Adhyay 11 (अध्याय ११)

06:04:00 Nandan Bhalwankar 0 Comments







डॉ. पंडित त्रिपुंड काढण्याची कथा 


हा परमात्मा कुठल्याही रूपामध्ये या पृथ्वीवर अवतार घेऊ शकतो. तसेच तो मानव म्हणून या वसुंधरेवर वावरत असताना त्याला जात पात धर्म वर्ण ह्यापैकी कशाचेच बंधन नसते. तो फक्त त्याच्या कार्यापुरता बांधील असतो. जात पात धर्म वर्ण हे मानवाने निर्माण केले, त्या परमात्म्याने नाही. तो ह्या सगळ्या पलीकडे आहे. 

... आणि म्हणूनच परमात्मा कृपा करताना भक्तांची जात पात, धर्म वर्ण, गरिबी श्रीमंती बघत नाही. याचप्रमाणे जो सच्चा सद्गुरू आहे, त्याला भजायला / पूजायला भक्तानेसुद्धा गुरूची जात पात, धर्म वर्ण बघू नये. डॉ. पंडितांनी सुद्धा हेच केले आणि म्हणूनच तो साईनाथ त्यांच्यापुढे "हारी विठ्ठल" झाला. खूप मोठी गोष्ट आहे. 

ह्या परमात्म्याचे नियमच वेगळे. तो फक्त भक्तांचा भोळा भाव आणि प्रेम बघतो. बाकी काहीच नाही. 

भाव करुणेची साद वात्सल्याची 
प्रेमे वाकवी तोचि बापूराय 

.. आणि या अभंगाप्रमाणेच साईनाथ डॉ. पंडितांच्या प्रेमळ भावापुढे "वाकले". वाकणे म्हणजे काय ? .... साईनाथाना असे कपाळी गंध लावलेले आवडत नसे. ते त्यामुळे अत्यंत क्रोधीत होत असत. मग इतरांना प्रश्न पडला. बाबांना डॉ. पंडितांचा का बरे राग आला नाही ?  

बापूला माझ्या प्रेमाची तहान ... 

डॉ. पंडित म्हणजे जातीने ब्राह्मण. साईनाथांना मशिदीत राहणारा मुसलमान मानीत. शिवाय पंडितांना गुरूही लाभले होते आणि ते सुद्धा त्यांच्या जातीसारखेच ब्राह्मण. 

इतकया सगळ्या गोष्टी असूनसुद्धा डॉ. पंडितांनी जणू काही ते आपल्या गुरूलाच त्रिपुंड काढीत आहेत अशा भावनेनेच साईनाथांना त्रिपुंड काढला. 

- हा मुसलमान आहे तर मी याला का नमस्कार करू ?
- मला already सद्गुरू लाभले आहेत, तर मी का याला त्रिपुंड काढू  ? 
- मी ब्राह्मण, हा मुसलमान तर मी यांच्या मशिदीत तरी कसे जाऊ ? ते मला शोभेल का ? मी पवित्र राहीन का ?
- मी ह्याच्याकडे गेलो तर माझे गुरू मला कसे स्वीकारतील ? 
     
असे कुतर्क मनात आले नाहीत. इतकेच नाही, तर शिरडीत आल्या आल्या पहिले मशिदीत गेले. तसेच साईनाथांची आज्ञाही पाळली. 

डॉ पंडित खरोखर ग्रेट आहेत. मी त्यांच्या जागी असलो असतो तर....  मला गुरू मिळाला असता अथवा नसता, मी एका 'मुसलमान' गुरूच्या पायी नक्कीच गेलो नसतो. त्याला त्रिपुंड काढणे तर सोडाच पण मी मशिदीची पायरी सुद्धा चढलो नसतो. डॉ. पंडित खरोखर श्रेष्ठ भक्त आहेत. मग अशांसाठी हा साईनाथ भुलणार नाही असे कसे होईल ? 

शबरीची उष्टी बोरे मोहविती ह्याला 
हावरा हा भक्तिप्रेमा विके कवडीमोला 

ह्या साईनाथाने स्वतःस डॉ पंडितांना आधीन केले. अगदी प्रेमाने सगळ्या नियमांबाहेर जाऊन त्या काढलेल्या त्रिपुंडांचा स्वीकार केला. 

ह्या साईनाथाला सगळ्यांचीच अगदी खडानखडा माहिती असते. ह्याला ज्ञात नाही असे काहीच नाही. अगदी मनातला भाव सुद्धा हा जाणतो. डॉ. पंडित शिरडीस  पहिल्यांदीच आले होते, तरीही ह्या बाबाला त्यांची A-Z सारी माहिती आहे. आपल्या मनातील खरे केवळ हाच जाणू शकतो. तसेच चेहऱ्यावरचा खोटा मुखवटा ह्याच्यापुढे काहीच कामाचा नाही. आणि अशा खोट्या वागण्यालाच हा क्रोधीत होतो.            

शेवटी एवढेच वाटते. कथेतील बाकी लोकांना जसा प्रश्न पडला की बाबा ह्याच्या हातून कसे त्रिपुंड काढून घेतात ? आमच्या का नाही ? असा प्रश्न बऱ्याच वेळा बाबांकडे बघून पडतो. त्या वेळी आपल्याला पटेल असे उत्तर आपल्याकडे नसते. आपले सारे तर्क फिके पडतात. पण खरे कारण हे त्या साईबाबालाच कळते. आणि म्हणूंनच तो वागतो ते उचितच असते. नकळत कधी कधी आपण comparison सुरू करतो. अर्थात ते ही बाबांवरच्या प्रेमापोटीच. पण ही भांडण्याची वृत्ती अगदी उफाळून बाहेर येते. मी हे केले ते केले तरीही मला काहीच नाही मिळाले .. आणि हा आता आता आलेल्याला सारे काही मिळाले...  विचार मनात येतोच ! पण डॉ पंडितांच्या मनातील भाव ओळखूया आणि हा साईनाथ कुणावर अन्याय करणार नाही हे जाणून घेऊया. तो योग्य वेळ आल्यावर देतोच !            

       


---------------------------------



हाजी फाळके कथा 



आपल्यापैकी कुणालाच "माझ्यात दुर्गुण आहेत" हे मान्यच नसते. काहीकाही वेळा आपल्याला ते माहिती असून आपण मुद्दाम "आपण किती चांगले आहोत" हे लोकांना खोटे दाखवतो किंवा काही वेळा "माझ्यात अहंकार आहे" हे आपल्याला कळतही नाही. कथेतील हाजीही तसाच. 

त्या काळी केवळ भाग्यवंतांनाच ही मक्का मदिना यात्रा करायला मिळत असे. तसेच ही यात्रा झालेल्या माणसाला एक वेगळेच महत्त्व होते. सहाजिकच याचा सुप्त अहंकार होणे natural आहे. सिद्दिक फाळकेला (हाजी) सुद्धा त्याची लागण झाली... त्याच्याही नकळत. बाबांना याच अहंकारावर हाजीला लस टोचायची होती. तसेच त्याला झालेल्या या अहंकाराची त्याला जाणीव करून द्यायची होती. म्हणूनच ९ महिने तो मशिदीची पायरी चढू शकला नाही. बाबा इतक्या जवळ असूनही बाबांची साधी नजरानजरही होत नव्हती. 


पण ... प्रत्येक चांगल्या केलेल्या कर्माचे फळ हे मिळतेच. म्हणूनच अहंकार असतानासुद्धा बाबांच्या दर्शनाचे भाग्य हाजीस प्राप्त होत होते. किती विरोधाभास आहे बघा.. डॉ. पंडित आयुष्यात पहिल्यांदी शिरडीस येऊनसुद्धा ते बाबांना त्रिपुंड रेखाटू शकले.. तर हाजींना साधी मशिदीची पायरी चढायला ९ महिने गेले.      

                
हा परमात्मा सतत त्याच्या अकारण कारुण्यामुळे आपली नाळ त्या आदिमातेशी जोडून देत असतो. पण आपल्यातील दुर्गुणांमुळेच आपणच परत परत ती तोडत असतो. कारण ते "बंधन" आपल्याला नको असते. 

आईच्या गर्भात बाळाचे ९ महिने संपूर्ण भरण-पोषण होते. ते बाळ मग योग्य वेळी मातेच्या पोटातून बाहेर येऊन तिच्या कुशीत मोठे होते. ह्या साईला प्रत्येक जण सारखाच. अगदी पाप्यातल्या पापी माणसालादेखील हा टाकत नाही. त्याच्या दुर्गुणासकट त्याचा स्वीकार करतो. हाजीला अहंकार असतानाही साईंनी त्याला आपल्या पोटात ९ महिने ठेवले... त्याचे भरण-पोषण करून (त्याच्यातील अहंकाराचे परिमार्जन करून) मगच त्याला मशिदीच्या कुशीत येऊ दिले.  


मक्का मदिनाची यात्रा झालेला हा हाजी साईनाथांची कीर्ती ऐकूनच आला होता.  बाबांकडे हवशे नवशे गवशे अगदी सारे येत. मनात स्वतःबद्दल मोठेपणा असल्यामुळे बाबांची भेट घडत नव्हती. "हरी का बेटा जरी का फेटा" या कथेतही आपण तेच पाहतो. दासगणू सुद्धा कीर्तनाला अगदी भरजरी पोशाख आणि शेला परीधान करून आले असताना बाबांनी त्यांना उपदेश दिलाच. 


अशा वेळेस माधवरावांच्या मदतीने हाजीला बाबांची भेट होऊ शकली. माधवराव म्हणजे शारण्य, भोळा भाव ह्यांचे प्रतीक. बाबाचरणी जाण्यासाठी याचीच आवश्यकता असते. किंबहुना हेच हाजीला समजावून सांगण्याकरता हाजीला माधवरावांची भेट घेण्याचा सल्ला मिळाला. हेच ते नाथसंविध.


जीवनाची भूमी जरी जाहली उजाड 

त्याने नदी पाठविली फोडुनी पहाड 

बाबांनी सुद्धा नंतर हाजीची परीक्षा घेण्यासाठी माधवरावांकरवी ३ प्रश्न विचारले. ह्यामागील भावार्थ योगिंद्रसिंहांनी त्यांच्या निरूपणात खूप छान समजावून सांगितला  आहे. तो जरूर वाचावा. 

मुळात माणूस वाईट नसतो. तर त्याला सद्गुरुंनी दाखविलेल्या योग्य मार्गावर चालायची गरज असते. साईनाथांनी पुढे हाजीची योग्य प्रकारे कानउघडणी केली आहे. त्याच्यातील बुड्ढेपणावर शब्दांनी वार केले आहेत. पुढे मग त्याला आंब्याच्या पेट्या देऊन त्याचे कौतुक केले आहे. आंबा = फळांचा राजा. अगदी राजेशाही पद्धतीने त्याचे स्वागत केले आहे आणि त्याला आपलेसे केले आहे. 


ह्या साईनाथाचे हृदय अतिविशाल आहे. तो सारे काही सामावून घेऊ शकतो. आपली जरी चूक झाली तरी त्याला योग्य वळणाला लावून, त्याला क्षमा करून आपलेसे करुन घेतो. ह्याच्याएवढा प्रेमळ कुणीच नाही.                


---------------------------------





बाबांची पंचमहाभूतांवर सत्ता आहे, याविषयी माझे विचार 


हे विश्वच मुळी त्या एका परम तत्वामुळे (दत्तगुरूंमुळे) उत्पन्न झाले. त्यातूनच पुढे पंचमहाभूतांची निर्मिती झाली. म्हणजेच या पंचमहाभूतांवरच काय, तर अवघ्या विश्वावरच 'त्या' एकाचीच - बाबाचीच सत्ता आहे.  


हा जगाचा निर्माता, आपला पिता, ज्याचा पंचमहाभूतांवरही वचक आहे, तो केवळ त्याच्या लेकरांच्या (आपल्या) प्रेमाखातर स्वतः एक पंचमहाभूतांनी नटलेला मानवी देह धारण करून येतो. आपल्यावर एवढे प्रेम यांच्याखेरीज अन्य कुणीच करू शकणार नाही.


केवळ हा आहे म्हणून आज आपल्याला अस्तित्व आहे, ही गोष्ट आपण नेहेमी लक्षात ठेवायाला हवी, म्हणजे अहंकार शिवणारच नाही.        


श्वासोच्छवास अवघा तुझा
तूची चालवावे प्राणा
आरती नंदामाता...

कुठे वाचले लक्षात नाही. पण झाडाची पाने हलतात ही सुद्धा त्याचीच इच्छा असते. 

पानापानात दिसतो कान्हा 
फुले तोडू कशी मी सांगा ना..   


साई चरित्रात तर आपण बाबांच्या पंचमहाभूतांवरील सत्तेच्या गोष्टी वाचतोच. पण मला वाटते की ह्या सतीची सत्ता अगदी प्रत्येक गोष्टीवर आहे. He can control Anything.. सर्वसत्ताधीश हा एकमेव साईच. सर्पदंश झाल्यावर माधवरावांच्या अंगातील विषालाही याचे ऐकावेच लागले. 

११ व्या अध्यायात बाबानी कशा प्रकारे शिरडीत आलेल्या अवकाळी वादळाला थांबवले ते आपण वाचतो.  आपण कधी विचार केला आहे का? गेल्या वर्षभरात या पृथ्वीवर महासागरांमध्ये अनेक वादळे / झंझावात आले. त्यांच्या ताकदीशी तुलना करता त्यांनी मानवजातीचे काहीच नुकसान केले नाही. 

ह्या वादळांना कुणी थोपवून धरले? माझ्या बापूसाईने.


ह्याच्या प्रेमाचा रे पूर 
बुडत्याला तारण्यास  


हा बापूसाई केवळ बाहेर दिसणारीच नाही,  तर मनात असंख्य वादळे असतात, त्यानाही हाच शांत करू शकतो.  


अग्नीचा  प्रमुख गुणधर्म म्हणजे दाहकता.  जीवाची होणारी घालमेल याला पाहिले की, यांच्या चरणांशी बसले की शांत होते. 


तुझे रूप आठवता होई जीवाला शांतता 
भीती भविष्याची जाई तुझी भक्ती आचरिता 


हा बापूसाई सर्वसमर्थ आहे. ह्याच्याइतका ताकदवान कुणीच नाही. ही गोष्ट आपण मनाशी पक्की केली, की सगळ्या चिंता दूर होतात.


इस बगिया का हर फूल खिला अनिरुद्ध तेरे आने से... 




-----------------------------------


वादळी पावसाची कथा 



साईचरित्रात बाबांचे केवढे पैलू हेमाडपंतांनी उलगडून दाखवले आहेत ... एक सामान्य दिसणारा आपल्यासारखाच हाडा मासाचा "माणूस" चक्क वादळापुढे निधड्या छातीने उभा राहून त्याला बोभाय स्वरात आरोळी ठोकतो.... कुणामध्ये एवढा "दम" आहे ? कुणाच्या बापात एवढी हिंमत आहे ? एक सामान्य माणूस हे daring करू शकेल का ? हे कुणी करत असेल तर त्याला इतर लोक वेडाच म्हणतील. आणि जरी एखाद्याने केले तरी तो म्हणाला म्हणून हे वादळ शांत होणारे का ? 

.... म्हणजेच आपल्याला समजते की सामान्य मानवाच्या रूपात वावरणारा परमात्माच हे करू शकतो. त्याच्यामध्येच एवढी ताकद असू शकते. बाकी कुणातही नाही. अशा अचानक आलेल्या बिकट प्रसंगी आपल्याला ह्या सामान्य मानवाच्या रूपातील वावरणाऱ्या परमात्म्यातील असामान्यत्व दिसून येते.      

ढगांचा गडगडाट 
विजांचा कडकडाट 
आकाशातील चकमकी ग 
प्रेम पाऊस पाडण्यास 

वैनी म्हणे तांडवनृत्ये दावी 
आपुलीच खूण 
असा असे हा माझा देव, 
तांडवात करी तारण ... 

ह्याचे सारेच निराळे. तांडवात तारण करणारा हाच. अख्ख्या शिरडीला आपल्या विशाल पंखांच्या सावलीखाली धरले आहे. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. सगळ्या प्रसंगातून आपल्याला सावरणारा केवळ हाच. हाच सगळ्याचा रामबाण इलाज.  

बघायला गेले तर पाऊस हा हवाच. जीवन जगण्यासाठी लागणारे पाणी हा पाऊसच पुरवतो. पण प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईटच. अति पाऊस (पूर) किंवा विनापाऊस (दुष्काळ) दोन्ही घातकच. पण ह्या साईनाथाचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेकही समोरच्याचे भलेच करणारा. He is really different !     

नदी पुरवी जीवन तरी महापुरी भय 
ह्याच्या प्रेमाचा पूर बुडत्याला तारण्यास  

अजून एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे हा साईनाथ केवळ अतिवृष्टी नाही, तर   दुष्काळही सुकाळात बदलू शकतो. शताक्षी शाकंभरी आईच्या कथेत आपण वाचतो. एका क्षणात परिस्थीती पालटवली. ग्रेट !

हल्लीचेच उदाहरण. निसर्ग चक्रीवादळ मुबईला धडकणार मुंबईला धडकणार असे बातम्यात सांगितले जात होते.


अति भयंकर होता समय । 

नभ समग्र भरलें तमोमय ।
पशुपक्षियां उद्भवलें भय । 

झंजा वायु सूटला ॥११५॥

झाला सूर्यास्त सायंकाळ । 

उठली एकाएकीं वावटळ ।
सुटला वार्‍याचा सोसाटा प्रबळ । 

उडाली खळबळ दुर्धर ॥११६॥

त्यांतचि मेघांचा गडगडाट । 

विद्युल्लतांचा कडकडाट ।
वार्‍याचा भयंकर सोसाट । 

वर्षाव घनदाट जोराचा ॥११७॥

मेघ वर्षल मुसळधारा । 

वाजूं लागल्या फटफट गारा ।
 ग्रामस्थांसी सुटला भेदरा । 

गुरांढोरां आकांत ॥११८॥


अशा या वादळाला कोण थोपवून धरणार? उत्तर सांगायला हवे का? ह्या बापूसाईची पंचमहाभूतांवरही सत्ता आहे. ह्याने ठरवले तर वादळच काय, परंतु प्रलय सुद्धा थांबेल. बापूरायाने या वादळापासून मुंबईला वाचवले. ह्याने वादळाची दिशाच बदलली. इतकी ताकद फक्त ह्याच्याकडेच.       

पाऊस सर्वस्वी नरमला । 

वाराही मंद वाहूं लागला ।
गडगडाट जागींच जिराला । 

धीर आला पशुपक्ष्यां ॥१३६॥

एवढी ताकद फक्त त्या साईचीच. आपण फक्त त्या बाबाच्या आणि मोठी आई मशीदमाईच्या आश्रयाला उभे राहूया, त्यांचे चरण घट्ट पकडूया... कारण...


ह्याच्या प्रेमाचा रे पूर बुडत्याला तारण्यास...


हा बापूसाई केवळ बाहेर दिसणारीच नाही,  तर मनात असंख्य वादळे असतात, त्यानाही हाच शांत करू शकतो.
   
तुझे रूप आठवता होई जीवाला शांतता
भीती भविष्याची जाई तुझी भक्ती आचरिता

हा बापूसाई सर्वसमर्थ आहे. ह्याच्याइतका ताकदवान कुणीच नाही. ही गोष्ट आपण मनाशी पक्की केली, की सगळ्या चिंता दूर होतात.





-----------------------------------



 आग भडकल्याची कथा 


आग लागली आग लागली ... असा आवाज ऐकला की आपल्या सर्वांच्याच तोंडाचे पाणी पळते. अगदी सारे बेचिराख करण्याची क्षमता असलेली ही आग प्रमाणाबाहेर गेल्यावर जितकी विध्वंसक, तितकीच योग्य प्रमाणात राहिल्यावर किती उपयोगाची आहे हे आपण सारेच जाणतो. आपल्या शरीराचेच उदाहरण घेऊ. 

१) प्राणाग्नी : 

हा नसेल तर आपले अस्तित्वच राहत नाही. ह्याच्यामुळेच आपण ह्या मानवी देहात राहू शकतो. 

२) जठराग्नी : 

मानवाला जगण्यासाठी ऊर्जा ही लागतेच. खाल्लेल्या अन्नातूनच ही प्राप्त होते आणि ह्या अग्नीद्वारेच अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकते. हा अग्नी जर सौम्य झाला (अपचन) किंवा भडकला (acidity) तरीही मानवाला problem च. 

आज आपले अस्तित्वच मुळी ह्या परमात्म्यामुळे आहे. तसेच हा सारे व्यवस्थित सांभाळत आहे, हा अग्नी बाबांच्या कृपेने त्याच्या लिमिट मध्ये आहे म्हणूनच सुखाने आपण जगू शकतो. नाहीतर आपले काही खरं नाही.     
    
आपण मानव म्हणजेच आपला मानवी देह हा सुद्धा पंचमहाभूतांनी नटलेला आहे. त्यावरही ह्या बाबाचाच control आहे. ह्याने किती बारकाईने शरीर बनवले आहे.. अगदी प्रत्येक पेशी न पेशीचे कार्य तितकेच महत्तवाचे. म्हणूनच ज्याने हे शरीर बनवलय, तोच त्याला व्यवस्थित सांभाळू शकतो. आणि तो आहे म्हणूनच आपण 'आहोत' हे आपण सदैव स्मरले पाहिजे. 

ह्या कथेमधून अजून एक ध्यानात येते ते म्हणजे ही आग दिवसाच्या माध्यान्हीला भडकली आहे. आयुष्याचे तरुणपण असेच करारी असते. रगारगात वेगळीच आग, जोश असतो आणि त्यामुळेच ह्या आगीप्रमाणेच माणूस गगनउंची गाठायचा प्रयास करतो. पण अशा वेळीच माणसाचा पाय घसरण्याचा धोका असतो. अती हाव, मोह, वाईट वळण, सतत जिंकण्याची ईर्ष्या हे सगळे धोके तारुण्यात सतत घिरट्या घालत असतात... आणि अशा या तारुण्याल्या धोक्यांनाच सावध होऊन मानवाच्या  स्वैराचारी वृत्तीला आळा घालीत आहेत. अशा वेळेस चुकल्यावर लगाम घालायला कुणीतरी ओरडायला लागतेच. म्हणूनच बाबांनी सटका उगारला आहे. 

बेसिकली कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. कारण श्रद्धावानांचा मार्ग हा मर्यादामार्ग आहे. त्याला आळा घालण्यासाठी ह्या साईनाथासारखा सद्गुरूच हवा. कारण त्याने आपले पालकत्व स्वीकारले की आपल्या आयुष्यात अशी संकटांची आग भडकूच शकत नाही आणि भडकली तरी आळा घालणारा हा साईनाथ सर्वसमर्थ कायम आपल्या मागे उभा असतो. 

साईनाथाने विज्ञानाच्या दृष्टीने आग विझवायला जे करायला हवे ते न करता त्यांच्या लीलेने आणि सामर्थ्याने ही ताकद विझवली आहे. हा चमत्कार नसून ही बाबांची लीला आहे. शेवटी अध्यात्म हे विज्ञानावर भारीच पडते. त्याची ताकदच निराळी. 

आपण आपला अगदी छोट्यातला छोटा प्रॉब्लेम घेऊन सुचितदादांकडे जातो आणि चिंतामुक्त होऊन बाहेर पडतो. बाबांनी आग शांत करायला उगारलेला सटका म्हणजेच हा महाशेष. मर्यादेचे मूर्तिमंत रूप. आपल्या जीवनातील वाढलेला दाह केवळ हा सटका रूपी शेषच ग्रहण करू शकतो आणि आपल्या जीवनात शांती प्रदान करू शकतो. कारण सुचितदादांच्या संकल्पातच बापूंची कृपा आणि नंदाईची शक्ती दडलेली असते.          

शेवटी एवढेच वाटते की ह्याची कशावर सत्ता म्हणून नाही ? हा जे ठरवतो तेच घडते. सगळ्यालाच ह्याचे ऐकावेच लागते. हा काहीही वाकवू शकतो. खरेच ग्रेट ! खरोखरच माझा बापू सर्वसामर्थ्यदाता !!          








      














0 comments: