Adhyay 31 (अध्याय 31)

01:14:00 Nandan Bhalwankar 0 Comments



विजयानंद संन्याशाची कथा 



नावातच संन्यास आहे. हा संन्यास घेणे काही सोपे नाही. आपल्यासारख्या सामान्य मानवाला तर नाहीच नाही. पुष्कळ लोक आपण बघतो. अगदी संतपदाला गेल्यासारखेच वागतात किंवा दिखाऊपणा करतात. स्वतःच्या भक्तीचे अवडंबर माजवताना दिसतात. मनात षड्रिपूंनी गर्दी केलेली असते; क्रोध आणि लबाडी तर अगदी क्षणाक्षणाला दिसून येते परंतु तोंडाने मी जणू संतच आहे असेच बाह्य जगाला पटवून देण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुले-बाळे संसार ह्याची तर फार इच्छा असते; परंतु तसे दाखवत मात्र नाहीत. 

असे लोक जगाला फसवू शकतात, पण हा साईनाथ सारे काही बरोबर जाणून असतो. तो सगळ्यांना अगदी पुरेपूर ओळखून असतो. ह्या बाबाला फसवणारा अजून जन्माला यायचा आहे. आपल्या कथेतील संन्याशी देखील असाच आहे. जगाला फसवण्याची त्याची इच्छा नसेलही, परंतु मनात संसाराची आणि घराची ओढ असतानाही स्वतःला संन्याशी म्हणवीत आहे. बाबांना हे सारे माहीत आहे आणि म्हणूनच बाबांच्या दर्शनाला आल्यावर बाबा त्याच्यावर भडकले. खरे तर हे रागावणे त्याच्यावर नसून तो जे नाही ते स्वतःला म्हणवून घेत आहे त्याला आहे.     

बाबांचा हा ओरडा खायलासुद्धा भाग्य लागते. संन्याशाला बाबांप्रती प्रेमभाव होता, आदर होता. तसेच त्याची संन्याशी बनण्याची पवित्र इच्छा आणि बाबांठायी असलेली ओढ आणि पूर्वपुण्याई यामुळेच बाबांनी त्याला आपल्याजवळ खेचून घेतले होते. आणि एकदा का ह्याने आपल्याला त्याच्याकडे ओढले म्हणजे आपल्या उत्कर्षाला सुरूवात झालीच म्हणून समजा. आपली उचित प्रगती व्हावी याकरताच हा बाबा झटत असतो. 

ह्या संन्याशाचा अंतिम क्षण बाबांचरणी व्हावा अशीच बाबांची इच्छा होती. आयुष्य संपताना बाबांचरणी जर देह असेल तर त्याच्यासारखे भाग्य नाही. बाबांनी संन्याशाला उचित गतीच दिली नाही, तर त्याच्या आईलाही पुत्रशोकाचे दुःख होऊ दिले नाही. दोघांनाही अंतिम क्षणी एकमेकांचा मृत्यू झाल्याचे माहीत नाही. दोघांनाही ते दुःख होऊ दिले नाही. किती विचार करतो हा बाबा ! हे त्याचे अकारण कारुण्यच.      

मुखीचा गजर मनामध्ये जावो
अरे सरत्या क्षणाला तूचि आठवो...   

ह्या संन्याशाची अंतिम घटिका जवळ येण्याआधी बाबांनी त्याच्याकडून भागवतपुराणाचे पठण / पारायण करून घेऊन पुण्यसंचय करून घेतला. नामस्मरणात त्याचे मन तल्लीन करून घेतले. बाबांच्या शब्दामुळेच त्याला मनःशांती, मनोधैर्य मिळाले. 

आपली आई मरणाच्या दारात असताना कुणाचे चित्त थाऱ्यावर असणार ? पण बाबांमुळेच ते लाभले. ह्या संन्याशाचेही तसेच झाले. वरकरणी हा जरी संन्याशी म्हणवत असला, तरीही त्याला आतून आईकडे जायची ओढ होती. ही विरक्ती अगदी बाहेरून कितीही जरी दाखवली, तरी शेवटी आई शेवटच्या घटिका मोजत आहे हे समजले की आतला खरा माणूस जागा होतो. प्रचंड दुःख होते. बाबांनी तेच त्याला दाखवून दिले. 
    
खरा संन्यास म्हणजे असे दोलायमान मन नव्हे. जे संन्यास घेतात ते संसारसुखाच्या पलीकडे गेलेले असतात. बाबांनी ह्याच्या मनाला योग्य वळण लावलेच, शिवाय इतके दिवस संन्याशी म्हणून तो वावरत असल्याचे खरे पुण्य त्याला ह्या भागवतपुराण वाचनाने दिले.  

बाबाना पुढील भविष्यकाळ दिसतो म्हणूनच त्या संन्याशाची सखखी आई जरी मरण पावली तरीही बाबानी त्याला शिरडी सोडून जाऊ दिले नाही. त्याचे मरण जवळ येत आहे, हे आधीच जाणून त्याप्रमाणे पुढील कृती केल्या. हा बाबा उचित तेच करतो. जगाच्या दृष्टीने जरी ते विचित्र वाटत असले, तरीही तेच उचित असते हे माहीत हवे. हेच या कथेद्वारे आपल्याला समजते.  

हा साईनाथ खरेच ग्रेट आहे. त्याला सर्व गोष्टींचा चहूबाजूंनी विचार करावा लागतो. हा परमात्मा जेव्हा मानव म्हणून जन्माला येतो तेव्हा त्यालाही किती सांभाळून वागावे लागते त्याचेच हे उदाहरण आहे. समाज आणि परिस्थिती याचे भान त्यालाही ठेवावेच लागते. संन्याशी असा अचानक गेल्यामुळे पोलिसांची चौकशी होऊ शकते हे बाबा जाणून आहेत. हीच खरी सभानता. बाकी लोक चमत्काराचीच अपेक्षा करीत होते. बाबांनी ज्या angle ने विचार केला तसा कुणीच करू शकले नाही. ही दूरदृष्टी केवळ बाबांकडेच असू शकते. याद्वारे बाबांनी संन्याशाला तर उचित गती दिलीच, पण त्याचबरोबर त्यामुळे कुठेही आणि कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही ह्याचीही काळजी घेतली. तसेच प्रेताचे विधीपूर्वक सारे केले. 

शेवटी एवढेच वाटते, आपण जसे आहोत तसेच ह्याला प्रिय आहोत. आपण किती पानी कम हे ह्याला बरोबर ठाऊक आहे. ह्याच्यासमोर सगळी चतुराई व्यर्थच. त्यामुळेच हा संन्यास वैगरे घेणे हे काही अपने बस की बात नही. त्यापेक्षा ह्याचे चरण धरूया. म्हणजे सारा बेडापार होईल.    

पिपा म्हणे सोडा दंभ 
ह्याचे पायी सर्व सुख 
  






----------------------------


बाळाराम मानकर कथा


नाही त्यागावी दारा 
नाही सोडावे घरा 
तरीही पावावे परमार्था 
अनिरुद्ध नामे 

पुष्कळ लोकांना परमार्थ म्हणजे नक्की काय हे कळलेलेच नसते. घरदार सोडून केवळ भक्तीत रममाण होऊन केवळ त्या साईला आठवणे असेच वाटत असते. कथेतील मानकर सुद्धा तसेच. घरदार सोडून आलेले आहेत. हे करण्याला सुद्धा परमेश्वरावर प्रचंड प्रेम लागते. नक्कीच. हे काही सोपे काम नव्हे. सध्या सुध्या व्यक्तीला हे जमणे केवळ अशक्य. परंतु आज केवळ बापूमुळे प्रपंचात राहूनही परमार्थ करता येऊ शकतो हे समजले. कुणाला खरे वाटेल का ? पण नाही, हे शक्य आहे. मीनावैनी साधनाताई आद्यपिपा यांच्यासारखी अनेक उदाहरणेही आहेतच. आपण प्रत्येक जण आपापल्या संसारात राहूनही परमार्थाचा यथायोग्य आनंद केवळ बापूकृपेमुळे घेऊ शकत आहोत. 

पाहायला गेलं तर हा बाबा सगळीकडेच आहे. ह्या साईने स्वतःच्या तोंडाने अनेक वेळा हे अनेकदा सांगितले आहे. साईचरित्रात अशा आशयाच्या भरपूर ओव्या मिळतात. बाबा केवळ शिरडीच राहातो आणि मला परमार्थ साधायला तिथेच गेले पाहिजे असे नाही. त्याची जरूरी नाही. सातासमुद्रापार असलेलाही बाबांच्या तितक्याच जवळ असतो. फक्त ह्या साईशी मनाने कनेक्टेड असणे गरजेचे आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करणे आवश्यक आहे. ह्या साईवर अधिकाधिक प्रेम करत राहणे म्हणजेच परमार्थ असे मला वाटते. 

बाबांनाही मानकरांना हेच सांगावयाचे होते. म्हणूनच मच्छिन्द्रगडावर आणि नंतर कुणब्याच्या वेषात येऊन बाबांनी वेळोवेळी "मी सदैव तुझ्या सोबतच आहे" हे दाखवून दिले. 

तू पक्ष्यात तू प्राण्यांत 
सर्वांच्या हृदयात 
चेतन तूचि अचेतन तूचि 
तू अवघ्या विश्वात ... 

हे माहित असूनही आपण मनात गफला करतो. हा बाबा जरी एक मानव म्हणून वसुंधरेवर वावरत असला, तरीही हा कोण आहे हे कायम मनात ठसले पाहिजे. आपल्या डोळ्यांना एका मानवाच्या रूपात असलेला तोच बाबा असे नाही. ह्याचा संचार एकाच वेळेस अनेक ठिकाणी आणि कुणामध्येही असू शकतो. म्हणूनच हा सर्वसाक्षी आहे. 

पानापानात दिसतो कान्हा 
फुले तोडू कशी मी सान्गा ना .. 
गोविंदाचा छंद जीवाला 
चराचराला व्यापूनि उरला 

हे बाबांनी मानकरांना पटवून दिले. साईनाथ जेव्हा मच्छिन्द्रगडावर होता किंवा पुणे स्टेशनला कुणबी रूपात आलेला तेव्हा तो शिरडीत नव्हता का ? तर नाही. हा एका क्षणाला अनेक ठिकाणी असतो. मानकर हे समजले. प्रपंचात राहूनही परमार्थ करता येऊ शकतो हे समजले. हाच या कथेचा गाभा आहे असे मला समजले.   





--------------------------------




वाघाची कथा 

 

1. 
अंते मति: सा गती: हा या वाघाच्या कथेचा गाभा आहे.

मरण्याच्या क्षणी आपण जे विचार करतो, त्यानुसार आपला पुढील प्रवास ठरतो. 

रामरसायन मधे आपण वाचतो. रावणाने त्याच्या मरण्याच्या क्षणीही अंधाराचा कुमार्ग स्वीकारला आहे. त्यानुसार तो कायमचा पाताळात गेला.

वाघाच्या कथेत तर त्या वाघाला साक्षात सगुण साकार परमात्म्याच्या चरणी अंतीम विसावा लाभला आहे. वाघाचे खरोखरीच भाग्यच म्हणावे लागेल.

मुखीचा गजर 
मनामधे जावो
अरे सरत्या क्षणाला
तूचि आठवो

वाघाचा सरता क्षण जवळ आला असताना त्याला साक्षात साईनाथान्च्या दर्शनाचा लाभ मिळणे म्हणजे त्याने मागच्या जन्मी नक्कीच पुण्यकर्म केलेले असणार. कथेतही तसे नमूद केले आहे.

आणि म्हणूनच आपण चांगले कर्म करीत राहिले पाहिजे. उचित समय आल्यावर हा आपल्याला सगळं काही देतोच देतो. वाघाने मागील जन्मी केलेल्या सत्कर्माचे फळ त्याला ह्या जन्मी आणि तेही अंतीम क्षणाला साईनाथांनी देउन त्याचा उद्धार केला आहे.

2.  
वाघ हा पशूयोनीत जन्माला येऊनही त्याने ह्या साईरूपातील परमात्मा ओळखला आहे. वाघाने शेपटी आपटून आणि इतर क्रियेद्वारे तसे दाखवले आहे. 

पण आज या जगात असंख्य मानव वावरत आहेत, ज्यांना सद्सदविवेकबुद्धी आहे, पण तरीही त्यांनी या युगातील बापूरूपी परमात्म्याला ओळखलेच नाही. हीच खंत आहे.

आता आपला तारणहार हाच हे त्या वाघालाही कळते आहे. मरण जवळ येत असताना प्रचंड मानसिक आणि शारिरीक यातना हौतात. पण तरीही त्या वाघाला मरताना शांती लाभली आहे.

शांतीची ही शांती
अक्षय निधान 
पूर्ण समाधान
बापू पायी

3. 
वाघाला झालेल्या रोगावर कुणालाच इलाज जमत नव्हता. सगळे उपाय थकल्यावर साईबाबा भेटला. हा साईनाथच उचित गती प्रदान करू शकतो. बाकी कुणीही नाही.

कर्म केल्यावर फळ हे मिळतेच. ऋण हे फेडावेच लागते. ते फेडण्यासाठीच त्याला वाघाचा जन्म मिळाला. साप आणि बेडकाच्या कथेतही आपण बघतोच. पण आपले कर्म चांगले असेल, तर हा साईनाथ त्यातूनही आपल्या जीवनाच्या आराखड्यात उचित बदल करून आपले नाथसंवीध ठरवतो आणि आपला बेडपार होतो

4.
वाघ हा मुळातच हिंस्त्र प्राणी. क्रौर्य हा त्याचा मूळ स्वभावधर्म. पण असे असतानाही साईनाथांसमोर तो स्वत:ला पूर्ण विसरला आहे. त्याचे दुखणेही तो विसरला आहे. या साईनाथपुढे कोणतेही दुखणे टिकूच शकत नाही. संकटाचे संधीत रूपांतर केवळ हाच करू शकतो.

शेवटी एवढेच वाटते.. 

वाघाला तर मरण्याच्या काही क्षण आधी साई लाभला. आपल्या सर्वांना तो बराच आधी लाभला आहे.

या संधीचे सोने करूया आणि 32 व्या अध्यायात म्हंटल्याप्रमाणे हा बापूरूपी प्रेमाने उतू जाणारा खजिना लुटून नेउया...

0 comments: