Adhyay 28 (अध्याय २८)

01:44:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

 

 लाला लखमीचंद कथा


 
 
बऱ्याच जणांना चमत्कार पाहायला खूप आवडतो. जादूचे खेळ पाहणे हे लहान मुलांप्रमाणे मोठ्यानाही भुरळ घालते. पण हे तर केवळ नजरेचे भास असतात. ते काही खरे नसते. तात्पुरते चमत्कार. हा साईनाथ अशा चिल्लर गोष्टी करत नाही. ह्याचे सगळे काही  दमदार असते. हा आपले आयुष्यच बदलून 'खरा' चमत्कार करतो. 
 
ह्या साईनाथाचे आपल्या आयुष्यात पदार्पण झाले की आपल्याला त्याच्या कृपेचे अनुभव यायला सुरुवात होते. आपल्या ह्याच अनुभवाला बाहेरील माणसे 'चमत्कार'  समजतात. ही तर खरे साईप्रेमाची जादूच ! लाला लखमीचंदांना अशीच सद्गुरू प्रेमाची जादू अनुभवायला मिळाली. 
 
लालांना प्रत्यक्ष बाबांनी स्वप्नात येऊन आपल्याकडे बोलावले आहे. खरेच खूप भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. त्यांना त्या क्षणी काहीच समजले नसेल. परंतु नंतर सारी लिंक लागल्यावर अंगावर शहारेच आले असतील. नक्कीच. 
 
दिल खो गया हो गया किसी का 
अब रासता मिल गया खुशी का 
रिश्ता नया रब्बा दिल छू राहा है 
खिचे मुझे कोई डोर तेरी और
तेरी और तेरी और तेरी और हाय रब्बा 
 
या कथेतून एक मात्र समजते. साईनाथांनी एकदा का ठरवले की ह्या भक्ताला आपल्याकडे खेचायचे, की सारी चक्रे फिरायला लागतात. सारा निसर्ग नियती बाबांची ही इच्छा पूरी करायच्या मागे लागतात. सगळ्या गोष्टी बाबांच्या आज्ञेत असल्याप्रमाणे घडत जातात आणि अर्थात शेवटी जे बाबा ठरवतात ती गोष्ट पूर्णत्वास जातेच. त्याला कोणताच अपवाद नाही आणि असूही शकत नाही. ह्या कथेत प्रत्येक टप्यावर चमत्कार आहे. 
 
लालांना पडलेले स्वप्न, गुणसंकीर्तनाला पाहिलेले तशीच साईछबी, शिरडीला येता का असे अचानक येऊन विचारणारा त्यांचा मित्र, ट्रेनमध्ये भेटलेले ४ बाबा भक्त, पेरू घेऊन विकणारी ती म्हातारी, अंतर्यामी बाबानी लालाजींचा पाहिलेला प्रवास, लालाजींच्या मनातली शिरा खाण्याची बाबांनी पुरवलेली इच्छा, लालाजींच्या मनातले बाबांनी ऐकलेले बोलणे हे सारे अगदी आपोआप घडत गेल्यासारखे आहे, नाही का ? 
 
एखाद्या चित्रपटात किंवा कार्टून मालिकेत ज्याप्रकारे नायकाच्या बाजूने साऱ्या गोष्टी आओपाप घडत जातात, अगदी तशाच प्रकारे हे सारे घडत गेल्याचे जाणवते. योगायोगांची अखंड मालिकाच लालाजींनी अनुभवली आहे. मस्तच. 
 
प्रयोग पुस्तकात रोपट्याची सूर्यप्रकाशाच्या दिशेने होत असलेली वाढ हा प्रयोग नक्की अभ्यासायला हवा. तर ही कथा अजून स्पष्ट होत जाईल.

"बांध माझ्या मना घट्ट तुझ्या पदा" ह्या पदानुसार भीरभीर उडणाऱ्या चिडीच्या पायाला साईप्रेमाच्या दोराने घट्ट बांधून हा साईनाथ आपल्या पायी तिला खेचतो आणि तिचा उद्धार करतो. 

ह्या कथेत लाला बाबांना आधी भेटले आहेत का ? तर नाही. बाबांना प्रत्यक्ष काय, तर फोटोमध्येही बघितले नाही. पण तरीही बाबांची कृपा झालीच की ! साईनाथ आणि त्याच्या भक्तांच्या मध्ये काहीच येऊ शकत नाही. distance doesn't matter !
 
जनम जनम का नाता 
है तेरा मेरा 
याद राहा प्रभू तुमको 
माई भूला बिसरा

आधीच्या जन्मातील कमावलेले पुण्य म्हणूनच हे नाथसांविध घडत जाते. सद्गुरूलाभ होतो. आणि एकदा का सद्गुरूचरण लाभले की दुसरे काहीच सुचत नाही. 
 
मोगऱ्याचा गंध दुरुनी न कळे 
परि येता जवळी न कळे दुसरे
 
अशीच लालाजींची स्थिती झाली. 
 
 
ह्या कथेमुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. 
 
१) स्वप्न काही खरे नसते अशीच बऱ्याच जणांची समजूत असते. स्वप्न खरे की खोटे हे मला माहीत नाही, परंतु हा बाबा जेव्हा स्वप्नात दिसतो, तेव्हा मात्र तो प्रत्यक्ष रूपातच आलेला असतो. तो भास नसतो हेच ह्या कथेद्वारे कळते. स्वप्नाद्वारेही झालेल्या कृपेचा प्रभाव भक्ताच्या प्रत्यक्ष जीवनात दिसतो. 

२) स्वप्न म्हंटले की माणसाला ते आठवेलच ह्याची १०० % खात्री नसते. परंतु लालांच्या ते पूर्ण स्वप्न लक्षात आहे. इतकेच नाही, तर स्वप्नात आणि ते पण पहिल्यांदीच पाहिलेला बाबांचा चेहेरा अगदी स्पष्ट त्यांना आठवत आहे. म्हणूनच दासगणूंच्या कीर्तनात बाबांचा चेहेरा पाहिल्यावर लाला थबकले आहेत. 
 
३) गुणसंकीर्तनाचा महिमा सुद्धा या कथेमुळे जाणवतो. मानवामधील साईभक्तीचे सुप्त बीज हे ह्या गुणसंकीर्तनामुळेच रुजू लागते. 
 
 ४) लालजींना साईकडे खेचून घेण्याचा रस्ता अगदी क्षणाक्षणाला क्लियर होताना आपल्याला दिसू शकतो. अख्खी परिस्थितीही वाकवली जाऊ शकते. 

५) पेरूच्या कथेद्वारे हेच समजते, की भक्तांच्या मनातील भोळा भाव हा साईनाथ जाणतो. यासाठी काय वाट्टेल ते हा साईनाथ घडवून आणू शकतो. जिथे पेरू मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती, तिथे चक्क पेरूची टोपली उत्पन्न झालेली पाहायला मिळू शकली. हीच ती प्रेमाची जादू. 
 
सुदाम्याच्या मूठभर प्रेमाच्या पोह्यासाठी श्रीकृष्णाने अख्खी सुवर्णनगरी त्याला दिली. 

भाव करुणेची साद वात्सल्याची 
प्रेमे वाकवी तोचि बापूराय

६) ह्या साईनाथाला सगळी खडानखडा माहिती असते. लालाजींच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचे डीटेल्स बाबा जाणून आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या मनात घडणारी प्रत्येक छोटी गोष्ट हा बाबा जाणतो. आणि भक्तांची प्रेमळ इच्छा पूर्ण करतो 

७) साईनाथांच्या प्रथम भेटीतच लालाजींना असलेला संधीवाताचा त्रास बाबानी दूर केला.

दर्शने सहजी हरेल फिकीर 
भोग प्रखर नासती

हा साईनाथ भक्तांचे प्रारब्धभोग स्वतःवर घेतॊ. लालाजींचा त्रास बाबांनी स्वतः खोकल्याच्या रूपात स्वीकारला. त्यांना अजून एक अनुभव दिला. 


शेवटी एवढेच वाटते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही जरी असलो, तरी ह्या बाबाचे आपल्यावर लक्ष असतेच ! आपण प्रत्यक्ष वा मनात करत असलेली प्रत्येक कृती / विचार हा बाबा जाणतोच. लालाजींप्रमाणे आपल्यालाही सद्गुरू लाभला / त्याने आपल्यासारख्या धोंडयांनाही जवळ केले त्यासाठी प्रथम ह्या बाबाना मनापासून अंबद्न्य म्हणूया !








------------------------------




बऱ्हाणपूर बाई कथा




ह्या कथेत अजून या बाईंची बाबांशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. समोरासमोर बाबांना बघू शकली नाही. पण साईंवर श्रद्धा आहे. शेवटी भक्त प्रेमापोटी बाबा स्वप्नात आलेच ! 
 
भक्त आणि सद्गुरू यामध्ये किती physical distance आहे ह्यावर काहीच अवलंबून नाही. भक्त बाबांशी मनाने किती जोडला गेला आहे हेच महत्तवाचे. 
 
शिरडी आणि बऱ्हाणपूर यातील यातील अंतर बाबांना तिच्याकडे पोचायला आड येऊ शकले नाही, आणि येऊ सुद्धा शकत नाही. ते कोणत्याही मार्गाने आपल्या भक्तांपेरेंत पोचतातच. ह्या बाबाला बंधन ते कुठले ! 
 
यावरून अजून एक गोष्ट समजते. ह्या बाबाच्या शरीराने जे जवळ आहेत त्यांचाच हा बाबा, तेच सारे ग्रेट असे अजिबात नाही. भक्त बाबांशी किती connected आहे यावरच सगळे ठरते. मग हा बाबा प्रेमासाठी कुठेही पोचतो. 
 
मी बाबांपासून किती लांब, अजूनही मला बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकले नाही, मी अभागी असे हे सारे विचार तिच्या मनात कधीच आले नाहीत. तिचे साईप्रेम त्यामुळे कमी होऊ शकले नाही. मग हा बाबाच तिच्याकडे तिला बोलवायला धावत आला. 
 
स्वप्न असो की वास्तव, हा बाबा प्रत्यक्ष आलेला असतो हे मात्र नक्की. ही कथा म्हणजे या गोष्टीचा लालजींप्रमाणे अजून एक दाखलाच आहे. 
 
एक लहान मूल आपल्या आईकडे, आपल्या हक्काच्या व्यक्तीकडे ज्याप्रमाणे काही मागते, अगदी त्याचप्रमाणे बाबा हिच्याकडे खिचडी भोजन मागत आहेत. खिचडी ! किती साधा प्रकार आहे ! बाबाना पंचपक्वान्ने, महागड्या चविष्ट मिठाया वैगरे काही नको. विश्वाचा राजा असूनही बाबांचा साधेपणा अगदी आपल्याला दिसून येतो. 
 
खरे पाहाता बाबांना हिच्या खिचडीची काय गरज असणार ? बाबांना काय कमी आहे का ? त्यांच्याकडे तर सारेच आहे. ही खिचडी म्हणजे बाईच्या बाबांवरच्या श्रद्धेला, प्रेमाला बाबांनी दिलेला प्रतिसाद आहे. म्हणूनच किती प्रेमाने पुढ्यातले सारे जेवण सोडून बाईच्या खिचडीसाठी बाबा हापापलेले आहेत. 
 
हा भक्तीचा भुकेला 
ह्याला नैवेद्य प्रेमाचा 
हा राहे तुमच्या ह्रदयी 
ह्याचा वाव सर्वांठायी ...
 
ह्या प्रेमासाठी हा साई सदा भुकेलेला असतो. जेवण सोन्याच्या वाढले आहे किंवा जेवणात किती भारी चमचमीत महागडे पदार्थ आहेत यापेक्षा किती प्रेमाने, भावाने तो नैवेद्य अर्पण केला आहे हे साईनाथ पाहातो. 
 
खरे पाहाता ह्या बाईप्रमाणे शिरडीत जाऊनही आपण साईला त्याला जो प्रेमभावाचा नैवेद्य अपेक्षित आहे तो दाखवतच नाही. आपण सदा स्वस्तुती, प्रौढी मिरवण्यातच व्यस्त असतो. आणि ह्या बाबाला उपाशीच ठेवतो. 

बापूला माझ्या प्रेमाची तहान 
बापूला माझ्या भक्तीचीच भूक 

ह्याचाच विसर पडतो. हे होऊ नये यासाठीसुद्धा ही कथा अभ्यासायला हवी. 
 
बाबांचे जेवण सुरू असताना पडद्याआड बाबा होते आणि ह्या बाईला पडदा दूर करून तिथे जावे लागले. हीच ती "तेल्याची भिंत". मनातील साई प्रेमभावच हा पडदा दूर करू शकतो. मग हा साईनाथ अगदी पोटभर जेऊन तृप्त होतो !
 
खरे पाहाता नियमांच्या बाहेर वागले की बाबा क्रोधीत होत असत. परंतु ह्या बाईच्या खिचडीसाठी कोपणे तर सोडाच, परंतु साईनाथांनी स्वत: नियम मोडून त्या खिचडीवर ताव मारला. 
 
आपण जरी म्हंटले की बाई खूप लांब राहात होती, तरीही तिने स्वतःहून शिरडी गाठायचा कधीच प्रयास केला नाही. मनात बाबांची तर ओढ आहे, परंतु नाणेघाट ओलांडायला नको. असे होता कामा नये. आपले एक पाऊल पडणे सुद्धा तितकेच महत्तवाचे आहे. शेवटी मग त्या बाबालाच धावत यायला लागले. आणि तो आलाच !
 
मग कसा तो कुठूनही 
येईलच तो अवचित 
वासरांसाठी प्रेमे जैशी 
धेनु येई हो हंबरीत
 
.



----------------------------







मेघाची कथा 







मेघाच्या कथेमध्ये त्याचा साईकडील प्रवास वर्णन करताना छोट्या छोट्या ४ - ५ कथा आढळतात. एक एक कथा जाणून घेत घेत आपण पुढे जाऊ . 

साईनाथांची इच्छा झाल्यावर आपल्या आयुष्यात अगदी चमत्कारिक गोष्टी घडून यायला सुरुवात होते आणि शेवटी आपली इच्छा काही जरी असली तरी हा बाबा त्याच्या चरणी आपल्याला लावतोच. मेघालाही ह्या भाग्याचा लाभ मिळणार होता. 

तसे पाहायला गेले तर मेघा जर साठ्याना भेटलाच नसता, तर शिरडीला त्याने जाण्याचा प्रश्नच नव्हता. साठयांनी त्याला शिवमंदिरात पूजेसाठी ठेवून घेतले असल्यामुळे अर्थात त्याची शंकरावर श्रद्धा जडली असणार. त्यात तो हिंदू ब्राहमण म्हणजे मुसलमानाच्या पायी लागण्याचा विचार दुरूनही एरवी त्याच्या मनात आला नसता. पण हा बाबा धर्म आणि जात ह्याच्या पलीकडे आहे ह्याचाच मेघाला पुढे प्रत्यय आला. 

ह्या कथेतून एक महत्तवाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ह्या बाबाच्या श्रद्धावानाच्या घरी अगदी चाकर म्हणून जरी कुणी असला, तरीही त्याच्या आयुष्याचे सोने होते. बाबा भेटण्याआधीही साठयांमुळे त्याला परमार्थाची गोडी लागली, त्याला सद्गुरू लाभला, त्याचा भाग्योदय झाला आणि आयुष्याला उचित वळण लागले. हीच त्या सद्गुरूकृपेची महती असते. आपण पुढे टाकलेले एक उचित पाऊल पुढे अख्खी सोनेरी वाटच आपल्यासमोर उभी करते ती अशी. 

एक मानवरूपी सद्गुरू / देव धरणीवर वावरत आहे हे लगेच कुणालाच पटू शकत नाही. मेघाचेही तसेच झाले. साठ्याना तो आपल्या गुरूच्या जागी मानीत होता. पण त्यांचे गुरूस्थानी असलेल्या बाबांच्या पायी जायला मात्र जात आणि धर्म त्याच्या आड आला. दैव देतं आणि कर्म नेतं अशीच आपली गत आपणच करून घेत असतो. पण तरीही हा सद्गुरू कोपत नाही किंवा मनात आपल्याविषयी रागही ठेवत नाही. 

वरवर पाहाता साईनाथ कोपले असे जरी वाटले तरीही त्यामागे आपल्या भक्ताचे हीतच त्यांना साधायचे असून त्या भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी हा उसना लटका क्रोध बाबा धारण करतात. बाबांपासून काहीच लपून राहिलेले नाही. मेघाच्या मनातील विचार बाबा जाणून आहेत. मनात नसताना केवळ साठयांनी सांगितले म्हणून मेघा शिरडीत आला होता. त्यामागे बाबांना भेटण्याची तिळमात्र ओढ नव्हती. पण असे असतानाही मेघा शिरडीत बाबांची सेवा करीत राहिला. बाबांच्या क्रोधाने आणि त्यांनी दिलेल्या अनुभवामुळे मेघाचे डोळे खाडकन उघडले होते. तो मनात पुरता खजील झाला होता. 

एवढा मोठा अनुभव येऊनही मानवाचे मन कुतर्कांतच डुंबत राहते ते असे. शेवटी मन हे बुद्धीला हरवते आणि मेघा तसाच परत घरी येतो. पण काय करणार ? बाबांची इच्छा त्याला पुन्हा शिरडीला नेणारच होती. बाबांच्या इच्छेच्या आड आल्यामुळे त्याला तापाच्या रूपात भोगावेच लागले. छडी लागे छम छम विद्या येई घम घम ... या तापाने जरी त्याला भयंकर 'ताप' दिला असला, तरी त्यामुळेच पुन्हा त्याला बाबा आठवला. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि मग तो कायमचाच बाबांचा झाला. हिंदू मुसलीम हा त्याच्या डोक्यातील भेद कायमचा संपला आणि आता साई हाच त्याचा शंकर झाला. तेल्याची भिंत पडली.     

ही भिंत पडल्यामुळेच साईचरणाच्या भक्तीवाटेवर मेघाचा प्रवास सुरू झाला आहे. एक एक अनुभव यायला सुरवात झाली आहे. 


   

पूजा करण्याची राहिली 




सद्गुरूतत्व, सारे देव हे शेवटी "एक" आहेत. मानवाने त्यांना त्याच्या सोयीप्रमाणे भिन्न बनवले आहे. देवांमधे आपापसात अजिबात वाद नाही. काया जरी वेगवेगळ्या असल्या, तरीही ते भिन्न नाहीतच. एकाच तत्त्वाची अनेकविध रूपे. 

ह्या लघूकथेतून काही गोष्टी स्पष्ट होतात. 

१) हा साईनाथ सर्वसाक्षी आणि सर्वव्यापी आहे. मेघाच्या पूजेत खंड पडला आहे हे मेघा सांगण्याआधीच त्यांना समजले आहे. 

२) कथेत नमूद केलेल्या देवतांची आणि मग साईनाथांची पूजा करणे हा मेघाचा नित्यक्रम होता. ती त्याची उपासनाच होती. दरवाजा बंद होता म्हणून किंवा इतर कोणत्या कारणास्तव त्याच्या नित्य पूजेत खंडच पडला आहे. बाबा हे कसे होऊ देतील ? भक्ताची नित्यपूजा अधुरी कशी बरे राहून देतील ? नक्कीच नाही. म्हणूनच आपल्या लीलेद्वारे बाबानी आपल्या भक्ताची उपासना करून घेतली, चांगली इच्छा फळास आणविली.       

३) ह्या साईच्या आज्ञेत सारे विश्वच आहे. सजीवच काय, तर निर्जीव वस्तूलाही ह्या बाबाचे ऐकावेच लागले.  निर्जीव वस्तूही त्याच्या आज्ञेत आहेत. म्हणूनच मेघाला दिसलेला बंद दरवाजा साईनाथांच्या शब्दप्रभावामुळे पुढे उघडा आढळला.  

४) साईनाथ केवळ माझीच पूजा करा असे कधीच म्हणत नाहीत. मेघा इतर देवी देवतांची करत असलेल्या पूजेला बाबांची अजिबात हरकत नाही. उलट राहिलेली पूजा पूर्ण करण्यासाठी साईनाथ स्वतः झटताना आपण बघतो.      

५) माझ्या पूजेतच सारे काही आले, मग बाकी देवतांची पूजा कशाला हवी? असे बाबा म्हणत नाहीत. त्यांना इतर देवतांची पूजाही तितकीच महत्तवाची वाटते. भक्तांच्या मनातल्या प्रेमळ भावभक्तीसाठी हा बाबा काहीही करू शकतो.    

६) मेघाची इतर देवतांची पूजा होईपरेंत बाबांनी स्वतःची पूजा होऊ दिली नाही. मेघाने ठरवलेल्या नित्यक्रमात अडथळा आणला नाही, उलट तो दूर केला.  

७) एक देव पूजेशिवाय राहून गेला याची मेघाला खंत आहे. ह्यालाच प्रेम म्हणतात. ते होते म्हणूनच बाबानी सुंदर अनुभव दिला.  

८) बाबांची आज्ञा होताक्षणीच तडक मेघा निघाला. बाबांवर असलेला पुरा विश्वास ह्यात दिसून येतो. त्याच्या मनात काहीच कुतर्क आला नाही. बाबांच्या शब्दांवर शंकाही घेतली नाही  


खरे पाहाता मी किती देवतांची पूजा केली ह्यापेक्षाही किती प्रेमभावाने मी पूजा केली हे जास्त महत्तवाचे आहे. मेघाचा सर्वांवर जीव लागला होता. बाबा हे ओळखून होते. म्हणूनच आपल्या भक्ताच्या मनातील पवित्र इच्छा पूरी करवून घेतली.        




बाबांना घातलेले स्नान 




हा साईनाथ भक्ताचे हट्ट कसे पुरवतो ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा. शंकराच्या देवळाचा सेवक बनवल्यापासून मेघा शंकराचा कट्टर भक्त बनला होता. पण आता साई हाच त्याचा सगुण रूपातील शंकर होता. दोन्हीही एकच आहेत हे त्याला समजले होते.  याच शंकराला स्नान घालायचे त्याच्या मनात आले. आपल्या प्रेमळ भक्ताचे असे प्रेम हा बाबा स्वीकारणार नाही असे कसे बरे होईल ? बाबांनी लगेच परवानगी दिली.         

आपल्याला सद्गुरूसेवेचा चान्स मिळाला आहे ही जाणीवच किती सुखकारक आहे ! या विचारानेच अंगात एक अनामिक बळ येतं .. याचा अनुभव आपण प्रत्येकानेच घेतला असेल. हे साईप्रेमाचे बळ. बाबाच ते पुरवतो. मेघा यामुळेच अगदी झपाटल्याप्रमाणे जवळपास २५ किलोमीटर चालला. प्रखर उन्हात छत्रीशिवाय, पायात चपलांशिवाय. खरेच ग्रेट ! आपण तर जिम मध्ये एसी च्या थंड हवेत आणि साऱ्या सुखसोयी असताना ट्रेडमिल वर ५ किमी जरी चालले तरी धापा टाकायला लागतो.   

साईप्रेमापुढे हे कष्ट हे श्रम उरतच नाहीत. शुल्लक होऊन जातात. भक्त जेव्हा साईप्रेमात न्हाऊन निघतो तेव्हाच ही स्थिती प्राप्त होते. बापूंचे वानरसैनिक म्हणायला जशी वीरश्री संचारते, अगदी तसेच काहीसे मेघाला झाले असावे. 

बाबा पण लबाड. आपल्या लाडक्या भक्तांबरोबर थोडी खेळी खेळल्यावाचून त्यांना थोडीच करमणार आहे ? लगेचच स्नानास ते तयार होत नाहीत. दुपार होईपरेंत मेघा त्यांची पाठच सोडत नाहीत. शेवटी भक्त प्रेमापुढे हा बाबा नेहेमीप्रमाणे हरतोच !

भाव करुणेची साद वात्सल्याची 
प्रेमे वाकवी तोचि बापूराय 

सुरुवातीला मेघा बाबांना मुसलमानच समजत होता. आता मात्र बाबामध्येच त्याचा देव होता. बाबांनीही त्याची कळ काढण्यासाठी मुद्दाम फकिराला गंगास्नानाची काय गरज असे म्हंटले असावे. 

खरे पाहाता बाबांची स्नान करण्याची इच्छा नसावी. परंतु भक्तप्रेमापोटी त्यांनी स्वतःची इच्छा दूर सारली आहे असे वाटते. एक आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराच्या प्रेमळ हट्टासाठी नमते घेते, त्याप्रमाणेच ते तयार झाले आहेत. परंतु नुसते डोक्यावर पाणी शिंपडण्याच्या अटीवरच. परंतु मेघा कसला ऐकतोय ! त्याचे प्रेम इतके उतू जात होते की सगळा पाण्याने भरलेला घडाच बाबांवर रिकामा केला. शंकराच्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करताना जसे समाधान मिळते तसेच मेघाला मिळाले असेल. 

पाण्याचा एक थेंब जरी कपड्यांवर पडला तरी त्या क्षणी तो थेंब जिथे पडला ती जागा ओली झालेली असते. इथे तर चक्क घडाभर पाणी अंगावर पडल्यावर बाबा कसले कोरडे राहणार, असाच विचार कुणाच्याही मनात आला असता. 

परंतु बाबांच्या इच्छेविरुद्ध जायची पाण्याची काय बिशाद ! पाण्याच्या गुणधर्मालाच बाबानी वाकवले आहे. पंचमहाभूते ही बाबांच्या कशी आज्ञेत आहेत याचे हे उत्तम उदाहरण. बाबांची जशी इच्छा तसेच घडून आले. 

इथे बाबांनी जादू केली का ? तर नाही. इथे बाबांना त्यांच्या इच्छेनुसार काही घडवून आणण्यासाठी काहीही करावं लागत नाही. त्यांची जशी इच्छा असते, तेच आपोआप घडून येते. आपण सामान्य मानव आहोत. हा साई जरी एक मानव म्हणून दिसत असला तरीही तो परमात्मा आहे. त्याला मानवाचे नियम लागू होऊच शकत नाहीत. 

केवढा मोठा अनुभव आहे हा ! मेघाचे बाबांवरील प्रेम, त्यांची सेवा करण्यासाठी काहीही करायची त्याची इच्छा, बाबांवरील श्रद्धा ह्याचे एकत्रित फळ बाबांनी मेघाला दिले आहे. या कथेत आई-मुलाचे हळुवार नाते उलगडत जाताना आपल्याला दिसते. 

हल्लीच्या जमान्यात हे प्रेमच कुठेतरी लोप पावत असलेले दिसते. सगळी कृत्रिमता. दिखाऊपणा. पण हा साई किती प्रेमळ आहे ना ! त्याचे नावच मुळी प्रेम ! ह्या साईने स्वतःची इच्छा बाजूला सारून मेघासाठी, त्याच्या प्रेमळ इच्छेचा मान देऊन स्नानास तयार होताना आपण बघितले. आज आपली आई सोडली तर कोण कोणासाठी एवढे करतो ? कुणालाच कुणाची फिकीर राहिलेली नाही. ह्या कथेतून आपण हे लाभेवीण प्रेमच करायला शिकायला हवे असे वाटते.      

खोटी सारी नाती ना प्रेम ना ओलावा 
नाते तुझे माझे अभंग रे ... 




मेघाला झालेला स्वप्नदृष्टांत 



मेघाची आता भक्तीमार्गात खूप प्रगती झाली होती. मेघाच्या घरी छबीरूपी साईनाथ विराजमान झालेले होते. त्याचे घर हीच त्याच्यासाठी दुसरी मशीदमाई झाली होती. त्याचीही खऱ्या मशीदमाईप्रमाणेच तो मनोभावे सेवा, पूजा-अर्चा करायचा. ह्याची सेवा आणि मनोभावे केलेल्या भक्तीचे फळ बाबांनी स्वप्नात येऊन त्याला दिले. 

स्वप्न. म्हणजेच झोपेत असताना बघितलेली दृश्ये. त्यात किती तथ्य असणार असेच प्रत्येकालाच वाटते. बाबानी अनेकांना स्वप्नदृष्टांत दिलेले आपल्याला माहीत आहेत. पण हे मेघाचे स्वप्न तर एक पायरी अजून पुढचे होते असेच म्हणावे लागेल. स्वप्नात बाबांनी टाकलेले तांदूळ चक्क प्रत्यक्षात त्याच्या बिछान्यावर पडलेले आहेत !!  

स्वप्नात खरे पाहाता स्पष्ट काही आठवत नाही आणि त्यात पाहिलेल्या माणसांचा चेहराही नीटसा कुणालाच आठवत नाही. परंतु इथे मेघाला बाबांचे स्पष्ट रूप दिसले आहे आणि बाबांनी सांगितलेले शब्द आणि कृती तसेच्या तसे लक्षात आहेत. 

हा बाबा अगदी कोणत्याही मार्गाने आपल्या भक्ताजवळ पोहोचू शकतो. त्याला कुणीच अडवू शकत नाही. आपल्याजवळ येताना कोणतेही दार ह्याला अडवू शकत नाही. 

कवाडे बंद होती 
चारी बाजूला 
तरी कसा बापू माझा 
येतचि राहिला ... 

आपल्या मनाची कवाडे ह्याच्या प्रवेशासाठी जरी बंद असली, तरीही हा आपल्या प्रेमापोटी आपल्याकडे पोचतोच. संकटात अचानक मिळालेली मदत, न होणारे अडलेले झटक्यात झालेले काम, अगदी मनातही नसताना घडून आलेल्या गोष्टी हे सगळे ह्याचेच तर मार्ग आहेत. 

जीवनाची भूमी जरी 
जाहली उजाड 
ह्याने नदी पाठविली 
फोडुनी पहाड 

मेघाला बाबांनी एवढा डायरेक्ट अनुभव देऊनही मेघाने बाबाना अजूनही नीट ओळखलेच नाही. घराचे दार बंद असताना बाबा कसे येतील हा त्याला विचार पडला; परंतु बिछान्यावर अचानक स्वप्न पडून गेल्यावर एवढे तांदूळ कसे काय आले हा विचार त्याच्या मनात आला नाही. 

शेवटी मेघा हे एक प्रतीक आहे. मानवी मनाचे. बाबा सगळे देऊनही आपण मात्र "असे कसे झाले?" ह्या विचारातच बुद्धी खर्च करत असतो. एवढेच नाही, तर बाबांनाच प्रश्न करीत असतो. पण असे सगळे असतानाही आपले जरी मनाचे दार बंद असले, तरीही हा बाबा धावत येतोच ! हेच त्याचे प्रेम ! या बाबाचे बोट एकदा धरले, की आपला बेडापार झालाच. बाबांचेही काय सॉल्लिड बोल आहेत ना ! एक एक शब्द ह्रदयावर कोरून ठेवावा असा आहे. 

हा बाबा स्वप्नात जरी आला असला, तरीही तो तिथेही प्रत्यक्षातच आलेला असतो याचा अजून एक दाखला म्हणजे ही कथा. इथे तर मेघाने न सांगताही मेघाच्या स्वप्नात काय घडले हे बाबांना माहीत आहे ! हे ऐकून एखादा तर थक्क झाला असता !काय पॉवर आहे बाबांची ! खरेच ग्रेट 

हा बाबा एक मानव म्हणून जरी वावरत असला, तरीही हा परमात्मा आहे. मानवाचे सारे नियम ह्याला लागू होऊच शकत नाहीत. लोहारणीच्या पोरीला त्या क्षणी भट्टीत पडण्यापासून वाचवणारा हा बाबा, ह्याला कशाला आत येण्यासाठी दार हवे ? 

गोविंदाचा छंद जीवाला 
चराचराला व्यापूनी उरला 

बेसिकली हा बाबा अमर्याद आहे. कुठलीही मर्यादित गोष्ट ह्याला बांधूच शकत नाही. हे एकदा समजले, की बाबा कोण आहे हे समजते. 

बघायला गेले तर बिछान्यावर तांदूळ टाकण्याचा या सगळ्याशी काय संबंध ? काहीच नाही. मग बाबांनी हे का केले असेल ? कदाचित मी जेव्हा स्वप्नात येतो, तेव्हा ते स्वप्न काल्पनिक न राहाता खरेच असते हे बाबांना मेघाला समाजवायचे असेल. स्वप्नात बाबांनी सांगितलेला शब्द न शब्द अर्थपूर्ण आहे हे सांगायचे असेल. परंतु मेघा ते समजू शकला नाही. मग पुढे बाबांना अगदी सगळ्याची फोड करून मेघाला सांगण्याची गरज पडली आहे. 

तांदुळाचे समजले. पण भिंतीवर त्रिशूल काढायचा काय संबंध ? कशाला ? आपल्या मानवांची दृष्टी जिथे दुर्बीण किंवा टेलिस्कोपनेसुद्धा पोहोचू शकत नाही अशा भविष्यात घडणाऱ्या गोष्टी फक्त बाबालाच ठाऊक असतात. म्हणून ते जे सांगतील त्यात नक्कीच तथ्य असते. आधी आपण ते समजू शकत नाही. आधी आपल्याला बाबांच्या गोष्टीचे महत्त्व वाटत नाही, पण नंतर भविष्यात त्याचीच जाणीव झाल्यावर मन खजील होते.    

इथे मेघाचे विशेष कौतुक. बाबांनी सांगितल्याबरोबर कोणत्याही प्रकारचा कुतर्क मनात न आणता लगेच भिंतीवर त्रिशूल काढायला, आज्ञापालन करायला तयार झाला. त्रिशूल काढून काय होणारे ? कशाला काढायचा ? असे विचारही त्याच्या मनात आलेले नाहीत. खरेच ग्रेट !      

पुढे आपोआपच साऱ्या गोष्टी क्लियर झाल्या. बाबांकडे शिवलिंग येणार आहे हे त्यांना आधीच माहीत आहे. आधी सांगितल्यानुसार हा बाबाच भविष्य जाणू शकतो. शंकराला स्थापन केल्यावर बाबांनी त्याला देण्यात येणाऱ्या आयुधाची आधीच सोय करून ठेवली होती. बाबांचे सारे प्लॅनिंग आधीच तयार असते. हा सगळ्याच याबाबतीत perfect कसा त्याचे अजून एक उदाहरण.    

पिपा सांगे खास 
बात ह्याची ऐका 
शब्द ह्याचा ऐका 
तोचि निका 

हा साईनाथ एका दगडात अनेक पक्षी मारतो. पूजा करीत असताना दीक्षितांच्या मनातही साईंनी मेघाला जशी शिवलिंगाची प्रतिकृती दिली होती तीच डोक्यात आली. ह्या साई शंकराने स्वतःच त्यांच्या मनात येऊन स्वतःच्या आगमनाची खबर दिली आहे. दीक्षितांनाही एक सुंदर अनुभव मिळाला आहे.     

मेघा आधीपासूनच शंकराचा सच्चा भक्त आहे हे बाबांना माहीत आहे. म्हणूनच मेघासाठी त्यांनी हे शिवलिंग पाठवले आहे. आपल्या लाडक्या भक्ताकडे शंकर भगवान स्वतःच शिवलिंगाच्या रूपात राहायला गेले आहेत. त्याला भेटायला आले आहेत. आपल्या भक्ताचा एवढा विचार केवळ हा बाबाच करू शकतो. बाकी कुणीही नाही.  

साईनाथ फक्त माझेच नाव घ्या असे कधीच म्हणाले नाहीत. मेघाचे शंकरावर असलेले प्रेम बाबांना माहीत आहे. या शिवलिंग देण्याच्या क्रियेतून बाबांनी त्याची शंकरभक्तीच दृढ केली आहे.  

या कथेतून मेघाचा संपूर्ण चित्रपट हेमाडपंतांनी आपल्याला दाखवला. भक्तीमार्गात आल्यावर माणसाचे आयुष्य कसे सुंदर होते, आपोआप घडत जाते आणि शेवटी साईचरणी लीन होते याचे ही कथा उत्तम उदाहरण आहे. साईनाथ त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याच्या आयुष्यरूपी मातीच्या घड्याला आकार आला .. साईप्रेमाचा. आपण प्रत्येकजण बापूंचे मेघा आहोत. याचाच आनंद मानूया ... आनंद माझा आहे कारण सच्चीदानंद माझा आहे ...    














 


    








  



  





       










    






 













   

       

       







  





     



















 


   


















 


     






    



       


        


















0 comments: