्याच्या मालकीचे. म्हणजेच कशाचीही कमी नाही.
३) जातीने खाटीक होता. म्हणजेच पशूंना एका झटक्यात / एका घावात बळी देणारे. म्हणजेच सबुरीचा अभाव. सगळे काही लगेच व्हावे ही इच्छा.
४) धंदा दलालीचा. उत्पन्न दुसऱ्या जागी पोचवण्याचे काम. सतत फिरतीचे काम. म्हणजेच चंचलता. एका ठिकाणी टिकून राहणे कठीण.
५) वांद्र्यासारख्या मुंबईतील महत्तवाच्या ठिकाणी वर्चस्व. म्हणजेच धंदा अगदी तेजीत सुरू असावा.
एकंदरीतच खोट काढायला असे काहीच नाही. बाबांचरणी दृढ असल्यामुळेच हे शक्य झाले. ही सारी त्यांचीच कृपा. पण चंद्रावरही डाग असतात. जगी सर्वसुखी असा कोण आहे ... सगळे काही सुरळीत चालू असताना आपली वाईट कर्मे अशी रोगाच्या रूपात आपल्याला भोवतात. मध्ये उगाचच टांग घालतात आणि सुखी जीवनात खोडा आणतात.
जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते, जेव्हा कशाचीच कमी नसते किंवा गरज नसते, तेव्हा कुठे कुणाला देव आठवतो ? माणसाने देवाला नुसती सोन्याची कोंबडी बनवले आहे. एक प्रकारे स्वतः चे काम करवून घेणारा आणि इच्छा पुरवणारा नोकरच केले आहे. जर काम झाले तर आपण सोयीस्कररीत्या त्याला विसरतो.. आणि जर काम नाही झाले की त्यावर रागावतो.
देव तर प्रत्येकाला हवा असतो... ते ही स्वतःचे काम करवून घेण्यासाठी. स्वतः चे दुःख दूर व्हावे याकरता. हा कनवाळू सद्गुरू आपल्याला आपण जसे आहोत तसे accept करतो ! आपले लाड पुरवतो.
कुंतीने भगवंताकडे दुःखच मागितले. का? तर त्याची आठवण राहावी याकरता. आज बापूनी मंत्रगजर दिला आहे, नित्य उपासना करायला सांगितली आहे. नित्य म्हणजे काय ? तर रोजची उपासना. माझ्या आयुष्यात दुःख आहे किंवा आनंद आहे यावर त्याला आठवायची आता गरजच नाही. सकाळी उठल्यावर ज्याप्रमाणे आपण दात घासतो अगदी त्याप्रमाणेच ह्या नित्य उपासनेची आपल्याला सवयच लागली आहे. म्हणूनच त्याला आठवायला आता दुःख कशाला हवे ?
आणि हा भगवंत कुणी परका आहे का ? हा आपला बाप आहे. ह्याच्याकडे "हक से मांगो". आपण आपल्या आईबापाकडे जसे हक्काने काही मागतो, तसेच ह्याच्याकडे मागूया. आणि ह्या बाबाचे नाम एकदा का आपल्या मुखात बसले की दुःख टिकेलच कसे ? नाही का ?
अमीरला संधीवात झाल्यावर बाबा आठवला. तो आधीपासूनच बाबांचा भक्त होता. फक्त ह्या संधीवातामुळे त्याला बाबांची सहवास आणि कृपा लाभली. बघा ! आपल्या वाईट प्रारब्धाने संकट येणारच होते, पण त्या संकटातही बाबांनी त्याला केवढे benefits दिले ! हे केवळ हा बाबाच करू शकतो.
संधीवात म्हणजे सोप्या शब्दात joint pains. ह्या आजारासाठी सांध्यांची हालचाल न होणे हे अधिक लाभदायी असते. हा बाबा एक प्रख्यात डॉक्टरही आहे. शरीराचाच नाही, तर मनाचाही. "चावडीत जाऊन स्वस्थ बसावे"... बाबांचे शब्द. इथे "स्वस्थ" हा शब्द महत्तवाचा वाटतो. निवांत बैस (शरीरासाठी) आणि निश्चिन्त होऊन बैस (मनासाठी) हाच त्यामागील अर्थ.
आता आपण चावडीतील सारे वर्णन आणि मानवी मन यांचे साम्य पाहू.
चावडीचे वर्णन | मानवी मनाशी साधर्म्य |
---|---|
प्राचीन | भूतकाळातील आठवणीत रमत असते |
खाली वर मोडकी - तुटकी | सतत जुन्या आणि कटू आठवणींमुळे निराश आणि मोडके झालेले असते. भविष्यकाळातील चिंता |
सरडे, साप, विंचू, पाली मन मानेल तसे वावरत असत | मनातील अनेक विषारी वाईट विचार, कुशंका, कुतर्क. सरडा - रंग बदलून फसवण्याची वृत्ती साप - विषारी दुराग्रह विंचू - दुसऱ्याला डंख मारण्याची प्रवृत्ती पाल - दुसऱ्याचे मन कलुषित करणे मन मानेल तसे वागणे - स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार |
माहाव्याधीचे, रक्तपितीचे रोगी आणि कुत्री तेथील उष्टे अन्न खात बसलेली असत | दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, अहित चिंतणे आयते कसे मिळवता येईल हा विचार |
गुडघ्यापर्यंत भरलेला कचरा | मनातील अढी |
भिंतीला सतराशे भोके पडली होती | मनावर झालेल्या जखमा |
कुणी कुत्राही चावडीला विचारत नव्हता | एकाकी पडलेले मन - नैराश्य |
आयुष्यातला फुकट हेलपाटा | अपयशाने खचून गेलेले मन |
वरून पाऊस, खालून ओल | मनाला स्वस्थता नाही, बेचैन झालेले मन |
जागा उंच नीच खळग्याची | मनात साठवलेले आयुष्यातील चढ उतार |
वारा थंडीचा एकाच कल्लोळ | गारठलेले मन - भीती |
.... आणि अशाच ठिकाणी हा साईनाथ एक दिवसाआड झोपायला येत असे. का ? ह्या अशा अशांत मनाला सामर्थ्य देण्यासाठी, उभारी देण्यासाठी, पवित्र स्पंदने रुजवण्यासाठी. परंतु आपल्याच चंचल मनाला ह्या साईनाथाचा (बुद्धीचा) interference नको असतो.
कवाडे बंद होती चारी बाजूला
तरी कसा बापू माझा येतांचि राहिला ...
तरीही हा बाबा सतत आपल्या प्रेमापोटी येत असतो... आपल्या आयुष्यात आनंद भरण्यासाठी ! पण अमीर प्रमाणे आपल्यालाच ते कळत नाही... आणि आपण कधी एकदा हे बंधन मोडतो असे आपल्याला होते.
ह्या चावडीमध्ये बाबा एक दिवस आड झोपायला जात असत. इथेच अमीरला बराच वेळ बाबांचा प्रत्यक्ष निकट सहवास, त्यांचे विनासायास पुष्कळ वेळा दर्शन मिळणार होते. बाबांच्या स्पंदनात, त्यांच्या सहवासात कोणता रोग बरा होऊ शकणार नाही ? संधीवाताचा ह्याखेरीज रामबाण इलाज तो कोणता ?
खरे म्हणजे अमीरला अशा वातावरणाची अजिबात सवय नव्हती. आलिशान फ्लॅट मध्ये राहिलेल्या अमीर माणसाला जेव्हा एखाद्या झोपडपट्टीत राहायला दिले तर कसे होईल ... तशीच ह्या 'अमीर' ची अवस्था झाली होती. स्वच्छंदी पक्ष्याला पिंजऱ्यात अडकवले तर दुसरे काय होणार ! पण बाबांची उलटी खूण. सुजलेल्या डोळ्यात बिब्बे घालायला सांगितले ! ह्या बाबांचा शब्द हेच रामबाण औषध.
मातृवात्सल्य विन्दानम मध्ये ब्रह्मदेवाचे उदाहरण आपण बघतो. कमळात राहायचे बंधन वाटत होते. पण खरे तेच त्याचे सुरक्षाकवच होते. त्याला मिळालेली आज्ञा. ती त्याने मोडली आणि मधू कैटभ जन्माला आले. अमीरलाही आज्ञा मोडल्याची चांगली अद्दल घडली. ब्रह्मदेवाला जसे समजले आणि त्याने महाविष्णूचा धावा केला... मग शेवटी महाविष्णूलाच धावत यावे लागले आणि महाकालीच्या कृपेने दैत्यांना हरवले आणि ब्रह्मदेव सुटला. अमीरनेही भयानक अनुभव आल्यावर बाबांचाच धावा केला. आज्ञापालन हेच कसे श्रेयस्कर आहे हे त्याला अगदी पटले.
अमीरच्या मनातील भीती पुढे खरी ठरली नाही. जो तहानलेला फकीर मेला तो बाबांनीच उभा केलेला. आमीरला स्वतःची चूक कळावी याकरताच. बाबांना अमीरचा रोग जावा असे मनापासून वाटत होते. म्हणूनच आमीरने आज्ञापालन करावे असे त्यांना मनापासून वाटत होते.
... आणि या आज्ञापालनाच्या जे जे आड आले ते ते बाबांनी ठेचलेच. उदाहरण म्हणजे चावडीत अमीरच्या उशाशी आलेला तो साप. बाबा जर ओरडले नसते, तर आमीरच्या मानेला तो नक्की डसला असता. अंधारातही साप आलेला बाबांनी अचूक हेरले. एवढेच नाही, तर साप तेथे असताना अमीरच्या बरोबर स्वत: तिथे झोपले. खुद्द बाबा तिथे असताना कोणत्या सापाची बिशाद तो अमीरला हानी पोचवेल !
मनामध्ये वसे ज्याच्या अनिरुद्ध राम
चोहो बाजू रक्षा करी अनिरुद्ध राम
ह्या संधीवातावर इलाज सांगताना बाबांनी ९ महिने चावडीत स्वस्थ बसायला सांगितले. बाबा जे सांगतात त्याला नक्कीच काहीतरी अर्थ असणार ! एक माता ज्याप्रमाणे ९ महिने आपला गर्भ पोटात वाढवते, त्याला सर्वबाजूने जपते, त्याचे भरण पोषण करते तसेच बाबांनी अमीरला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जपले, त्याचा रोग समूळ नष्ट केला.
बघायला गेले तर अमीरला आधीच बाबा माहीत होता, त्याची ताकद माहीत होती, परंतु सुखासुखी सारे मिळाल्यावर हा बाबा कुठे आठवतो ? काहीतरी संकट, अडचण आल्यावरच हा आठवतो. साईमाउली ते ही accept करते. भक्ताला अडचणीतून बाहेर काढते. ह्या कथेतून नित्य उपासनेचे महत्व समजते. त्याची गरज समजते.
आज लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट उभे आहे. अमीरप्रमाणे आपण सारेच quarantine झालो आहोत. गेले कित्येक महिने. तरीही हा बापू रोज अनिरुद्ध टीव्ही मार्फत भेटतो. आपली काळजी वाहतो. आपली आठवण काढतो. अगदी कितीही कठीण काळ आला तरी आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात बापू रामराज्य आणणारच ! नक्कीच !
----------------------------
हेमाडपंत - विंचू कथा
ह्या कथेची सुरुवातच मुळी हनुमंताच्या कथेने होते. ह्या राम म्हणजेच शक्तीचा मूळ स्रोत ! हनुमंत रामाच्या ताकदीची परीक्षा घ्यायला गेला. रामाच्या नुसत्या बाणांच्या पिसांचा वारा हनुमंतास आकाशात गरागरा फिरवू लागला ! म्हणजेच या रामामध्ये किती ताकद आहे याचा अंदाज या कथेतून लागतो. हा साई म्हणजेच राम. दोघेही एकच.
ही कथा ज्याअर्थी कथन केली जात आहे त्याअर्थी नक्कीच त्यामागे काहीतरी अर्थ असणार. ह्या कथेद्वारे सांगितलेला उपदेश (रामनामाची ताकद किती हे) हेमाडपंतांनी प्रत्यक्ष तिथल्या तिथे अनुभवला. कसा ?
१) रामनामामध्ये एवढी ताकद आहे की तो विंचू (डंख मारणारा, समोरच्याला अजिबात न सोडणारा) सुद्धा स्वस्थ बसला होता. स्वतःच्या प्रवृत्तीच्या विरोधी वागत होता.
२) ही कथा म्हणजेच रामाचे गुणसंकीर्तन ! आणि ह्याची ताकद एवढी अफाट आहे की विंचूसुद्धा हेमाडपंतांना काहीही इजा पोचवू शकला नाही.
हाच तो कृष्णाचा वेणूनाद. हा ऐकताना भान हरपायला नाही झाले तर नवलच.
तृणचारा चारू विसरली
गायी व्याघ्र एकेठायी झाली
पक्षीकुळे निवांत राहिली
स्वैरभाव समूळ विसरली ...
३) आपल्या खांद्यावर एक भयंकर विंचू विराजमान झाला आहे हे त्यांच्या लक्षात आणून देणारे हे रामनामच. नाहीतर कथा ऐकण्यात गुंग झालेल्या हेमाडपंतांना ते कधीच लक्षात आले नसते.
४) ही कथा रामनामाची ताकद लक्षात आणून देणारी होती. त्या साईरामावर, त्याच्या ताकदीवर विश्वास ठेवला की महाभयंकर विंचूही काहीही बिघडवू शकत नाही हा दिलासा आधीच हेमाडपंतांना मिळाला. आणि म्हणूनच पुढे आपल्या खांद्यावर विंचू आहे हे लक्षात आल्यावर एकदम घाबरुन न जाता त्यांनी धीराने आणि साईरामाच्या विश्वासाने पुढील पाऊले उचलली.
५) ह्या कथेत हनुमंत रामाची ताकद बघायला, त्याची परीक्षा घ्यायला गेला. आणि फसला. हेमाडपंत सुद्धा "माझा बाबा आहे. मग खांद्यावर विंचू जरी बसला तरी तो बघून घेईल.. मी काहीच करणार नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असे म्हणाले असते तर कसे चालले असते ? म्हणूनच विंचवाचे विघ्न यायच्या आधीच नक्की काय करायला हवे हे हेमाडपंतांना या चाललेल्या कथेमुळे समजले.
६) हा राम कोण हे प्रत्येक जीवाला समजतेच. कारण शेवटी तोच त्यांचा बाप असतो. ते उपजतच असते ! ह्या विंचवालाही ही रामकथा बरोबर समजली आहे. म्हणूनच तो खूप शांत बसून आहे.
पुढे मरणासन्न वाघाच्या कथेतही हा साई कोण हे त्या वाघाला बरोब्बर समजले आहे. म्हणूनच बाबांसमोरही तो वाघ स्वस्थ बसलेला आहे. आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो. पोपटही रामा रामा ... या मंत्रगजरावर किती सुरेख डोलत असलेला आपण पहातो. हे तो का करतो ? त्याला राम कोण आहे हे कुणी समजावले आहे का ? पण त्याला ते उपजतच माहीत आहे. सारे सजीव हे "त्या"च्या आज्ञेतच असतात याचाच ह्या कथा दाखला आहेत.
... आणि म्हणूनच ही रामकथा मूळ कथेच्या सुरुवातीला सांगितली गेली आहेत असे वाटते. घडणारी प्रत्येक गोष्ट ही नाथसंविधच असते !
हेमाडपंतांना पण सॅल्यूट ! एवढा मोठा विंचू माझ्या खांद्यावर बसला असता तर मी तर त्या क्षणी थयथयाट केला असता. एवढा संयम आणि धीर फक्त हेमाडपंतासारख्या श्रेष्ठ भक्ताकडेच असू शकते.
आधी झालेल्या सापाच्या कथेमुळे साईनाथांनी विंचू, साप यांना मारू नये असे सांगितल्यामुळे हेमाडपंतांनी त्या विंचवाला मारले नाही. बेसिकली प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसारच वागतो. विंचू डंख मारणारच. साप हा डसणारच. त्यांना मानवाएवढी बुद्धी नाही. म्हणूनच आपणच स्वतः नेहमी सतर्क राहायला हवे.
प्रत्येक जीव स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि प्राण वाचवायला कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण जिथे खरोखरीच गरज नाही, तिथे अशा प्राण्यांना कशाला मारून टाकायचे ?
आपल्या आयुष्यातही अशीच अनेक संकटे दबा धरून बसलेली असतात. आणि अचानक, आपण बेसावध असताना अलगद येऊन आपल्यावर घाला घालतात. आणि म्हणूनच कायम सभानता हवी. नेहेमी रामभरोसे राहून स्वतः काहीही न काळजी घेता बसणे हे देखील चुकीचेच. बाहेर कोरोना असतानाही आवश्यक ती काळजी ना घेता बिनधास्त बापू आहे म्हणून हिंडणे हे चुकीचेच.
हा बाबा सदैव आपल्या सोबत कायम आहेच. no doubt ! म्हणूनच संकट आले तरी आपल्याला हिमंत येते. ती ही हा बापूच पुरवतो. आज प्रत्येक संकटात हा बापू हाच आपला आधार आहे. सारे काही बापू भरोसेच. हा सदैव भक्त रक्षणासाठी तत्पर आहे.
असा कसा तूच एक धावणारा
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ...
----------------------------
0 comments:
Post a Comment