Adhyay 37 (अध्याय ३७)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
चावडी वर्णन भावार्थ
अख्ख्या ३७ व्या अध्यायात चावडीचे अगदी डीटेल मध्ये सुरेख वर्णन केले आहे. एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहावा इतके सगळे बारकावे त्यात मांडले आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा नक्कीच काहीतरी अर्थ-भावार्थ असणार. परंतु इतक्या साऱ्या वर्णनातील एकेका पैलूबद्दल लिहिणे माझ्या अल्प बुद्धीला शक्य नाही. म्हणूनच ह्या साऱ्याचा एक टॉप व्ह्यू किंवा ओव्हरऑल भावार्थ जसा जमेल तसा लिहायचा प्रयास केला आहे.
अगदी खूप पूर्वीचे दिवस आठवले. दादर मधला पालखी सोहळा जितका लक्षात आहे तितका पुन्हा डोळ्यासमोरून सरकला. सगळीकडे जल्लोष, उत्साह, आनंदी आनंदाची उधळण. डोळ्याला दुसरे काहीच दिसू नये, कानांनी हरिनामाच्या गजराशिवाय काहीच ऐकू नये, मुखाने फक्त त्याचे नाम घ्यावे बास. थोडक्यात बेधुंद होणे म्हणजे काय तेच.
बापू बापू उल्हासें
निघे पालखी बापूंची
ध्वजमाळा नी तोरणे
चिपळ्या झांजा वाजती ....
हे अख्खे गाणे म्हणजेच ती चावडीची मिरवणूक, असे मला वाटते. भक्तीभाव चैतन्याच्या लहरींवर लहरी अंगावर याव्यात आणि आपले बाहेरच्या जगाशी भान सुटावे.. अशीच ती अवस्था असते. पावसाच्या सरी जेव्हा डोळे मिटून आपण मुखावर तुषार झेलावेत, तसेच.
हा सारा सोहळा म्हणजेच पवित्र स्पंदने आणि पॉझिटीव्हीटीचा डोह. त्याच्यात डुंबून डुबून वेळ कसा जातो ते समजतच नाही.
मशीदमाई हीच आपली मोठी आई महिषासूरमर्दिनी. तिचे अनन्यसाधारण महत्त्व तर आपण जाणतोच. बाबा एक दिवस आड चावडीत झोपायला जात असत. आपण आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि पहुडले की आपण निर्धास्त होतो. तेव्हा साऱ्या चिंता मिटलेल्या असतात. आपल्या प्रत्येकालाच अशी हक्काची निवाऱ्याची जागा हवी असते. मातेच्या ममतेची ऊब हवी असते. आपल्याला फक्त आपले कुटुंब सांभाळताना फे फे उडते... मग विचार करा... ह्या बाबाला तर अवघ्या विश्वाची चिंता लागून राहिलेली आहे. हा किती दमत असेल? मग अशा वेळेस ह्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणार कोण ? तर ही चावडी. माता अनसूया. असा माझा भाव आहे.
आणि मग लक्षात येउ शकते की हे सारे वर्णन इतके सविस्तर आणि खोलात जाऊन का लिहिले असेल. खरे पाहाता ह्या बाबाचे सारे काही दमदार. ह्याच्या एकेका पावलागणिक आनंदवन फुलवणारे. हा आनंदच आपल्याला ह्या सोहळ्याच्या प्रत्येक कणात ठासून भरलेला जाणवतो. डॅड नी सांगितल्याप्रमाणे आनंद ग्रॅब करण्याची नामी संधी म्हणजे ही चावडीची मिरवणूक.
आधी सांगितल्याप्रमाणे ह्या मिरवणूकीतून काही गोष्टी ज्या लक्षात येतात त्या लिहिण्याचा प्रयास केला आहे.
१) इथे प्रत्येक जण हा सारा सोहळा "आपला" मानून पूर्ण क्षमतेने त्यात पूर्ण झोकून देऊन जमेल ते काम करण्यात व्यस्त आहे. प्रत्येकाला दुसरे काहीच त्यावेळी दिसत नाही.
२) प्रत्येकाने आपापले काम वाटून घेतले आहे. कुणी कुणाच्या अध्यात-मध्यात नाही. तसेच कुणी कुणावर लक्षही ठेऊन नाही.
३) प्रत्येक जण मग्न होऊन सारे काही चोख पाहात आहे. प्रत्येकाच्या कामामध्ये साईप्रेम अगदी ओथंबून वाहताना दिसत आहे.
४) हा साई आपला राजा / पालनकर्ता आहे आणि आपण त्याची प्रजा / लेकरे हाच प्रत्येकाचा भाव आहे. ह्या साऱ्याचा केंद्रबिंदू म्हणजेच तो साई. एका राजाची भव्य-दिव्य मिरवणूक जशी असते तसेच हे सारे वाचून वाटते. ही झाली सामान्य राजाची गोष्ट. हा तर ह्या विश्वाचा राजा आहे. मग त्याचे तर सारेच निराळे असेल, नाही का?
५) सारे जण बाबांना सजवण्याच्या तयारीत आहेत. हेच आपले निजधाम. सर्वस्व. हे पक्के ठाऊक आहे. बाबा मस्त दिसावा ह्याचे सारे प्रयास केले आहेत. शेवटी हिराच आहे हा साई. तो नेहमी चकाकणारच !
६) बाबा देखील भक्तांचे हे प्रेम स्वीकारायला आसुसले आहेत. ते सुद्धा भक्तांची हौस तितक्याच प्रेमाने भागवत आहेत आणि सारे काही करू देत आहेत. डॉ पंडितांच्या कथेत आपण बघितलेच आहे. बाबाना एरवी काहीही केलेले चालत नसे. लगेच नरसिंव्हाचा अवतार धारण करीत असत. पंडितांच्या प्रेमाकरता हा बाबा पिघळला. तसेच इथे घडलेले आढळते. प्रत्येक जण जे जे म्हणून प्रेमाने बाबांचे काही करत आहे त्याला बाबाही तेवढ्याच आनंदाने स्वीकारत आहेत.
७) बाबांचा शामकर्ण घोडाही अगदी मनसोक्त उधळत होता. हाच तो बाबांचा दशदिशांनी होणारा कृपावर्षाव.
८) तिसऱ्या अध्यायात आपण वाचतो. ह्या कठीण कलियुगात फक्त ह्या बाबाचे नामसंकीर्तन आणि भजनच मानवाला तारून नेऊ शकते. तेच ह्या मिरवणूकीद्वारे बाबा आपोआपच करून घेत आहे.
९) हेमाडपंतांना आणि त्यांच्या लिखाणाला मनापासून सलाम ! काय सुंदर वर्णन केले आहे !
ही चावडीची मिरवणूक आपण आत्ताही अनुभवत आहोत. कशी ?
१) पादुकापूजन. पादुका म्हणजे साक्षात बापूच. पूजनाच्या वेळेस जसे आपण पादुकांना अलगद सजवतो, त्यांना फुले, गंध, अक्षत अर्पण करतो, गजर-आरती करतो, अगदी तसेच. ती सारी स्पंदने देखील अशीच भारावलेली असतात. तसाच सच्चिदानंदोत्सव. ती सुद्धा प्रत्येकाच्या घरची चावडी मिरवणूक नाही का ? मशीदमाईकडून हा बाबा आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी येतो. काही दिवस राहायला. तेव्हा याच्या आगमनाने प्रत्येक श्रद्धावानाच्या घराला शोभा येते.
२) बाबांचे चावडीत येण्याचा सारा सोहळा म्हणजे गुरुवार आणि उत्सवाचे "आला रे हरी आला रे" हेच आठवते. तुताऱ्या, झांजा, घंटा यांच्या गजरात परमात्मत्रयीची दमदार एंट्री. गेटवर पुष्प उधळणारी, त्यांना ओवाळणारी सारी मंडळी सारी सज्ज होऊन त्यांच्या स्वागतासाठी आतुरलेली आहेत.
शेवटी एवढेच वाटते. हल्लीचा काळ हा खूपच वेगळा आहे. जग पाश्चात्य संस्कृतीच्या खूपच आहारी गेले आहे. डिस्को आणि पब मधील गाण्यांवर थिरकले नाही तर काय आयुष्य जगलास ? असे बरेच लोक मला विचारतात. माझाच स्वतःचा अनुभव आहे. पण असे लोक खरेच अभागी वाटतात. कारण ते ह्या बाबाच्या खऱ्या आनंदापासून, आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या चावडी मिरवणुकीपासून वंचितच आहेत.
सुख आणि आनंद ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जो आनंदी आहे तो सुखी असेलच असे नाही. आणि हे सुख केवळ हा बाबाच प्रदान करू शकतो.
चोहो दिसे गुलाल बुक्का
रंग इंद्राचे लाजले
ओस पडली स्वर्ग नगरी
देव धावत आले इथे
हीच ती सुखाची पर्वणी असे मला वाटते.
--------------
१० डिसेंबर १९१० पासून चावडी मिरवणूक सुरू झाली बाबा एक दिवस मशिदीत तर एक दिवस चावडीत नीजत असत. हा त्यांचा क्रम समाधीपरेंत सुरू होता. म्हणेजच "सातत्य" हा गुण दिसून येतो.
मिरवणूक म्हंटली की त्याची सर्व शोभा डोळ्यासमोर येते. अगदी तशीच ही नेत्रसूखदायी आणि आनंद देणारी ही चावडी मिरवणूक होती. बापूंनी ३१ डिसेंबरला सांगितले होते. "छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्या. म्हणजेच grab the happiness.". म्हणजेच 'सत्य प्रेम आनंद'. असाच आनंद लुटायला सारे श्रद्धावान येत. त्यामुळे आनंद फक्त याच्याकडेच मिळतो. दुसरीकडे नाही.
चावडीच्या रात्री भजन चाले. टाळ चिपळ्या मृदूंग खंजिरी इत्यादी विविध वाद्ये भक्त स्वत: घेऊन येत व भजनाचा आनंद लुटत.
साइसमर्थ चुंबकमणी ।
निजसत्तेचिया आकर्षणीं ।
जडलोहभक्तां लावूनि ओढणी ।
नकळत चरणीं ओढील ॥१२४॥
साई हा विश्वातील मोठा चुंबक आहे. आपण लोखंडासारखे जड आहोत. आपल्याच प्रारब्धाने किंवा क्रियमाणाने. स्वतःच्या अकारण कारुण्याने हा आपल्याला त्याच्या चरणाशी स्थिर करतो. आनंद प्रदान करतो. ओवी १२४ = १ + २ + ४ = ७. ७ समुद्र न्याहाळ करण्यासाठी म्हणजेच आपली सप्तचक्रे शुद्ध करण्यासाठीच आपल्याजवळ खेचून नेतो.
बाबा नित्याची कफनी घालत. सटका, तमाखू चिलीम बरोबर नेत व खांद्यावर फडका टाकून निघत. पण त्याची बाळे त्याला नटवत. अंगावर जरीकाठी सुंदर शेला घालत.
बाबा मशिदीतून निघताना तिथली ज्योत शांत करून निघत. घरातील ज्योत शांत करून ती मनात प्रज्ज्वलित करायची हेच बाबा आपल्या कृतीतून आपल्याला सांगत आहेत.
चव्हाटयावरी मखरें तोरणें ।
वरी अंबरीं झळकती निशाणें ।
नूतन वस्त्रें दिव्याभरणें ।
बालकें भूषणीं शृंगारिलीं ॥१२६॥
इथे बालके म्हणजे जो जो कुणी या चावडी मिरवणुकीत सहभागी झाला आहे तो कितीही मोठा जरी असला तरीही बाबांचे बालकच आहे.
विविध वाद्ये वाजवत नाचत गात दिंडी पताका गरुडटके मिरवीत नाचत उडत भजन करीत मिरवणूक हळूहळू पुढे सरकत असे. अश्व म्हणजे भक्ती. शामकर्ण घोड्याच्या पायात घुंगरू बांधले जात. तो सुद्धा या वाजंत्रीच्या तालावर नाचत असे.
काय मौजेचा तो उत्सव ।
भक्तिप्रेमाचें तें गौरव ।
पाहावया तयाचा नवलाव ।
अमीर उमराव एकवटती ॥१६८॥
अशीच मौज आपण श्रीहरीगुरुग्राम मध्ये केली. ते दिवस आठवले की नकळत आनंदाश्रू येतात. बापूंचे जवळून होणारे दर्शन, नजरानजर, त्यात भरलेले आश्वासन आठवले की डोळे पाणवतात. आता फक्त हे आठवणीतच राहणार.
अशी ही मिरवणूक सर्व भक्तांना आनंद देत वाजत गाजत चावडीत येत व तिथे बाबांना विविध अलंकारांनी नटवले जात. भाळी तिलक रेखाटला जाई, चिलीम केली जाई, सर्वजण चिलीम ओढत. निर्जीव वस्तू. पण तिचे भाग्य थोर आहे. बाबांचा हस्तस्पर्श तिला होत असे.
बाबांची पंचोपचार पूजा होत असे. विवध सुगंधी फुलांच्या माळा अर्पण व्ह्यायच्या. आरती ओवाळली जायची. सारे भक्त एक एक करून साष्टांग नमस्कार करून जात. बाबा तात्यांना 'मला सांभाळ' असे सांगत. रात्री अधून मधून माझी खबर घे असेही सांगत.
सर्वजण घरी गेल्यावर बाबा आपली शेज स्वतः तयार करीत असत. साथ-पासष्ठ शुभ्र चांदरींच्या घड्या उलगडून त्या एकावर एक पसरत व त्यावर झोपत.
मशीद ते चावडी हा आपला मन ते बुद्धीचा प्रवास आहे. आपले मन सैरावरा धावत असते. सतत विचार सुरू असतात. संकल्प-कुतर्क तर्क वितर्कांचे द्वंद्व हैराण करीत असते. असे मन बुद्धीच्या ताब्यात एका झटक्यात जाणे शक्यच नाही. त्याला ओंजारून गांजारून, मिरवणुकीतील छान छान गोष्टी दाखवून बुद्धीच्या ताब्यात हळूच द्यावे लागते.
बुद्धी ही निश्चयात्मिक आहे. तिचे मत ठाम असते. कोणतेच द्वंद्व नाही. मशीदमाई आपले चंचल मन बुद्धीचरणी स्थिर करते व मग हळूच बुद्धीच्या ताब्यात देते. बुद्धीस्फुरणदाता मात्र सद्गुरूच आहे. म्हणजेच पुन्हा सद्गुरुंकडेच सोपवते. मला एवढेच कळते की ह्याचेच होऊन राहायचे आहे.
--
चित्रावीरा चाबुकस्वार
वाशी केंद्र
0 comments:
Post a Comment