Adhyay 23 (अध्याय २३)

11:05:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 





योगाभ्यासीची कथा  


जास्त शिकलेला किंवा ज्ञान असणारा प्रत्येक मानव स्वतःला ग्रेट समजत असतो. फक्त स्वतःलाच काय ते कळतं, मीच काय तो शहाणा याच अविर्भावात प्रत्येकी जण वावरत असतो. कथेतील योगाभ्यासी सुद्धा तसाच. योगशास्त्राचा मुळापासून अभ्यास केला असल्याने नाही म्हंटलं तरी थोडा का होईना अहंकार मानवात शिरतोच. आपोआपच. त्याच्याही नकळतच. म्हणूनच एक क्षणही त्यांना समाधी साधली जात नव्हती. यासाठीच साईनाथांचे नाव, त्यांची कीर्ती ऐकून ते बाबांकडे आले होते. 

ते जेव्हा गेले तेव्हा बाबा कांदा भाकर खाताना दिसले. योगाभ्यासात कांद्याला वर्ज्य मानले जाते. कारण कांदा हा तामसी वृत्ती उत्पन्न करतो. म्हणजेच बुद्धीचे जडत्व, आळस निर्माण करतो. बाबांना नेमके तेच खाताना योगाभ्यासीने पाहिले. म्हणूनच पाहताक्षणीच त्यांना वाटले की हा बाबा काय माझी शंका सोडावणार ? 

म्हणजेच बाबांना तो एक सामान्य मानवच समजला. आणि इथेच चुकला. हा साई म्हणजेच मूळ ज्ञान. त्याला सारेच येत असणार. योगशास्त्राचे कुठलेही नियम ह्याला लागूच होऊ शकत नाहीत. तो ह्या साऱ्या पलीकडे आहे. आपण सामान्य आहोत म्हणून तो आपल्यासाठी सामान्य बनून येतो. हा त्याचा मोठेपणा आहे. पण आपणच त्याला लहान समजतो.            

हा बाबा योगाभ्यासाच्या अंतिम पायरीच्याही वर विराजमान असणारा आहे. योगाभ्यासात अति उच्च टप्प्यात असणाराच हा कांदा पचवू शकतो. त्याला ह्या कांद्याचा शरीरावर आणि मनावर काहीच परिणाम होत नाही. हा बाबा तर त्यावर आहे. म्हणूनच योगाभ्यासीच्या मनातील शंका ओळखून बाबा म्हणाले आहेत की "कांदा ज्याला पचेल त्यानेच तो खावा". हे ऐकून तर योगाभ्यासी चमकलाच ! पुरता ओशाळला ! 

बाबा असा काही अनुभव देतात ना .. समोरचा नुसता चकीतच होत नाही तर साईप्रेमात पडतो. त्या क्षणी हा योगाभ्यासी धन्य झाला. 





-----------------             





शाम्या - सर्पदंश कथा 



आपण साईचरित्रात बाबांच्या अनेक लीला वाचतो. अगदी आपल्या कल्पनेच्याही  पलीकडील मार्गांनी हा बाबा आपल्या भक्तांना वाचवतो. ह्या बाबाची पंचमहाभूतांवरची सत्ता तर आहेच. ११ व्या अध्यायात आपण वाचेलच ! पण ही कथा वाचून हे ही कळले की ह्याचा अंगातील विषावरही control आहे ! शब्दच नाहीत ! मातृवात्सल्य उपनिषदात लिहिल्याप्रमाणे ही आदिमाता अक्षरश: काहीही करू शकते ! तसाच तिचा हा पुत्र. 

माझा बापू बापू हा आसरा 
जेव्हा जीव होई ... जीव होई घाबरा 

शब्द सावळ्याच्या खरा 
घेई संकटी उडी 
तारी भक्त हा आपुला 
जरी कोसळल्या दरडी ... 

कोणच्या बापात एवढी ताकद आहे सांगा ! विषालादेखील ह्याचे ऐकावेच लागले ! रामायणामध्ये समुद्रावर सेतू बांधताना समुद्रालाही रामाचा शब्द ऐकावाच लागला. हा शेवटी ह्या विश्वाचा राजा आहे. सारेच ह्याच्या आज्ञेत. फक्त आपणच अतिशहाणे, की ह्याची आज्ञा मोडायचे धाडस करतो... आपल्या कर्मस्वातंत्र्याच्या दुरुपयोगाने. 

आयुष्याच्या संध्याकाळीच अशी भयानक संकटे आपल्यावर अचानकपणे घाला घालतात. तेव्हाच आपली ताकद क्षीण झालेली असते, संकटांना तोंड द्यायची शक्ती नसते. अशी ही नेमकी वेळ साधून ही संकटे दबा धरून बसून आपल्याला वाईट तडाखा देतात. आणि विष हे इतके भयानक आहे की माणसाला डोळ्यासमोर मृत्यू दिसतो. म्हणजेच संकटाची तीव्रता इतकी असते की त्यातून सहीसलामत सुटण्याचा काहीच मार्ग दिसत नाही....  आणि अशा काळाच्या तडाख्यातून केवळ हा बाबाच तारू शकतो. बाकी कुणीच नाही. कारण त्याच्याकडेच काळालाही नामवायची ताकद असते.  

११ व्या अध्यायात जेव्हा ढगफुटी झालेली तेव्हा शिरडीला साईनाथांखेरीज कुणीच वाचवू शकले नाही. शाम्याला हे बरोबर माहिती आहे. आणि म्हणूनच तो पहिला बाबांकडे धावला. आपल्याला काहीही जरी का झाले असेना... मग ती छोट्यातील छोटी गोष्ट असो वा मोठ्यातली मोठी... आपली पहिली धाव सूचितदादांकडेच असते. दादांकडे जाऊन आल्यावर आपला जीव भांड्यात पडतो.

पिपा जाणतो हाच निवारा 
तारक हा आम्हा ... 
आमुचा एकचि जीवनत्राता ... 

संकटाच्या वेळी प्रत्येक जण साथ सोडतो. फक्त हा बाबाच खरा सोबती. पण वरवर दिसता ही कथा वाचून ह्या साईने पण पाठ सोडली की काय ... असेच वाचणाऱ्याला वाटेल. पण हा आपली साथ कधीच सोडत नाही. ह्या साईला "का?" विचारणे हा तर आपला अगदी फेव्हरेट प्रश्न. पुष्कळ वेळा असं होतं. मनातल्या प्रश्नांची काहीही केल्या उत्तरच मिळत नाहीत. "असे का झालं?" ह्या प्रश्नाला बहुतांश वेळा त्या क्षणी आपल्या कुणाकडेच उत्तर नसते. पण मग हळूहळू आपल्या लक्षात येतं. मग वाटतं ... अरे मी ह्या साईला असे विचारायला नको होते. शाम्यासारखा एवढा श्रेष्ठ भक्त समजू शकला नाही. मग आपण तर किती सामान्य ! आपली काय कथा ?       

म्हणजेच काय तर हा साई जे काही करतो त्यात बराच गहन अर्थ दडलेला असतो. पहिल्यांदा कुणालाच काहीच समजत नाही. पण वेळ आल्यावर सारे स्वच्छ पाण्यासारखे पारदर्शक होते. हा बाबा जेव्हा गहू दळायला बसलेला तेव्हा आधी कुणालाच काहीच समजेना ... ह्यामागे नेमके कारण तरी काय असावे ? पण नंतर ह्या गहुंदळणरूपी सुदर्शन चक्राची ताकद सार्याना समजली. 

आपल्या कथेतही "चल निघ जा खाली उत्तर" असे बाबा नक्की कुणाला बोलले हे सर्वांना नंतर कळले. म्हणजेच काय, तर हा बाबा जे जे म्हणून करतो ते ते योग्यच असते.. आणि म्हणूनच या बाबावर पूर्ण विश्वास ठेऊन सबुरी धरायला हवी. हेच या कथेचे सार आहे. 

पिपा सांगे खास बात ह्याची ऐका
शब्द ह्याचा ऐका तोचि निका 

ह्या बाबाचा प्रत्येक शब्द हा मंत्रच असतो. त्या मंत्राची ताकदच एवढी अफाट असते की बाकी कुणाचेच काहीच चालत नाही. विषालाही खाली यावेच लागले. प्रॅक्टिकल बुक मध्ये अजून काही महतवाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्या जरूर वाचायला हव्यात. त्यामुळे हा मुद्दा अधिक छान कळू शकेल. 

शाम्या हा बाबांचा लाडका भक्त. भयंकर संकट जेव्हा येते तेव्हा सारेच घाबरतात. त्या मनाच्या नाजूक अवस्थेमुळेच बाबाच्या बोलण्याच्या नेमका अर्थ त्याच्या लक्षात आला नाही. एवढा विचार करायची त्याची अवस्थाच नव्हती. बाबा आपल्या प्रत्येकाच्याच मनातले ओळखतो. हाच आपली मनस्थिती समजू शकतो. म्हणूनच नंतर अगदी प्रेमाने बाबा शाम्याला समजावून सांगत आहेत आणि एक प्रकारे धीर देत आहेत.        

ह्या बाबाला तर आपल्यापेक्षाही जास्त आपली काळजी असते. अंगात विष भिनू नये म्हणून बाबांनी शाम्याला रात्री निजू दिले नाही. आणि आश्चर्य म्हणजे शाम्या वाचला. काळाची झडप बाबांनी अगदी दूर भिरकावून दिली आणि शाम्याला जीवनदान दिले. कृतांताच्या दाढेतून शाम्याला ओढून काढले. खरेच ग्रेट !

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात हा प्रारब्धरूपी साप फणा काढून उभा असतो. आणि आपल्याही नकळत आपल्याला डसतो. अगदी होत्याचे नव्हते करून टाकतो. पण हा बाबा आणि मशीदमाईच्या छायेत असणाऱ्यांना काहीच भय नाही. कारण हा अनिरुद्ध राम जीवनातील रावणाला मारतोच आणि रामराज्य येतेच ! १०८ %


    

-----------------             






काकासाहेब दीक्षित - बोकड कापायची कथा




रस्ता नही आसान 
देना पडता है इम्तिहान 
चाहे कुछ भी हो अंजाम ... 

भक्ती ही जितकी करायला सोप्पी, पण भक्तिमार्गात प्रगतीपथावर राहणे हे तितकेच कठीण असते. म्हणूनच तिला बाभूळवनीची वाट असे म्हंटले आहे. सद्गुरू भक्तांची परीक्षा घेतात. अर्थात ते ही त्यांच्याच प्रगतीसाठीच. हिऱ्याला पैलू पाडायला त्याला अनेक यातनांतून जावे लागते. तेव्हाच त्याचा "हिरा" बनतो. ह्या बाबाला आपल्या प्रत्येक भक्ताला एक एक "हिरा" झालेला बघायचे आहे. म्हणूनच ते भक्तांची कठीणातील कठीण परीक्षा घेतात. तेव्हाच त्या भक्ताचा खरा चेहेरा समजतो.               

गोष्ट सुरू होते ती एका बोकडापासून. अगदी मरणासन्न झालेला. मशीदमाईच्या छायेखाली आला. ही मोठी आई अगदी प्रत्येकाचा आसरा आहे. हा साई आणि त्याची आई ही अवघ्या विश्वाचा आधार आहे. ती कधीच कुणालाही टाकत नाही. 

मग जरी ... 
- आपली शक्ती ह्या बोकडाप्रमाणे संपली       
- प्रारब्धाच्या ओझ्यामुळे आपण पूर्ण थकलो 
- ह्या संकटांची तीव्रता इतकी आहे की आपण सहन करू शकत नाही 
- आता काहीच करायची ताकद नाही आणि कुठे मार्ग सापडत नाही 

... अशा वेळेस हा बाबाच आपला आसरा .. 

आपल्या प्रत्येकाची अवस्था कधी ना कधी ह्या बोकडाप्रमाणे होते. अगदीच हीनदीन. ज्याचे कुणी नाही त्याचा हा बाबा आहे. वृद्धापकाळ हा कुणालाच नको असतो. म्हातारा माणूस ही एक घरातील अडगळ होते. थोडक्यात ह्या बोकडाप्रमाणेच "useless" अशी त्यांची गणती केली जाते. अशा वेळेस हा बाबाच आपली काठी, वाली असतो. 

ह्या बोकडाचे पण भाग्य थोर म्हणावे लागेल. मरताना खुद्द बाबांच्या प्रत्यक्ष सहवासात पुढील जन्म मिळणार आहे. एवढेच नाही, तर बाबांच्या इच्छेने पुढील जन्म प्राप्त होणार आहे. बाबांच्या आज्ञेने उचित गती मिळणार आहे. एवढे सारे लाभ त्या बोकडाला मिळणार आहेत.... केवळ ह्या मशीदमाईच्या आश्रयाला आला आहे यासाठी ! आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी जरी ह्या मशीदमाईच्या छत्राखाली आले, तरीही जीवनाचे कसे सोने होते .. ते हे असे !

ह्या बोकडाचे जसे महतभाग्य .. त्याउलट कथेतील काही जणं खरेच अभागीच म्हणावे लागतील. बडेबाबा ... बाबांचे एवढे लाडके असूनही बाबांची आज्ञा पाळायची बुद्धी होत नाही. बाबांची आज्ञा कुणा ऐऱ्यागैऱ्याला प्राप्त होत नाही. बाबांनी एवढा मान देऊनही बोकडाला मारायला सबब काढली. तरी जातीने मुसलमान, म्हणजे धर्मानुसार बोकड कापायची सवय असणारच. तरीही त्यांनी पळ काढला. पण दीक्षित, जातीने ब्राह्मण. आधी कधी बोकड कापायचा दूरच, बोकड दुरून जरी दिसला तरी वाट बदलणारे. तरीही बाबांची आज्ञा फुलाप्रमाणे झेलली. आणि ती पण आनंदाने. वैतागून आणि दुःखी होऊन नाही.           

जातीने ब्राह्मण म्हंटले की जन्मापासूनच सोबत असलेल्या "शाकाहारी"पणा मुळे कुठल्याही जीवाची हत्या करताना हात जरा धास्तावतोच. सवयच नसते. "कुणा प्राण्याला मारायचे" हा विचारच मनाला रुचत नाही आणि तशी कृती घडणे हे केवळ दुरापास्तच. दीक्षितांना सांगण्याआधी बाबांनी माधवरावाना सुरा आणायला पाठवले. पण भविष्य आधीच ओळखून ते आलेच नाहीत. वास्तविक माधवरावही ब्राह्मणच. त्यांनाही दीक्षितांएवढेच बोकड कापणे जीवावर आले होते. पण ते ही इथे मागे हटताना पाहायला मिळाले.        

आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. बाबांचे श्रेष्ठ भक्त म्हंटले म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणारच. दीक्षितांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साई राम असे उगाचच म्हंटलेले नाही. त्यासाठी बऱ्याच परीक्षांमधून जावे लागलेले असते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. 

आज्ञापालनाचे जागते उदाहरण म्हणजे ही कथा. खरेच ग्रेट ! साईनाथांसाठी, त्यांच्या आज्ञापालनासाठी स्वतःच्या सवयीच्या आणि comfort zone च्या बाहेर येऊन झोकून देऊन आणि स्वतःला विसरून कार्य करणे ही फार मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनाच असे करायला जमू शकत नाही. त्यासाठी ह्या बाबावर अफाट प्रेम असावे लागते. तेव्हाच हे शक्य होऊ शकते. 

दीक्षित हे एक लखलखते सोने होते. केवळ बाबासारखे असली जोहरीच हे ओळखू शकतात. प्रत्येक जण काय आहे हे केवळ हा बाबाच जणू शकतो. आणि म्हणूनच दीक्षितांची परीक्षा घेतली आहे. 

हा बाबा पण एक मोठा बनिया आहे. दारी आलेल्या बोकडाचाही योग्य वापर केला. दीक्षितांची परीक्षा घेतली. प्रत्येक संधीचे सोने केवळ हा बाबाच करू शकतो. 

बोकड तर मरणारच होते. शेवटी तर त्याला न मारताच ते मेले. त्यालाही वेदना नाहीत, परीक्षा घेण्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली. साप भी मरे और लाठी भी ना टूटे ... एका दगडात दोन पक्षी मारणे हे बाबाखेरीज चांगले कुणाला जमणार !              

हा बाबासुद्धा लोण्याहून मऊ आहे. आपल्या प्रत्येकाचे ह्रदय समजून घेतो. बाबांना काय दीक्षितांच्या मनावर काय परिस्थिती ओढावली असेल हे माहीत नसेल ? नक्कीच माहीत आहे. पण तरीही हा भक्तांच्या अध्यात्मिक प्रगतीसाठीच हे सारे करतो. स्वतःच्या मनावर दगड ठेऊन निर्णय घेतो. मुलाला पोहणे शिकवायचे असेल तर प्रत्येक बाप आपल्या मनावर दगड ठेऊन मुलाला खोल पाण्यात ढकलतो. तेव्हाच पाण्याशी झुंज देत देत तो मुलगा पोहायला शिकतो. खोल पाण्यात माझ्या बापाने मला का ढकलले हे केवळ आपल्या बापावर पूर्ण विश्वास असलेला मुलगाच जणू शकतो. म्हणूनच पाण्यात पडल्यावरही पोहण्याचे आव्हान पेलायचा प्रयास करतो.          
               
शेवटी एवढेच वाटते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे मोहरूपी बोकड येते. लोभ आणि हाव सुटता सुटत नाही. त्याला कापायला जमत नाही. साईनाथाच्या इच्छेपुढेही आपल्याला मोहाला दूर सारणे जमत नाही. इथेच दीक्षित आपल्याला खूप काही शिकवतात. त्यांचा आदर्श ठेऊया.         

साजरं दिसतं लोभाचं जाळं 
मासळीला कळना आलाया काळ 
सोताच्या पापाची तुटेना नाळ .... 



 
    







 













       

             





0 comments: