Adhyay 4 (अध्याय ४)

05:58:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

गवळीबुआ



हा अध्यायामध्ये विठ्ठलाचा खूप वेळा उल्लेख येतो. साईनाथ हेच विठ्ठल आहेत. जो पंढरीनाथ आहे, तोच हा साई. साईचरित्रामध्ये अनेक उदाहरणे येतात. साई, राम, कृष्ण, विठ्ठल हे एकच आहेत हेच हेमाडपंत वारंवार सांगायचा प्रयास करतात. मानवाचे मन हे संशयी असते. अनुभव आल्याशिवाय काहीच मानायला तयार नसते. स्वतः मधेच मश्गुल असते. म्हणूनच वारंवार उदाहरण देऊन हे तत्व सांगायची हेमाडपंतांना गरज पडत आहे.....    

गवळीबुआ हे या उदाहरणांतील एक. अगदी दृढ विठ्ठलभक्त. तेच साईनाथाना पाहून "हाच तो मूर्त पंढरीनाथ" असे म्हणत आहेत. साईनाथांमध्ये विठ्ठलालाच पाहात आहेत. जो पंढरीनाथ आहे, तोच सगुण साकार होऊन साई म्हणून प्रगटला आहे. आणि म्हणूनच दर वर्षी न चुकता ९५ वर्षाचे असूनही ते पंढरीची आणि शिरडीची वारी करीत आहेत.. केवढे हे प्रेम ! खरेच ग्रेट !  




गवळीबुआ आपल्याला खूप काही शिकवतात.... 

१) विठ्ठलाचे कट्टर भक्त होते. आपल्या आराध्याविषयी श्रद्धा कशी असावी याचे उत्तम उदाहरणच आहेत. 

२) विठ्ठलाईतकेच साईनाथांवरही तितकेच दृढ प्रेम आहे... 

बापूला माझ्या प्रेमाची तहान 
बापूला माझ्या भक्तीचीच भूक 

हावरा 'हा' भक्तिपेमा... हे गवळीबुआंना उमगले आहे.     


३) रामकृष्णहरी चा त्यांचा निरंतर जप चालत असे. नामसंकीर्तनाचे महत्त्वच जणू त्यांनी ठसवले आहे. ह्यामुळेच साईरुपातील विठ्ठलाने आपल्या प्रेमळ भक्ताला स्वतःकडे ओढले आहे. सगुण साकार रूपात आपल्या जवळ केले आहे. 

४) विठ्ठल आणि साई हे एकच आहेत हे पक्के माहीत आहे. "मी विठठलाचा भक्त आहे, तर मी साईनाथांकडे बघणारही ना नमस्कारही करणार नाही... माझा विठ्ठल हाच काय तो देव" असे म्हंटले नाही. 

याचप्रमाणे सगुण साकार रूपात साईबाबा भेटले म्हणून मी विठ्ठलाकडे जाणार नाही असेही त्यांनी म्हंटले नाही. 

५) वारी करताना पंढरीसोबतच शिरडीलादेखील जातात. "पंढरीला गेले तर शिरडीला का जाऊ किंवा शिरडीला गेलो, आता पंढरीला जायची गरज नाही" असा विचार मनात आला नाही. 

६) ९५ वर्षाचे थकलेले आणि जर्जर शरीरही पंढरी आणि शिरडी वारीच्या आड आले नाही. मनात अतोनात प्रेम असेल तर शारीरिक थकवाही जाणवत नाही.    

७) नामसंकीर्तनांसोबतच अगदी आनंदाने गुणसंकीर्तन करण्यामध्येही गुंग झाले आहेत. माझा विठ्ठल हाच तो साई हे अगदी मुक्तपणे सांगत आहेत आणि कृतीतून दाखवूनही देत आहेत. 

८) स्वत: सोबत लवाजमा घेऊन आणि मिरवत वारीला जात नाहीत. स्वप्रसिद्धीचा सुद्धा मोह नाही. केवळ एक गर्दभ आणि मनात हरिनाम हेच त्यांचे सोबती.            


तर असे हे गवळीबुआंचे उदाहरण देऊन हेमाडपंत आपल्या सार्यांना कळकळीने साई हेच विठ्ठल आहेत हेच सांगत आहेत...   


अनिरुद्ध आला रे आला माझा सावळा विठ्ठल आला...    

गवळीबुआना जसा साई लाभला तसा आपल्या सर्वाना बापू लाभला आहे. हा चान्स वाया दवडता कामा नये. अंबज्ञ डॅड !


--------------------------------------------------




साईंच्या अंगठ्यातून गंगा यमुना निघाल्या 




पंढरपूरची रसयात्रा आठवली. मला आणि माझ्या आईला त्यात सहभागी होण्याची संधी मिळालेली. रसयात्रेच्या प्रोग्राम मध्ये विठ्ठलाच्या दर्शनाचा प्रोग्राम नव्हता. खरं सांगायचे म्हणजे रसयात्रेला येऊनही पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची ओढ मनात होतीच... शेवटी सामान्य मानवी मन ते.... भरकटलेच.  


दुसऱ्या दिवशी भल्या पाहाटे उठून विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो; पण दर्शनच मिळू शकले  नाही. आमच्यासारखे रसयात्रेला आलेली बरीच मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला आली होती. पण विठ्ठलाच्या दर्शनाअभावी सर्वांचाच हिरमोड झालेला. 

त्या दिवशी दुपारी बापू आल्यावर स्वतः म्हणाले, 
कशाला जाता दूर 
आमुचे इथेच पंढरपूर   
      

नंतर आमचे आम्हालाच उमगले. साक्षात बापू, नंदाई, सूचितदादा (म्हणजेच सगुण साकार रूपातील विठ्ठल, रखुमाई, पुंडलीक) आमच्या सोबत रसयात्रेला असताना मुद्दाम extra efforts घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे म्हणजे समोर गोड्या पाण्याचा मोठा तलाव असतानाही दुसरा तलाव शोधण्यासारखे आहे.... 

बापूंमुळे आम्हाला एक महत्तवाचे तत्व उमगले.  आकाशातून पडणारे पाणी हे एकच आहे. तलाव, नद्या जरी वेगळ्या ठिकाणी असल्या तरीही प्रत्येक ठिकाणचे पाणी तहान भागवते. त्याचप्रमाणे विठ्ठल हाच आपला बापू. मग कशाला इत्तर extra efforts ? नाही का?            

आपण अभ्यासत असलेल्या दासगणूंच्या कथेतही हेच तत्व हेमाडपंत आपल्याला सांगायचा प्रयास करतात. 

दासगणूंना प्रयाग तीर्थावर स्नान करायला जायचे मनात आले. दासगणू प्रत्येक गोष्टीची साईनाथांकडे आज्ञा मागायला आले आहेत. मनात आल्याबरोबर लग्गेच निघाले नाहीत. 


बाबा देती प्रत्युत्तर  नलगे तदर्थ जाणें दूर  
हेंचि आपुलें प्रयागतीर विश्वास धर द्दढ मनीं १०३॥
   
बाबांची आज्ञा दासगणूंनी अगदी तंतोतंत पाळली आणि साईंच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे त्यांना बाबांनी अनुभव दिलाच. 


खरेंचि सांगावें काय कौतुक बाबांचे चरणीं ठेवितां मस्तक  
उभयांगुष्ठीं निथळलें उदक गंगायमुनोदक पाझरलें १०४॥

पाहूनियां तो चमत्कार दासगणूसी आला गहिंवर  
काय बाबांचा महदुपकार फुटला पाझर नयनांसी १०५॥

ओवीमध्ये आलेला हा 'चमत्कार' म्हणजे साईप्रेमाची लीला आहे. दासगणूंना आलेल्या ह्या अनुभवामुळे ते गहिवरले आहेत. साई नुसते बोलले नाहीत, तर प्रत्यक्षात त्यांनी अनुभवही दिला आहे. 

हा अनुभव म्हणजे दासगणूंच्या आज्ञापालनाला, विश्वासाला आणि प्रेमाला साईंनीं दिलेली पोचपावतीच आहे.     

ह्या साईचरणांतच सारे काही सामावले आहे. एक फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे चरण घट्ट धरले की सारे काही मिळते. जन्माचे सार्थक होते. इथे तिथे वणवण भटकायची काहीही गरजच लागत नाही. उचित आहे ते तो योग्य वेळी पुरवतोच. 
    
बापू पायी ठेऊ 
एकविध भाव 
नको धावाधाव 
अन्य कोठे ... 

---------------------------------------------






भुयाराची गोष्ट 




हा परमात्मा जेव्हा मानवी रूपात या धरणीवर येतो, तेव्हा कसा, कुठे, कधी प्रगट  झाला, पहिल्यांदी कुणाला आणि कुठे दिसला अशी जिज्ञासा प्रत्येकालाच असते. हेमाडपंत या गोष्टीमध्ये साई प्रगटीकरणाविषयी सांगतात. योगीन्द्रसिंहांनी याचा खूप छान भावार्थ लिहिला आहे. तो आपण जरूर वाचलाच पाहिजे.    
     
आपल्या आयुष्यात साई प्रगटणे हाच आपला भाग्योदय. हाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट. ह्या कलियुगामध्ये प्रत्येक मानवाला काही ना काही संकटे, अडचणी आहेतच. आजकालच्या घडीला अगदी प्रत्येकालाच आधार हवा आहे. आणि हा आधार सद्गुरू देतो. हेच ते आपल्या आयुष्यातले साईंचे पदार्पण. हाच आपल्या वाळवंटाचे नंदनवनात रूपांतर करू शकतो... 

इस बगिया का हर फूल खिला 
अनिरुद्ध तेरे आने से... 

पिपा म्हणे माझे मोडके जीवन 
तूच केले बापू सफळ संपूर्ण ... 

... आणि आपले आयुष्य असे आनंदाने भरून टाकण्यासाठी 'हा' काय म्हणून नाही करत... भुयाराच्या कथेतील जागेत साईनाथांनी १२ वर्षे तप केले आहे असा उल्लेख येतो ! हे सारे कष्ट साईनाथ आपल्या बाळांसाठीच घेतात. आपल्या भक्तांची पापे पण तेच स्वीकारतात. केवळ आपल्या लेकरांना आनंदी बघण्यासाठी. एवढे आपल्यावर कोण प्रेम करणार !

जळीताची आग 
बापूची सोसतो 
तरी कसा बापू माझा 
येतचि राहतो ...      

ह्या साईनाथाच्या प्रगटीकरणाचे स्थान पाहण्यासाठी आधी विटांचा थर आणि जात्याची तळी दूर सारावी लागते. हा साई स्वतः आपल्या लेकरांना आपल्याकडे खेचतो, त्यांचा उद्धार करायला. पण एवढे करूनही आपण कुतर्क, शंकांच्या भोवऱ्यात अडकतो आणि साईचा प्रेमाने पुढे केलेला हात धुडकावून लावतो. हे कुतर्क, शंका म्हणजेच हा विटांचा थर. 

मातृवात्सल्य उपनिषदात लिहिल्याप्रमाणे ह्या साईनाथाला आपल्या मनाची दारे उघडून आत यायला मोठ्या आईने परवानगी दिलेली नाही. हा आपल्या कर्मस्वातंत्र्याच्या आड कधीच येत नाही. आपल्या मनाच्या भुयारात श्रद्धा-भक्तीच्या आणि साई-प्रेमाच्या समया सदैव तेवत असतात. मनाचे दार बंद असतानासुद्धा ह्या समयांना ऑक्सिजनचा पुरवठा ही मोठी आई करत असते. भैतिक जगातही तिची आणि तिच्या पुत्राचीच ह्या पंचमहाभूतावर सत्ता आहे. 

हा साई आपल्याला कवेत घ्यायला सदैव तयार आहे.. गरज आहे ती आपल्या मनातल्या संशय आणि कुतर्कांना दूर सारून ह्या साईला आपल्या हृदयात बसवण्याची. मग आपला उद्धार झालाच म्हणून समजा.. 

ठाव नका देऊ कुतर्का 
शुद्ध भोळी प्रीती करावी... 

हा साईनाथ एवढे सारे आपल्यासाठी करतो, पण ह्याचे सारे क्रेडिट मात्र त्या मोठ्या आईलाच देतो. साईंचे "माझ्या गुरूंचे हे स्थान आहे" हे वाक्य खूप महत्त्वाचे वाटते. ह्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपण मात्र नसलेले क्रेडिटही स्वतः कडे घ्यायला बघतो. अहंकार आणि क्रेडिट घेण्याचा हव्यास ... 

शेवटी एवढेच वाटते, हा आपल्या आयुष्यात त्याच्याच कृपेमुळे प्रगट झाला आहे... त्याचे बोट कायम घरून ठेऊ... कारण ह्याचे आपल्या आयुष्यातले पाऊल हाच आपला आनंद आहे. 

आनंद माझा आहे 
सच्चिदानंद माझा आहे ... 



        
---------------------------------------------
            


मनाचा लांगडेपणा  



परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित मानीत उणेपणा  
खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले साईंस १५५॥




मानवाचे मन हे सतत कुठल्या ना कुठल्या विचारांनी ग्रासलेले असते. आज एक तर उद्या दुसरे. पण ह्या मनाच्या ताकदीवरच पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. हेच मानवाच्या उचित प्रवासाची योग्य दिशा ठरवू शकते. पण हे मन खूपच दुबळे असते, लंगडे असते. कलियुगामध्ये तर हे मन मजबूत बनवणे हे खूपच गरजेचे असते. 

... आणि म्हणूनच हा बापू मनसामर्थ्य प्रदान करायला आला आहे. हाच मनाचे नमः करून आपला उचित प्रवास करू शकतो. ग्रेट ! 

बघायला गेलं तर विज्ञानालाही 'मन' हे अजून दाखवता आलं नाही. मग त्याला बळकटी देणं तर दूर राहिलं. जे विज्ञानालाही शक्य नाही, ते केवळ हाच करू शकतो. बाकी कुणीही नाही.      








  

0 comments: