Adhyay 40 (अध्याय ४०)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
देव मामलेदार आणि हेमाडपंतांची कथा
हा साईनाथ आपल्या प्रत्येकालाच आपल्यापेक्षाही जास्त ओळखतो. हाच जन्म काय तर याआधीचे कित्येक जन्म ह्याला ठाऊक असतात. आपण कथांमध्ये बघितलेच आहे. आता प्रश्न असा आहे की आपण ह्या बाबाला किती ओळखले आहे ? माझ्या मते ४० वा अध्याय अशाच दोन भक्तांभोवती फिरतो ज्यांच्या कथांद्वारे आपल्याला "बाबांना ओळखणे म्हणजे नक्की काय" हे समजू शकते.
तसे पाहाता ह्या बाबाला पूर्ण ओळखणे ७ जन्म घेतले तरी कुणाला शक्य नाही. परंतु बाबांनी उच्चारलेले शब्द आपण कसे घेतो ह्यावरच आपण बाबांना किती ओळखू शकलो हे आपल्यालाच समजते. ह्या अध्यायात नमूद केलेल्या दोन श्रेष्ठ भक्तांच्या कथांची जर घटनानुक्रमे तुलना केली तर सारा भावार्थ अधिक स्पष्ट होतो. साईचरित्राच्या प्रॅक्टिकल बुक मध्ये खरेच खूप सुंदर पद्धातीने या सर्वांचा भावार्थ लिहिला आहे. तो जरूर वाचावा. त्याने संकल्पना अधिक स्पष्ट होत जाते. त्याखेरीज अन्य असे लिहिण्यासारखे नाही.
बाबांचा शब्द म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हा जे बोलतो ते होतेच. ती गोष्ट ही काळ्या दगडावरची रेघच होते. देव मामलेदार खरोखर श्रेष्ठ / उत्तम भक्त आहेत. पण तरीही त्यांच्याकडे आलेल्या बाबांना ते ओळखू शकले नाहीत. मग आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा ? नाही का ? मामलेदारांनी जी चूक केली तीच चूक आपण करू नये याकरताच त्यांनी हा अध्याय लिहिला आहे असे वाटते. त्यात मामलेदारांची चूकही दाखवायची नाही आणि आपण किती ग्रेट आहोत हे ही त्यांना दाखवायचे नाही. ह्या कथा वाचून श्रोते बाबांना अधिक चांगल्या पद्धतीने ओळखावेत हीच हेमाडपंतांची तळमळ आहे.
हा साईनाथाने वेगवेगळी रूपे घेतलेली साईचरित्रात आपण वाचतो. हा बाबा चराचरात व्यापलेला आहे हे मामलेदारांना माहिती नाही असे नाही. बाबांनी शब्द दिला म्हणजॆ तो येणारच हा विश्वासही मामलेदारांना आहे. परंतु मामलेदारांचा असा समज झाला की हा बाबा जसा शिरडी मध्ये निवास करून आहे त्याच रूपात त्यांच्याकडे येऊन जाईल. म्हणेजच मामलेदार बाबांच्या रूपात अडकले. इथे बाबांच्या शब्दापेक्षाही त्यांच्या रूपाला जास्त महत्त्व दिलेले जाणवते.
हा बाबा सुद्धा अवलिया आहे. सारखी भक्तांची परीक्षा बघत असतो. इथे बाबांनी मामलेदारांची परीक्षा बघितल्यासारखेच आहे. वेळोवेळी बाबांनी अनेक खुणा देऊनसुद्धा मामलेदार बाबांच्या त्या रूपातच अडकले. म्हणूनच बाबा मुद्दाम दुसऱ्या रूपात आले असे वाटते. मामलेदारांना त्यांची चूक समजावी यासाठीच बाबांनी ही सारी लीला केली. आपल्या श्रेष्ठ भक्ताचे अध:पतन होऊ नये, त्याची सतत प्रगतीच व्हावी याकरताच नेहमी हा बाबा झटत असतो. हे असे दुसऱ्या रूपामध्ये येऊन मामलेदारांच्या मनाला यातना देण्याचा बाबांचा अजिबात विचार नव्हता, तर त्यांनी कसे वागायला हवे होते हे दाखवले.
याउलट हेमाडपंतांच्या मनात मात्र सारे काही पाण्यासारखे साफ होते. "चित्र नव्हे तूचि असशी एवढेच मानत होतो" हे ते जाणून आहेत. छबी रूपात माझा बाबाच आला आहे हे पक्के माहीत आहे. बाबांच्या शब्दावर पूर्ण विश्वास असणे म्हणजे नक्की काय हे या कथेद्वारे समजते. बाबा येणार म्हणजे येणार. त्याच्या तयारीसाठी आधीच जेवणाचे ताटही साग्रसंगीत मांडले आहे. लोकांची भीडभाड न ठेवता प्रमुख पाहुण्याची जागा बाबांसाठी रिकामी ठेवली आहे. बाबा येणार म्हणून जेवणही थांबवले आहे. हेमाडपंतांना खरेच मानले. त्यांच्या भावाला काय म्हणावे, तो अनुपमेयच !!
आणि अशा भक्तांना तर हा बाबा अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचतोच ! प्रेमाने आंघोळ घालतो. त्यांचे घर "साईनिवास" बनवतो. त्यांच्याकडून साईचरित्र लिहून घेतो. एवढेच काय पुढे येणाऱ्या आपल्याच "बापू" रूपाची पायाभरणीही करतो. खरेच ग्रेट !
मी तर या दोन्ही भक्तांपुढे कुणीच नाही. देव मामलेदारांप्रमाणे मला जर बाबा "मी तुझ्या घरी येतो" असे म्हणाले असते तर मी अक्षरश: आनंदाने वेडा झालो असतो. मी ही मामलेदारांप्रमाणे असाच बाबांच्या त्या रूपाची वाट बघत उभा असलो असतो. माझ्याही मनात "अरे पण बाबा कसे येतील ?" असाच विचार आला असता.
पण शेवटी ही कथा वाचून हळूच मनात येते - बाबा, येशील का माझ्या घरी ?
एक वेळ तू सहजचि ये रे
अनिरुद्धा मम घरी
आगमनाची वाट पाहतो
दे मज तूचि सबुरी ....
0 comments:
Post a Comment