Adhyay 38 (अध्याय ३८)

06:36:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

----  


बिनीवाले ची गोष्ट 



साईनाथांची सर्वव्यापकता साईचरित्राच्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला दिसून येते. ह्याच्यापासून काहीच लपलेले नाही. याआधी आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे. खरं तर हा सारा अध्याय हंडीभोजनावर आधारित आहे. यामध्ये ही छोटी कथा आलेली आहे. ह्या कथेतून काही गोष्टी स्पष्ट होतात. 

१) बाबांचे आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष आहे. ते शिरडीला प्रत्यक्षात जरी बसले असले, तरी त्यांचा एक डोळा आपल्या प्रत्येकावर आहे, आपल्या प्रत्येक कृतीवर आहे 

२) एका उचित श्रद्धावानाशी नाते जोडल्याचा सुंदर परिणाम इथे दिसून येतो. नानांमुळेच बिनिवाल्याना बाबनविषयी समजले आहे. त्यांना सगूण रूपातील सद्गुरू लाभला आहे 

३) बिनीवाल्यांना मनापासून दत्तभक्ती केल्याचेही फळ प्राप्त झाले आहे. सद्गुरू दत्तानेच आपल्या पुत्राकडे - साईनाथांकडे जाण्याची वाट लाभली आहे 

४) बऱ्याच वेळा आपल्याला आपली चूक झाली आहे हेच लक्षात येत नाही. समोरच्याने सांगूनही कधी कधी पटकन कळत नाही की आपण नक्की चुकलो कुठे ? हा बाबा आपला बाप आहे. आपल्या प्रत्येकावर त्याचे प्रेम आहे. आपल्यात प्रगती व्हावी हीच त्याची इच्छा असते. म्हणूनच तो चूक लक्षात आणून देतो. 

५) साईनाथानी नानांना साऱ्या गोष्टीचे spoon feeding केलेले नाही. त्यांना स्वतः विचार करायला लावले आहे आणि त्यांनाच त्यांची चूक लक्षात आणून दिली आहे. तसेच चूक झाल्यावर बाबा त्यांच्यावर रागावलेले नाहीत, की त्यांना ओरडलेही नाहीत. एका व्यवस्थित पद्धतीने सारे काही समजावून सांगताना बाबा आढळतात. 

६) नानानी जे केले ते मुद्दाम केलेले नाही. त्यामागे साईवरचे प्रेमचं आहे. साईदर्शनाला उशीर होऊ नये हीच त्यांची इच्छा आहे. पण केवळ हा एकच विचार डोक्यात असल्यामुळे बाकी गोष्टी त्यांच्या ध्यानातच आल्या नाहीत. एकाच गोष्टीचा सुद्धा वेगवेगळ्या angle ने विचार कसा करायचा हे बाबांनी शिकवले आहे.       

७) बाबा कधीच चुकीचे सांगणार नाहीत. बाबा म्हणाले म्हणजे नक्कीच माझे चुकले असा नानांचा विश्वास आहे. वास्तविक पाहाता बाबा जेव्हा नानांना म्हणाले तेव्हा त्यांची चूक झाली आहे हेच त्यांना माहीत नव्हते. पण माझे चुकलेच नाही, बाबा उगाचच ओरडतात असे त्यांच्या मनात आले नाही 

८) हे सद्गुरुतत्व एकच आहे. दत्तबाप्पा आणि बाबा यांच्यात काहीच फरक नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दत्ताचे दर्शन न घेता बाबांकडे आले हे बाबाना आवडले नाही. जर वाटेत थांबून दत्तांचे दर्शन घेऊन बाबाकडे अगदी उशीरा जरी पोचले असते, तरी बाबांनी त्यांना शाबासकी दिली असती. इथे नानांच्या कृतीतून अगदी त्यांच्याही नकळत दत्तदर्शनाचा अनादर केल्याप्रमाणेच झाले. दत्तांना केलेला नमस्कार हा बाबांना केलेल्या नमस्काराप्रमाणेच आहे. हे नानांना उमगायला हवे होते.            
 
९) इथे एक महत्तवाची गोष्ट म्हणजे दत्त आणि बाबा हे वेगळे नाहीतच. सद्गुरुतत्वाची भिन्न रूपेच आहेत ही. आपण मानवाने त्यांना वेगवेगळे ठरवले आहे. हेच बाबा कसे चुकीचे हे दाखवून देत आहेत आणि बरोबर काय ते प्रेमाने शिकवत आहेत. हे असे करून बाबांनी बिनीवाल्यांची दत्तभक्तीच दृढ केली आहे

१०) कर्म केले की त्याचे फळ हे कधी ना कधी मिळतेच. ते कधी द्यायचे हे 'तो' ठरवतो. इथे नानांच्या हातून अजाणतेपणेच कर्म घडले आहे. तरीही ते त्याना भोगावेच लागले. हे ही का ? तर नानांना त्यांची चूक कळून यावी याकरताच. लगेच पायात मोठा काटा बोचला. तरीही नानांना ते समजले नाही. पायात काटा बोचणे हे दत्तगुरूंनीच दिलेला उपदेश होता. तो ही नाना जणू शकले नाहीत. शेवटी बाबांनाच सांगावे लागले. 

परमेश्वराच्या एका रूपावर, म्हणजेच बाबांच्या रूपावर प्रेम असल्यामुळे बाबांना कधी भेटतो असं झाल्यामुळे त्यांनी दत्त दर्शन घेतले नाही. परंतु नानांची अध्यात्मिक पातळी उच्च दर्जाची असल्यामुळे त्यांची ही चूक त्यांना त्यांच्या स्थानावरून खाली आणू शकते याची बाबांना काळजी आहे. 

नेवासकरांनी शेवटचे तीन दिवस विवेकपूर्ण वैराग्य उपभोगले परंतु नानांनी बाबांची भेट झाल्यापासून शेवटच्या श्वासापरेंत उपभोगले. विवेकपूर्ण वैराग्य म्हणजे सर्व काही बाबाच.         

शेवटी एवढेच वाटते. नाना तर खूप ग्रेट भक्त आहेत. त्यांचीही अशी चूक होऊ शकते तर मग आपली काय कथा ? इथे बाबांचे बोल आठवतात. "माझ्याबरोबर दिवस घालवून तू हेच का शिकलास ?". बाबांच्या शरीराने जवळ असलेल्या व्यक्तींना आपण जवळपास संतपदीच नेऊन ठेवतो. पण ते ही चुकू शकतात हे माहीत हवे. म्हणूनच भक्ती ही बाबांचीच करावी. बाबांजवळ वावरणाऱ्या माणसांची नाही. बाबांशी मानाने कनेक्टेड राहणे सर्वात महत्तवाचे आहे. बाबासाठी distance doesnt matter. किंबहुना जो शरीराने लांब असणारा भक्त असतो तोच खरा बाबांशी जास्त जोडलेला असतो. 

बऱ्याच वेळा आपल्या आसपास वावरणारी माणसे म्हणतात. "मी साईकडे जातोय तर मी स्वामीना नमस्कार करणार नाही.". असे लोक खरे तर जगाला impress करायच्या नादात स्वत:लाच फसवत असतात. अशा so called "उत्तम" भक्ताना साई आणि स्वामी यांच्यात फरक नाही हेच समजलेले नसते. आपण अशी चूक करता कामा नये असेच साईना म्हणायचे आहे असे वाटते.             




------------------



हंडी वर्णन 



ह्या जगात अनेक खवैये असतात. अशांचा "काही खाणे" म्हणजे जीव की प्राण असते. थोडक्यात खाण्यावर विशेष प्रेम असतं. मी ही अशा माणसांपैकी एक आहे. हा अध्याय माझ्या आवडीच्या अध्यायांपैकी एक आहे कारण ह्या अध्यायात इतक्या विविध खाद्यपदार्थांची / dishes ची नावे आणि त्यांचे अगदी सखोल केलेलं वर्णन आहे की वाचणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटेल.     

बाबानाही थोड्याफार प्रमाणात खवैये म्हंटले तर वावगे ठरणार नाही. बाबांचा एक वेगळा पैलू इथे आपल्यासमोर येतो. हेमाडपंत बाबांना सर्वार्थाने प्रत्येक अध्यायात वर्णन करीत आहेत. एका अष्टपैलू व्यक्तिमत्तवाचे किंवा महापुरुषाचे जसे पुस्तक काढले जाते अगदी तसेच हे साईचरित्र म्हणजे बाबांचे अनेक पैलू उलगडून दाखवत आहेत. तेच आपण या अध्यायात बघू. 

१) हे सारे वर्णन ऐकले की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे बाबांनी ह्यात नमूद केलेली सारी कामे ही एकट्याने केली आहेत. जेवण करायला जे जे म्हणून कष्ट लागतात, ते सारे स्वतः केले आहेत. कुणा दुसऱ्याकडून करून घेतलेले नाही. सामानासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते जेवण वाढण्यापरेंत सारे काही हा बाबा करतो. स्वावलंबनाचा धडाच दिला आहे.  

२) ही सारी कामे करायला त्यांनी इतर कुणाचीही मदत घेतलेली नाही. स्वतःच्या देवत्वाचा वापर करून दुसऱ्याना फसवून किंवा दडपण टाकून कामाला लावलेले नाही. 

३) बाबांनी कोणत्याही अमानवी शक्तीचाही वापर केला नाही. एका मानवाला असणाऱ्या सर्व मर्यादा पाळूनच सारे काही केले आहे. जादूने सारे काही केले असे नाही 

४) बाबा कोण आहेत हे एव्हाना बऱ्याच जणांना कळलेले आहे. तरीही ते स्वतः ground level ला उतरून सारे काही करताना दिसत आहे. त्यात त्यांना काहीच कमीपणा वाटत नाही. 

५) एखादी गोष्ट करायला पूर्ण झोकून देऊन काम कसे करावे हेच शिकवले आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असणारे सारे श्रमही बाबांनी घेतले आहेत. 

६) बाबानी केवळ स्वतःचा विचार करून अन्न शिजवलेले नाही. हंडी एवढी मोठा आहे की १०० पेक्षा जास्त लोक जेवतील. आपल्यापुरते जेवण शिजवले नाही. 

७) बाबा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीही गोष्टी शिजवत असे. बाबा आणि नॉनव्हेज खातात ? आज जगात अनेक लोक सद्गुरू म्हंटले की आपोआपच पुरातन काळानुसार त्याची इमेज बनवतात. त्याच्यामधले देवत्व पाहायला जातात. पण हा शेवटी मानव बनून आला आहे हे मात्र काही त्यांच्या पचनी पडू शकत नाही. नॉनव्हेज खाणे हे अपवित्रच, असेच मानले गेल्यामुळे लोकांच्या मनात हा प्रश्न असतो. पण मानव म्हणून जन्माला आल्यावर एक माणूस म्हणून जे जे कोण करतो, ते ते सारे हा बाबा करणारच. त्यात नॉनव्हेज खाणेही आलेच. मग खाल्ले तर बिघडले कुठे ? बाबाही लोकांचा हाच समज दूर करायचा प्रयत्न करीत असावेत. 

परंतु बाबा जरी हे खात असेल, तरीही तो कुणालाही ते खायला फोर्स करीत नसे. ज्याला मांसाहार खाण्याची इच्छा आहे त्यालाच ते देत असे. खूप मोठी गोष्ट आहे. हल्ली मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना नॉनव्हेज न खाण्यावरून खूपच डिवचतात. शाकाहारी लोक कसे बाटले जातील हेच पाहात असतात. एवढेच नाही, तर शाकाहारी लोकांना टोमणेही मारतात. बाबा खातो, मग तू का खात नाहीस ? तुला जर बाबांनी खाऊ घातले तर तू खाशील का ? असे अनेक प्रश्न मुद्दाम डिवचायला विचारतात. पण हे मांसाहार खाण्यामागे बाबांची नक्की काय भूमिका आहे हेच त्यांना समजलेले नसते. शेवटी बाबा तो बाबाच आणि माणसे ती माणसेच !

दादा केळकरांची कथाही हेच सांगते. जातीने ब्राहमण असल्यामुळे सागोती आणणे दादांना जरा जडच जाणार होते. पण तरीही त्यांची परीक्षा बघायला बाबा त्याना बोलले असमावेत असे वाटते. बाबांना काय समजत नाही का ! त्याला सगळे कळत असते. खरा हिरा तावून सुलाखूनच बाहेर निघतो. दादाही कमी नाहीत. केवळ बाबांच्या शब्दाखातर लगेच तयार झाले. परंतु शेवटी बाबाना दया आली आणि त्यांनी दादाना थांबवले. दीक्षितांच्या बोकड कापायच्या कथेतही बाबानी हेच केले. पण शेवटी त्यांचा पिंड लक्षात घेता बोकड कापू दिला नाही. 

८) बाबा स्वतः घासाघीस करून व्यवहार करीत असे. ही दक्षता बाबा इथे शिकवीत आहेत. पदार्थ सुद्धा हातात घेऊन, तो बरोबर आहे का हे बघूनच तो घेत असत. व्यवहारात प्रत्येक जण समोरच्याला फसवून आपला फायदा कसा करता येईल ते बघतो. विकणाऱ्याला जे जास्त भावात विकायचे असते तेच विकत घेणाऱ्याला कमीत कमी भावात विकत घ्यायचे असते. अशा वेळेस कसा व्यवहार करायचा हे बाबा आपल्याला सांगत आहेत. बाबांना हे सुद्धा येते !

९) बाबा इथे स्वकष्टाचे महत्त्वही विषद करीत आहेत. कष्ट करून खाण्यात जो आनंद आहे ना तो आयते मिळण्यात नाही हेच बाबांना दाखवायचे आहे. परावलंबी जीवन आणि पुस्तकी विद्या कधीच कामी येत नाही. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कारभाग बुडाला ह्या म्हणी प्रत्यक्षात जगताना बाबा दिसतात.  

१०) बाबा उकळत्या हंडीत स्वतःचा हात घालून अन्न ढवळीत असे. मला सांगा कुणाला शक्य आहे हे ? शिवाय हे कृत्य करताना तोंडावर भीतीचा लवलेशही नाही. आणि इतकेच काय, असे केल्यावर साधे भाजण्याची खूणही नाही. असे कसे ? पण हे लक्षात घेऊया की ज्याच्या पायी अष्टसिद्धी लोळण घेत आहेत त्याला काय अशक्य ? नाही का ? आपला हस्तस्पर्श ह्या अन्नाला व्हावा आणि सर्वांनी बाबांचा कृपाप्रसाद घ्यावा हीच भावना बाबांची होती. 

बाबा उकळत्या हंडीत हात घालून फिरवत व त्यांना भाजत नसे ही क्रिया सद्गुरूंची पंचमहाभूतांवर सत्ता आहे हे दर्शवते. आपणही सारे पंचमहाभूतांनीच बनलेले आहोत, त्यामुळे आपल्यावरही बाबांची सत्ता आहे व काय खाणे योग्य हे बाबाच जाणतात. म्हणूनच हंडी शिजवण्याचा प्रपंच करतात.  

११) बाबांची प्रत्येक कृती बाहेरचे जण notice करायचे. म्हणूनच खाण्यावरूनही बाबांची जातकुळी ठरवायचे. पण हा बाबा जात-धर्म ह्या सगळ्यांच्या पार आहेत हे ही त्यांना समजत नाही. 

शेवटी एवढेच वाटते की विश्वाचा पसारा सांभाळणारे बाबा हे खरोखर उत्तम chef आहेत. काही वर्षांपूर्वी गुलाबजाम नावाचा सिनेमा आला होता. त्यात उत्तम स्वयंपाक करणाऱ्या त्या सिनेमामधील अभिनेत्रीने म्हंटलेले शब्द आठवतात. "स्वयंपाक म्हणजे केवळ किचन मध्ये शिजवलेले अन्न नव्हे. तर भाजी, मसाले आणण्यापासून ते जेवण वाढून भांडी घासेपरेन्त केलेले सर्व कष्ट." तिचे हे वाक्य मला फार आवडलेले. ह्या बाबाला हे ही माहीत आहे. हा बाबा सर्वार्थाने परिपूर्ण कसा हेच या अध्यायात समजते.

हा बाबाच आपले जीवन त्याच्या गोडव्याने भरून टाकतो. जीवनातील गोडवा म्हणजे हा बाबाच.   

गोड झालं मन माझं 
गोड झालं जीवन 
बापू बापू म्हणताना 
उरात फुलला ऊस 

खरे पाहाता आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो. पण इथे देव आपल्याला स्वतः कष्ट घेऊन, राबून, स्वतःच्या हाताने केलेले भोजन प्रेमाने खाऊ घालीत आहे. किती हे भाग्य ! सारे काही हाच करतो. आपण फक्त निमित्तमात्र. आयते येऊन पानावर बसायचे आणि बाबांनी प्रेमाने वाढलेले खाऊन तृप्त व्हायचे व ते प्रेम रक्तात भिनवायचे. म्हणजे आपल्यालाही साऱ्यांशी असेच प्रेमाने वागता येईल. बाबांची परीक्षा घ्यायला येणाऱ्याशीही बाबा प्रेमानेच वागत हे आपल्याला समजले पाहिजे. कारण ह्याच्याकडे फक्त सत्य, प्रेम आनंदच आहे.  

हात त्याचा घास त्याचे 
मायाही केवळ त्याची 
त्याचा घास मुखी येता 
वैनी जाहली रे पूरी ... 



   


  
   

 








  




 






   





    




 
  


 


     



    







  

         








   



 

0 comments: