Adhyay 16 and 17 (अध्याय १६ आणि १७)

05:50:00 Nandan Bhalwankar 0 Comments


हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 


लोभ असतानाही ब्रम्हज्ञान ?



हल्लीचा जमाना instant गोष्टींचा आहे. सगळे काही अगदी झटपट हवे असते.  कमी खर्चात किंवा विना मेहेनतीत सारे काही कसे मिळेल हाच विचार प्रत्येक जण करत असतो. काही जणं खूप हुशार असतात. आवळा देऊन कोहळा काढणे ही म्हण आहे अगदी तस्सेच वागतात. ह्यालाच सोप्या भाषेत "लबाडी" असे म्हणतात. आपल्या कथेतील ब्रह्मार्थी सुद्धा असाच. ह्याला तर आवळा न देता कोहोळा काढायचा होता. ते ही साईनाथांकडून. ह्या बाबाला फसवू स्वार्थ साधणारा अजून जन्माला यायचा आहे. 

आपण सारेच अगदी सामान्य मानव आहोत. षडरिपू तर अगदी अंगात भिनलेले असतात. असे असतानासुद्धा साक्षात "ब्रह्म" बघायची आणि जाणून घ्यायची इच्छा आहे ! ब्रह्म म्हणजे काही खेळणे नाही की जे बाजारात गेले आणि घरी विकत घेऊन आले. मोठी तपसाधना, अपार मेहेनत आणि नामजपतप करून ऋषी मुनींना महत्प्रयासाने ब्रह्मज्ञान प्राप्त होते. आपल्या सारख्या अतिसामान्य, संसारात अडकलेल्या, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांनी भरलेल्या आणि जराही बदलण्याची, मोह त्यागण्याची इच्छा नसलेल्या माणसाला हे काय सहजासहजी प्राप्त होणार आहे काय ? माणसाने अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत.      

साईनाथांच्या मनाच्या मोठेपणाचा या कथेतून अनुभव आला. ह्या साईने त्या ब्रह्मज्ञान जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या इसमाचा अपमान केलेला नाही. तसेच त्याच्या खऱ्या नावाचा उल्लेख न करता त्याला केवळ "ब्रह्मार्थी" म्हणून संबोधले आहे. त्याचे खरे नाव घेऊन त्याची बदनामी केलेली नाही. एवढेच नाही, तर त्याला "प्रत्येक जण त्रासापासून मुक्तीकरता माझ्याकडे येतो. तुझ्यासारखे अजून कुणीच विचारले नाही." अशी complement सुद्धा दिली आहे. तसेच स्वतःच्या लीलेने त्यालाच त्याची चूक दाखवून त्याला न झेपणाऱ्या ब्रह्म जाणून घ्यायच्या इच्छेच्या मागे लागू नये हे सांगितले आहे. कुणालाही न दुखावता असे करता येणे हे कुणी बाबांकडूनच शिकावे. नंतर तो ब्रह्मार्थी स्वतःच समजला. 

ब्रम्ह म्हणजेच साक्षात दत्तगुरू ! The ultimate ! त्याला प्राप्त करून घेणे काय सहजासहजी होणे आहे काय ? नको तिथे डोके चालवले की असं होतं. ज्यातलं काहीच माहीत नाही आणि जे झेपणार नाही ते कशाला हवे ? हा माणूस ब्रह्माला एक साधी सोपी आणि हलकी गोष्टच समजला. म्हणूनच परतीचा टांगा करून आला. आलो, घेतलं ब्रह्मज्ञान आणि चाललो असे थोडीच होते ? त्यासाठी त्या परमात्म्यावर अफाट प्रेम, त्याच्या प्राप्तीकरता अमर्याद मेहेनत घ्यायची इच्छा आणि वेळ हवा. संसार आणि मुला-बाळामंध्ये गुंतणारे आपण, आपण काय ब्रह्म मिळवायच्या मागे  लागणार ? नाही का ? ज्याला ब्रह्म प्राप्त होते तो सगळ्यांच्या पलीकडे जातो. तो कायमचा "त्या"च्याकडे गेलेला असतो. त्याला पुन्हा परतीचा प्रवासच उरत नाही.      

ब्रह्म मिळवायला कशाची गरज असते आणि काय त्यागावे लागते हे बाबांनी प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजावून सांगितले आहे. ज्याच्याकडे आपण ब्रह्म मागायला आलो आहे, तो ५ रुपयाची दक्षिणा आपल्या समोर दुसऱ्याकडे मागत आहे, हे त्याने अनेक वेळा सांगितले आहे पण त्याला दक्षिणा मिळत नाही; तर आपल्याकडे खिशात असलेल्या पैश्याने आपण त्याला दक्षिणा देऊया हा विचारही त्या ब्रह्मार्थीच्या डोक्यात येत नाही. आपल्याकडे दक्षिणेच्या पन्नास पट पैसे खिशात असतानाही मी जर दक्षिणा स्वतःहून देत नसेन (पैशाच्या लोभापायी गप्प बसत असेन) तर मला पैशाचा किती लोभ आहे हे समजून जावे. जो माणूस श्रीमंत असतानाही साधे ५ रुपये दान द्यायलाही विचार करीत असेल, तो ब्रह्म कसे मिळवणार ? 

साईनाथ तर सर्वज्ञ आहेत. त्यांना सारेच माहिती आहे. त्या ब्रह्मार्थीला ब्रह्म म्हणजे काय हे कळावे याकरताच बाबांनी ही लीला केली. आणि बाबांच्या या लीलेने अगदी चोख काम केले आहे. इथे बाबांनी ५ रुपयेच दक्षिणा का मागितली ? ही दक्षिणा त्यांना actually त्या ब्रह्मार्थी कडे मागायची होती. त्याद्वारे बाबांना ब्रह्म प्राप्त करण्यासाठी पंचप्राण, पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेंद्रिये अर्पण करावी लागतात हेच सांगायचे होते.  

आपण तर अगदीच सामान्य. राग तर आपल्या नाकावर असतो. पत्नी, मुले-बाळे संसार यांच्यातच मन गुरफटलेले असते. विषयसुखाची, इंद्रियसुखाची आवड असते. धनाचाच नाही, तर साध्यातल्या साध्या गोष्टीचाही लोभ मोह असतोच. मग असे असताना आपण ब्रह्म मिळवण्याच्या मागे लागायचा विचार तरी करू शकतो का ? नाहीच.  

पण ब्रह्म मिळवणे न झेपणारे जरी असले, तरी ह्या माणसाची ब्रह्म मिळवण्याची इच्छा पवित्रच होती. कदाचित हेच बाबांना आवडले असावे म्हणूनच ब्रह्म असे सहजासहजी प्राप्त होत नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्याच्यावर रागावले नाहीत. 

एकदम संत तुकाराम चित्रपट आठवला. संसार, पत्नी मुले असतानाही विठ्ठल भक्तीत अगदी रंगून गेले होते. त्यांच्या विठ्ठल भक्तीने, विठ्ठलावरच्या प्रेमाने त्यांना कायमचे वैकुंठातील स्थान प्राप्त झाले. त्यांचा हेतू ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा नव्हता. तर त्यांना तो पूर्णब्रह्म विठ्ठलच हवा होता. त्याच्या चरणात विसावा हवा होता. 

संत तुकाराम तर खरेच ग्रेट ! आपली त्यांच्याशी comparison होऊच शकत नाही. आपण अतिसामान्य. संसाराचा व्याप, जबाबदाऱ्या पार पाडण्यातच अख्खे आयुष्य खर्च होते. पण मग नरजन्माची इतिकर्तव्यता कशी काय साधायची ? याचे उत्तर बाबांनी ८ व्या अध्यायात दिलेलेच आहे. हा बाबाच आपले मन आणि परिस्थिती  जाणू शकतो. म्हणूनच सतत अनेक सूट देतच असतो. त्याने "नाम" रूपी साधे सोपे साधन दिले आहे, ज्याद्वारे आपण प्रपंचात राहूनही परमार्थ साधू शकतो.       

नाही त्यागावी दारा 
नाही सोडावे घरा 
तरीही पावावे परमार्था 

अनिरुद्ध नामे ... 

आपल्याला आज बापू लाभला आहे. आपले सगळे काही हा बापूच. खरे म्हणजे त्या माणसाला समजलेच नाही. ज्याच्या शोधात तो होता तो हा बाबाच.    


सर्वस्पर्शी परब्रह्म तू 
अनिरुद्ध झालासी 
वंदन तुज अनिरुद्धा 

आरती अनिरुद्धा 
प्रभू पूर्णब्रह्म शुद्धा 

हा बापू, हा साई म्हणजेच ब्रह्म. अजून काय हवे? समोरच बाबारूपी ब्रह्म बसलेले असताना कशाला हवे ब्रह्मज्ञान ? हा बापू किती साधा सोपा आपल्यासारखाच बनून या पृथवीवर आला आहे. मग कशाला बाकीच्या गोष्टींच्या मागे लागायचे ? त्यापेक्षा ह्या बापूलाच मिळवायचा प्रयत्न करूया. मग आपोआपच सारेच तो देणारच आहे !  

कशा ज्ञानाची अटाटी 
ब्रह्म सावळे सामोरी








       

0 comments: