Adhyay 15 (अध्याय १५)

05:49:00 Nandan Bhalwankar 0 Comments


हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


दासगणू गुणसंकीर्तन कथा  



प्रत्येकालाच वाटते की लोकांनी आपली वाहवा करावी, चारचौघात आपण नीटनीटके आणि सुंदर दिसावे. त्याकरताच आपण अधिकची आभूषणे घालतो. त्याने आपण उठूनही दिसतो आणि आपसूकच लोकांचे आपल्याकडे लक्ष जाते, अगदी आपोआपच. खरे पाहाता ह्या अधिकच्या घातलेल्या गोष्टी ह्या शरीराला भारच असतात. पण तरीही केवळ स्व-स्तुतीसाठी आपण त्या साऱ्या गोष्टी / आभूषणे परिधान करतो. आपली स्तुती ऐकणे कुणाला आवडत नाही ?        

आपण साईचरित्रात ऐकतो. भगवंतप्राप्तीकरता भक्तीमार्ग हा सर्वात सोपा आहे. भक्ती करायला त्या परमेश्वराने कसलेच बंधन ठेवलेले नाही. कठोर नियम नाहीत. नियम फक्त प्रेमाचाच. अधिकच्या कुठल्याच साधनांची काहीच आवश्यकता नाही. 

आपण ३ ऱ्या अध्यायात वाचतो. गुणसंकीर्तन म्हणजेच भक्ती. गुणसंकीर्तन हा शब्द  ऐकला की डोळ्यासमोर येतात ते भक्तश्रेष्ठ दासगणू महाराज. त्यांची भक्ती खरेच ग्रेट ! प्रश्नच नाही. पण कितीही जरी झाले, तरी मानवाला ह्या षड्रिपूंची alergy कधी कशी होईल काहीच सांगता येत नाही. 

आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. ह्या अहंकारानेच आपले अध:पतन होते. आपण गडगडत खाली येतो. असे होऊ नये याकरताच अत्यंत कळकळीने आणि मायेने हा साईनाथ वारंवार आपल्याला सावध करत असतो. ही कथा म्हणजे साईनाथांचे दासगणूंना सावध करणेच आहे.             
         
हेमाडपंत म्हणतात भक्ती ही बाभूळवनीची वाट आहे. नेहेमी सतर्क राहायला लागते. कधी पाय घसरेल सांगता येत नाही. म्हणूनच बाबा दासगणूंना अत्यंत प्रेमाने घातलेला झगमग पोषाख काढून ठेवायला सांगत आहेत. 

घन:श्याम नयनी आला 
सखे मी काजळ घालू कशाला 

रोमांचाने नटली काया 
हिरेमाणके कशास वाया
कशास मोहनमाळा 
सखे मी काजळ घालू कशाला 

कृष्णसख्याची मादक मुरली 
रात्रंदिनी या कानी आली 
शृंगार सर्व ही झाला 
सखे मी काजळ घालू कशाला  ... 


बेसिकली गुणसंकीर्तन करणे ही अत्यंत पवित्र भक्तीसेवा आहे. आपल्या देवाचे गुणवर्णन करताना सतत वक्त्याच्या डोळ्यासमोर तो साईच दिसतो. त्याचेच गूण आठवतात. आपल्याला जसा साई दिसतोय, आपण जसा त्याला अनुभवतोय, अगदी तसाच्या तसा हा बाबा समोर बसलेल्या ऐकत असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला अनुभवयाला मिळावा हाच गुणसंकीर्तनाचा हेतू. यामध्ये फोकस हा केवळ तो साईच. बाकी कुणीच नाही.   

... आणि दासगणूंचा असा पोषाख पाहून त्यांचा स्वतःचा किंवा गुणसंकीर्तनाला बसलेल्या श्रोत्यांचा साईनाथांवरचा फोकस ढळू शकण्याची शक्यता होती. तेच साईनाथांना थांबवायचे होते.     

गुणसंकीर्तनात महत्त्वाचा केवळ तो साईच. बाकी काहीच नाही. आणि म्हणूनच गुणसंकीर्तन करताना आपला पोषाख कसा आहे यापेक्षाही आपण त्या साईनाथाला श्रोत्यांपरेंत कसे पोचवू शकू हा विचार करणे उचित आणि योग्य आहे. इथे आपल्याला साईनाथांच्या गुणसंकीर्तनाला जायचे आहे, आपल्या गुणसंकीर्तनाला नाही. त्यामुळे गुणसंकीर्तनाला जाताना मी हे परिधान केले तर मी कसा दिसेन, ते परिधान केले तर कसा दिसेन या विचाराला काहीच अर्थ नाही. श्रोत्यांना समोर मी दिसण्यापेक्षा तो साईनाथ दिसायला हवा, कारण तेच गुणसंकीर्तनाचे खरे यश आहे.      

गुणसंकीर्तनात केलेले साईचे गुणगायन हेच खरे दागिने आणि आभूषणे. तीच आपण परिधान करायला हवीत. गुणसंकीर्तन करणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानाला साईनाथांनी मस्त गाईड केले आहे.    

कुणालाच भार नको असतो. भार म्हणजेच extra ओझे. unnecessary load. साईनाथांनी दासगणूंनी परिधान केलेल्या वस्त्रांना हा "भार" म्हंटले आहे. हा साईनाथ किती apt आणि perfect उपमा देतो ना ! गुणसंकीर्तनास जाताना ह्या साऱ्या extra गोष्टींची काहीच गरज नाही हेच त्यांनी सांगितले आहे.    

दासगणूंची गोष्टच न्यारी. त्यांच्या मनात असे विचारही आले नसतील. परंतु तरीही साईनाथ त्यांना ही अधिकची वस्त्रे काढून ठेवायला सांगत आहेत. शिरडी गावी, माझ्या देवाच्या - ह्या साईच्या गावी गुणसंकीर्तनाचा प्रोग्राम आहे म्हणूनच ते असे तयार होऊन आले होते. बाकी काहीच नाही. पण बाबांचा शब्द हा फायनल. बाबांनी सांगितल्याबरोबर काहीही न बोलता स्वतः हून ती भरजरी वस्त्रे काढली आहेत. त्यांचा मोह नाही, तसेच साईनाथ मला असं बोलले म्हणून वाईटही वाटले नाही. साईनाथांची इच्छा तीच माझी इच्छा हाच मनात भाव होता. किती ग्रेट !इतकेच नाही, याच गुणसंकीर्तनाला नाही, तर पुढील प्रत्येक गुणसंकीर्तनाला ते साध्या वेषातच जात असत. खरेच दासगणूंना सलाम !


या कथेमुळे एक बाबूजींनी संगीतबद्ध केलेले गीत आठवले.  

निलाजरेपण कटीस नेसले 
निसूगपणाचा शेला 
आत्मस्तुतीचे कुंडल कानी 
गर्व जडविला भाळा 
उपभोगाच्या शतकामनाची 
कंठी घातली माना .. 
थकले रे नंदलाला 

... अशीच षड्रिपूरूपी अनेक आभूषणे घालून आपण सारे मिरवत असतो... आणि वर म्हणजे त्याची लाज तर सोडाच, शिवाय त्याचा अभिमान वाटतो. ही सारी आभूषणे ताबडतोब काढून फेकायला हवीत. कशाला असे ओझे बाळगायचे ? 

आपण लोकांवर किती छाप पाडायला गेलो, तरी प्रत्येकाला आणि त्या साईला आपण कोण हे बरोबर माहीत असतं. त्यामुळेच अशी उगाचच घातलेली आभूषणे पुढे आपल्याला चांगलीच "भारी" पडतात. 

लोकांनी वाहवा करण्यापेक्षा साईनी वाहवा केलेली जास्त महत्तवाची आहे. लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. त्यामुळे आपण जसे आहोत, तसेच जगूया. नाहीतर असे नको व्हायला एक दिवस आपण स्वतःलाच हरवून बसू !           





----------------------




चोळकर आणि दोन पाली कथा 











----------------------





चोळकर कथा  



आपण मानव जाम पक्के असतो. स्वार्थासाठी आपण काहीही करायला मागेपुढे पाहात नाही. स्वतःच्या फायद्यासाठी आपण समोरच्याचा फक्त वापर करतो. कामा पुरता मामा. आपले काम झाले की तू कोण आणि मी कोण ... use and throw. 

आपल्या लहानपणापासूनच आपली "देव" ह्या संकल्पनेची ओळख होते. मी त्याची प्रार्थना केली तर तो मला काहीतरी देतो, माझी मनोकामना पुरवतो असाच प्रत्येकाचा समज असतो. त्यामुळे देवाला आपण आपली सारी कामे करून घ्यायची मशीनच बनवून टाकली आहे. देव म्हणजे काय कामधेनू किंवा कल्पवृक्ष नाही. किंवा मला जे आणि जसे हवे तसे पुरवणारा जीनी नाही. कधीकधी आपली एवढी मजल जाते की ह्या देवालाच विकत घेण्याचा आपण मूर्खपणा करून बसतो. 

मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव 
देव अशानं भेटायचा नाही रं 
देव बाजारचा भाजीपाला नाही रं    

आपले अडलेले काम किंवा इच्छा पूर्णत्वास जावी याकरता प्रत्येक जण झटत असतो. पण पुष्कळ वेळा आपल्या प्रयासांना उचित यश येत नाही. मग आपण देवाकडे धाव घेतो. आता हाच आपला तारणहार हा भाव मनात आणून प्रेमाने देवाकडे काहीतरी मागतो. (जुईनगर ला याग करताना आपण ऐकले असेल. जर उचित असेल तर मला नक्की दे. मी आज माझे मागणे घेऊन तुझ्या दारी आलोय.)  तसेच मागितलेले देवामुळे प्राप्त झाले की देवाप्रती कृतज्ञता म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करावे या पवित्र आणि प्रेमळ हेतूने आपण काहीतरी दान किंवा पवित्र कर्म करतो. ह्यालाच नवस बोलणे असे म्हणतात. ह्यात केवळ प्रेमाचा बंध आहे. व्यवहार नाही.   

नवस आणि सौदा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तू माझे काम कर, तर मी तुला हे हे देईन ... अशा भाषेत देवाशी आपण जर बोलत असू तर त्यात प्रेम तर नसतेच शिवाय ही निव्वळ सौदेबाजी असते. पण एक कायम लक्षात असायला हवे. देवाशी असा सौदा करण्याची आपली लायकीच नाही. 

मुळात देव, तो परमात्मा हा स्वतः "पूर्ण" आहे आणि नेहेमी परिपूर्णच राहणार. त्यामुळे ह्याला आपण काय देणार आणि देऊ शकणार ? ह्याला कधीच कसलीच गरज नसते. आपण मानव हे अपूर्ण आहोत. आपली ताकद आणि क्षमता मर्यादित आहे. त्यामुळेच आपल्याला ह्याची गरज भासते. सर्व प्रकारची कमतरता आणि अपूर्णता केवळ हा परमात्मा दूर करू शकतो कारण हाच सगळ्याचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे ह्याच्याशी व्यवहार करणारे आपण कोण ? नाही का ?         

मै जो भी हू और जैसा हू 
वो मुझको अपना लेता है 
कभी चाहता नही मुझसे कुछ भी 
बस प्यार से देता रेहेता है ... 

बेसिकली हा देव प्रेमासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होतो. ह्याला आपल्याकडून कसलीच अपेक्षा नसते. नवस न करताही हा आपल्याला सगळे देऊ शकतो. आणि हा सद्गुरू जे उचित असेल ते नक्की पुरवतोच. त्यासाठी आपल्याकडून काहीच मागत नाही. कारण हे त्याचे लाभेवीण प्रेम आहे. देवाइतकी दानत कुणाकडेच नाही. 

नवस करणे हे काही चुकीचे नाही. आपल्याला कुणी मदत केली तर आपण त्याचे उपकार स्मरतो आणि कृतज्ञता म्हणून थँक्स, अंबज्ञ म्हणतो. त्याकरताच आपण काहीतरी काहीतरी दान करण्याचे नवस करताना आधी बोलतो. पण आपण हे दान करताना सुद्धा तोलून मापून आणि बराच विचार करून बोलतो. या दानामागेही फक्त प्रेमभाव हवा.  बाकी काहीच त्या देवाला अपेक्षित नाही.  

- मंदिरात जाताना देवाला नमस्कार करून पेटीत एक रुपया दक्षिणा देतानाही आपण विचार करत असू तर त्याला काहीच अर्थ नाही. 

- काही करोडपती तर केवळ "माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती श्रीमंत आहे" ह्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांचा उदो उदो व्हावा यासाठी मोठमोठे दान करतात. 

- काही श्रीमंत (मनाने गरीब) तर ऐपत असूनही दानात एक रुपया देतात आणि त्यांना राजवाडा हवा असतो. तर काही गरीब (मनाने श्रीमंत) इतके कमवत नसूनही दक्षिणा म्हणून खूप काही देतात. 

- नवस बोलताना तो किती रुपयांचा आहे, किलोभर सोन्याचा आहे यापेक्षाही तो किती प्रेमभावाने बोलला आहे हे जास्त महत्वाचे. 

- जर माझी ऐपत १०० रुपये देण्याची आहे, पण मी १ रुपया देत असेन; म्हणजेच अत्यंत कमी खर्चात देवाला पटवून लोभामुळे जास्तीत जास्त फायद्यासाठी मी हपापलेलो असेन तर ते देवाला बरोबबर कळते. देवाला उल्लू बनवायला गेलो तर  मी स्वतःच खड्यात गेलो हे नक्की. त्याला फसवणारे आपण कोण ? 

हा ठकांचा रे ठकू 
हा चोरांचाही चोरू ... 

हा परमात्मा ठगास महाठग आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.             

- आपले काम झाले की देवाला विसरलो असे होता कामा नये. गरज सरो वैद्य मरो असे करायला गेलो तर त्यात आपलेच नुकसान आहे. 


चोळकर खरेच ग्रेट आहेत ! कित्ती प्रेमाने नवस केला आहे ! ह्या प्रेमाला हा साईनाथ भुलला ! चोळकरांचे काम झाले. पण तरीही परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे नवस फेडायला उशीर होत होता. इतर सगळे जण नवसाला खूप घाबरून असतात. फेडायला जमले नाही तर देव कोपेल आणि वाईट होईल याच भीतीत असतात. पण या परमात्म्याचे नियमच निराळे. चोळकर genuine होते. म्हणूनच साईनाथांनी नवसाच्या नियमातही सूट दिली. कोप धरला नाही. तसेच चोळकरांनीही मला काय जमणार म्हणून हातावर हात ठेवून बसले नाही. साखर सोडली. 

साईनाथाना सारेच कळते, त्यांच्यापासून काहीच लपून राहात नाही हे चोळकरांना माहीत आहे. जर मी नवस फेडू शकत नसेन, तर किमान मी साखर तरी सोडेन हा प्रेमभाव साईनाथाना पोचला. हा साईनाथ सारेच जाणतो. हा सर्वसाक्षी आणि सर्वव्यापी आहे. "साखरेने भरलेले चहाचे प्याले" हे बाबा उगाच बोलत नाहीत. खूपच सुंदर अनुभव मिळाला आहे चोळकरांना. 


साईनाथांचे बोल खरोखर सॉल्लिड आहेत. ते पुन्हा पुन्हा ऐकावे असेच आहेत. माझे सर्वात फेव्हरेट ! 


जोग उठले पाहुणे निघाले । 
बाबा जोगांस वदते झाले । 
“पाजीं यांस चहाचे प्याले । 
भले भरले साखरेचे” ॥६१॥

खुणेचीं अक्षरें पडतां कानीं । 
चोळकर चमत्कारले मनीं ।
आनंदाश्रु आले नयनीं । 
माथा चरणीं ठेविला॥६२॥

कौतुक वाटलें जोगांना । 
त्याहूनि द्विगुण चोळकरांना । 
कारण ठावें तयांचें त्यांना ।
पटल्या खुणा मनाच्या ॥६३॥

चहा नाहीं बाबांस ठावा । 
येक्षणींच कां आठवावा । 
चोळकरांचा विश्वास पटावा । 
ठसा उमटावा भक्तीचा॥६४॥

इतक्यांत पुरता दिला इशारा । 
कीं “पावली वाचादत्त शर्करा ।
 तुझ्या त्यागाचा नेमही पुरा । 
चोळकरा झालासे ॥६५॥

नवस - वेळेचें तुझें चित्त । 
दीर्घसूत्रतेचें प्रायश्चित्त । 
हें जरी तुझें ठेवणें गुप्त । 
तें मज समस्त कळलें गा ॥६६॥

तुम्ही कोणी कुठेंही असा । 
भावें मजपुढें पसरितां पसा । 
मी तुमचिया भावासरिसा । 
रात्रंदिसा उभाच ॥६७॥

माझा देह जरी इकडे । 
तुम्ही सातांसमुद्रांपलीकडे । 
तुम्ही कांहींही करा तिकडे । 
जाणीव मज तात्काळ ॥६८॥

कुठेंही जा दुनियेवर ।
मी तों तुम्हांबरोबर । 
तुम्हां ह्रदयींच माझें घर ।
अंतर्यामीं तुमचे मी ॥६९॥

ऐसा तुम्हां ह्रदयस्थ जो मी । 
तयासी नमा नित्य तुम्ही । 
भूतमात्राच्याही अंतर्यामीं । 
तोच तो मी वर्ततों ॥७०॥

यास्तव तुम्हांस जो जो भेटे । 
घरीं अथवा वाटे ।
ते ते ठायीं मीच रहाटें । 
मीच तिष्ठे त्यामाजीं ॥७१॥

कीड मुंगी जलचर खेचर । 
प्राणिमात्र श्वान शूकर । 
अवघ्या ठायीं मीच निरंतर । 
भरलों साचार सर्वत्र ॥७२॥

मजशीं धरूं नका अंतर । 
तुम्ही आम्ही निरंतर ॥ 
ऐसें मज जो जाणील नर । 
भाग्य थोर तयाचें” ।।७३।।                                


हा बाबा मनातले सारेच जाणतो. ह्यांच्यापासून काहीच लपत नाही. चोळकरांचे बाबावर अखंड प्रेम आहे. "माझे काम झाले, तसेही मला आता नवस फेडायला झेपणार नाहीये तर जाऊदे, कशाला फेडू ? राहूदे." आणि "साईबाबाला काय कळणार मी नवस फेडला की नाही फेडला ते!" असा विचार मनात आला नाही. एखाद्याने बाबाला फसवले असते, पण हा बाबा सारेच जाणतो. हे कायम लक्षात असायला हवे. 

काही जण तर मशीदमाईत साईसहवासात असूनही चुका करतात तर चोळकरांसारखे शिरडीपासून, बाबांपासून कोसो दूर असूनही उचित आचरण करतात. खरेच ग्रेट ! बाबांपासून शरीराने लांब की जवळ याने काहीच फरक पडत नाही. आपण बाबांशी मनाने किती connected आहोत तेच महत्तवाचे.     

शेवटी एवढेच वाटते. हा बाबा सारेच जाणतो. आपण जे काही करूया ते प्रेमाने करूया. प्रेम आणि भाव हेच महत्तवाचे. बाकी कशाचीच गरज नाही. प्रेमासाठी हा काहीही करू शकतो. तो अगदी धावत येतो आणि आपल्याला उचलून कुशीत घेतो. मग कसले नवस आणि कसले काय, आयुष्यात त्याच्या प्रेमाचे चमत्कारच घडून येतात.   

समरसूनि साद घाल 
लावूनिया हृदयी ज्योत 
सावळा धावेल हा 
कळवळूनी ओतप्रोत ...  

प्रेम देई प्रेम घेई 
हाच एकला करार    
हाच एकला करार ... 




----------------------------      



दोन पालींची गोष्ट 




रोज आपल्याला कित्ती माणसे भेटत असतात, कित्येकांना आपण ओळखतही नाही. माणसेच काय, अनेक प्राणी पक्षी कीटक यांना पण आपण पाहतो. हे सुद्धा नमूद करायचे कारण म्हणजे ही कथा. जे जे घडते, ज्यांना ज्यांना आपण भेटतो त्या प्रत्येकाला काहीतरी कारण असते. मग ते प्राणी पक्षी वा कीटक का असेनात.   बाळा शिंप्याच्या कथेतही साईबाबाना म्हंटलेले आपण ऐकतो. माशी किडा मुंगी सुद्धा काही लागे बांधे असल्याशिवाय आपल्या जवळ येत नाहीत.    

इथे तर द्वारकामाईत आणि ते ही साक्षात साईनाथांच्या जवळच्या भिंतीवर ही पाल चुकचुकत आहे. ते काही उगाचच असणार नाही. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असले पाहिजे. 

पालीचे चुकचुकणे हे काहीतरी वाईट संकेत असल्याचे समजले जाते. सारेच घाबरतात. पुढे काही अशुभ होईल की काय... मनाला कितीही समजावले तरी शंकांची पाल चुकचुकतच राहाते. सर्वसामान्य भाविक भोळे असतात आणि म्हणूनच साईना तो भक्त विचारता झाला.  

हा साईनाथ काही जाणत नाही असे होणार नाही. प्रत्येक "का?" ह्या प्रश्नाचे ह्या बाबाकडे उत्तर असतेच. ह्याच विश्वासाने तो भक्त बाबांना विचारत आहे. बाबांनीही अगदी सहजतेने त्याच्या शंकेचे निरसन केले आहे आणि मनातली भीती त्या क्षणी मनातून काढून टाकली आहे.     

तू पक्ष्यात तू प्राण्यात 
सर्वांच्या हृदयात 
चेतन तूचि अचेतन तूचि 
तू अवघ्या विश्वात ... 

... आणि म्हणूनच हा साईनाथ अगदी प्रत्येक जीवाला त्याच्या मागच्या अनेक जन्मांपासून जाणतो. मग इथे ह्या पालीचे चुकचुकणे आणि त्यामागील कारण बाबाला माहीत नसेल असे  होईल काय?  

ह्या कथेतून काही गोष्टी समजल्या - 

१) हा परमात्मा जेव्हा जन्म घेतो, तो लोकांच्या मनातील भीती काढून मनाला बळकटी देण्यासाठी. मनसामर्थ्य प्रदान करण्यासाठी. बाबांनीही त्या भक्ताच्या मनातली "पाल चुकचुकते म्हणजे वाईट घडणार" ही भीती अशीच काढून टाकली आहे.     

२) पाल चुकचुकते तेव्हा वाईट घडणार हा पूर्वापार चालत आलेला लोकांचा समज आहे. हा साईनाथ असे चुकीचे समज दूर करायला आला आहे. हा समज खोडून काढून पाल तिला झालेल्या आनंदाने चुकचुकत आहे हे बाबांनी पुढे सिद्ध केले आहे.   


३) हा साईनाथ मानवांच्याच नाही, तर पालीसारख्या प्राण्याच्याही मनातले बरोबर ओळखतो. मानव म्हणून आलेला परमात्माच हे जणू शकतो. बाकी कुणीही नाही.    

व्यापकत्व जरी अनंत 
कुठेही जरी एकांत 
वा मेळविला लोकांत 
जाणितो वर्म सकळांचे     

४) बापू नेहेमी म्हणतात. आपल्या प्रत्येकाची रांग वेगळी आहे. म्हणजेच प्रत्येक जीवाचा प्रवास केवळ हाच जाणतो. कोण कुठची ती पाल, कोण तिची बहीण, ती औरंगाबादवरून येणार आहे वैगरे सारेच हा बाबा जाणतो. 

५) हा बाबा भविष्यही विणू शकतो. बाबांनी जेव्हा त्या भक्ताचे शंकानिरसन केले, तेव्हा दुसरी पाल कुणालाच दिसली नव्हती. बाबा असे काय बोलत आहेत, थट्टा करीत आहेत, असेच कुणालाही वाटेल. परंतु पुढे दोन पालींना गिरकी घेताना बघून सारेच अचंबित झाले. 

ह्या बाबाला भविष्यही माहीत आहे... किंवा हा बाबा जे बोलतो तेच पुढे भविष्य होते. 

६)  बघायला गेलं तर पाल कुणालाच आपल्या घरी असणे पसंत नसते. सगळे तिला घराबाहेर घालवायला बघतात. ती तर विषारी असते. पण इथे तर ती चक्क मशीदमाईच्या भिंतीवर चढलेली आहे. 

म्हणजेच, मशीदमाई आणि साईनाथ यांच्या सानिध्यात / कृपाछत्रात जो येतो, 

-> त्या पालीचे चुकचुकणे सुद्धा अशुभ नसून शुभच बनते. 
-> कोसो दूर असलेल्या, भेटण्याचे काहीच चान्सेस नसतानाही तिच्या बहिणीला ती पाल भेटू शकते. 
-> एवढेच नाही, तर पालीसारख्या विषारी आणि नगण्य जीवालाही साईचरित्रात स्थान मिळते. म्हणजेच मोठी आई आणि साई यांच्या आश्रयाला जो आला त्याचा उद्धार झाला हे निश्चितच.      

७) ही भिंत म्हणजेच आपली मनोभूमी. त्यावरच संशयरूपी पाल चुकचुकते. पण ह्या साईनाथ आणि मोठी आई यांच्या सावलीखाली, त्यांच्या प्रेमाच्या जादूने ह्या संशयाचेही आंनदात रूपांतर होते. 

८) आपल्या सर्वांची अवस्था ह्या पालीसारखीच झालेली असते. पाल ज्याप्रमाणे चुकचुकते तशी आपल्याकडून आयुष्यात अनेक चुकाच होतात. आणि त्यामुळेच आयुष्यातल्या खऱ्या आनंदापासून आपण वंचितच असतो. 

ह्या साईमुळेच आपल्या आयुष्यात दुसऱ्या पालीरूपी आनंद येतो. मग ह्या आनंदानेच आपण ह्या पालीसारख्या गिरक्या घेतो. हे गिरक्या घेणे म्हणजेच "आनंद माझा आहे कारण हा सच्चिदानंद माझा आहे." 

आनंद देणे हेच त्या परमात्म्याचे ब्रीद आहे. बापू म्हणतात - "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक". 

९) सर्व जीवांच्या आधीच्या कित्येक जन्माविषयी ह्या साईनाथाला माहीत असते. ह्या दोन पालींविषयी साईनाथाना खडानखडा माहिती आहे. कदाचित ह्या दोन पाली  आधी कित्येक जन्माच्या बहिणीही असतील.... म्हणूनच बाबांनी ह्या जन्मातही त्यांना पुन्हा भेटवले आहे. 

१०) पाल ही कुणालाही नकोशीच. पण तरीही हा साईनाथ तिला accept करतो; इतकेच नाही, तर तिला तिच्या बहिणीशीही भेट घडवून आणतो. विषारी असूनही बाबांनी तिला आनंद दिला, इतकेच नाही, तर मशीदमाईची छाया आणि साक्षात साईसहवास घडवला. केवढे हे बाबांचे प्रेम ! आपले पाप रूपी विष पिऊन केवळ प्रेम आणि आनंद देणारा हा फक्त बाबाच !    

११) बऱ्याच वेळा आपल्या हातून एक तर सेवा तरी घडते किंवा भक्ती तरी. ह्या दोघांची एकत्रित सांगड घालायला जमायला हवी. ह्या कथेतील दोन पाली म्हणजेच भक्ती आणि सेवा. हा साईनाथच ह्या दोघींची सांगड कशी घालायची याचे प्रात्यक्षिक ह्या कथेद्वारे दाखवीत आहेत. एकाच दगडात अनेक पक्षी मारणारा हा साईनाथच ! बाकी कुणी नाही !

१२) बाबांनी या कथेद्वारे सांघिकतेची भावना दृढ केले आहे. 

शेवटी एवढेच वाटते. ह्या पालीप्रमाणेच आपणही आपल्या आयुष्यातला आनंद शोधत असतो, चुकचुकत चुका करत असतो. पण तरीही हा बाबा अनेक संधी देत असतो. मशीदमाईच्या पवित्र भिंतीवर (अंगाखांद्यावर) बागडायला चान्स देतो. आणि शेवटी हा पैलपार नेतोच. आज बापूही आपल्या आयुष्यात रामराज्य आणणारच आहेत. अगदी नक्की. 

नेम धरुनी मार बाण रे 
नको करू अनमान 
जन्म माझा व्यर्थ जाणे 
हा तुझा अपमान ...           



  














0 comments: