Adhyay 25 (अध्याय २५)

10:18:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  

मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 




दामूअण्णा कासार - धंद्याची गोष्ट  


जगी सर्वसुखी असा कोण आहे... 

ह्या जगात सर्वसुखी असा कुणीच नाही. प्रत्येकालाच काही ना काही कमी आहेच. दामुअण्णा एवढे श्रीमंत असूनही पुत्रशोकाचे दु:ख त्यांना सतावीत होते. दोन बायका करूनही त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला नव्हता. पण ज्याच्या डोक्यावर साईनाथाचा वरदहस्त असेल त्याला कमी ती तरी कशाची पडू शकणार ? नाही का ? त्याचे हे दु:खही बाबांनी पुढे अगदी लीलया दूर केले. 

कुणीच मानव परिपूर्ण नसतो. पूर्ण केवळ हा साईनाथ. म्हणूनच हा आपल्यातील अपूर्णता घालवू शकतो. बाकी कुणामधेच एवढे सामर्थ्य नाही. 

मानवाला प्रत्येक क्षणाला नेहेमीच काही ना काही प्रश्न पडतच असतात. कुणीच यातून सुटला नाही. अशा आणि यासारख्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर केवळ हा साईनाथच देऊ शकतो. कारण शेवटी आपण मानव आहोत. आपली बुद्धी आणि ताकद, कुवत ती किती असणार ! हा साईनाथच सारे काही जाणत असल्याकारणाने तोच उचित काय आणि ते मिळण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगू शकतो. 

प्रत्येक माणूस "हे करावे की न करावे" याच प्रश्नात सदैव गुंतलेला असतो आणि नक्की काय केले पाहिजे हे मात्र त्याला पुष्कळ विचार करूनही काहीच समजत नाही. दामुअण्णाना सुद्धा हाच प्रश्न सतावत होता. वरवर पाहता धंद्यात नफा तर दिसत होता. त्या काळी आणि किंबहुना ह्या घडीला सुद्धा एक लाख रुपये ही फार मोठी रक्कम आहे. सहज चालून आलेली लक्ष्मी अशी दवडणे हे त्यांना खरोखरच जीवावर आलेले होते.      

तसे पाहाता दामूअण्णांच्या घरी लक्ष्मी पाणी भरीत होती. पैश्याने काहीच कमी नव्हती. पण श्रीमंत माणसाला जितका संपत्तीचा लोभ असतो, तितका कुणालाच ह्या जगात नसेल. धंद्याच्या नफ्यात मिळणारी एवढी मोठी रक्कम घालवणे हे त्यांच्या जीवावर आले होते. 

बघायला गेलं तर या धंद्यात काहीच शाश्वती नव्हती. नफा मिळेलच असे त्यांचा मित्र तर म्हणत होता ह्यांना पण वरवर पाहाता त्यात नफा दिसत होता; परंतु तो मिळेल की नाही ही भीती मात्र मनात कुठेतरी दडलेली होती. धंदा म्हंटले की नफा तोटा हा आलाच. परंतु पैसे गुंतवून फायदा न होता तोटा झाला तर फार मोठे नुकसान होऊ शकते. यासाठीच दामूअण्णा घाबरत होते. 

आता आपण काही महत्तवाच्या गोष्टी लक्षात घेऊ.  

१) दामूअण्णांनी साईनाथांना तर विचारले... परंतु "ते जे म्हणतील तेच मी ऐकेन" हा प्रथमदर्शनी त्यांचा निश्चय होता असे दिसत नाही. "एक मत घ्यावे" ह्यासाठीच बहुदा त्यांनी बाबांना विचारले आहे असे दिसते. कारण बाबांना विचारले तरीही दामुअण्णा निश्चिन्त झालेले दिसत नाहीत. त्यांच्या मनाची अजूनही द्विधा मनस्थितीच आहे. 

२) साईनाथांपेक्षा त्यान्च्या त्या मित्रावरच दामूअण्णांचा जास्त विश्वास होता असे दिसते. त्यामुळेच साईनाथांचे उत्तर आल्यावरही त्यांचे मन शांत झालेले नव्हते. 

३) खरे पाहाता दामूअण्णाना हा सौदा करायचाच होता. तेच त्यांच्या मनात होते. परंतु बाबांचाही त्यांना त्यांच्या म्हणण्याला होकार हवा होता. (म्हणजे सारे काही safe). म्हणूनच बाबांनी सांगितल्यावरही त्यांना हातचे पैसे जातील की काय ही भीती वाटली. त्यांना दोन्ही दगडावर पाय ठेवायचे होते. साईनाथानाथाची परवानगी तर हवी होती, परंतु ती दामुअण्णा सांगतील त्याला.      

४) हा साईनाथ नेहेमी जे भक्ताला त्याच्यासाठी योग्य असेल तेच सांगतो. प्रेयसापेक्षा जे त्या भक्तासाठी श्रेयस आहे त्याचीच निवड करायला सांगतो. आपले हीत नक्की कशात आहे हे आपल्याला समजत नसते. पण हा बाबा सारे काही जाणत असतो. आपली इथे पोच नाही ते हा बाबा अगदी सहज पाहू शकतो. 

पिपा सांगे खास बात ह्याची ऐका 
शब्द ह्याचा ऐका तोचि निका 

शब्द तुझे जरी दुरून ऐकले 
नशीब आमुचे तरी फळफळलें 
  
५) इथे दामूअण्णांची लबाडीही दिसून येते. ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे बाबाना वळवू पाहात आहेत. म्हणजेच इथे प्राधान्य बाबांच्या इच्छेला नसून स्वतःच्या इच्छेला आहे. कितीही हुशाऱ्या आणि लबाड्या बाबांच्यापुढे फिक्याच. त्यांना कळत नाही असे काहीच नाही.        

६) ह्या लोभातून कुणीही व्यक्ती सुटली नाही. आपण सारे सामान्य मानव. लोभ आणि मोह हा असणारच. तसाच दामूअण्णांनासुद्धा होता. एक लाख रुपये डोळ्यासमोर दिसत होते. ते दवडायचे नव्हते. हा बाबा आपल्या मनात नक्की काय चालू आहे हे अगदी बरोबर ओळखतो. आपल्या भक्तांची काळजी ह्यालाच. दामुअण्णाचे नुकसान झालेले बाबाला कसे बरे आवडेल ? म्हणूनच बाबांनी हा सौदा करायला नकार दिला. 

७) अर्धंवट माहिती घेऊन निष्कर्षाला आलो की दामूअण्णांसारखी धावपळ होते. मनाची स्थिती ढासळते आणि त्याचाच परिणाम आपल्या शरीरावरही दिसून येतो. परंतु बाबांचा साऱ्याच बाबतीत सखोल निरीक्षण आणि अभ्यास असल्याकारणाने ह्या बाबाला उचित निर्णयापर्यँत येता आले. 

८) श्रद्धावानांना जे उचित आहे ते दत्तगुरू नेहेमीच पुरवत असतात. अर्थात आपले प्रयास आपण चालूच ठेवायचे असतात. ते नाही थांबवायचे. परंतु आपल्यामधील "लोभ" आपल्याला स्वस्थ  बसू देत नाही. सतत काही ना काही उचापत्या करायलाच लावतो. म्हणूनच आयुष्यात अशी द्विधा मनस्थिती येते. बाबांचे वाक्य - "आपल्याला अर्धी भाकरी पुरे. लाखाच्या मागे पडू नकोस" हे खूप महत्तवाचे वाटते. इच्छा आणि लोभ यात एक रेषा असते. ती पार झाली कीच आयुष्यात प्रश्न पडतात. 

९) बाबांनी दामूअण्णाना उचित मार्गदर्शन केले आहे. शिवाय आपण हे सांगितलयावर दामुअण्णा काय करतील हे ही बाबाना माहीत आहे. म्हणूनच बाबांनी आपल्या संदेशात प्रेमाने दामूअण्णाना समजावून सांगितले आहे. पण तरीही लाखाच्या मोहात दामुअण्णा पडले आहेत. 

१०) परीक्षेचा निकाल असताना जशी अधीरता असते, तशीच दामूअण्णाना झाली आहे. बाबांच्या उत्तराची अगदी प्रकर्षाने ते वाट बघत आहेत. ही अधीरता कशामुळे आली? आपण वर पाहिले. दामूअण्णांना तर हा सौदा करायलाच हवा होता. त्यांच्या मनात जे होते त्याच्या विरुद्ध निर्णय लागला म्हणूनच त्यांना त्रास झाला. 

"तू जे इच्छिसी तेचि घडो"

हे त्यांच्या मनात नसून 

"मी जे इच्छिसी तेचि घडो" 

हे होते. यामुळेच बाबांचे उत्तर दामूअण्णांना रुचले नाही. इथे बाबांनाही नावे ठेवायला त्यांनी कमी केलेली नाही. बाबांना काय करू हे विचारणे ही त्यांना त्यांची चूक वाटली. 

बघा, मोह मानवाला काय काय करायला भाग पाडतो. किती मोठे पाप घडले ! पण तरीही हा साईनाथ आपल्याला टाकत नाही. समजून घेतो. 

११) आपले काम व्हावे यासाठी आजकाल प्रत्येक जण लाच देतो. मस्का पॉलिश लावणे हे सुरू होते. तुमचा फायदा आणि माझाही फायदा असा धंदा सुरू होतो. ऑफिसमध्ये बढती मिळावी किंवा आपले स्थान बळकट व्हावे याकरता बॉसला चाटले जाते. लक्षात येण्यासाठी साधे सुधे नेहेमीच्या व्यवहारातील उदाहरण. 

सध्या चुकीला बरोबर आणि योग्य गोष्टीना चूक ठरवले जाते. पण जे चूक ते चूकच. सगळ्यांनी ते ठरवले म्हणून बरोबर होऊ शकत नाही. 

आपल्या गोष्टीत दामूअण्णांनाही साईनाथांकडून होकार मिळावा याकरता त्यांनी बाबांचे पाय चेपायला, मस्का लावायला सुरुवात केली. बाबांनी एकदा दिलेला नकार पुन्हा बदलायला निघाले. त्यासाठी प्रत्यक्ष बाबांना भेटायला आले. एवढेच नाही, तर होणाऱ्या नफ्यातला वाटाही देईन असे सांगितले. 

दामूअण्णांनी इथेतर साक्षात बाबांबरोबर व्यवहाराची भाषा केली ! बाबा कुठलाही निर्णय देताना त्यात स्वतःचा फायदा बघत नाहीत. कुठंलही कार्य करण्यामध्ये त्यांना स्वतःचे खिसे भरण्याचा अजिबात मोह नसतो. 

हा साईनाथ कुणी साधासुधा मानव नसून तो मानवरूपी परमात्मा आहे. हे आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. त्याला जरी मानवाच्या मर्यादा असल्या, तरीही हा विश्वाचा राजा आहे. त्याला काय आणि कसली कमी असणार ? त्याला आपण काय देऊ शकणार ? आपली तेवढी कुवतच नाही. 

इथे तर स्वतःचे काम होण्यासाठी जवळ जवळ बाबांना त्यांनी विकतच घ्यायचे ठरवले. आपण दिलेल्या लाचेला हा काय भुलणार ? ते शक्यच नाही. ते ह्याच्यापुढे नगण्यच ! हा बाबा ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. हा मूर्तिमंत सत्य आहे. हा काय असत्य आणि अनीतीचे कार्य करणार ? हा तर सदैव भक्तांसाठी झटत आला आहे, त्यांच्या कल्याणासाठी झटत आला आहे. 

हेच आपण विसरतो आणि दामुआण्णांसारखी मोठी चूक करून बसतो ! 

१२) हा बाबा सर्वांना अगदी बरोबर ओळखून असतो. दामूअण्णांची लबाडी काही ह्या बाबांपासून लपून राहिलेली नाही. ह्याला बसवू शकणारा अजून जन्माला यायचा आहे. हा बाबा लबाडांसाठी अति-लबाड आहे. बाबांनी दामूअण्णांची लबाडी नुसती ओळखलीच नाही, तर ते कशी लबाडी करीत आहेत हे ही दाखवून दिले ! त्यांची चूकही तिथेच त्यांना दाखवून दिली आणि ते खजील झाले. बाबा खरोखर हुशार आहेत ! 

१३) व्यवहारात तोटा होणार आहे हे बाबा आधीच जाणीत होते. भविष्याचेही ज्ञान असल्यामुळे योग्य ते काय हे केवळ बाबाच जणू शकतात. सामान्य मानवांना ते दिसू शकत नाही.     

खरे पाहाता आपली कुवत नसतानाही आपल्या प्रत्येकालाच केवढा गर्व असतो ! प्रत्येक जण स्वत:ला शहाणा समाजात असतो. मलाच काय ते कळते ह्या गैरसमजामुळेच साईनाथाला दोष दिले जातात. पण नंतर भविष्य वर्तमान झाल्यावर डोळे पांढरे होतात. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. "अरेरे .. मी तेव्हा ऐकायला हवे होते" असेच शब्द फक्त आपल्या तोंडी राहतात. पश्चात्ताप करण्याशिवाय हाती काहीच उरत नाही. त्यालाच आपण दुर्दैव म्हणतो. त्या दामूअण्णांच्या मित्रालाही अखेर बाबांच्या शब्दाची ताकद समजली.      


शेवटी दामूअण्णांचे सुद्धा कौतुक करावेसे वाटते. हो नाही हो नाही करता करता त्यांनी बाबांचे ऐकले आणि त्यांचे भले झाले. बाबांचा मोठा अनुभव त्यांना मिळाला.          

ह्या कथेत सद्गुरूतत्तवाचीही ताकद कळून येते. आज कित्येक लोकांकडे सद्गुरूततवाचे छत्र नसल्यामुळे ते पुष्कळ गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. जेव्हा जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतील तेव्हा तेव्हा त्यांना फक्त त्यांच्या मर्यादित ताकदीच्या जोरावरच त्या संकटांशी लढावे लागेल. पण ज्यांच्यासोबत हा बाबा आहे त्यांना संकटातही मदत आणि मनसामर्थ्य आपोआपच मिळत जाते.. ह्याच्या कृपेमुळे. आज आपल्या सोबत बापू आई दादा आहेत त्यामुळे जीवनाचे ओझे पुष्कळ कमी झाले आहे. जगण्याला उचित दिशा प्राप्त झाली आहे, उचित अनुचितातील फरक कळू लागला आहे. बापू प्रवचनातही सांगतात. व्यवहार कसा करावा, डोळे उघडे ठेवून कसे जगायचे.   

सामान्य माणूस हा षड्रिपूंच्या कक्षेत येतोच. इथे कुणीही संत नाही. त्यामुळेच माणसाला लोभ जडलाच तर "ह्या"च्या पायांचाच जडूदे .. अशीच प्रार्थाना करूया... 

लोभ जडला ह्या पायांचा 
लोभ वाढत राहो ... 
षड्रिपू झाले बहू उपकारी 
अजातशत्रू मी झालो ..  
     





             
दामूअण्णा कासार - पुत्रप्राप्तीची गोष्ट


प्रत्येक सर्वसामान्य माणसाला संसारात नक्की काय हवे असते ? तर सुख आणि समाधान. त्यामागे धावून धावून त्याचे अख्खे आयुष्य निघून जाते. 

सुखासाठी श्रम सारे 
अहोरात वणवण 
ओझी वाहतो कर्माची 
भार वाढतची राहे ... 
बापूराया धाव घे रे 
मायबापा धाव घे ...  

हे सुख आणि समाधान मिळावे यासाठीच तो वेगवेळ्या मार्गांचा अवलंन करीत असतो. आधी सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण असा कुणीच नाही. प्रत्येकालाच काही ना काही कमी ही आहेच. सारी श्रीमंती असूनही दामुअण्णा पुत्रशोकाने त्रासलेले होते. त्यावर उपाय तो काय करायचा ह्याच विचारात असत. त्यासाठीच त्यांनी बरेच उपाय केले. पण उचित ते फळ मिळाले नाही. 

नको येरझारा बहूमूर्तीपाशी 
अनिरुद्ध एकचि भार वाहे 
अनिरुद्ध नामे असे ज्यास गोडी 
तोचि सुखे राही सर्वकाळ ... 

आपला बाप एवढा श्रीमंत आणि परिपूर्ण असताना दुसऱ्या कुठे कशाला भीक मागायची ? कशाला हवे इतर उपाय ? त्याची काहीच गरज नाही. मध्ये प्रियागोल्ड बिस्किटांची जाहिरात लागायची. "हक से मांगो". हा साईनाथ आपला सख्खा बाप आहे. आपण त्याची लेकरे. मग कशाला हवे इतर कोणते उपाय ? 

पण भक्ताने जरी सांगितले नाही, तरी ह्या बाबाचे आपल्या प्रत्येक भक्तावर बरोबर लक्ष असते. दामूअण्णांनी प्रत्यक्ष जरी बाबांना सांगितले नसेल, तरी बाबा हे सारे जाणूनच आहेत. म्हणूनच आंब्याच्या पेट्या आल्यावर बाबांना दामूअण्णांची आठवण झाली. त्यातील ४ आंबे दामूअण्णांकरिता बाजूला काढून ठेवायला सांगितले. एवढेच नाही, तर बाबांनी खास त्यांच्यासाठीच ते ठेवले होते. 

खरे पाहाता आधीच्या कथेत दामुअण्णा बाबांशी कसे वागले हे आपण पाहिले. कुणालाही राग आला असता. पण शेवटी त्यांनी बाबांचे ऐकले. हा बाबा कुणावरही राग धरत नाही. सगळ्यांच्या सुखासाठी सतत झटत असतो. एवढे सारे होऊनही बाबानी दामूअण्णांवर कृपादृष्टी कायम ठेवली आहे. आणि त्यांचे दुःख दूर केले आहे. 

कलियुगात जन्माला आलेला प्रत्येक जण हा प्रारब्धाचे ओझे जवळ बाळगून आहे. बाबांचे "हे आंबे खावे आणि मरून जावे" हे वाक्य त्यांच्या डोक्यावर असलेल्या प्रारब्धाच्या डोंगरालाच उद्देशून म्हणत आहेत असे वाटते. ह्या आंब्यांच्या प्रसादाच्या रूपात त्यांचे प्रारब्धाचे विशाल डोंगरच नष्ट केले आहेत. म्हणूनच ह्यातून मुक्ती मिळाल्यावर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. 

ही कथा वाचून "भगवान देता है तो छप्पर फाडके देता है" ही म्हणच आठवली. पुत्रशोक करीत असलेल्या माणसाला एक नाही, तर तब्ब्ल १२ मुले दिली ! बाबाचें सारेच गुणाकार स्वरूपात. हाच तो त्रिविक्रम ! हा बाबा काहीच कमी पडू देत नाही. सारे काही प्रेमाने देतच असतो... आणि त्याबदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवत नाही.        
         
बाबांनी ४ आंबेच का ठेवावे ? याद्वारे त्यांना दामूअण्णांचे आहार विहार आचार विचार शुद्ध करायचे होते. ते झाले आणि बाबांचे शब्दही फळाला आले. हा बाबा जसे  म्हणतो तसे घडतेच ! किंबहुना नियतीलाही ते अगदी ऐकावेच लागते. त्याला कसलाच अपवाद नाही. इथे बाबांनी सृष्टीचे सारे नियम वाकवलेले आहेत. बाबांची दामूअण्णांना पुत्र द्यायची इच्छा झाली, त्यांनी संकल्प केला की त्याच्या आड कुणीच येऊ शकत नाही. 

शेवटी एवढेच वाटते, सारे काही प्रदान करणारा, आपल्याला दुःखातून बाहेर काढणारा, आपल्यातील कमतरता भरून काढणारा हा बाबाच आहे. बाकी कुणीही नाही. हाच आपला निवारा आहे !                


अवघाचि संसार सुखाचा करीन 
आनंदे भरीन तिन्ही लोकी ...     
    
इस बगिया का हर फूल खिला 
अनिरुद्ध तेरे आने से ...  


 



 


   

       



 



 





     
 





 



      








  









                     





0 comments: