Adhyay 27 (अध्याय २७)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही. शाम्या विष्णुसहस्त्रनाम पोथी कथा
प्रत्येक मानवाला काही ना काही छंद असतोच. अगदी मनापासून आणि स्वतः झोकून देऊन त्याची ती ती आवड अगदी प्रत्येक जण जोपासत असतो. त्यामध्ये त्याला खूप आनंद मिळत असतो. मग जेव्हा परमात्मा मानव म्हणून या धरणीवर वावरत असेल तेव्हा त्यालाही छंद असणारच. ह्या कथेमध्ये पुष्कळ पोथ्यांचा / ग्रंथांचा उल्लेख आला आहे. ह्या साईनाथालासुद्धा पवित्र आणि उपयोगी ग्रंथ संग्रही करण्याची आवड आहे असे दिसते. बापूंसारखीच. कोणतेही नवे, उपयोगी आणि interesting पुस्तक दिसले आणि बापूंनी ते संग्रही केले नाही असे झाले नसेल.
ह्याच्या प्रत्येक कृतीमागे फार गहन अर्थ दडलेला असतो. त्याद्वारे तो प्रत्येकाचे कल्याणच साधत असतो. ह्याचे छंद आणि आवडही इतरांवर कृपा करण्यासाठीच हा जोपासतो. शाम्याला विष्णूसहस्रनामाची पोथी देण्याची ह्याची लीला काही औरच ! तेच शाम्याचे नाथसंविध असते.
आपले हीत नक्की कशात आहे हे आपल्याला समजत नाही. एवढेच नाही तर त्यासाठी मी नक्की काय करायला हवे हे सुद्धा लगेच उमगत नाही. परंतु हा साई ते जाणतो. साईचे शाम्यावर जीवापाड प्रेम आहे. म्हणूनच तो नको नको म्हणत असतानाही त्याला विष्णुसहस्रनामाची पोथी देणे जरूरीचे आहे म्हणून बाबांनी बळे बळे ती पोथी उपलब्ध करून दिली. अगदी स्वतःच्या हाताने त्याच्या खिशात टाकली.
मग कुणालाही प्रश्न पडेल की बाजारात विष्णू सहस्रनामाची पोथी अगदी सहज विनासायास उपलब्ध असताना बाबांनी असे का बरे केले ? शाम्या आणि रामदासीबुआ ह्यांमधे भांडणे लावून दिली की काय ? पण नीट विचार केला की तसे नाही असे समजते. ते कसे ?
१) रामदासी हा नित्यनियमाने रामायण आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करीत असे. म्हणजेच त्यांनी भक्तीमार्गात आधीच पाय रोवलेलाच होता. परंतु असे असतानाही त्यांचे वर्तन मात्र त्यानुसार नव्हते. बऱ्याच वेळा आपण पोथी वाचतो, पण त्यामागील भावच समजून घेत नाही. तसेच त्यात सांगितलेला मोलाचा उपदेश प्रत्यक्ष आचरणातच आणत नाही. त्यालाच पद्धत मूढ असे म्हणतात.
मग असे असताना पोथी वाचनाचा खरा फायदा कसा काय प्राप्त होणार ? तो ह्या रामदाश्याला प्राप्त व्हावा हीच बाबांची कळकळ होती. राम्दाश्याने जरी पोथीची नुसती घोकंपट्टी केली असली, तरीही त्याचेसुद्धा फळ बाबांनी त्याला दिले. त्यालाही पोथी नुसती न वाचता त्यामागील अर्थ आणि उपदेश जाणून घेऊन तो आचरणात आणावा अशी बाबांना त्याला शिकवण द्यायची होती म्हणूनच बाबांनी हा सारा घाट घातला. राम्दाश्याला बाजारात पिटाळून त्याच्या गैरहजेरीत त्याची पोथी राम्दाश्याला दिली.
२) ह्यामागे सजून एक कारणही असेल ते म्हणजे बाबांनी समोर दिसत असलेली संधी grab / catch कशी करायची हे शिकावले आहे. बाबांनी शाम्याला बाजारातून पोथी विकत घे असे सांगितले नाही, तर समोर दिसत असलेली पोथी लग्गेच हातात घेऊन शाम्याला दिली.
३) ह्याद्वारे बाबांनी दानाचे महत्त्वही पटवले आहे असे दिसते. आपण प्रत्येक जण चिकट असतो. स्वतःकडे समुद्र असतानाही एक बादली पाणीही दुसऱ्याला देताना आपण हजारदा विचार करतो. तसेच राम्दाश्याचे झाले.
४) ह्या लीलेमुळे राम्दाश्याच्या क्रोधिष्ट स्वभावाला बाबांनी लगाम घातला.
या कथेतून अजून एक समजले ते म्हणजे बाबांनी जेव्हा शाम्याला बळे बळे पोथी देऊ केली तेव्हा त्याच्याही मनात बाबांविषयी कुतर्क आला. बाबा भांडणे लावून देत आहेत की काय ? आपलेसुद्धा इथेच चुकते. हा बाबा नेहेमी आपल्या भल्यासाठी झटत असतानाही आपण त्याला दोषीच ठरवतो. आपल्या प्रत्येकाचाच अगदी आवडीचा प्रश्न असतो. देवा तू असे का केलेस ?
ही कथा विष्णुसहस्रनामाचे महत्त्वही विषद करते. ते ही जरूर वाचावे. हा बाबा स्वतःच महाविष्णू आहे. मनसामर्थ्यदाता. बाबांचे बोल अगदी पटतात. "हे नाम मनाची धगधग शांत करते.". हा साईनाथ प्रत्यक्ष महाविष्णू असतानाही बाबा स्वतःचा (साईनामाचाच) उदो उदो करा असे सांगत नाहीत. तर विष्णुसहस्रनामाचे महत्त्व पटवून देताना दिसतात.
राम्दाश्याचेही पोथीवरील प्रेम कथेत कळून येते. म्हणूनच बाजारात बऱ्याच पोथ्या उपलब्ध असतानाही त्याला आपलीच पोथी हवी होती. प्रत्येकालाच आपली गोष्ट प्रिय असते. परंतु त्यासाठी त्याने बाबांना दोष दिला. त्याचा तीव्र क्रोध उफाळून आला. एवढ्या शुल्लक कारणासाठी त्याने अगदी टोकाची भूमिका घेतलेली पाहायला मिळते. ह्यातून काही गोष्टी समजतात.
-> दररोज विष्णुसहस्रनामाचे पाठावर पाठ करूनसुद्धा समोर प्रत्यक्ष उभ्या असलेल्या साईरुपी विष्णूला ह्याने नीट ओळखलेच नाही.
-> मन क्रोधाने सतत पेटलेले आहे
-> ज्याचे रोज नेमाने पाठ करतो, त्याच्याशीच समोरासमोर भांडायला आणि त्यावर दोषारोप करायला सुद्धा कमी केले नाही
-> दानत नाही
-> पोथीच्या बदल्यात पंचारत्नी गीता मागितली. म्हणजेच विष्णूसहस्रनामाएवढी पवित्र पोथी समोरच्याला दान करण्याची नियत नाही. एवढेच नाही, तर एक पटीच्या (विष्णुसहस्त्रनाम) बदल्यात पाचपट गोष्ट हवी आहे. (पंचरत्नी गीता - ज्यामधे विष्णूसहस्रनामासोबतच इतरही स्तोत्र आहेत). ते पण ५ पंचारत्नी गीता मागितल्या.
-> एवढे सारे ग्रंथ वाचूनही पालथ्या घड्यावर पाणीच. ग्रंथवाचनाचा काहीच फायदा झाला नाही.
पुष्कळ लोक आपण बघतो. मी हे वाचले आहे ते वाचले आहे, मलाच सारे कळते असे दाखवतात. प्रौढी मिरवतात. अनेक वल्गना सतत करत फिरतात. परंतु एवढे सारे वाचले असतानाही आतमध्ये मात्र षड्रिपू खचाखच भरलेले असतात. मग अशा वाचनाचा काय फायदा ? नाही का ?
आपण साईचरित्रातील उदाहरणेच बघूया. भावार्थात मोठमोठ्या गोष्टी लिहायच्या परंतु त्यातील आचरणात काहीच येत नाही. हा बाबा खूप साधा सोपा आहे. आपणच त्याला उगीचच कठीण करून ठेवले आहे. राम्दाश्याने भारंभार ग्रंथ वाचण्याऐवजी नुसते साईवर प्रेम केले असते, तरी त्याचा बेडापार झाला असता. एवढे जरी कळले तरी पुरे, असे मला वाटते.
-------------------------
खापर्डे बाई कथा
गुरुकृपा होणे म्हणजे नक्की काय याचे जीवंत उदाहरण म्हणजे ही कथा. सद्गुरू आणि भक्त यांच्यामधील खरे प्रेम अगदी दिसून आले. हा त्रिविक्रम प्रेमस्वरूप कसा याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. हेमाडपंतांनी साईचरित्राच्या सर्व श्रोत्यांना साईप्रेमाच्या झऱ्यात चिंब भिजता यावे यासाठीच ह्या कथेची निवड केली आहे असे दिसते.
कथेच्या सुरुवातीलाच दादासाहेब खापर्डे या विलक्षण, परंतु तितकेच नम्र व्यक्तिमत्तवाची आपल्याला ओळख होते. इतके मोठे असूनही पाय जमिनीवर राहणे हे खरोखर महत्तवाचे आहे. साईनाथांसमोर नेहेमीच ते आपुलकीने आणि नम्रपणे वागत असत. आणि हे नुसते दाखवण्यापुरते नाही, तर खरोखर मनापासूनचा नम्रपणा त्यांच्या स्वभावात होता. हा बाबा सर्वांना अगदी नखशिखांत ओळखत असतो. त्याचेच फळ बाबांनी खापर्डेना दिले आहे.
आपण नेहेमी ऐकतो. गुरुमंत्र मिळण्यासारखे भाग्य नाही. आपल्या प्रत्येकाला बापूंनी गुरुमंत्र दिला आहे. आपण खरेच खूप भाग्यवंत आहोत. कथेत बाबांनी तसाच खापर्डे कुटुंबियांनाही गुरुमंत्र दिला आहे. हे तर अहोभाग्य. ज्याला ज्याला म्हणून जे जे उचित आहे ते ते हा बाबा देतोच.
ह्या संपूर्ण कथेत बाबांची प्रसन्नता अगदी उठून दिसणारी आहे. आपली प्रेमळ भक्त ही कित्येक जन्मानंतर आपल्याला भेटली आहे ह्याचा आनंद बाबांच्या प्रत्येक कृतीतून ओसंडून वाहताना आढळतो. मानवाला विस्मृतीचा शाप आहे. पण हा बाबा सारे काही जाणतो. आपले कित्येक आधीचे जन्म ह्याला आपल्याला बघताक्षणीच समोर दिसून येत असतील. बाबांचे वाक्य न वाक्य याची साक्ष पटवून देते.
जनम जनम का नाता
है तेरा मेरा ...
ह्या बाबाला किती चमचमीत नैवेद्य आहे, तो सोन्याच्या ताटात वाढला आहे का यापेक्षा किती प्रेमाने तो अर्पण केला आहे हे महत्तवाचे असते. बाकी काहीच नाही. खापर्डे बाईंचे बाबांप्रती प्रेम, त्यांची सेवा ह्याचे फळ बाबानी तिला अगदी आवडीने दिले. हा बाबा मनातील भाव जाणतो आणि त्यासाठी हा वाटेल ते करतो.
बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या भक्तीचीच भूक ...
हा भावच बाबा बघतो आणि मग प्रेमकृपावर्षाव करून आपल्याला चिंब चिंब भिजवतो. कृतार्थ करतो.
ही कथा म्हणजे नुसते प्रेम आणि प्रेम ! बस्स ! बाकी काहीच नाही. शेवटी तर खापर्डे बाईंची सेवा बघून तर खुद्द बाबा तिचे हात चेपू लागतात ! केवढे हे प्रेम ! स्वतः विश्वाचा राजा असताना आपल्या भक्तांच्या प्रेमळ भावापुढे मात्र अगदी कवडीमोलालाही विकला जातो !
शबरीची उष्टी बोरे मोहविती ह्याला
हावरा हा भक्तिप्रेमा
विके कवडीमोला
कित्येक जण केलेल्या सेवेची इतरांसमोर प्रौढी मिरवताना आपण पाहातो. त्यामागे प्रेम नक्कीच असते, परंतु "मी बाबांसाठी किती केले" हे दाखवण्यासाठी सतत धडपड सुरू असते. हा बाबा सगळे काही जाणतो. त्यामुळे आपण केलेली प्रत्येक सेवा त्याच्या चरणी रुजू होतेच. म्हणूनच सेवा प्रेमाने आणि अम्बज्ञतेने करायला हवी. खरे तर ही सेवा आपण बाबांसाठी करीत नसून आपल्या स्वतःसाठी करीत असतो. त्याने आपलीच प्रगती होत असते. त्यामागे बाबांचा काहीच फायदा नाही.
पण हा बाबा अगदी प्रत्येकाच्या प्रेमाने केलेल्या सेवेचे तितकेच मनापसून कौतुक करतो ! मग ती सेवा छोटी का असेना ! हा श्रीराम ज्याप्रमाणे खारूताईचेही प्रेमाने लाड करतो आणि तिला आपल्या ह्रदयात स्थान देतो, तसेच ह्या कथेत बाबांनी खापर्डे बाईंचे कौतुक केले आहे.
ह्या बाबांच्या कृतीतून अजून एक गोष्ट समजते ती म्हणजे सेवा करण्यासाठी लागणारी ताकद पुरवणारा सुद्धा हा बाबाच आहे. करणारा आणि करून घेणारा तोच ! आपण केवळ नाममात्र.
शेवटी एवढेच समजले. हा प्रेमासाठी काय वाट्टेल ते करतो. आपल्या भक्ताला चक्क आपल्या डोक्यावर घेऊन नाचतो ! एवढे विशाल आणि अफाट मन केवळ ह्या बाबाचेच !
0 comments:
Post a Comment