अध्याय ४४ (Adhyay 44)

04:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments


हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


ह्या अध्यायातही साऱ्या निर्वाणाच्या कथाच आहेत. एक एक कथा वाचून मनात खूप दुःख होते.  


बाबांच्या समाधीचे ठिकाण ठरले 



ह्या बाबाच्या प्लॅनिंग ला काय म्हणावे ! आपण मानव तहान लागल्यावर विहीर खणायला जातो.. पण हा बाबा खरेच ग्रेट आहे. वेळेआधीच सारे प्लॅनिंग करून ठेवतो !  बुट्टीच्या वाड्यात श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या ठिकाणीच बाबांची समाधी ठेवली गेली. शेवटी बाबा आणि श्रीकृष्ण यामध्ये फरक तो कसला ! बाबांनीही या गोष्टीची कल्पना भक्तांना आधीच देऊन ठेवलेली. फक्त त्यावेळेस कुणीच ती गोष्ट समजू शकले नाही इतकंच ! बाबांच्या इच्छेप्रमाणेच साऱ्या गोष्टी घडत गेल्या. बांधलेल्या वाड्याचाही उचित आणि अगदी योग्य उपयोग झाला ! हा बाबा सगळे काही सेट करून ठेवतो ! ग्रेट !



------------



बाबांची वीट 


परमात्म्याची सोबतीण, त्याची अर्धांगींनी - आल्हादिनी ही त्याच्या सोबतच असते. महाशेषही कुठल्या ना कुठल्या रूपात त्याच्याबरोबर छत्र धरायला उभा असतोच ! रामावतारात सीता, श्रीकृष्णासोबत जशी राधा तशीच साईरुपात ही वीट ! त्याची शक्ती. 

या कथेत बाबांच्या निर्वाणाच्या अगोदर काही कारणाने हे वीट फुटली आणि तिचे दोन तुकडे झाले. शक्तिरूपिणी आल्हादिनीच जणू ती ! बाबा तिच्याविना कसे काय जगू शकतील ? नाही का ? हा बाबाही तिच्यामागोमाग गेलाच ! 

एका मानवाला आयुष्याची सोबतीण हरवल्यावर जसे दुःख होईल अगदी तसेच ह्या बाबाला झाले आहे. आपल्याला दिसताना जरी ही साधी वीट असली, तरी ह्या बाबासाठी ती सोबतीण होती ! कॉम्पुटर ज्याप्रमाणे CPU चालूच शकत नाही, अगदी तसेच बाबा त्यांच्या सोबतीणीशिवाय. 

अर्थात ही सारी बाबांचीच लीला ! बाबा एक एक गोष्ट आधीच सुचवत असतात. परंतु आपण ती गोष्ट समजू शकत नाही. 


--------------


बाबांनी ब्रह्मांडी प्राण चढवला  


हा साईनाथ ह्या देहाच्या चौकटीपूरता सीमित नाही हे आपण जाणतोच. याआधीच्या अनेक कथांमध्ये आपण वाचलेच आहे. आणि हा एक मानव जरी असला तरी मानवाचे सारेच नियम त्याला लागू होऊच शकत नाहीत. कारण हा शेवटी परमात्मा आहे. पण हे पुन्हा सांगण्याची गरज ती काय ?

तर ही कथा वाचून कुणीही अचंबितच होईल. असा कुठला तरी मानव करू शकेल काय ? हे सारे अनाकलनीयच आहे. हो. मान्य. ह्या बाबाला समजून घेणे मानवाला शक्यच नाही. परंतु तरीही आपल्या अल्पबुद्धीने आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.   

बाबा एक मानवरूपात खाली आल्यावर मानवाला असतो तसाच त्यांना मृत्यूयोगही होताच. परंतु त्यांचे इच्छित कार्य अजून पूर्ण झाले नव्हते. म्हणूनच कुयोग असतानाही बाबांनी लीला केली. त्यांनी ब्रह्मांडी प्राण चढवले. कुयोगानुसार दम्याचा त्रास सुरू झाला. मानवी देह म्हंटला की त्रास हा होणारच. नैसर्गिक भोग हे भोगायचेच असतात. त्यापासून कुणीही वाचू शकले नाही. परंतु बाबांची कार्यपूर्ती अजून व्हायची असल्यामुळे हा सारा प्रसंग घडला. 

म्हाळसापती खरेच श्रेष्ठ भक्त आहेत ! बाबांनीही ह्या प्रसंगाकरता त्यांचीच निवड केली आहे. बाबांचा देह सांभाळण्याची जबाबदारी घ्यायची हे काही साधेसुधे काम नाही. त्यात बाहेरील जग हे अशा संधीची वाटच बघत असते. इतके अगणित भक्त, संधीसाधू आणि श्रद्धाहीन विरुद्ध मत देऊनही म्हाळसापती तसूभरही हलले नाही. बाबांचे डोके आपल्या मांडीवरून हे तीनही दिवस हलू दिले नाही. 

बघायला गेले तर बाबा जरी परमात्मा असला, तरीही बाहेरील जगाच्या दृष्टीने ते एक मानवच म्हणून दिसत आहेत. म्हणूनच बाहेरील जग बाबांना एक मानव म्हणूनच त्यांना पडताळून पाहात आहे. ज्या माणसाचा श्वास थांबला आहे, काही हालचाल नाही असा माणूस विज्ञानाच्या दृष्टीने जिवंत असणे हे अशक्य आहे. पॉसिबलच नाही. काही जण बाबा कोण आहेत जाणून मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सारे करत आहेत तर काही जण त्यांना बाबा कोण आहेत, त्यांची शक्ती न जाणल्यामुळे बाबांच्या देहाचे अंतिम कार्य करण्यासाठी मागे लागले आहेत. बाबा गेले आहेत असे काही जणांना वाटले असताना आणि तशी त्यांची खात्री झालेली असतानाही बाबांना बोल लावायचे त्यांनी कमी केलेले नाही. चक्क बाबानी जगाला फसवले असेही म्हणायला कमी केले नाही.   

परंतु म्हाळसापती मात्र ठाम होते. काय विश्वास आहे बाबाच्या शब्दावर ! तीन दिवसांनी ब्रह्मांडी प्राण चढवून मी परत येतो असे कुणी म्हंटले असते तर इतरांनी त्या व्यक्तीला वेड्यातच काढले असते. अशा कार्याकरता पक्का भक्त हवा. आणि तो म्हाळसापतीच ! म्हाळसापतींनीच शिरडीला बाबा परत दिले. किंबहुना ह्या विश्वासासाठी बाबांना परत यावेच लागले असते. इतकी ताकद आहे ह्या विश्वासात. या सर्व काळात म्हाळसापतीनी बाबांचे डोके आपल्या मांडीवरून हलूही दिले नाही. ह्या तीन दिवसांत म्हाळसापतींचे सारे शरीरव्यवहार, त्यांच्या शारीरिक क्रिया (मलमूत्र वैगरे) बाबांच्या कृपेमुळे बंद झालेल्या. इतकी शक्ती बाबांशिवाय कुठून येणार ! एवढेच काय तर म्हाळसापतींचा पोटचा मुलगा त्यात वारला असूनही ते त्या जागेवरून हलले नाही ! काय बोलावे आता याला ! किती हे प्रेम ! पण बाबांच्या शरीराची काळजी घ्यायची होती. त्याला first priority ! ते तर अगदी महत्त्वाचे होते ! नाहीतर ह्या जगाने काय केले असते ते सांगता येत नाही. म्हाळसापतींचा त्याग तो काय म्हणावा ! बाबांनीही ह्या काळात त्यांच्या देहाची त्रिशुद्धी केली. मन, प्राण प्रज्ञा शुद्ध केले.    

ही कथा म्हणजे खरोखर एक चमत्कारच म्हणावा अशी आहे. दुसरा शब्दच नाही. कुयोगाचे रूपांतर एका सुरेख अनुभवात होऊ शकते हे या कथेद्वारे बाबांनी दाखवून दिले. म्हाळसापतींचा त्याग मात्र काय वर्णावा ! केवढी ही परीक्षा ! पण यात त्यांना बाबा सोडून दुसरे काहीच दिसले नाही. काय लेव्हलचे प्रेम आहे हे ! सॅल्यूट हा शब्दही कमीच पडेल. अख्खे जग, बुद्धेभेदक, घाबरलेले भक्त, मौलवी पाद्री यांच्या विरूद्ध एकटे उभे राहायला खरोखर हिम्मत लागते. साईप्रेमाची परिसीमा आणि पराकोटीचा विश्वास लागतो, जो म्हाळसापतीकडे होता. केवळ इतक्या ताकदीचा भक्तच ह्या सगळ्या गोष्टी पेलू शकतो. 

आणि ह्या साऱ्या भयंकर वेळेचा बाबाकृपे आणि म्हाळसापतीच्या भक्तीच्या ताकदीमुळे  शेवट गोड झाला. बाबा पुन्हा देहरूपात आले. अशा प्रकारे बाबांनी कुयोग टाळून सारे काही पुन्हा पाहिल्यासारखे केले. शेवटी ह्या बाबाची काळावरही सत्ता आहे. हा काहीही घडवून आणू शकतो. बाबाचे कार्य पूर्ण झाले नसताना कुठला कुयोग त्यांना रोखू शकणार ? परंतु सगळे नियम पाळून हा बाबा त्यातून मार्ग शोधून त्याचे कार्य सुरू ठेवतोच ! कारण तीच जगदंबेची इच्छा असते ! 

आकाशाची करी तू पृथवी 
अग्नीसी करी जल 
पिपा जाणतो सर्व अशक्य 
तुझ्या हाताचा मल 
   







 




 




 





  




   





   







  





 





 



  





         






 

0 comments: