Adhyay 18 and 19 (अध्याय १८ आणि १९)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
हे दोन्ही अध्याय खूपच मोठे आहेत. एकेका कथेमधून दुसऱ्या कथेचा उगम होतो. म्हणूनच या दोन्ही अध्यायात कथांची एक link list आहे. पण त्याचा सोपा भावार्थ जाणून घेण्यासाठी आपण part by part ह्या कथांचा अभ्यास करूया.
साठे - गुरुचरित्र कथा
ह्या कलियुगात जो जन्माला आला त्याच्या पाठी त्रास येतोच, आणि त्याच्या प्रारब्धाच्या ओझ्यामुळे तर तो अजूनच वाकतो. अगदी कंटाळून जातो. आजूबाजूची माणसे त्यात टोचा मारायला आणि पाय खेचायला अगदी तयारच असतात. अशा वेळेस कुठेतरी दूर निघून जावे आणि एकटे राहावे असेच सतत वाटत राहते. साठे पण असेच. अशा वेळेसच कुणीतरी हक्काचा आधार असावा असे प्रत्येकालाच वाटते. ह्या परिस्थितीतून कुणीतरी बाहेर काढावे हीच इच्छा असते.
वाट चुकल्या जीवनी तू ध्रुवतारा
भक्तिवेड्या पामरांना तारणारा ...
ह्या साईनाथाचे प्रत्येकावरच लक्ष असते, आणि म्हणूनच तो कुणा ना कुणाच्या रूपात आपल्यापरेंत येऊन पोहोचतो. साठयांना त्यांच्या स्नेहीने साईनाथांबद्दल सांगणे हे बाबांनी दिलेले आमंत्रणच आहे. ह्याला आपल्या यातना बघवत नाहीत. रुग्णांना बरे करणे हा डॉकटरचा जसा सहजभाव असतो, तसेच दुःखी आणि वाट चुकल्या माणसासाठी ह्याचे ध्रुवतारा बनणे हा त्याचा सहजधर्म आहे. हा आपल्याला त्याच्या जवळ बोलावून आपल्याला सगळ्यातून बाहेर काढतो.
तूच एक अनिरुद्ध मनुजा ना दोष देत
दलदलीत फसलेल्या जीवासी हात देत
असा कसा तूच एक धावणारा ...
साईनाथाकडे जाणे म्हणजेच दुःखाला लागलेली ओहोटी आणि सुखाची भरती. हा साईनाथच स्वतः विघ्ननाशक असल्यामुळे ह्या बाबापुढे कुठलेच दुःख कधीच टिकू शकत नाही. बाबांकडे खेचले गेल्यामुळे साठे कृतकृत्य कृतकृत्य झाले.
ही अख्खी कथा गुरुचरित्रावरच फोकस करते. बाबा फक्त माझाच उदो उदो करा असे कधीच म्हणत नाहीत. उलट गुरुचरित्राचा अजून एक पाठ वाच असेच सांगतात. शेवटी सद्गुरुतत्व हे एक आहे. साऱ्या नद्या त्या अनिरुद्ध सागरालाच मिळणार.
गुरुचरित्रग्रंथात अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील महत्तवाचे सूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितलेला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा संगम गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे.
साठयांनी सुद्धा निश्चयाने ही पोथी वाचायला घेतली आहे. साठेंमध्ये हा चांगला गुण होता, जो प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. निश्चयाचे पक्के. आपला निश्चय झाला की पुन्हा आपण मागे फिरतो. साठयांनी तसे केले नाही. यासाठी जिद्द, मेहेनत, अपार प्रेम आणि निश्चय लागतो, जो साठयांकडे होता. म्हणूनच बाबांनी त्यांना दृष्टांत दिला.
बाबा पण खरेच ग्रेट आहेत. गुरुचरित्र वाचण्याचे benefits लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा एकदा साठयांना तो ग्रंथ वाचायला सांगितला आहे. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायात ज्याप्रमाणे दृष्टांत कथा येते, तसेच साईनाथांनीही साठ्याना दृष्टांत दिला आहे. नृसिंह सरस्वती महाराज, हा साईबाबा हे एकच आहेत. ह्या सद्गुरुतत्वाकडे प्रत्येक समस्येचे निवारण करण्याचे औषध आहे. तेच बाबा साठयांना प्रेमाने पाजत आहेत आणि त्यांचे दुःखहरण करीत आहेत.
ह्यातून बाबांचे काही गुण लक्षात आले.
१) हा साई कित्ती प्रेमळ आहे... आपले दुःख निवारण व्हावे म्हणून आपल्याला स्वतः कडे खेचणारा हाच, आपल्याला उपाय सांगणाराही हाच, आणि प्रेमाने औषधाचे डोस पाजणाराही हाच ! सगळे काही हाच करतो.
२) गुरुचरित्राचे पारायण करणे जरी साठयांच्या मनात आले, तरी ते वाचायची बुद्धी देणारा बुद्धीस्फुरणदाता हा साईच. कोणत्या रोगावर कोणते औषध हे हा बरोबर जाणतो.
३) पारायण करण्याचे सायास जरी साठयांनी घेतले असले, तरी त्यांना शक्ती पुरवणारा सुद्धा हा साईच. नशिबाला दोष देत असलेल्या आणि कंटाळलेल्या माणसाचे चित्त कधीच थाऱ्यावर नसते. म्हणूनच या पठणासाठी लागणारी एकाग्रता पुरवणाराही हाच.
४) सप्ताह पूर्ण होण्याच्या रात्री बाबांनी दृष्टांत दिला आणि यात असे दिसले की ग्रंथाचे आवर्तन करणारे, पोथी हातात घेऊन निरूपण करणारे हे बाबाच असतात. तिथे "स्वतः" बाबानी केले असा उल्लेख आला आहे. साठे एका श्रोत्यासारखे ऐकत बसले होते. याचाच अर्थ हे सारे पठण बाबांनी स्वतः केले आहे. लेकरासाठी, त्याच्या भल्यासाठी स्वत: बाबा कष्ट घेत आहेत.
बापू करितो आमुची सेवा ...
हेच त्याचे कारुण्य !
४) एक आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला प्रेमाने शिकवते त्याचप्रमाणे एका शिक्षकाच्या आणि प्रपाठकांच्या भूमिकेत बाबा शिरले आहेत. दृष्टांतामध्ये बाबानी साठयांना गुरुचरित्र कसे वाचावे याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे, जेणेकरून जेव्हा नंतर त्यांना पुन्हा एकदा पारायण करायला सांगितले जाईल, तेव्हा त्याच्या वाचनपद्धतीची आधीच साठ्याना कल्पना असेल आणि पठण सोपे होईल. अगदी स्वप्नातले video conferencing असावे, तसेच ! Baba, you are amazing !
५) पठणाचे स्वतः कष्ट घेऊन त्याचे फळ हा बाबा साठयांना देत आहे. त्याचे credit ही स्वतः कडे घेतले नाही.
करूनी सर्व हा मूक राही
हा ह्याचा बाणा ...
६) मी तुला शिकविले आणि तुझ्यावर कृपा केली अशी उपकाराची भाषा बाबांनी कधीच केली नाही. तसेच हे करण्यामागे स्वतः चा किंचितही फायदा पाहिला नाही.
७) साठयांनी जेव्हा पठणाचा निश्चय केला तेव्हाच खरे ते जिंकले. आपण एक पाऊल उचलले की पुढची ९९ पावले हा उचलतो.
असा हा प्रेमळ बाबा. हा एका दगडात अनेक पक्षी मारतो. ही कथा हेमाडपंतांच्या समोर घडली म्हणूनच पुढे त्यांना सबुरीची आणि पठणाची नित्यनियमितता यांचे महत्व समजण्याची शिकवण बाबांनी दिली. अशा या कथेतून पुढे अनेक कथा घडत गेल्या. त्यांचा भावार्थ जाणून घ्यायचा आपण प्रयास करू.
नाथभागवत पारायण कथा
सगुण रूपातील परमात्म्याचा मोह अगदी प्रत्येकालाच असतो. त्याचे दर्शन, त्याच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ऐकावा असे प्रत्येकालाच वाटते. त्याची एक अनामिक ओढ आपल्या सर्वांनाच असते. आपले काही मिस होऊ नये हीच इच्छा असते. बाबांचे होणारे एका क्षणाचे दर्शनही खूप सुखावून जाते. हेमाडपंतांचे अगदी तसेच झाले असावे म्हणूनच बाबांकडे धावत गेले... पण वाचत असलेली नाथभागवताची पोथी तशीच ठेऊन. बाबांना बहुतेक हेच आवडले नसेल.
नाथभागवत पोथी वाचणे हे अत्यंत पवित्र आहे. ती वाचून अनेकांना अनुभव आले आहेत. जोगांच्या पोथीवाचनाकरता श्रोते म्हणून असणाऱ्या अनेकांना बाबानी आधी सांगितलेली गोष्ट या वाचनाद्वारे दृढ होत असल्याचा प्रत्यय आल्याचे साईचरित्रात नमूद केले आहे. नाथभागवत हे श्रीकृष्णाचेच. श्रीकृष्ण म्हणजे हा साईबाबाच. दोघात काहीच फरक नाही. सर्व देव नमस्कारं केशव प्रतिगच्छति ...
... आणि म्हणूनच साईदर्शनासाठी नाथभागवत वाचायचे राहिलेले साईनाथांना आवडणार नाही.
यातून काही गोष्टी लक्षात आल्या.
१) ह्या साईनाथाला सगळ्यांच्या प्रत्येक कृतीच्या खबरा असतात. ३ ऱ्या अध्यायात आपण वाचतोच. ह्यांच्यापासून काहीच लपून राहात नाही. म्हणूनच हेमाडपंत नाथभागवताचे पारायण अर्धवट सोडून बाबांकडे आले आहेत हे ही साईनाथ जाणतातच.
२) ह्या साईनाथाला काय हेमाडपंतांचे मन कळले नसेल ? त्यांचे प्रेम कळले नसेल ? नक्कीच समजले असणार. आणि म्हणूनच एक आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला शिस्त लावते, तसेच साईनाथ हेमाडपंतांना त्यांचे नाथभागवत वाचायचे अर्धवट राहिले आहे हे दाखवून देत आहेत.
३) साईनाथांनी नुसती आठवण केली नाही, तर माधवरावांकडे नाथभागवत मधल्या ज्या भागापासून हेमाडपंतांचे वाचायचे राहिले होते तोच भाग समोर आणून ठेवला. आणि म्हणूनच हेमाडपंतांना त्यांचे वाचायचे राहिलेले हे समजले.
४) साईनाथ हेमाडपंतांना रागावत नाहीत. तसेच त्यांनी नाथभागवत अर्धवट वाचायचे ठेवले म्हणून राग पण धरला नाही.
५) साईनाथांची भक्तांना नीट समजावून सांगण्याची हातोटी आणि कला यांना मनापासून सलाम ! बाबांनी एकही शब्द न उच्चारता आपोआप हेमाडपंतांना उपदेश केला आहे.
६) नाथभागवत वाचणे हा हेमाडपंतांचा नियम होता. ह्या साईनाथाने कधीच कुणावरही हे वाचलेच पाहिजे असा फोर्स नाही केला. आपल्या लाडक्या भक्ताचा नियम मोडू नये हीच बाबांची इच्छा होती.
७) "साई माझा गुरू आहे तर मी नाथभागवत वैगरे काहीच वाचणार नाही" असे हेमाडपंत म्हणाले नाहीत. तसेच साईनाथ सुद्धा "फक्त माझेच वाच. बाकी काहीच नाही" असे म्हणून स्वतःचा उदो उदो करीत नाहीत. नाथभागवत हे ही तितकेच महतवाचे आहे, हाच संदेश याद्वारे मिळतो.
८) हेमाडपंतांना शाम्याकडे पाठवण्याचे बाबांचे दोन उद्देश होते. एक तर सबुरीची शिकवण आणि दुसरे म्हणजे नाथभागवतचा अर्धवट राहिलेला भाग वाचायला सांगणे. हा बाबा अगदी लीलया एका दगडात दोन पक्षी मारतो. ते ही भक्तांच्या भल्याकरताच.
९) हेमाडपंत शामरावांकडे गेल्यावर शामराव लगेच त्यांना कथा सांगायला बसत नाहीत. ते म्हणतात - "देवांवर पाणी घालून येतो". म्हणजेच हेमाडपंतांना जरी बाबांनी पाठवले असेल, तरीही शामरावानी नित्यपूजा सोडली नाही. ते पूजा आटोपूनच हेमाडपंतांकडे आले.
शामरावानी अतिथीधर्म सोडला नाही. त्यांना पूजा करेपरेंत विड्याच्या पानाचा आस्वाद घ्यायला सांगितला.
आणि थोडा वेळ मिळाल्यावर शाम्याच्या घरी हेमाडपंतांना नाथभागवताची पोथी दिसली. मग त्यांना आठवण झाली. ही सारी बाबांचीच किमया !
खरेच, बाबा ग्रेट आहेत ! किती सोप्या पद्धतीने उपदेश देतात !
हेमाडपंत खूपच श्रेष्ठ भक्त आहेत. मी त्यांच्यापुढे काहीच नाही. बापू आई दादांना बघताक्षणीच हातातले सारे टाकून धावणारा ! हे सारे मी लिहीत असलो, तरी मी ही कदाचित हेमाडपंतांसारखेच केले असते. पण हा बाबा आहे ना सांभाळायला !
पिपा सुखाने वस्ती करितो
हरभऱ्याच्या रोपावरी
कारण तूचि भार वाहतो
मला काय काळजी ...
शामरावानकडे हेमाडपंतांना सबुरीची शिकवण देण्याकरताही बाबांनी पाठविले होते. साठेच्या गुरुचरित्र वाचायच्या अनुभवामुळे हेमाडपंतांच्या डोक्यात प्रश्न उद्भवले. त्याचीच उत्तरे पुढे शामरावानी देशमुखीणबाईंच्या कथेद्वारे दिली.
बाबांनी मागितलेली दक्षिणा आणि त्याबदल्यात शाम्याने दिलेले पंधरा नमस्कार म्हणजे काय ते योगिंद्रसिंह नी त्यांच्या लेखातून खूपच छान पद्धतीने दिलेले आहे. ते जरूर वाचावे.
इथे एक महत्तवाची गोष्ट लक्षात आली. बाबांनी मागितलेल्या दक्षिणेचा खरा अर्थ शामरावाना नीट लक्षात आला आहे. शाम्या खरेच ग्रेट आहेत. याआधी पण बाबांच्या दक्षिणा / भिक्षा मागण्याबद्दल साईचरित्रात उल्लेख आला आहे. पण तरीही बाबा दक्षिणा का मागतात हे काही लोकांना कळले नाही. ह्या विश्वाच्या राजाला कशाला दक्षिणा लागणार ? नाही का ? पण शाम्याला बरोबर समजले आहे. आणि म्हणूनच ते दक्षिणे ऐवजी नमस्कार पाठवतात.
दोन हात एक माथा
न लगे दूज साईनाथा ...
हे शाम्याला नीट समजलेले आहे. हे नमस्कार हेमाडपंतांकरवी शाम्याने साईना पाठवले आहेत. याद्वारे बाबांनी हेमाडपंतांची साईनिष्ठा बळकट केलेली आहे.
देशमुखीणबाई कथा
बाबांनी हेमाडपंतांना शाम्याकडे का पाठवले हे तर आपल्याला समजले. साठ्यांना गुरुचरित्राचा केवळ ७ दिवसात अनुभव आला, पण मी गेले ७ वर्षे वाचत असूनही मला काहीच का प्राप्त होत नाही ? प्रत्येक सामान्य मानवाला पडणारा प्रश्न. आपण सामान्यच आहोत. संत नाही. त्यामुळेच मनात प्रश्न येतात. अगदी नकळत आपले मन comparison सुरू करते. ते ही लग्गेच.
बापू नेहेमी प्रवचनातून सांगतात. माझ्याकडे प्रत्येकाची रांग वेगळी. कुणीच कुणाच्या रांगेत घुसू शकत नाही. पण हे माहीत असूनही आपण स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करतो. भूतछाया प्रयोगात आपण बघतो. आपण स्वतःची (real me) दुसऱ्याच्या सावलीशी (shadow) तुलना करतो आणि म्हणूनच फसतो.
आपण सामान्य आहोत. आपण लोकांनी काय कर्म केली आहेत हे कसे काय जणू शकणार ? त्यांचे आधीचे जन्म आणि पुण्यराशी किती ते कसे बघू शकणार ? एवढेच काय आपण स्वतः आधीच्या जन्मात काय करून ठेवलेलं आहे हे तरी आपण कुठे जाणतो ? परंतु हा साई सारेच जाणतो. म्हणूनच हा आत्ता आत्ता येऊन साईपाशी जाऊन पोहोचला आणि मी कित्येक वर्ष सेवा करून मला काहीच मिळाले नाही असे आपण म्हणूच शकत नाही. ही तुलना ग्राह्यच नाही, कारण त्याचा पायाच अर्धवट माहितीचा आहे.
हा साई प्रत्येकालाच फळ देतोच देतो. पण ते कधी द्यायचे हे मात्र तोच ठरवतो कारण त्याची उचित वेळ हाच जणू शकतो. बापू म्हणतात. फणसाच्या झाडाला खूप वेळानंतर फळे येतात. अगदी उशीरा. पण आली की मुबलक प्रमाणात येतात. हेमाडपंतांना बाबांकडून त्यांचे चरित्र लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. केवढे हे मोठे फळ मिळाले आहे पुढे हेमाडपंतांना !
आपण हेमाडपंतांसारखीच प्रत्येक जण चूक करत असतो. माझ्या चांगल्या कर्माचे मला ताबडतोब फळ हवे असते. म्हणूनच मनात वाईट विचार येतात. वर्तमान आणि भूतकाळातील अनुभवामुळे भविष्यात जे फळ मिळणार आहे ते ही आपण गमावून बसतो.... आणि हेच साईनाथाला होऊ द्यायचे नसते. म्हणूनच बाबा त्यांची लीला करतात.
शाम्याने सांगितलेली देशमुखीणबाईची गोष्ट ही अशीच एक साईलीला. कथेत आपण वाचतो. बाबांकडून उपदेश आणि कानमंत्र मिळावा याकरता उपास करते की मरायला टेकेल.
ह्या म्हाताऱ्या बाईने बाबांना वेठीस धरले आहे. पण त्यामागे त्या बाईचे प्रेमच आहे. एक मूल ज्यापद्धतीने आपल्या माऊलीकडे हट्ट करते की मला हे हवंच आहे अगदी तस्सेच ह्या म्हातारीने बाबांकडे मागणे मागितले आहे. पण हे नुसते मागणे नाही. त्यामागे कंडिशन घातली आहे. खाणे पिणेच सोडले आहे. असे करून तिला अपाय होऊ शकणार होता.... आणि त्यामुळेच ह्या बाबालाही त्रास होणार होता.
म्हातारवय म्हंटले की व्याधी आल्याच. नको ते विचार आले. आपले मन सुद्धा नको त्या विचारांमुळे, कुतर्क, शंका, फलाशेची घाई यामुळे असेच जर्जर म्हातारे झालेले असते. अशातच मग ह्या बाबाला अनेक दूषणे दिली जातात. आपले मागणे, आपली इच्छा पूरी व्हावी म्हणून टोकाचे वागले जाते.
ह्या म्हातारपणातच अविचारीपणा येतो. ह्या बाबांकडून मला जे हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी काय वाट्टेल ते केले जाते. ह्यामुळेच ह्या साईबाबाला आपण त्रास देत असतो. पण तरीही ... आपल्यावरच्या अक्षय्य प्रेमाखातर हा आपल्याकडे धावून येतो... आपल्याला समजवायला, आपल्या विचारांची दिशा योग्य मार्गावर आणायला. ह्या कथेत साईबाबा सुद्धा असाच त्या म्हातारीजवळ गेला आहे.
म्हातारी असे विचित्र वागूनही हा साई तिच्यावर रागावलेला नाही. ह्याच्याएवढी क्षमा कुणाकडेच नाही. एखाद्या स्वैर भिरभिरणाऱ्या मनाला केवळ हा बाबाच लगाम घालू शकतो. ह्याच्या शब्दाने मनाला शांती मिळते. दाह कमी होऊन स्थैर्य मिळते. ह्याच्याएवढे प्रेमाने कुणीच समजावून सांगू शकत नाही.
आपण अगदी कितीही म्हातारे झालो तरीही ह्या साईची कायम लेकरेच राहू. पण असे असतानाही हा साई त्या म्हातारीला तिचे वय पाहून "आई" म्हणून संबोधत आहे. हा साई एक मानव म्हणूनही perfect आहे.
खरे तर हेमाडपंतांप्रमाणेच ह्या म्हातारीची सबुरी केव्हाच संपली आहे. म्हणूनच साईनीच शाम्याच्या मुखातून ही म्हातारीचीच गोष्ट हेमाडपंतांना सांगितली आहे. त्याद्वारे साईना हेमाडपंतानाच उपदेश करायचा आहे. शाम्यानेही बाबांना म्हातारीबद्दल जे कळले, ती उपाशी आहे वैगरे ते ताबडतोब सांगितले आहे. साईनाथाना सारेच कळते, मग मी काय सांगू असे म्हणाले नाहीत. ह्यामागेही त्यांचे साईनाथांवरचे प्रेम आणि कळकळ दिसून येते.
आपल्या गुरुवर प्रेम कसे करायचे हे कुणी साईनाथांकडून शिकावे. त्यांच्या बोलातूनही गुरूवरील प्रेम अगदी ओसंडून वाहताना जाणवते. You can feel it ! बापू आई मामाना सुद्धा observe केल्यावर हे जाणवते. स्वतः सदगुरू असून एक भक्त म्हणूनही हे कसे perfect आहेत हे ही आपण शिकायला हवे.
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
ह्यानुसारच साईनाथ गुरूंनी दिलेला मोलाचा उपदेश आणि शिकवण पुढे प्रसारित करीत आहेत. बेसिकली गुरूला आपल्या शिष्याकडून फक्त निष्ठा आणि सबुरी हीच अपेक्षित असते. आणि ह्या दोन्हीही गोष्टी सद्गुरूंवरील विश्वासातूनच येतात.
गुरूकडे कानमंत्र किंवा आणि काही मागणे मागण्यापेक्षा ह्या गुरुलाच मागूया. ह्याच्याकडेच बघूया, ह्याचेच शब्द ऐकूया. प्रत्येक वेळेस ह्याला आठवूया आणि ह्याच्यावर अधिकाधिक प्रेम करूया.
युगे युगे मी मार्ग चाललो
फक्त तुझा बापू
तुला सोडूनी जाऊ कुठे मी
तुजविण मज कुणी नाही ...
आपणही ह्या म्हातारीसारखेच वागतो. जे वर्ज्य करायला हवे ते करत नाही. नको ते करतो. मग ह्या बाबाला धावून यावे लागते. आधीच आपल्या प्रारब्ध ओझ्यामुळे आपण ह्या म्हातारीसारखे गलितगात्र झालेले असतो. त्यात हे वेडेवाकडे विचार. हे कसे काय चालणार ?
शेवटी एवढेच समजले. हा विश्वासच सर्वात महतवाचा आहे. हा विश्वास आपल्या मनात घट्ट रोवल्यावर मन ह्या म्हातारीसारखे म्हातारे होऊच शकत नाही. सदा उत्साही आणि आनंदीच राहाते. ह्या विश्वासामुळेच आयुष्यात अनेक चमत्कार घडू लागतात. मग बाबांकडे काही मागायची किंवा अशा अटी घालायची गरजच उरत नाही.
पिप्याचा झोका बापू
पिप्याचे गगनही सारे बापू
हेमाडपंतांना मिळालेला अनुग्रह
बाबांची समजावून सांगण्याची पद्धत प्रत्येकासाठीच निराळी. अनुभव ऐकल्याशिवाय मनात बदल घडत नाही. म्हातारीचा आलेला अनुभव हेमाडपंतांच्या मनाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन गेला. प्रत्येक जण स्वतःचे minus points किंवा फजिती जगापासून लपवून ठेवायला बघतो. पण इथे तर हेमाडपंतांनी सारेच खूपच ओपनली सांगितले आहे. दुसरा अशी चूक करू नये हीच मनात कळकळ आहे. किती मोठे मन !
बाबांना सगळेच माहिती. त्यांच्यापासून काहीच लपून राहात नाही. सगळ्या लीलांचा सूत्रधारही हा बाबाच. पण असे असूनही आपल्या भक्तासाठी, आरती सुरू असतानादेखील बाबा हेमाडपंतांची गोष्ट अगदी पुढे येऊन कान देऊन ऐकतात. प्रत्येक भक्तासाठी ह्या बाबाकडे वेळ असतो. मनात कळकळ असते. स्वतः विश्वाचा राजा असूनही हेमाडपंतांना दिलेला उपदेश नक्की समजला का, हे त्यांनी विचारले आहे. एक आई जसे प्रेम करेल तसेच बाबा करताना दिसतात.
या कथेत दिलेले कासवीचे आणि तिच्या पिल्लाचे उदाहरण सुद्धा अगदी हेमाडपंतांच्या आणि म्हातारीच्या कथेसाठी perfect आहे.
बारा वर्षें पायीं वसवटा ।
केला गुरुनें लहानाचा मोठा ।
अन्नवस्त्रासी नव्हता तोटा ।
प्रेम पोटांत अनिवार ॥६१॥
भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा ।
जयास शिष्याचा खरा जिव्हाळा ।
माझ्या गुरूसम गुरु विरळा ।
सुखसोहळान वर्णवे ॥६२॥
काय त्या प्रेमाचें करावें वर्णन ।
मुख पाहतां ध्यानस्थ नयन ।
आम्ही उभयतां आनंदघन ।
अन्यावलोकन नेणें मी ॥६३॥
प्रेमें गुर्मुखावलोकन ।
करावें म्यां रात्रंदिन ।
नाहीं मज भूक ना तहान ।
गुरूवीण मन अस्वस्थ ॥६४॥
तयावीण नाहीं ध्यान ।
तयावीण न लक्ष्य आन ।
तोच एक नित्य अनुसंधान ।
नवलविंदान गुरूचें ॥६५॥
हीच माझ्या गुरूची अपेक्षा ।
कांहीं न इच्छी तो यापेक्षां ।
केली न माझी केव्हांही उपेक्षा ।
संकटीं रक्षा सदैव ॥६६॥
कधीं मज वास पायांपाशीं ।
कधीं समुद्र - परपारासी ।
परी न अंतरलों संगमसुखासी ।
कृपाद्दष्टीसीं सांभाळी ॥६७॥
कासवी जैसी आपुले पोरां ।
घालिते निजद्दष्टीचा चारा ।
तैसीच माझे गुरूची तर्हा ।
द्दष्टीनें लेंकरा सांभाळी ॥६८॥
आई या मशिदींत बैसून ।
सांगतों तें तूं मानीं प्रमाण ।
गुरूनें न फुंकले माझेच कान ।
तुझे मी कैसेन फुंकरूं ॥६९॥
कासवीची प्रेमद्दष्टी ।
तेणेंच पोरांसी सुखसंतुष्टी ।
आई उगीच किमर्थ कष्टी ।
उपदेशगोष्टी नेणें मी ॥७०॥
कासवी नदीचे एके तटीं ।
पोरें पैल वाळवंटीं ।
पालन पोषण द्दष्टाद्दष्टी ।
व्यर्थ खटपटी मंत्राच्या ॥७१॥
तरी तूं जा अन्न खाईं ।
नको हा घालूं जीव अपायीं ।
एक मजकडे लक्ष देईं ।
परमार्थ येईल हातास ॥७२॥
तूं मजकडे अनन्य पाहीं ।
पाहीन तुजकडे तैसाच मीही ।
माझ्या गुरूनें अन्य कांहीं ।
शिकविलें नाहींच मजलागीं ॥७३॥
नलगे साधनसंपन्नता ।
नलगे षट्शास्त्रचातुर्यता ।
एक विश्वास असावा पुरता ।
कर्ता हर्ता गुरू ऐसा ॥७४॥
सद्गुरूला आपल्याकडून कशाकशाचीच अपेक्षा नसते. आपला वर्ण, जात-पात, शिक्षण, वय, हुशारी, श्रीमंती-गरीबी, चातुर्य ह्यावर काही म्हणजे काहीच अवलंबून नसतं. मग महत्वाचं काय ? तर तो गुरुवारचा विश्वास. फक्त हाच. बाकी कुणीच नाही. अनन्यता.
कसे काय मागू
फक्त तूचि हवा रे ...
ह्याला पाहून स्वतःला विसरायला हवे. केवळ ह्याच्याच रंगात रंगून जायला हवे. माझा सद्गुरू कायम माझ्याकडे बघतच असतो, माझ्याबरोबरच असतो, त्याचे माझ्यावर लक्ष असतेच आणि माझे बोट धरून तो माझ्यासोबत चालत असतोच ! मला फक्त त्याच्याठायी विश्वास आणि अनन्यता हवी.
अवघा रंग एक झाला
रंगी रंगी रंगला श्रीरंग
मी तू पण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया
कासवीच्या उदाहरणामधून काही गोष्टी स्पष्ट होतात.
१) मी ऐलतिरी, माझा गुरू पैलतीरी असूनही तो माझा योग्यरीत्या सांभाळ करीत असतो.
२) गुरू माझ्याजवळ phyically / शरीराने जवळ आहे की नाही याने काहीच फरक पडत नाही. त्याच्याशी मनातून कनेक्टेड असणे सर्वात महत्तवाचे.
३) मला जरी गुरू माझ्यापासून शरीराने लांब दिसत असला, तरी त्याची दृष्टी माझ्यावर असतेच.
घार हिंडते आकाशी
लक्ष तिचे पिलापाशी
४) गुरू ही आपली आईच असते
५) हा गुरूच मला पैलतीरी नेण्यासाठी स्वतः कष्ट करत असतो.
ऐलतिरी मी पैलतीरी तू
ने मजसी जलपार
मनाची तूचि छेडिली तार ....
६) कासवी पिल्लाना दूध किंवा शरीराची उब देत नाही. वरवर वाटताना जरी वाटले की गुरूचे आपल्याकडे लक्ष नाही, तरीही त्याला आपली काळजी असतेच. कधी गुरू जरी आपल्यावर रागावला तरीही ते माझ्या भल्यासाठीच आहे हे नीट समजून जावे
७) सद्गुरूची कृपादृष्टी असली की सारे काही कुशलमंगल होते. त्याच्या नजरेचा स्पर्षच आपल्याला ताकद आणि बळ पुरवतो. आपली प्रत्येक कमतरता भरून काढतो.
८) कासवीच्या पिल्लांप्रमाणे आपल्याला केवळ त्या सद्गुरूचे ध्यान करायचे आहे. बाकी कशाचीच आवश्यकता नाही. ध्यान करणे म्हणजे नक्की काय ? तर प्रत्येक गोष्टीत त्याला आठवणे, त्याच्याशी अधिकाधिक जोडून घेणे, त्याच्यावर अधिकाधिक प्रेम करणे.
९) गुरू हा आपल्या प्रत्येक हाकेला ओ देतच असतो. त्याचा प्रेमवर्षाव आपल्याला चिंब चिंब भिजवतो. तृप्त करतो. मग कशाचीच चिंता उरत नाही.
तुझे रूप मी पाहणे
दुजे काही न दिसणे
अनिरुद्ध प्रेमळा
त्याला माझिया कळवळा
रामनाम - विष्णूचे सुदर्शनचक्र
जो जो मज भजे जैसा जैसा भावे
तैसा तैसा पावे मी ही त्याची
जया माझी आठवण
निरंतर आठवण मज त्याची ...
हे साईमुखातील अमृत. याचाच अनुभव हेमाडपंत त्यांच्या पुढच्या अनुग्रह कथेत घेताना आपण बघतो. आपल्या प्रेमाला कशी हा पावती देतो याचीच ही कथा एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल.
हेमाडपंत त्या रात्री रामनामाच्या विश्वात रंगून गेले आहेत आणि झोपी गेले आहेत. सकाळी लवकर उठण्यासाठी ज्याप्रमाणे रात्री झोपतानाच अलार्म लावणे गरजेचे असते, तसेच सकाळी उठल्या उठल्या जर मुखात 'त्या'चे नाम यायला हवे असेल, तर त्याचे नाम घेता घेताच झोप यायला हवी. हेमाडपंतांचेही असेच झाले. मग कुणी म्हणेल अरे पण रात्री झोपल्यावर कुठे आपल्याला काही कळत असतं ? त्याचे सकाळी उठल्या उठल्या मुखात नाम येण्याशी कसा काय संबंध होऊ शकेल ?
पण .... रात्री जेव्हा आपले नामस्मरण जरी आओपाप आपल्या बाजूने थाबत असते असे आपल्याला वाटत असले, तरी त्या क्षणापासून आपण सकाळी उठेपरेंत 'हा' आपल्या वतीने आपला नामस्मरणाचा अखंड जप सुरू ठेवतो. हेच त्याचे कारुण्य. प्रेमासाठी हा काहीही करायला तयार असतो. विठ्ठलाने धुणीभांडी करून जनाबाईला घरकामात मदत केली. नाथाघरी बारा वर्षे पाणी भरण्याचे कामे केले. चोखामेळाकरिता मेलेली ढोरं ओढली....
भाव करुणेची साद वात्सल्याची
प्रेमे वाकवी तोचि बापूराय...
आपण मनापासून जेव्हा ह्याला आठवतो, तेव्हा हा कसा धावून येतो ह्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे.
असो पाप किती किंवा पुण्य गाठी
ह्याची नाही गणना हो त्याला
ऐकूनी पाझरे त्याचे अंतरंग
प्रेमे साद त्यासी हो घाला...
मग कसा तो कुठूनही
येईलच तो अवचित
वासरांसाठी प्रेमे जशी
धेनु येई हो हंबरीत ...
काय सुंदर अनुभव देत आलाय हेमाडपंतांना... हे अनुभव म्हणजे काही योगायोग नसतात.. coincidences are His way of remaining anonymous ... औरंगाबादकरांनी गायलेले भजन म्हणजे काही योगायोग नव्हता. तो त्या रामाने हेमाडपंतांच्या मनातल्या प्रेमाला दिलेला response होता. औरंगाबादकर हे केवळ निमित्तमात्र ! कर्ता तो रामच. हा कुणाच्याही रूपात आपल्यापरेंत येऊन आपल्याला संकेत देतो.
मज न लागे गाडीघोडी
विमान अथवा आगीनगाडी
हाक मारी जो मज आवडी
प्रगटे मी ते घडी अविलंबे
... आणि हा राम हेमाडपंतांसाठी धावत आलाच. त्यांना भेटायला. हा एकमेव आपला खरा मित्र आहे. बाकी नुसतेच दिखाव्यापुरते.
या कथेमध्ये पुढे सारे रामनाम आणि रामनामाचे महत्त्व दिलेले आहे. त्याचा भावार्थ काही अग्रलेखामध्ये आणि योगिंद्रसिंहांच्या लेखात खूप छान समजावून सांगितला आहे, तो जरूर वाचावा.
बेसिकली रामनाम काहीही करू शकते. वाल्या कोळीचे उदाहरण आपण सारेच जाणतो. एवढी पॉवर आहे ह्या रामनामात. मला एवढेच समजते की फक्त त्याचे नाम घेऊन जीवनाचे सार्थक होऊ शकते. बाकी खडतर मार्ग वैगरे काहीच अवलंबायची गरज नाही. कलियुगामधला भगवंतप्राप्तीचा मार्ग 'त्या'नेच खूपच सोपा केला आहे. त्याचा जरूर लाभ घेतला पाहिजे. मला खरेच बाकी मानवांचे वाईट वाटते. जीवन म्हणजे फक्त मौजमजा. कशाला घ्यायचे नाम ? thats for old age ! खरेच अभागी. पण किमान old age मधे नाम घेणार असे म्हणतात त्याचे बरे वाटते.
सुकाराचे लेकुरे ...
आपले ठेवावे झाकून
दुसऱ्याचे पाहावे वाकून
ही म्हण अगदी प्रचलित आहे. याचा अनुभव आपल्या प्रत्येकालाच असतो. लोकांना स्वतःचे वागणे आणि दुर्गुण दिसत नाहीत. पण समोरच्याचे अगदी लग्गेच दिसतात. त्या क्षणी तिसऱ्या व्यक्तीला ती गोष्ट सांगितली जाते. त्याच्यामागून जरा बढाचढाके वाईट-साईट बोलले जाते. कधी कधी तर गोष्ट खूपच जास्त रंगवून सांगितली जाते. काही खोट्या गोष्टीही त्यात जमा होतात. आपल्या मनातला राग extra add केला जातो. समोरचाही तितकाच तन्मयतेने ही निंदा ऐकत असतो. म्हणजेच सांगणाऱ्या प्रमाणेच ऐकणारीही तितकाच दोषी. बाबा ह्यालाच विष्ठा चिवडणे असे म्हणत आहेत.
सुकाराचे लेकुरे मस्त वोरडा घातिला
चिखलाच्या नंदनवनी त्यासी आनंद जाहला
बेसिकली काही जण समोरच्याची प्रतिमा लोकांच्या नजरेत मलीन करण्यासाठी सुद्धा निंदा करतात. हे तर too much ! पण कलियुग आहे. मनात मत्सर राग असतोच. त्यामुळेच परनिंदा करायची संधी कुणीच सोडत नाही. निंदा करण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद प्राप्त होतो. मी देखील बऱ्याच वेळा निंदा करतो. कारण त्यामागे बरेच वाईट अनुभव असतात. पण मग नंतर लक्षात येते की ही निंदा करण्यातून आपल्याला काहीच प्राप्त होत नाही.
१) Generally निंदा ही मागूनच होत असल्यामुळे ज्याची निंदा होते त्याला काहीच कळत नाही.
२) ज्याने खरोखर बदलायला हवे, तो काही बदलतच नाही. कारण आपण ज्यांच्याविषयी निंदा करत असतो, त्यांना आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजूच शकत नाही. आपल्या मनात त्याच्याविषयी काय आहे हे त्याला समजणार तरी कसे ?
३) निंदा करून आपलेच डोके बधिर होते. मनस्वास्थ्य बिघडते.
४) ज्याची निंदा होत आहे तो मजेत जगत असतो. पण आपण निंदा करीत असल्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. extra burdon
५) समजा 'अ' ही व्यक्ती 'ब' ची 'क' कडे निंदा करीत आहे. तर 'अ' ला थोडी भीती असतेच. 'क' ने 'ब' ला 'अ' तुझ्याबद्दल काय काय बोलतो हे सांगितलं तर ?
६) जो निंदा करीत आहे त्याचीही निंदा ऐकणारा पुढे करू शकतो. हल्ली कुणाचाच भरवसा नाही.
७) विनाकारण वेळ वाया जातो. निष्पन्न काहीच नाही.
हेमाडपंतांनी त्या निंदा करणाऱ्या माणसाचे नाव सर्वांनसमोर उघडे केले नाही. म्हणजेच हेमाडपंतांनी ही कथा लिहिताना सुद्धा त्या निंदा करणाऱ्या माणसाचीही निंदा केलेली नाही. हा खूप मोठा गुण हेमाडपंतांकडून शिकण्यासारखा आहे.
निंदकाचे घर असावे शेजारी.. आपली निंदा जे करतात त्याने आपली चूक आपल्याला समजते आणि त्यासाठी क्षमा मागून किमान यापुढे तरी तीच चूक पुढे होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो. त्यामुळे कुणी आपली निंदा केलीच, तरी त्यासोबत हा फायदा आपल्याला मिळतो.
नंदाई सुद्धा आत्मबल क्लास मध्ये हेच सांगत असते. आज डॅड नी आपल्याला इतक्या भक्ती सेवेमध्ये गुंतवून ठेवले आहे की हे सारे करण्याला वेळच पुरत नाही. हीच त्याची कृपा.
बापू भक्तिविण नाही
दुजे सार ह्या जीवनी
पिपा लोळत होता मळी
त्यासी उद्धरिले झणी
तो हा मिळाला नरजन्म
सांडू नको ऐसा व्यर्थ ...
राधाकृष्णामाईची कथा ...
ह्या बाबाचे सगळ्यांवर बरोबर लक्ष असते आणि हा योग्य वेळी प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला देतोच देतो. राधाकृष्णामाईची कथा याचीच साक्ष देते.
सुंदराबाई क्षीरसागर. राधाकृष्णाच्या निस्सीम भक्त. यामुळेच त्यांचे नाव राधाकृष्णामाई पडले. बाबांवर, आपल्या सद्गुरूंवर जीवापाड प्रेम. सेवेत अव्वल. बाबा येण्याचा रस्ता साफ करीत. वाटेतील दगड बाजूला करीत. बाबांकरिता प्रेमाने खायला पाठवीत. अशा प्रेमळ भक्ताकरिता हा बाबा धावून येणार नाही असे होईल काय ? बाबांनी तिच्या आयुष्यातले असेच काटेकुटे दगड बाजूला सारले.
प्रेम देई प्रेम घेई
हाच एकला करार
ह्या जातीनं ब्राह्मण. बाबा मुसलमान. तो काळ खूप वेगळा होता. आताचं जग फारच modern आहे. त्या काळी लोकांचे विचारही थोडे बुरसटलेले होते. त्यात राधाकृष्णामाई बालविधवा होत्या. त्यामुळे लोक खूपच विचित्र विचार करू शकत होते. हेच avoid करण्यासाठी बाबांनी त्यांना मशिदीत येण्याची बंदी घातली होती. यात बाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. आपल्या भक्ताला लोकं नावं ठेऊ नये याकरताच बाबांनी हे केले होते.
जो भक्तांसाठी धावत येई
अन लेकुरांसी जवळी धरी
असा अनिरुद्ध माझा स्वामी ...
काही कारणामुळे जर आपला भक्त मशिदीच्या स्पंदनासाठी वंचित राहात असेल, तर आपणच ती स्पंदने प्रत्यक्ष त्याच्याकडे जाऊन त्याचा त्याला लाभ देऊया... हा प्रेमळ विचार बाबांच्या मनात आला, म्हणूनच ते प्रत्यक्ष स्वतः सुंदराबाईंकडे आले. ह्या साईनाथाला कुणीच रोखू शकत नाही. त्याच्या लीलेला काहीच बांध नाही.
सुंदराबाईना याच कारणासाठी बाबांचा चरणस्पर्ष प्राप्त होऊ शकला नव्हता. त्यापासून त्या वंचित राहिल्या होत्या. पण लोकप्रथेच्या विरोधात जाऊनही काही करायचे नव्हते. मग बाबा सरळ बाईंच्या छपरावरच चढले. खरेच ग्रेट ! हा खरोखर अनिरुद्ध आहे ! unstoppable ! याद्वारे त्यांनी आपल्या चरणांची स्पंदने त्यांना दिली. सेवेचे फळ दिले !
राधाकृष्णाबाईंच्या बाजूला असलेल्या घराला बाबानी शिडी लावली आहे आणि त्यावर ते चढले आहेत. एका श्रेष्ठ भक्ताच्या सानिध्यात राहिल्याने त्या शेजाऱ्याचेही घर पावन झाले... हाच तो चांगल्या संगतीचा परिणाम !
साईचरित्रात बाबांनी भक्तांचे भोग स्वतःवर घेतल्याची अनेक उदाहरणे येतात. हे ही त्याचेच उदाहरण. सुंदराबाईंना हिवताप होता तेव्हा बाबाही तिथे अशक्त झाले होते. त्यांचे आपल्या लेकरांवर लक्ष असतेच. साऱ्यावरच माया. एकीकडे पैलवानाला कुस्तीत हरवणारे strong बाबा इतके अशक्त होतात की त्यांना चालतानासुद्धा त्यांच्या बाजूला दोन माणसांचा आधार लागावा ! सुंदराबाईंना आलेला ताप बाबांनी स्वतःवर घेतला.
कोट्यावधी पापांचे करी हा भंजन
ह्याचे हे सामर्थ्य रक्षी जना
अनिरुद्ध नामे असे ज्यास गोडी
तोचि सुखे राही सर्वकाळ ...
... पण अचानक ठीक होऊन अशा अवस्थेत बाबा चक्क छपरावर चढले ! हा स्वतः आपल्या भक्तांसाठी कष्ट घेतो ! बाबा साक्षात याची देही याची डोळा सुंदराबाईना bless करायला आले.
ऋण, वैर हत्या कल्पअंतीही चुकत नाही हे आपण पाहिलेच. बाबांनीसुद्धा त्या शिडीवाल्याला २ रुपये देऊन हाच संदेश दिला आहे. हा स्वतः त्याच्या आचरणाद्वारे समाजाला आदर्श घालून देत असतो. त्याचेही फुकट काहीच घेतले नाही. ऋणात राहिले नाहीत. राधाकृष्णामाईची निष्ठा आणि सबुरीची शिकवणच, त्यांचा आदर्श या दोन रुपायांद्वारे सर्वांना बाबांनी दिला आहे.
ह्या दोन शिड्याही त्यांच्या सेवा आणि भक्तीचे प्रतीक. ह्यावरूनच हा बाबा चालत आपल्याकडे येतो. जितकी आपली सेवा आणि भक्ती जास्त, तितका ह्याचा प्रत्यक्ष सहवास, ह्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. ह्याचा सहवास मिळाला म्हणून सुंदराबाईसुद्धा चढल्या नाहीत. त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. आपण मात्र बापू आई दादाचा सहवास लाभला की आपण हवेतच चालू लागतो.
हा बाबा म्हणजे त्रिविक्रमच ! हा एका वेळी ३ पावलं टाकतो. बाबानी ह्या ३ घरावर चालून सुंदराबाईंचे त्रितापच हरण केले आहेत. एकाच वेळी ३ पावले टाकून त्यांनी राधाकृष्णामाईंचे भूत, वर्तमान आणि भविष्यच उजळवून टाकले आहे.
बाबा एकदा वर आणि एकदा खाली शिडीवरून चढून आणि उतरून येतो. आपल्या आयुष्यातही असेच ups and downs चालूच असतात. अशा आपल्या प्रवासात हा आपल्यासोबत कायम असतोच. हा त्रिविक्रम आपल्या आयुष्याच्या वर्तुळाच्या फेऱ्यावर / व्यासावर प्रत्येक point ला कायम आपल्याला साथ देतो. सोबत करतो. मग ते सुख असो वा दु:ख ! हाच आपला खरा सोबती. बाकी नुसते नामधारी.
हा सुंदराबाईंकडे येताना, छपरावर चढताना त्यांना समजले नाही. हा आला आणि हा गेला ... अगदी सहजतेने ... बापूही असाच आपल्या घरी येत असतो ... पण आपल्याला कळतच नाही. आपण आपल्याच विश्वात मश्गुल असतो. "हा" कुठे कुणाला आठवतो ? पण तरीही हा रोज येतो .... प्रेमासाठी !
शेवटी एवढेच वाटते. सुंदराबाई मशिदीत येऊ शकत नव्हत्या तर बाबांनी स्वतः तिच्या घरी प्रत्यक्ष येऊन तिच्या घराचीच मशिदमाई केली. हा बाबा काहीही करू शकतो ! फक्त ह्याच्यावर मनापासून प्रेम करूया !
0 comments:
Post a Comment