Adhyay 35 (अध्याय ३५)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो. हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
काका महाजनींच्या मित्राची कथा
ह्या साईनाथाच्या दर्शनासाठी हवशे नवशे गवशे सारेच येत असत. एका मानवी देहात परमेश्वर वावरत आहे ह्यावर कुणाचाच लगेच विश्वास बसत नाही.
काकांचा मित्रही त्यापैकी एक. बाबांविषयी ऐकून जिज्ञासा निर्माण झाली. पण ह्यामुळेच त्यांचे आयुष्य पुढे बदलून गेले. त्यांना बाबारूपी सद्गुरु लाभला.
बेसिकली प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजत असतो. मलाच काय ते कळते या भावनेमुळेच सद्गुरूविषयी मनात संशय, संभ्रम आणि तर्क कुतर्क उत्पन्न होतात.
हीच ती "तेल्याची भिंत", जी बाबा बरोबर ओळखून असतात. मनातली ही भिंत / अढी / अहंकार अनुभव आल्यावर लगेच गळून पडतो. ते सारे पाडण्याचा उपाय सुद्धा हा बाबाच सुचवतो.
ह्या कथेतून काही गोष्टी समजतात.
१) बाबांचा हा मित्र निर्गुणाची उपासना करणारे होते. म्हणजेच आधीपासूनच भक्तीमार्गातले होते. *ह्या उपासनेचे फळ म्हणूनच त्यांना सद्गुरूकडे जाण्याचा मार्ग मिळू शकला. आपण करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे फळ हा देतोच !*
२) मित्राच्या मनातील संशय आणि चौकशीची भावना यामुळेच त्यांना बाबांकडे जाण्याचा रस्ता मिळाला. *हा बाबा खरेच ग्रेट आहे. हा आपल्या मनातील संशयाचाच "त्या"च्या वरच्या विश्वासात आणि प्रेमात रूपांतर करतो. ह्याच्यासारखा कुणीच नाही.*
३) हा बाबा आपले complete transformation करतो. "मी नमस्कार करणार नाही आणि दक्षिणाही देणार नाही" असे म्हणणारे काकांचे मित्र कधी बाबांचे होतात हे त्याचे त्यांना समजत नाही. हीच ती सद्गुरूप्रेमाची जादू !
*मोगऱ्याचा गंध*
*दुरुनी न कळे*
*परि येता जवळी*
*न कळे दुसरे ..*
४) ह्या साईकडे जो येतो त्याचे ह्या बाबाशी जन्मजन्मांतरीचे नाते असते. हा बाबा आपल्या प्रत्येकाचाच पिता आहे. आपण एक सामान्य मानव असल्यामुळे आपल्याला ते समजायला वेळ लागतो. मग ह्या बाबालाच आठवण करून द्यायला लागते.
जनम जनम का नाता
है तेरा मेरा
याद रहा प्रभू तुमको
मै भूला बिसरा ...
५) हा बाबा काकांकडे तर दक्षिणा मागतो, पण मुद्दामच त्या मित्राकडे मागत नाही. त्यामुळेच त्याच्या मनाला खाते. हा बाबा नक्की कोण आहे हे समजल्यावर त्याचे डोळे उघडतात. आता मात्र दक्षिणा द्यायची इच्छा होते. किती सहज शिकवण देऊन जातो हा बाबा ! ही हातोटी फक्त त्याचीच !
६) काकांसारख्या उचित श्रद्धावान मित्राशी ओळख असल्यामुळे त्यांना साईंबद्दल माहिती मिळाली. आपल्या आयुष्यात चांगली आणि उचित संगत असल्याने काय चमत्कार होतात याचा ही कथा एक दाखलाच आहे.
७) हा बाबा कुणावरही त्यांना दक्षिणा देण्यासाठी जबरदस्ती करत नाही.
८) बाबांनी त्या मित्राला एवढा मोठा अनुभव देऊनही त्याच्या मनातली तेल्याची भिंत पूर्णपणे गेलेली नाही. कुणाचीच जात नाही. शेवटी सामान्य मानव. मन लगेचच सारे मानायला कबूल होत नाही. म्हणूनच पाऊस भरून आला असतानाही प्रवास सुखरूप होईल की नाही याची चिंता लागून राहिली आहे.
१०) ह्या साईकृपेमुळे कसे आयुष्यात बदल घडत जातात, आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर होतात हे इथे समजते. केवळ साईदर्शनाने असाध्य टाचेचे दुखणे बरे झाले.
११) पुढे घरी पोचल्यावर त्या मेलेल्या दोन चिमण्या म्हणजे काकांच्या मित्राच्या मनातील मेलेले कुतर्क आणि कुशंका आहेत. आणि आता एक उडत गेलेली चिमणी म्हणजेच साईचरणाकडे झेपावलेले त्यांचे मन ! तर्क कुतर्कांमध्ये भक्ती अडकली होती ती स्वतंत्र झाली व उडाली
*शेवटी एवढेच वाटते. काकांचा मित्र ते काका महाजनी म्हणजेच विगत ते उत्तम भक्त हा आपल्या प्रत्येकाचाच प्रवास आहे. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या लाईनीत पुढे मागे आहे. पण विगत असो वा उत्तम भक्त, ह्या साईचे प्रत्येकावरच समान प्रेम आणि कृपा असते. हे मात्र नक्की !*
------------
धरमसी जेठाभाई ठक्कर कथा
परमात्मा जेव्हा एका सामान्य मानवाच्या रूपात येतो तेव्हा त्याचे "देवत्व" पहिल्या फटक्यात कुणीच मान्य करायला तयार होत नाही. आणि त्यात मानवाकडे जेव्हा काहीच कशाचीच कमी नसेल (ऐश्वर्यसंपन्न) आणि देहाभिमान चिकटून असेल तर मग विचारूच नका. अशा वेळी त्या परमात्म्याला नावेच ठेवली जातात. त्याच्याबद्दल मनात बरेच प्रश्न आणि शंका असतात. अशा शंका सोडवायला आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायला अनेक लोक त्या परमात्मा साईकडे जातात.
साईकडे हवशे नवशे गवशे सारेच येत. हा बाबा प्रत्येकाच्या मनात नक्की काय चालू आहे आणि कोण माणूस कशासाठी त्याच्याकडे येतोय हे त्याला बरोबबर माहीत असते. त्यानुसार हा बाबा त्याला अनुभव देतो.
बघायला गेले तर ह्या मनात येणाऱ्या शंका आणि प्रश्नांचे आभारच मानायला हवे. त्यामुळेच आपण साईकडे आकर्षिले जातो. ह्या शंका ही पहिली पायरीच म्हणता येईल. ह्यामुळेच आपल्या कथेतील शेट धरमसी जेठाभाई साईभक्त बनू शकले.
तसे बघायला गेले तर काका महाजनींसारख्या श्रेष्ठ श्रद्धावानाचा संग असल्यामुळेच शेटजींना साईनाथांबद्दल नीट कळू शकले. हेच ते उचित श्रद्धावानांच्या संपर्कात राहिल्याचे फळ. काकांमुळे बाबा कोण आहेत हे त्यांना मनातून माहीत होते. फक्त ते मान्य करायचे नव्हते. त्याचीच खात्री करायला त्यांनी शिरडीला जायचा निर्णय घेतला. शेटजी स्वतः कायदेपंडित असल्यामुळे त्यांचा स्वभावच शंकेखोर बनला होता. हे असे कसे तसे कसे अशा प्रष्णांची उत्तरे शोधणे हा तर त्यांचा मूळ स्वभावच होता.
काका बाबांच्या आज्ञेत आहेत आणि बाबांच्या परवानगीशिवाय ते शिरडी सोडणार नाहीत हे माहिती असले तरीही मी जेव्हा म्हणेन तेव्हा परत यावेच लागेल असा शेटजींचा हट्टच होता. एकंदरीतच "साई कसे ह्याला थांबवतात तेच बघतो" असाच त्यांचा निश्चय असावा. पण... असे असतानाही बाबांची लीला ते जाणून होते म्हणूनच त्यांनी काकांसोबत अजून एक माणूस सोबत घेतला. न जाणो काका परत आले नाहीत तर ? म्हणजेच इथे मानवाचे द्विधा मन दिसते. दोन्ही दगडावर पाय असलेले. साई कोण आहे हे मान्य असणारे आणि नसणारेही. जर त्यांना स्वतःवर इतका confidence असता तर त्यांनी तिसऱ्या माणसाला सोबत घेतलेही नसते.
काकांचीही खरोखर कमाल वाटते. शेटजींच्या पेढीवर मुख्य कारभारी असतानाही केवळ बाबांचा शब्द पाळायचा म्हणून ते ८-८ दिवस शिरडीतच राहात असत. खरच ग्रेट ! शेटजीच काय, इतर कोणत्याही मालकाला ते पचणारच नाही. परंतु काकांच्या अशा वागण्यामुळेच शेटजी साईचरणी स्थिर झाले.
चमत्कार तिथे नमस्कार. माणूस चमत्काराला फार भुलतो. साईबाबांची जणू परीक्षा घ्यायलाच शेटजी आलेले. बाबांनीही शेटजींना पुरते अचंबित केले. शेटजी जसा बॉल टाकत तसा बाबा प्रत्येक चेंडू सिक्सर मारत होते. शेटजी तसे मनाने चांगले होते. म्हणूनच बाबांकडे रिकाम्या हाती कसे जाणार म्हणून द्राक्ष घेऊन गेले. ही द्राक्ष सबीज होती... जसे शंकांनी भरलेले शेटजींचे मन. नंतर बाबांच्या हातून त्यांना मिळाल्यावर ती सारी द्राक्षे निर्बीज निघाली. एकदा का हे मन बाबांकडे आल्यावर त्यात शंका राहातीलच कशा ? शंकेचे बीजच नाहीसे होते.
अनिरुद्ध येता अवघा जाळे कापत राहिला ....
पुढे शेटजींच्या मनात चाललेली प्रत्येक गोष्ट बाबांनी ओळखली, त्यांना क्लीन बोल्ड केले. एवढेच नाही, तर त्यांच्या मनावरचे दडपण पहिल्या भेटीतच नाहीसे केले. जाणितो वर्म सकळांचे ! बाबांना माहीत नाही अशी गोष्टच नाही. खरेच ग्रेट ! इतकेच नाही, तर ह्या साई त्रिविक्रमाचा साऱ्याच बाबतीत गुणाकार कसा असतो हे ही समजले. तो एकपटीने घेतो आणि दसपट देतो ! शेटजींना वठणीवर आणण्यासाठी जरी ही केलेली लीला असली, तरी फार मोठी गोष्ट इथे समजते. ह्याच्यावर जो मनापासून प्रेम करतो, त्याच्यावर हा अनंत पटीने प्रेम करतो. तुम ते प्रेमु राम के दुना !
प्रेमाचा हा घननीळ रंग
घेउनी आला गं
प्रेमासाठी आला खाली
सागरास मिळण्यास
ह्या साईला अनन्यतेचा दिलेला एक रुपया आपल्या आयुष्यात दहा दिशांनी (दहा रुपये) म्हणजेच सर्व दिशांनी संपन्नताच घेऊन येतो. हेच यातून शिकायला मिळते.
काही काही श्रीमंत माणसांचे खरोखर नवल वाटते. पदरी अमाप पैसा असतो. परंतु त्याचा उपभोग मात्र घेत नाहीत. उलट असलेल्या पैशांचे ओझेच वाटते. पैसा कमावणे हे नक्कीच योग्य आहे तसेच तो उधळूही नये हे ही मान्य. परंतु आपल्याकडे समुद्र असतानाही त्यातली एक बादली पाणी जरी कुणी द्यायला तयार होत नसेल तर अशांना काय बोलणार ? नाही का ? तसेच आपले शेटजी. बाबांनी त्यांच्या शब्दांनी शेटजींच्या वृत्तीला फटकारले आहे.
शेटजी पैशाने जरी श्रीमंत असले तरी मनाने गरीबच होते. पैसे जरी असले तरी मन सुखी नव्हते. पैसा हे शेवटी एक सुख देण्याचे साधन आहे. सुख नाही. खरे सुख हा बाबाच प्रदान करू शकतो.
पिपा म्हणे सोडा दंभ
ह्याचे पायी सर्व सुख
गर्व अहंकार सोडा हो तुम्ही
विठ्ठल सोयरा जोडा
हेच या कथेचे सार आहे....
----------------------
कायस्थ प्रभू जातीच्या गृहस्थाची कथा
अमानवी शक्ती या जगात अस्तित्वात आहेत. कधी कधी त्यांचे अस्तित्व जाणवतेसुद्धा. ज्यांना अशा शक्तीचा अनुभव येतो त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचारही न केलेला बरा. अनेक जण ह्या भीती आणि तणावाखालून जात असतात. परंतु अशातूनही हा बाबा बाहेर काढू शकतो. बाकी कुणीच नाही. कारण बाकी कुणामध्येही एवढी ताकदच नाही.
बाबा आणि त्यांची उदी काहीही घडवून आणू शकते. कुठल्याही वाईट शक्तीला रोखू शकेल अशी ही संजीवनी जीवनात अनेक चमत्कार करू शकेल. सर्वांना निर्धास्त करू शकेल. बापूंनी प्रदान केलेले माता शिवगंगागौरीचे कवच श्रद्धावानांना असे अमानवी शक्तीपासून वाचवू शकेल. कायस्थ प्रभू जातीचा हा गृहस्थ कुठल्या परिस्थितीतून जात असेल ना ! अशा सर्व त्रासापासून श्रद्धावानांना अभय देणारे हे शिवगंगागौरीचे कवच खरेच श्रेष्ठ आहे. अनेकांना असे अनुभवही आले आहेत. ही कथा सुद्धा त्याचाच दाखला आहे.
------------------------
नेवासकर कथा
संत हे परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. ते स्वतःचे न राहाता केव्हाच त्या परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. "मीच ह्याचा हाचि माझा अनिरुद्ध अवघा" असाच त्यांचा भाव असतो. कथेतील नेवासकरही असेच म्हंटले तर वावगे ठरणार नाही. सेवा आणि भक्ती कशी असावी याचे एकदम आदर्श उदाहरण म्हणजेच 'नेवासकर'. त्यांचे सारे काही हा बाबाच होते. त्याचे रसाळ, मधुर फळही बाबांनी त्यांना दिले. बाबांना समर्पण, बाबांवर पूर्ण निष्ठा आणि सबुरी असणाऱ्यांना बाबा अगदी अलगद कसे सांभाळतात ह्याचे ह्या दोन्हीही कथा उत्तम उदाहरण आहेत.
आपल्या घरात काही कार्य असताना त्या घरातल्यांवर ते कार्य पूर्ण होईपरेंत जबाबदारी आणि टेन्शनच असते. नेवासकरांकडे वर्षश्राद्ध होते. परंतु नेमकी जेवणाऱ्यांची संख्याच वाढली. जेवण पुरेल ना ? असा प्रश्न उद्भवला. कोणताही प्रश्न असो, काहीही अडले, तरी आपल्या प्रत्येकाचीच धाव त्या बाबाकडेच. त्याच्याकडे प्रत्येक अडचणीचे सोल्युशन असतेच. नेवासकरांनाही हा विश्वास होता म्हणूनच त्यांना उदीचा आणि बाबांच्या कृपेचा किती सुंदर अनुभव आला ! एक विश्वास असावा पुरता...कर्ता हर्ता गुरू ऐसा ... ह्या वाक्याचा दाखलाच मिळाला.
माझे तरी काय असे
सर्व तुझेचि रे देवा
तुझे असो तुझ्यापाशी
मीच होय तुझा
पुष्प उमलले जे माझे
वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही
भरूनी मीच राही ...
नेवासकर त्यांना प्राप्त झालेले सगळे धान्य ते बाबांचरणी अर्पण करत असत. मला जे जे म्हणून मिळाले आहे ते ते सारे तूच दिलेले आहेस, त्यावर माझा काहीच हक्क नाही. माझ्यासह माझे असे जे जे म्हणून आहे ते तुझेच आहे. तुझ्या इच्छेने त्यातले जे काही म्हणून देशील तेच माझे. किती सुंदर भाव आहे ! हीच ती अनन्यता आणि एकनिष्ठता. असा भाव असलेल्या माणसाला काय कमी पडणार ? हा बाबा त्यांना कसे काय कमी पडू देईल ? नाही का ?
इथे एक महत्तवाची गोष्ट समजते ती म्हणजे नेवासकरांनी नुसते तोंडाने गोड गोड बोलून कुणाची वाहवा मिळवली नाही; तर बोलल्यानुसार सारे काही बाबांचरणी अर्पणही केले ! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ! खरेच ग्रेट ! हल्ली तर लोक फक्त गोड बोलून समोरच्यावर इम्प्रेशन पाडतात. पण कृती शून्य.
धन जन मान वाहतो तुझ्या चरणी
प्रसाद म्हणूनि तूचि जे द्यावे
अध्याय २० मध्ये आपण दासगणू आणि मोलकरणीची गोष्ट ऐकतो. त्याग करूनच सुख कसे मिळू शकते ? ह्या प्रश्नाचे उत्तरही ही कथा आपल्याला देते. तसे बघायला गेले तर प्रत्येकातच लोभ ठासून भरलेला असतो. अगदी कोट्यधीश तर मंदिरात १० रुपये दान करतानाही विचार करतो. पण नेवासकर खरेच ग्रेट आहेत.
आपल्या प्रत्येकालाच आपल्या मेहेनतीच्या बदल्यात जे जे म्हणून मिळते ते अतिप्रिय असते. मग तो आपल्याला मिळणारा महिन्याअखेरचा पगार असो किंवा बोनस. एका शेतकऱ्याला तर आपले उत्पन्न म्हणजे जीव की प्राण असते. काळ्या मातीला तो एक माता म्हणून पूजतो. मग असे असताना जेव्हा नेवासकर अख्खे धान्य मशिदीत बाबांचरणी वाहातात म्हणजे काय बोलावे ! सर्व सामान्यांमध्ये असणारा हा लोभ नेवासकरांमध्ये दिसत नाही. म्हणूनच त्यांना सामान्यांच्या वर आहेत असे भावार्थाच्या सुरुवातीला म्हंटले आहे.
बाहेरच्या जगाच्या दृष्टीने तर हा चमत्कारच आहे. हे असे होणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाल्याप्रमाणेच आहे. पण हा चमत्कार का झाला ? मुळात ही कुठली जादू वैगरे नसून हे बाबांचे प्रेम आहे. नेवासकरांसाठी बाबांनी पाठवलेली त्यांची कृपा आहे. बाबांची लीला आहे. आणि केवळ बाबांचा भक्तच ही लीला समजून घेऊ शकतो. बाकी कुणीही नाही.
मग कुणी म्हणेल की नेवासाकरीणबाईंनी भांड्यातले वाढून झाले की ते फडक्याने झाकून ठेवायला का बरे सांगितले असेल ? नेवासकरीणबाईंचा तर पूर्ण विश्वास होता की बाबा आणि उदी अन्न कमी पडू देणार नाहीत. परंतु ही सारी घटना एक चमत्कार म्हणून नावारूपाला यावी आणि त्याचा बोभाटा व्हावा अशी त्यांची इच्छा नव्हती; कारण बाबा कधीच चमत्कार दाखवीत नसत. हीच ती सभानता.
ही उदी काय म्हणून करत नाही विचारा ! सारे काही करू शकते ! ५० जणांसाठी केलेले जेवण हे ५०० माणसे जेउनसुद्धा उरते. हा बाबा त्यांच्या भक्तांची लाज राखतो. त्यांना काहीच कमी पडू देत नाही. अडीअडचणीला साहाय्य करतो. ही उदी स्वतःच पवित्र असल्यामुळे जेवण जरी वर्षश्राद्धाचे असले, तरी त्यावरही तेवढीच प्रभावी ठरते आणि विलक्षण कार्य करते.
असाच एक याविषयीचा सुंदर अनुभव मध्ये वाचनात आलेला तो खाली देत आहे.
अनुभव :
अर्धी वाटी तांदळाचा कुकरभर भात!!! - भानुशंकर जामसांडेकर, बोरिवली ....
मी एक रिक्षाचालक आहे. मी दुसर्यांची रिक्षा चालवत असे. एक दिवस रिक्षा बिघडली आणि पाच-सहा दिवस ती बंदच राहिली. त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती खूपच खराब झाली. एक दिवस तर अक्षरशः घरात तांदळाचा दाणाही नव्हता. माझी दोन मुले व पत्नी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच न खाता राहिले. शेवटी रात्री मुलांना भूक सहन होईना. ती आईला म्हणाली, ‘‘आई, सकाळपासून काहीच केलं नाहीस. आता तरी काही कर ना!’’
नेमका त्याच वेळेस मी घरी पोहोचलो. पत्नी म्हणाली, ‘‘अहो, मुलांना भूक लागली आहे. काय करूया?’’ मी म्हणालो, ‘‘काय करूया काय, माझ्याकडे पैसेही नाहीत.’’ पत्नीने पुन्हा स्वयंपाकखोलीत जाऊन शोधण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच ती बाहेर आली व म्हणाली, ‘‘अहो, हे बघा....अर्धी वाटी तांदूळ मिळाले.’’ मग तिने त्यात थोडीशी डाळ घालून खिचडी बनवायचे ठरवले.’’ मी बापूंना म्हणालो, ‘‘माझ्या दोन्ही मुलांचे तरी पोट भरू दे. आम्ही असेच राहू.’’
पत्नीने खिचडी कुकरला लावली. कुकरची शिट्टी झाली.
कुकर थंड झाल्यावर उघडून पाहिले तर काय, आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना....
....कुकरचा डबा चक्क पूर्णपणे खिचडीने भरलेला होता!
अर्धी वाटी तांदूळ व साधारण तेवढीच डाळ ह्यांची एवढी खिचडी बनूच शकत नाही....पण आपल्या लेकरांचे हाल न बघवून माझ्या बापुरायाने ही अशक्य गोष्ट घडवून आणली होती.
आम्हा दोघांना आश्चर्यच वाटले. बापूंनी आमची त्या दिवसाची भूक तर भागवली होतीच, शिवाय दुसर्या दिवसासाठीही खिचडी राखून ठेवली होती!
मी एक रिक्षाचालक आहे. मी दुसर्यांची रिक्षा चालवत असे. एक दिवस रिक्षा बिघडली आणि पाच-सहा दिवस ती बंदच राहिली. त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती खूपच खराब झाली. एक दिवस तर अक्षरशः घरात तांदळाचा दाणाही नव्हता. माझी दोन मुले व पत्नी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच न खाता राहिले. शेवटी रात्री मुलांना भूक सहन होईना. ती आईला म्हणाली, ‘‘आई, सकाळपासून काहीच केलं नाहीस. आता तरी काही कर ना!’’
नेमका त्याच वेळेस मी घरी पोहोचलो. पत्नी म्हणाली, ‘‘अहो, मुलांना भूक लागली आहे. काय करूया?’’ मी म्हणालो, ‘‘काय करूया काय, माझ्याकडे पैसेही नाहीत.’’ पत्नीने पुन्हा स्वयंपाकखोलीत जाऊन शोधण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच ती बाहेर आली व म्हणाली, ‘‘अहो, हे बघा....अर्धी वाटी तांदूळ मिळाले.’’ मग तिने त्यात थोडीशी डाळ घालून खिचडी बनवायचे ठरवले.’’ मी बापूंना म्हणालो, ‘‘माझ्या दोन्ही मुलांचे तरी पोट भरू दे. आम्ही असेच राहू.’’
पत्नीने खिचडी कुकरला लावली. कुकरची शिट्टी झाली.
कुकर थंड झाल्यावर उघडून पाहिले तर काय, आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना....
....कुकरचा डबा चक्क पूर्णपणे खिचडीने भरलेला होता!
अर्धी वाटी तांदूळ व साधारण तेवढीच डाळ ह्यांची एवढी खिचडी बनूच शकत नाही....पण आपल्या लेकरांचे हाल न बघवून माझ्या बापुरायाने ही अशक्य गोष्ट घडवून आणली होती.
आम्हा दोघांना आश्चर्यच वाटले. बापूंनी आमची त्या दिवसाची भूक तर भागवली होतीच, शिवाय दुसर्या दिवसासाठीही खिचडी राखून ठेवली होती!
तर असा हा बाबा. भक्तांना वेळोवेळी जपणारा.
बापूसम नाही देव हो कृपाळू
करितो सांभाळू हर घडी
यापुढचा नेवासकरांचा अनुभव म्हणजे काय बोलावे तेच कळत नाही. साप म्हंटला की अगदी प्रत्येकाची भीतीने गाळण उडते. अगदी कितीही मोठा शूरवीर का असेना तो सापाला बघूनच पळ काढतो. कुणीही सर्वसामान्य माणूस असेच करेल. भीती ही माणसाला जन्मजातच प्राप्त झालेली असते. अगदी मरेपरेंत माणसाच्या मागे ती चिकटलेलीच असते. पण ही कथा वाचून नेवासाकराना काय बोलणार ! कोणता सामान्य माणूस भुजंगाला दूध पाजायला निर्भीडपणे पुढे जाईल ? अर्थातच कुणीच नाही. मी प्रत्यक्षात असा सुटा साप बघितला नाही. प्राणीसंग्रहालयातच पाहिला आहे. तिथे तर तो काचेत बंदिस्त असतानाही भयावह जाणवतो. इथे तर तो समोर फणा काढून उभा आहे !
मुळात साप पाहिला की तो विषारी आहे की बिनविषारी हे सर्पमित्रांशिवाय कुणालाच बघितल्यावर समजू शकत नाही. आणि कुणाला जाणून घ्यायची इच्छाही नसेल. भुजंग म्हणजे तर भयंकर विषारी साप ! फणा वर काढून बसला म्हणजे तर तो अगदी त्याच्या पोझिशनमधेच तयार उभा असणार. अशा भुजंगात साईला पाहणे ह्याला काय संबोधावे तेच समजत नाही.
मग त्यांचा अभ्यास केल्यावर नीट समजते. हेच ते
- बाबांसाठी आयुष्यभर सेवा करून शरीर झिजवणारे.
- सर्वस्व बाबांचरणी अर्पण करणारे.
- इतकेच नाही तर बाबाच्या स्नानाचे, हात-पाय-तोंड धुतलेले मोरीतून बाहेर आलेल्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करणारे.
हे सारे वाचल्यावर नेवासकर भुजंगातही साईनाथाना बघतात याचे कुणाला नवल वाटेल ? नाही का ? यांच्या भक्तीला काय म्हणावे ! ही खरी भक्ती ! काही जण नुसतेच तोंडाने बडबड करून भक्तीचे अवडंबर माजवतात. प्रत्यक्षात काहीच नाही.
स्पष्ट बोलायचे झाले तर नेवासकरांना पाहिल्यावर कुणीही त्यांना वेड्यातच काढेल. पण हा वेडेपणा भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यावरच येतो. भगवंताच्या प्रेमात मनुष्य असाच "वेडा" होतो.
मीरा जगली प्राशूनि जहर
गोरा पुत्रिक तुडवूनी बाळ
तुझिया प्रेमे मारण्या तत्पर
तोचि जगला जगी...
बापू रे जखडूनी ठेवी पदी
आणि मग असे असताना हा बाबा धावत आला नाही असे कसे बरे होईल ? बाबा तेव्हा भुजंगात येऊन दूधाचे अख्खे पातेले पिऊन गेला सुद्धा ! खरेच ! ह्या प्रेमाखातर हा बाबा सृष्टीचे अख्खे गुणधर्म वाकवून भक्तांना अनुभव देतो !
शेवटी एवढेच वाटते. साईचरित्रात नेवासकरांसारखी उदाहरणे का लिहिली आहेत? कारण त्यांच्याकडून आपण शिकायला हवे याकरताच. नेवासकरांना "वेडे" म्हणण्यापासून ते "साईभक्तीत वेडे" होण्याचा प्रवास हा आपल्या प्रत्येकाचा आहे. अगदी नेवासकरांसारखे नाही, पण किमान साईभक्तीत तरी आहोत यासाठीच बाबांना पहिले अंबज्ञ म्हणूया !
0 comments:
Post a Comment