Adhyay 24

10:34:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  

मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

फुटाण्याची गोष्ट 


एखादी गोष्ट समजावून सांगण्याची आणि समोरच्याच्या मनात ठसवण्याची एक कला असते. आणि ह्या साईनाथाचे सारे काही हटकेच. अगदी अलगद समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे आणि त्याला खजील करून त्याला त्याची चूक आपोआपच समजावी असे. ही फुटाण्याची गोष्टही काहीशी अशीच. 

आपण दररोज देवाची पूजा करतो, देवाला नैवेद्य अर्पण करून मगच जेवतो. यामागे आपण पहिला घास नेहेमी त्या भगवंताला अर्पून मगच स्वतः ग्रहण करावा हाच भाव असतो. तसेच जेवण्याआधी वदनी कवळ घेता .. हा श्लोक म्हणण्याची पूर्वापार प्रथा आपल्याकडे आहे. एकंदरीतच मी जेवण्याआधी भगवंताला आठवावे आणि त्याला आपल्या घरातील एक सदस्य मानून त्यालाही प्रेमभावे जेवायला द्यावे हीच भावना असते.  

हल्ली तर एक औपचारिकता म्हणूनच देवाला नैवेद्य "दाखवला" जातो. त्यामागे प्रेमभाव वैगरे सोडाच, तर जेवताना देवाची आठवणही राहात नाही. जिथे औपचारिकता आली तिथे प्रेम कसे असेल ? माझे स्वतःचेही काही वेगळे नाही. भूक लागल्यावर मला तर मी कधी एकदा जेवण ताटात वाढून जेवायला सुरुवात करतो असे होऊन जाते...     


सकाळी आला उपाशी गेला 

दुपारी आला उपाशी राहिला 

रातीस आला उपाशी निजला 

तरी कसा बापू माझा येतचि राहिला .. 

बापूला माझ्या प्रेमाची तहान 

बापूला माझ्या भक्तीचीच भूक ... 


इथे तर्खडांची गोष्ट आठवते. किती सुंदर भाव आहे त्यांचा ! नैवेद्य दाखवायला विसरल्यावर केवढ्या प्रेमाने बाबांची क्षमा मागितली आहे ! ह्याला म्हणतात प्रेम ! 

बेसिकली हा साईनाथ ह्या कथेत नक्की काय सांगायचा प्रयत्न करत आहे ? 

१) ज्याप्रमाणे आपण घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी जेवणाचे ताट वाढतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या साईनाथाला आपल्या घरातीलच एक member मानून त्याची आठवण काढून, त्याला प्रेमाने "तू ही ये रे जेवायला" असे म्हणून मगच घास घ्यायला हवा.  मग बघा, हा साईनाथ कसा तृप्त होऊन जातो ते !

बेसिकली सगळे आपल्या मनातल्या भावावरच अवलंबून आहे. जर मला ह्याची आठवणच राहात नसेल, याचाच अर्थ आपण आपल्या घरात ह्याचे अस्तित्वच मान्य करीत नाही आहोत. नाही का ? पण तरीही आपल्या प्रेमापोटी हा सतत आपल्याकडे येतो... 

ह्या बाबाला मोठे पंचपक्वानांचे जेवण, सोन्याचांदीचे ताट वैगरे काहीही नको. फक्त मनातील प्रेम आणि भाव हेच त्याचे जेवण. पण याचाच आपल्याकडे अभाव असल्यामुळे हा साईनाथ उपाशीच राहतो. सुदाम्याच्या मूठभर प्रेमाने दिलेल्या पोह्यामुळे त्याला अख्खी सुवर्णनगरी मिळाली !    

 २) हा साईनाथ कायम आपल्याजवळ आहेच हे आधी मनात पक्के हवे. मग आपसूकच "त्या"ची आठवण राहील. माझ्या डोळ्यांना हा दिसला म्हणजेच तो माझ्याजवळ आहे असे मुळीच नाही. ह्याने सदैव आपले बोट पकडले आहे. हे एकदा मनात फिट बसवले की बेडापार झालाच !            

म्हणजेच बाबा आणि माझ्यामधले physical distance किती यावर काहीच अवलंबून नाही. मी मनाने त्याच्याशी किती कनेक्टेड आहे हे महतवाचे !

३) नुसते जेवतानाच नाही, तर आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट ह्याच्या नजरेत येतेच. ह्याच्या नजरेचा स्पर्ष पोहोचू शकत नाही अशी जागाच नाही. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीचा हा प्रत्यक्ष साक्षीदार आहेच !


सर्वसाक्षी आहे बापू 

तो काय जाणेना ...      

 

४) ह्या बाबाला कायम आपल्या प्रत्येकाचीच आठवण असते. मग आपण त्याची आठवण नाही काढली तरीही ! बापूंचा गणपती मधला लाईव व्हिडीयो आठवला. बापू त्यातही हेच बोलले होते ! 


हेमाडपंत जरी बाबांना जेवताना घास द्यायचे विसरले होते, तरीही बाबा रोज न चुकता त्यांच्या प्रेमाच्या घासाची आतुरतेने वाट पाहात असायचे. ह्याला म्हणतात प्रेम ! कुठल्याही अपेक्षेविना केलेलं निस्वार्थी प्रेम !


५) हा बाबा आपल्या प्रत्येकाला त्या भगवंतावर प्रेम करायला शिकवीत आहे ! आणि हो ! ते ही प्रेमानेच ! खरेच ग्रेट ! ह्याच्यासारखा शिक्षक नाही. 


६) हेमाडपंताना बाबांनी सुंदर बोध दिला आहे ! ते ही न रागावता आणि न रुसता. हेमाडपंत जरी जेवताना बाबांची आठवण काढीत नसले किंवा प्रेमाने घास अर्पण करीत नसले, तरी बाबा त्यांच्यावर रागावले नाहीत किंवा कोपही धरला नाही. आपण मात्र दुसऱ्याने केलेली छोटीशी चूकही अगदी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवतो. 


७) जे काही असेल ते सर्वांनी वाटून खावे हाही संदेश बाबांनी दिला आहे. एक तीळ सात जणांत वाटून खावा ही म्हण प्रचलित आहे. हल्ली प्रत्येकाचाच मोह आणि अप्पलपोटीची वृत्ती इतकी वाढली आहे की डोळ्यासमोर दुसरा कुणी दिसतच नाही. काही जणं तर लपून छपून खातात. मिळून, एकमेकांत वाटून खाण्याची सवयच राहिली नाही. खाताना फक्त स्वतःचा विचार न करता जे काही आहे ते मिळून खावे हा महत्तवाचा संदेश बाबांनी दिला आहे. 


८) बाबांनी ही कथा सर्वांसमक्ष घडवली आहे. म्हणजेच हा उपदेश केवळ हेमाडपंतांसाठी नसून प्रत्येकालाच आहे हेच बाबांना बहुधा सांगायचे असावे. आणि बाबांचा हाच उपदेश साईचरित्रामुळे आपल्या प्रत्येकालाच प्राप्त झाला आहे. 


९) बाबांनी इथे फुटाणे पाडून एक प्रकारे प्रॅक्टिकलच दाखवले आहे. हल्लीच्या जगात नुसत्या बोलण्याने काहीच होत नाही. प्रत्येक जण पुरावा मागतो. खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यात सारे जण अगदी माहीर असतात. हा साईनाथ काळानुरूप वागताना इथे दिसतो. हेमाडपंतांना नुसती शिकवण दिली नाही, तर सर्वांसमक्ष फुटाणे सुद्धा पाडून दाखवले !

 10) ह्या फुटाण्याप्रमाणेच आपल्या प्रत्येकामधेच अनेक दुर्गुण लपून राहिलेले असतात. ह्या बाबांच्या कृपाछत्राखाली आल्यामुळे ते सारे आपोआपच ह्या फुटाण्यासारखे बाहेर पडतात.

धुवाया इंद्रिय, सारवाया मन
व्हावया स्वच्छ दारी आलो...    

आपण प्रत्येक जण आपल्यात दुर्गुण आहेत हे मानायलाच तयार नसतो. "हे फुटाणे माझ्याकडे कसे आले... माझ्याकडे तर ते नाहीतच" ह्याच विचारात आपण असतो. एकंदरीतच कुणीच स्वत:ची चूक कबूल करीत नाही. पण आपण जितके स्वत:ला ओळखतो त्यापेक्षा कितीतरी अधिक हा बाबा आपल्याला ओळखतो. 


११) साईनाथांच्या कृतीला पाहून कुणी म्हणाले असते की अरे इथे तर फुटाणे पाडून साईनाथांनी तर जादूच केली आहे... पण ही जादू नाही, तर ह्या बाबाची शिकवण देण्याची आगळी-वेगळी पद्धत आहे. ह्या बाबाचे सारे काही एकदम हटके ! हेमाडपंतांना सारे काही समजावून सांगण्याची बाबांची इच्छा अशी फलद्रूप झाली. बाबांनी मार्ग अगदी निराळाच निवडला. हा बाबा कधी काय करेल ह्याचा नेम नाही. हीच त्याची लीला.

१२) बघायला गेलं तर हेमाडपंत सारे काही समोर असलेल्या प्रत्येकामधे वाटूनच खात होते. पण ह्या बाबाला विसरत होते. साईनाथांनी हे का केले? तर हेमाडपंतांची भक्तीमार्गात प्रगती व्हावी म्हणूनच. त्यामागे बाबांचा दुसरा कोणताच हेतु नव्हता.

१३) "साईनाथ सर्वांसमक्ष मला बोलले" असे हेमाडपंत रागावून म्हणाले नाहीत. त्यात त्यांनी अपमानही मानला नाही. तर यातून बोध घेऊन स्वत:ची प्रगती साधली. फार मोठा गुण आहे हेमाडपंतांचा !

१४) बघायला गेलं तर ही सारी कथा हेमाडपंतांवर फोकस करते. आपण कुठे कमी पडलो हे सांगण्यात हेमाडपंतांना काहीच कमीपणा वाटला नाही. तर उलट याद्वारे बाबांचे गुणसंकीर्तनच केले आहे. आपण जिथे कमी पडलो तसे साईचरित्राचे वाचकांनी करू नये हीच त्यांची इच्छा होती. फार मोठी गोष्ट आहे ही ! आपण प्रत्येक जण स्वत:च्या चूका जगापासून लपवायचे बघतो. पण इथे हेमाडपंतांनी तर सारे ओपनली लिहीले आहे ! खरोखर ग्रेट !

१५) कथेमधे शेवटी सुदाम्याची गोष्टही येते. सर्वांनी मिळून मिसळून शेअर करून खावे ही जरी शिकवण ह्या कथेतून द्यायची असली, तरी इथे महत्त्वाचा एक फरक लक्षात येतो. स्वत:कडॆ अन्न असूनही सुदामा श्रीकृष्णाशी खोटे बोलला आणि वागला. पण हेमाडपंत मात्र सगळे काही जसेच्या तसे बाबांसमोर कबूल करीत आहेत. बाबांना ते खोटे बोलले नाहीत. इथे फुटाणे जरी हेमाडपंतांच्या कोटातून बाहेर आले असले तरी बाबा खरे काय ते जाणत होते. एकंदरीतच हेमाडपंतांनी बाबांना फसवले नाही.


एकंदरीतच ह्या बाबापासून काहीही लपून राहिलेले नाही. त्यामुळे आपण कितीही जरी मुखवटे घालून वावरलो तरी आपण खरे काय आहोत हे तो बाबा जाणतोच! आपण जगाला मूर्ख बनवू शकतो, पण ह्या बाबाला नाही. आपल्याला वाटतं चला, हा बाबा काहीच बोलत नाही, म्हणजे ह्याला काहीच कळत नाही... पण तसे नसते. वास्तविक असे वागून आपण स्वत:लाच उल्लू बनवत असतो. आणि म्हणूनच ह्या कथेत शेवटी दिलेले श्रीकृष्ण आणि सुदामाचे उदाहरण कायम लक्षात ठेऊया. कारण त्यातच आपले हीत आहे.   

     

--------------------------------------



अण्णा चिंचणीकर आणि मावशीबाई कथा 





विनोद ! अगदी सहज आनंद प्रदान करणारा शब्द ! जो विनोद करतो आणि जो ऐकतो त्यांच्यासाठी जरी हे हसू देणारे असले, तरी ज्याच्यावर विनोद केला जातो,  त्याला कदाचीत वाईट वाटू शकते. कधी कधी रागही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोष्टीतील अण्णाही बहुतेक असेच असावे. म्हणूनच मावशीबाई आणि अण्णांचे भांडण झाले.     

काही जणं तर विनोदाच्या आड जे बोलायचे आहे ते बोलून जातात आणि मुद्दाम त्याला विनोदाचे लेबल लावतात. प्रत्येकाला दुसऱ्यावर विनोद झाला की हसू येते, परंतु स्वतःवर विनोद झाला की मात्र राग येतो. 

अण्णांचा स्वभाव straight forward होता. "जशास तसे" ह्या म्हणीला अगदी साजेसा होता. स्वतः कुणाच्याच वाटेला जात नसत. परंतु जर कुणी उगाचच वाटेत आला तर त्याला सोडतही नसत. मावशीबाईनी साधा विनोद केला, पण अण्णांनी तो seriously घेतला आणि दोघांचे भांडण जुंपले. 

भांडणांमध्ये प्रत्येकालाच आपणच जिंकावे हीच इच्छा असते. समोरच्यानेच माघार घ्यावी असेच प्रत्येकाला वाटत असते. आणि त्यात जर आपली काही चूक नसेल तर मग काही विचारूच नका. अगदी टिपेला जाऊनही भांडायला आपण कमी करीत नाही. आजूबाजूला कोण आहे, आपण कुणासमोर आणि कुठे भांडत आहोत याचाही विचार आपण करीत नाही. इथे तर प्रत्यक्ष द्वारकामाईत आणि ते ही साईनाथांसमोर हे सारे चालू आहे ! 

पण साईनाथ सुद्धा ग्रेट आहेत ! भांडणाचा विषयच बदलून टाकला आहे ! Situation कशी handle करायची हे कुणी त्यांच्याकडूनच शिकावे. एका क्षणात भांडण स्टॉप झाले, एवढेच नाही तर त्याचे विनोदातही रूपांतर केले. 

हा साईनाथ प्रत्येकाला ओळखून असतो. अण्णा चिंचणीकरांचा लगेच फाडफाड बोलून टाकणाऱ्याचा स्वभाव, तर त्याच विरुद्ध सर्वसामान्य माणसाप्रमाणे सेवा करताना थट्टा मस्करी करण्याचा  स्वभाव.. हे सारं तो जाणतोच. आणि या भांडणाची परिणीती पुढे जाऊन काय होऊ शकेल याचीही त्यांना कल्पना आहेच. आणि म्हणूनच योग्य वेळीच साईनाथांनी हा विषय आवरता घेतला आहे. 

भगवंताची सेवा करणे हे खूप पुण्याचे काम आहे. ते करीत असताना खरे तर अशी भांडणे न होऊ देणेच बरे. पण प्रत्येकाचे विचार आणि स्वभाव वेगळा. त्याला इलाज नाही. भांडणे होतच राहतात. अशा वेळेस मग साईनाथालाच मधे पडून काहीतरी लीला करून ते भांडण सोडवावे लागते. म्हणजेच आपल्या लेकरांमधे झालेले भांडण ह्या साईनाथाला आवडत नाही. पण भांडणांमधे कुणालाच स्वतःची चूक दिसत नाही. मग ह्यालाच मधे पडून सारे सोडवावे लागते. 

मुख्य म्हणजे इथे साईनाथांनी कुणाची "बाजू" घेतली नाही... आपल्या शब्दांच्या जादूने त्यांनी दोघांनाही फटकारले. ते ही विनोदाद्वारे. बाबा खरोखर एक महान कलाकारच आहेत. 

मुळात भांडण कशामुळे होते ? दुसऱ्याच्या बोलण्यावर आपण पटकन react होतो तेव्हाच. त्यापेक्षा समोरच्याला आधी नीट समजून घेऊन मग आपण आपले मत मांडायला हवे. पण हल्ली तर काहीच सांगता येत नाही. कित्येक जण मुद्दाम दुसऱ्याना त्रास द्यायलाही खोडया काढतात. त्यामुळे आजकाल कुणावरच भरवसा ठेवता येत नाही.    

प्रत्येक वेळेस भांडताना हा बाबा "प्रत्यक्ष" आपल्या बरोबर असेलच, ह्याची गॅरेंटी देता येत नाही. म्हणूनच या कथेतून दिलेला बोध नीट लक्षात ठेवणे गरजेचे वाटते. पण असे जरी असले, तरी त्याचे आपल्याकडे कायम लक्ष असतेच. हा विश्वास ठेवला की बेडापार झालाच म्हणून समजा.         



  



    




  





      





       







 





   




  





     







  




     




   




 





   








0 comments: