अध्याय ४५ (Adhyay 45)

04:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

----  


आनंदराव पाखाडे आणि काका दीक्षित कथा 



अध्यात्म म्हंटले की बहुतांश जणांना काहीतरी अवघड गोष्ट आहे आणि हे प्रपंचात राहून जमूच शकणार नाही असेच वाटते. पुराण काळातील इतक्या कथा आणि त्यात दिलेल्या क्लिष्ट गोष्टी वाचून बऱ्याच गोष्टी एक तर डोक्यावरून तरी जातात किंवा सध्याच्या युगात करायला अशक्य तरी वाटतात. अर्थात, कुणालाही तसेच वाटेल. किंबहुना म्हणूनच काही लोक अध्यात्माकडे आणि भक्तीकडे पाठ फिरवताना आपण बघतो. परंतु हा बाबा मात्र हे जाणून आहे. 

अध्यात्म म्हणजे अवडंबर, संसारत्याग वैगरे नसून ती अतिशय साधी सोपी गोष्ट आहे हे तो अनेक उदाहरणे देऊन पटवून देतो. उगाचच कठीण केलेल्या संकल्पना हा खूपच सोप्या पद्धतीने सांगतो. कारण मुळात हा साधा सोपा आहे. केवळ कफनी घालणारा फकीर ! किती साधा पोशाख ! हा स्वतःच सामान्य मानवाप्रमाणेच राहतो आणि जगतो. मानवामध्ये मिळून मिसळूनच राहतो. मग हा जर साधा असेल तर याला प्राप्त करून देणारी भक्तीही साधी सोपीच असणार ना ! 

मग कशाला उगाचच घाबरायचे आणि भीत बसायचे ? मुळात हा भिती घालवायला खाली आला आहे आणि आपण मात्र घाबरतच बसतो. कथेतील काकासाहेबांप्रमाणे. माणसाला सवय असते. समोरच्यांकडे बघून आपण बरेच तर्क काढतो. तेच नियम स्वतःला अप्लाय करायला बघतो आणि मग पदरी कॉम्प्लेक्स येतो. मला हे कसे जमेल ? मग आता काय करायचे ? अशासारखे विचार मनात बळावायला लागतात. मग बाबालाच लीला करावी लागते. कथेत आनंदराव पाखाडे सारखे पात्र पाठवावे लागते. 

मानवाचे लक्ष स्वतःला बाबांनी काय करायला सांगितले आहे तिथे कमी असून दुसऱ्याला काय अनुभव मिळाला त्याच्याकडेच लागून राहिलेले असते. अगदी प्रत्येक जण तसाच. चंचल मनाचा. एकच औषध प्रत्येक रोगाला इलाज म्हणून वापरता येत नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाला नक्की काय करायची गरज आहे हे केवळ बाबाच जणू शकतो. म्हणूनच आपल्याला बाबांनी काय करायला सांगितले आहे याकडे आपण फोकस करावा म्हणजे जीवनात काकासाहेबांना पडले तसे प्रश्न पडतच नाहीत. 

मानवाचे अजून एक चुकते म्हणजे तो इतरांशी स्वतःला कम्पेअर करतो. तुलना करतो. तुलना ही नेहेमी दुःखच देते. मन दूषित होते. प्रत्येक युगानुसार सगळ्याच गोष्टी बदलतात. कलियुगात सगळे पापीच आहेत. हे बाबासुद्धा जाणतो. परंतु हा आपल्याला आपण जसे आहोत तस्से स्वीकारायला तयार असतो. आपल्या पापंसकट हा कवेत घ्यायला रेडी आहे. मग कशाला घाबरायचे ?  

हा बाबा सारेच जाणून आहे. काकासाहेबांच्या मनाची घालमेलही हा जाणतो. म्हणूनच त्यांच्या मनाला शांतता मिळावी आणि त्याचबरोबर उचित दिशा मिळावी म्हणून बाबांनी आनंदराव पाखाडेंना पाठवले आहे. 

आनंदरावाना पडलेल्या स्वप्नामध्ये बाबांचे पाय पाण्यात आहेत. जेव्हा स्वच्छ आणि निर्मळ पाणी असतं तेव्हा त्या पाण्याचा तळही आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. पण जर पाणी गढूळ आणि दूषित असेल तर पाण्याची खोली, त्याचा तळ आणि पाण्यात काय आहे ते ही दिसत नाही. इथे पाणी हे मानवी मनाचे प्रतीक आहे. आपल्या मनात साईचरण असतातच. प्रत्येकातच हा बाबा आहे. जर मनात कुतर्क आणि भिती, शंका असेल तर ते मनाचे पाणी गढूळ होते. मग साईचरण दिसू शकत नाहीत आणि पर्यायी ते आपण पकडूही शकत नाही. मग बाबांनाच लीला करून त्यांचे चरण पाण्याबाहेर काढावे लागतात. आपल्यासाठी बाबा ते ही कष्ट घेतात. मग मात्र आनंदरावांप्रमाणे ते लग्गेच पकडायचे. 

काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपले सारे जीवन ह्या साईच्या शोधात इथे तिथे भटकण्यातच वाया जाते. पण हा आपल्या मनातच आहे, आपले अंतिम उद्दिष्ट म्हणजे ह्याचे चरण आपल्या मनातच आहेत हे मात्र आपल्या लक्षातच येत नाही. मग बाबांनाच लीला करावी लागते. 

काकासाहेब सुद्धा खरोखर श्रेष्ठ भक्त आहेत. नो डाउट ! त्यांना न्यायला बाबा विमान पाठवणार आहेत म्हणजे खरोखरच ग्रेट आहेत ! प्रत्येक गोष्ट करताना बाबांचा कौल घेण्याची त्यांची सवय बाबांना खूपच आवडते. त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे.   
   
आपल्याला संसारात अनेक अडचणी असतात. त्यासाठी उचित ते नक्की काय हे आपल्याला कळत नाही. म्हणूनच आपण बाबांचा सल्ला घेतो. म्हणूनच काकासाहेब बाबांच्या छबीला ते प्रत्यक्ष बाबाच आहेत हा भाव ठेऊन त्यापुढे चिठ्ठ्या टाकून त्यांचा सल्ला घेत असत. ह्या कथेतील चिठ्ठयांच्या गोष्टीवरून काही गोष्टी आढळल्या - 

१) खऱ्या श्रद्धेने भक्ताने प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर मिळतेच !

२) प्रश्न विचारण्याने मनात श्रद्धा, सबुरी आणि अनन्यता ठेवायला हवी 

३) एकदा चिठ्ठीतले उत्तर आले की त्यावर चर्चा न करता तसे वागणे अपेक्षित आहे. त्यावर इतरांचे मत घेऊन काही कारणे पुढे करून तसे वागणे टाळले तर त्याला काहीच अर्थ नाही. 

४) उत्तर आपल्या मनासारखे मिळावे याकरता तोच तोच पुन्हा पुन्हा विचारला तरीही बाबांचे उत्तर एकच येणार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे 

५) अतिशय शुल्लक प्रश्न असे चिठ्ठी टाकून विचारायला हा काही खेळ नाही. म्हणून कोणते प्रश्न विचारायचे हे सुद्धा आपल्याला समजायला हवे. 

६) यामधून सर्वात महत्तवाची गोष्ट समजते ती म्हणजे आपल्या मनातले सारे काही हा बाबा ऐकतो. त्यामुळे प्रश्न विचारायला सगुण साकार बाबाकडेच जायला पाहिजे असे अजिबात नाही ! तो कुठूनही आपले मनातले बोलणे ऐकतोच ! 


कलियुगात बेडापार होण्यासाठी नामसंकीर्तन किती आवश्यक आहे हे तर आपण तिसऱ्या अध्यायात बघितलेच. ह्या युगात गुरू आणि गुरुचरण यांचे काय महत्त्व आहे हेच ही कथा सांगते. ह्याला शरण गेल्याने सारे काही साध्य होते. बाकी कशाचीच आवश्यकता नाही हे शेवटी काकासाहेबाना समजते. 

प्रभुचरणा नयनी साठविता 
दुःखवेदना नूरल्या आता 
येई सुखाला येई धीराला 
अनिरुद्ध अवघा ... 

शांतीची ही शांती अक्षय निधान 
पूर्ण समाधान बापू पायी ... 

आज आपल्याला सद्गुरुलाभ झाला आहे हे किती मोठी गोष्ट आहे ना ! त्याने तर आपल्याला कित्ती सवलती दिलेल्या आहेत ! आपण प्रत्येकजण हे जाणून आहोतच  ! आज प्रपंच करतासुद्धा परमार्थ करू शकत आहोत ... ते केवळ त्याच्याच कृपेमुळे !

नाही त्यागावी दारा 
नाही सोडावी घरा 
तरीही पावावे परमार्था 
अनिरुद्ध नामे .. 



-----------------


म्हाळसापतींचे अरुंद फळीवर शयन 
 

बाबांच्या प्रत्येक कृतीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे हे मात्र नक्की. आपण ते घ्यायलाच हवे. पण शेवटी बाबा हे ह्या जगाचे संचालक आहेत. एक मानव असतानाच खुद्द परमात्मा आहेत. अष्टसिद्धी त्यांच्या चरणाशी लोळण घेतात. पण आपण मात्र सामान्य मानव आहोत हे लक्षात ठेवायला हवे. हा बाबा एकाच वेळेस अनेक ठिकाणी असतो. ह्याचा देह हा मानवाचा जरी असला तरी तो परमेश्वरी आहे. म्हणूनच अगदी प्रत्येक बाबतीत त्यांच्यासारखे आपण वागूच शकत नाही. आपल्याला शक्यच नाही ते. कारण आपण मर्यादित आहोत. तो अमर्याद आहे. 

बेडकाने कितीही छाती फुगवली तरी तो बैल होऊ शकत नाही. म्हणूनच आपण ह्या साईप्रमाणे वागायला जाऊ नये. साई अरुंद फळीवर शयन करतो म्हणून आपणही तसेच कयायला जाणे योग्यच नाही. काही गोष्टी हाच करू शकतो हे मनात पक्के करूया. साईबाबा इथे हुतेक हेच सांगायचा प्रयास करीत आहेत.  

तुझ्यासारखा तूच देवा 
तुला कुणाचा नाही हेवा ... 



 



 

  



























   











  
    





नाही त्यागावी दारा 
नाही सोडावे घरा 
तरीही पावावे परमार्था 
अनिरुद्ध नामे ...   

0 comments: