अध्याय ३६ (Adhyay 36)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
दोन गोमांतकांची कथा
अगदी प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच. प्रत्येक जण आपापल्या परीने ते फेस करायचा प्रयास करत असतं. सद्गुरूची साथ असताना प्रॉब्लेमची तीव्रता खूप कमी होऊन जाते, आयुष्यात कशा आपोआप गोष्टी घडत जातात ... आणि आपण संकटातून बाहेरही येतो. अशी सर्व श्रद्धावानांचीच कथा असते. आपल्या कथेतील हे दोन गोमांतक सुद्धा काहीसे असेच.
ह्या दोन्ही कथेत कॉमन फ़ॅक्टर म्हणजे नवस. आपण अनेकांना बघतो. ही देवी नवसाला पावते, हा देव नवसाला पावतो म्हणून नवस बोललेले अनेक जण आपल्या ओळखीचे असतील. तर हा नवस म्हणजे नक्की काय? चोळकरांच्या कथेत आपण बघितलेच आहे. अगदी सोप्या भाषेत देवाने माझ्यासाठी हे हे केले तर मी अमुक अमुक करीन असा भाव म्हणजेच नवस. आपल्या कथेत दोघानीही नवस केला होता.
या कथेतून काही गोष्टी लक्षात आल्या -
१) तसे पाहाता ह्या साईनाथाला पूर्ण जाणून घेणे हे आपल्यासारख्या सार्वसामान्य माणसासाठी अशक्यच. म्हणूनच प्रश्न पडतात. बाबा एकाकडून दक्षिणा मागतात आणि स्वीकारतात, तर दुसऱ्याने स्वतः जास्त दक्षिणा देऊनही स्वीकारत नाहीत. आपल्या डोक्याने हे बघितले तर प्रश्न पडतो, जसा माधवरावांना पडला. असे का केले बाबांनी ? आपल्या प्रत्येकाचाच फेवरेट प्रश्न.
पण हा साईनाथ जे काही करतो तेच उचित कसे हे कथेच्या शेवटी कळते. म्हणूनच थेट निर्णयाला येऊन बाबांना प्रश्न विचारू नयेत हे समजले.
२) हा बाबा कधीच कुणाकडे उगाचच दक्षिणा मागत नाही. त्याच्याकडे सर्वांचे चोख हिशोब असतात. बाबा आपल्याकडे दक्षिणा मागतोय याचा अर्थ आपलेच काही देणे आहे हे समजून जावे. त्यामध्ये बाबा मागतायत त्यामुळे बाबांचा कमीपणा किंवा आपण दान देतोय म्हणून आपला मोठेपणा अजिबात नाही.
३) आपण नवस करतो, आणि पुढे तो फळतो; म्हणजेच आपले इच्छित काम पूर्ण होते. परंतु गरज सरो वैद्य मरो ह्या म्हणीप्रमाणे नवस फेडायला मात्र आपण सोयीस्कररित्या विसरून जातो. माझे काम झाले, आता काय करायचे नवस फेडून ? अशीच कृतघ्न वृत्ती अगदी उफाळून येते. मग अशा चाप्टरपणा मुळेच अपुऱ्या नवसाची फळे भोगावी लागतात.
हा बाबा इतका आपल्यावर प्रेम करतो की अशा विसरलेल्या नवसाचे ओझे आपल्यावर राहू नये आणि त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये हीच बाबांची इच्छा असते. मग हाच आपल्याकडून हा नवस फेडून घेतो आणि त्यापासून उद्भवलेल्या त्रासापासून वाचवतो.
पुष्कळ वर्षापूर्वी नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आलेला अजून लक्षात आहे. त्यातही अपुऱ्या नावासामुळे त्रासलेल्या व्याकी नामक व्यक्तीचा नवस हा गपतीबाप्पा कसा चमत्कारिकरीत्या फेडून घेतो आणि ताबडतोब त्याची भरभराट कशी करतो हे खरोखर पाहण्यासारखे आहे.
४) बाबांनी त्या भक्ताने जेवढा आणि नवस बोलला होता, बरोबर तेवढेच पैसे दक्षिणेस्वरूपात मागितले. त्यावेळी त्या व्यक्तीचा पहिला पगार १५ रुपये. म्हणून १५ रुपयेच मागितले. खरे पाहाता आत्ता त्याचा पगार खूप जास्त आहे. पण बाबांनी त्याला फसवले नाही. आणि त्यातून स्वतःचे खिसे भरले नाहीत. उलटे त्या व्यक्तीची ऋणातून मुक्तता केली.
५) ह्या बाबांना प्रत्येकाचाच खडानखडा हिसाब-किताब पाठ आहे. त्यांचे मेमरीचे रजिस्टर अफाट आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीची नोंद त्यात आढळते. बाबा खरेच ग्रेट !
६) हे सद्गुरूतत्व कसे एक आहे ह्याची खूण ह्या कथेद्वारे पटते. हा बाबा आणि दत्त हे एकच आहेत हे अगदी कळते. दत्ताला केलेला नवस हा बाबांनी फेडून घेतला. कथेतील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
७) आपल्याला आयुष्यात खूप प्रश्न पडतात. मी इतके चांगले वागत असताना असे कसे झाले ? माझ्यावरच अशी वेळ का ? असे असंख्य प्रश्न आपण देवाला विचारतो. आपली चूक लक्षात येत नाही, पण देवाने असे का केले हे मात्र अगदी लगेच विचारले जाते. नवस करायचा, देवाने आपल्याला हवे ते आपल्याला द्यायचेसुद्धा, पण आपण मात्र जे बोललो ते अगदी सोयीस्कररीत्या विसरायचे. आणि असे असतानां मग काही झाले तर बोलही देवालाच लावायचे. या कथेमुळे देवाला प्रश्न विचारताना आधी स्वतःला प्रश्न विचारावेत हे समजले.
८) बाबा दक्षिणा मागतो त्यात त्याचा काही फायदा आहे म्हणून नाही, तर तेवढ्या दक्षिणेचे आपण देणे लागतो म्हणूनच.
९) हा बाबा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे. त्यामुळेच दुसऱ्या गोमांतकाची घडलेली सारी गोष्ट बाबाला समजली.
चालता लागली उन्हाची साउली
सद्गुरू माउली सांगाती ये ...
इतकेच नाही, तर या गोष्टीत बाबा दुसऱ्या गोमांतकाचा उल्लेख न करता त्या त्या प्रत्येक जागी स्वतःचा उल्लेख करतात. याचाच अर्थ ह्या बाबाचे आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीवर लक्ष आहे. हा आपला सहप्रवासी बनून आपल्या संगे चालत आहेच. आपण भोगत असलेल्या प्रत्येक दुःखात हा बाबा समान वाटेकरी आहे.
१०) दुसऱ्या गोमांतकाच्या कथेत एक महत्तवाची गोष्ट लक्षात आली ते म्हणजे संकटात सापडल्यावर प्रत्येक वेळेस, जेव्हा खजिना चोरीला गेला, तेव्हा फकीर बनून; बोटीत घेणारे शिपाई बनून, प्रॉब्लेम वर सोल्यूशन सांगून, त्यावरचा उपाय सांगून आणि नवसही फेडून घेऊन हा मात्र अगदी सहज नामानिराळा राहिला. सगळे काही हाच करतो. हाच कर्ता.
तूच कर्ता आणि करविता
शरण तुला भगवंता मी ...
शरण तुला भगवंता
११) आपल्या आयुष्यात अशीच अवचित संकटे येतात. आपली आपली म्हणणारी माणसेच ह्या कथेतील ब्राह्मणाप्रमाणे केसाने गळा कापतात. कमावलेला सारा खजिना लुटून नेतात. प्रत्येक जण फक्त फायद्यापुरतीच मैत्री करतो. आपला वापर करतो. केवळ हा बाबाच लाभेवीण प्रीती करतो. आपण चिंतातूर दिसलो की लगेच आपल्या मदतीला धावत येतो. विविध रूपात. आपल्याला फुलाप्रमाणे जपतो. शेवटी भोग हे भोगूनच संपवायचे असतात. त्याला पर्यायच नाही. म्हणूनच चोरी झाल्याच्या १५ दिवसांनी हा बाबा फकीर रूपात भेटायला आला.
शेवटी एवढेच वाटते. ह्या दुसऱ्या गोमांतकाप्रमाणे आपल्या प्रत्येकाचाच प्रवास आहे. समुद्रकिनाऱ्यावर अनेक कुतर्कांच्या, षड्रिपूंच्या लाटा झेलत आपले मन अनेक आघात, घाव, धोके सोसत असते. हा बाबा जेव्हा त्याच्याकडे आपल्याला बोलावून घेतो, तेव्हाच खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. ह्यातही अडचणी येतात. पण बोटीवरील शिपायाप्रमाणे हा बाबा प्रत्येक वेळेस आपल्या मदतीला उभा राहतो. He only shows us the path. त्याच्या कवेत घ्यायला आसुसलेला असतो. आपल्या प्रत्येकाच्याच जीवनप्रवासाचे शेवटचे टोक ह्याचे चरण आणि ती मोठी आई मशीदमाईच आहे.
युगे युगे मी मार्ग चाललो
फक्त तुझा बापू
तुला सोडूनी जाऊ कुठे मी
तुजविण मज कुणी नाही ...
----------------------
सखाराम औरंगाबादकर पत्नी कथा
आधीच्या अनेक भावार्थात सांगितल्यासारखेच ह्या साईकडे हवशे, नवशे, गवशे सारेच येत असत. ही औरंगाबादकरीण बाई सुद्दा त्यातीलच एक. पुत्रप्राप्तीसाठी बाबांकडे येत आहे. ह्या बाईप्रमाणे प्रत्येक जण अडचणीत असतो. आपल्याकडे जे नाही, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी इथे तिथे वणवण भटकत राहातो. शेवटी बाबा बोलावून घेतात. मग बाबांच्या छायेत पुढील आयुष्य सुखात जाते.
काम्यभक्ती ही प्रत्येक भक्ताची पहिली पायरी असते. मला काहीतरी मिळावे यासाठी साईनाथाची केलेली भक्ती म्हणजेच काम्यभक्ती. बाबाही हे मान्य करतो. भक्तांवर रागावत नाही.
खरे पाहाता आपण अगदी मनात जरी बाबांना काही सांगितले तरी हा बाबा ते ऐकतोच. नक्कीच. त्याच्यापरेंत ती गोष्ट पोचतेच. पण ही बाई बाबांकडे पहिल्यांदीच येत असल्याने तिच्या मनात प्रश्न आहेत. सहाजिकच आहे. म्हणूनच बाबाना आपल्या मनातील गोष्ट एवढ्या जनांमध्ये कशी बोलायची ? बाबा कसे भेटणार ? अशी मनात घालमेल सुरू आहे. झाले. माधवराव म्हणजे शंकराचा नंदीच. हिने त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना बाबांच्या कानावर घाला असे सांगितले. माधवरावांनीदेखील तिला खूप मदत केली.
ह्या कथेत माधवरावांना बाबांचा नंदी असे का म्हंटले जाते याचा अंदाज बांधता आला. काय भाव आहे त्यांचा ! उगाच बाबाना ते प्राणप्रिय नाहीत. कुठचाही मानमरातब, स्वर्ग वैगरे नको, केवळ बाबांचे पाय हवे आहेत.
दे ठाव गुरुपदी
नको स्वर्ग रूक्ष
तुझ्या पायी राहीन
नको मजला मोक्ष
अशी त्यांची भावना आहे. खरेच ग्रेट ! बाबा जसे काय आपले मित्रच आहेत असेच शामा बाबांशी बोलत आहे. बाबाही त्याच्याशी तसेच बोलत. अत्यंत जिव्हाळा, प्रेम आणि बोलण्यातील सहजता हे आपण आपल्या हक्काच्या, आपल्या माणसाकडे बोलत असतानाच आपसूकच बाहेर येते. बाबा आणि शामा यांचे नाते वेगळेच आहे हे या कथेत अगदी जाणवते. असे लाडे लाडे बोलणे प्रत्येकाला जमणे नाही.
शाम्याचा बाबांवर पुरा विश्वास आहे. हा बाबा अशक्याचे शक्य करू शकतो, अगदी काहीही घडवून आणू शकतो हे शाम्या जाणून आहे. त्यांची काय ताकद आहे, ते काय करू शकतात हे पुरते माहीत आहे. ज्या बाईला इतक्या वर्षात मूल झाले नाही, ते हा बाबाच त्याच्या कृपाप्रसादाने देऊ शकतो असा शाम्याला भरवसा आहे. आपल्या आईला ज्याप्रमाणे हक्काने काही सांगतो तसेच शाम्या बाबांना सांगत आहे. लाडे लाडे हट्ट करीत आहे. हुज्जत घालत आहे. हे सारे प्रेमानेच.
आकाशाची करी तू पृथवी
अग्नीसी करी जल
पिपा जाणतो सर्व अशक्य
तुझ्या हातीचा मल
शेवटी शाम्याच्या प्रेमाखातर, विश्वासाखातर बाबा हरतो आणि आशीर्वाद देतो. काय ताकद आहे बघा ! साईचीच नाही, तर साईच्या भक्ताचीही ताकद इथे कळून आली. केवढे हे प्रेम, विश्वास, हक्क ! साईला तन-मन-धनाने शाम्याने बाबांना आपले मानले आहे. तेव्हाच हे असे नाते तयार होऊ शकते.
आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे. हा बाबा जे बोलणार ते ते सारे होणारच. त्याच्या शब्दाप्रमाणे त्या बाईला दिवस गेलेच. बाळ जन्माला आल्यावर त्याला घेऊन ती बाईसुद्धा साईचरणी त्याला आशीर्वाद घ्यायला घेऊन गेली. ही खरी कृतज्ञता. ५०० रुपये अर्पण केले. बाबांनी त्याचाही उचित उपयोग केला. सारे कुशल मंगल झाले.
बाबासुद्धा प्रत्येक गोष्टीचा उचित विनियोग कसे करतात ते समजले. बाबांनी ह्यातून शामकर्ण घोड्याच्या राहण्यासाठी भिंती बांधल्या आणि ते देखील स्वतः. हा घोडा म्हणजेच ईश्वरी कृपा. तीच ह्या भिंती बांधून बंदिस्त केली. हा स्वतःच सारे काही करून नामानिराळा राहतो.
तव स्मरणाच्या अखंड भिंती
उभ्या होउदे चहूबाजूंनी
आवागमना द्वार नकोचि
घर बांधाया येत राहा ...
शेवटी एवढेच वाटते. हा जो चमत्कार झाला तो कशामुळे ? बाबाच्या अशिर्वादामुळे तर आहेच, पण त्यामागे दडले आहे ते शाम्याचे बाबांवरील प्रेम, विश्वास, भक्ती. आपल्या भक्ताच्या प्रेमळ उचित हट्टासाठी बाबांनी अक्षरश: अद्भुत गोष्ट घडवून आणली. ही साईची महानता आहेच; पण तेवढीच साईच्या प्रेमावर जगणाऱ्या शाम्याचीही आहे असे मला वाटते.
0 comments:
Post a Comment