अध्याय ४१ (Adhyay 41)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
साई छबीची गोष्ट
४० व्या अध्यायाशी कनेक्टेड कथा आहे. आधीच्या अध्यायात हेमाडपंत आणि देव मामलेदार यांच्यातील फरक पाहिला. परंतु हेमाडपंतांच्या कथेमध्ये ती बाबांची छबी नक्की कशी आली हे मात्र अनुत्तरीतच राहिले. त्याचेच उत्तर आपल्याला या कथेतून मिळते.
आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कामांचे प्लॅनिंग करत असतो. बऱ्याच वेळा केलेले प्लॅनिंग फसतेच. शेवटी आपण माणूस. परफेक्शन नाही. मात्र हा बाबा एकमेव perfect. ह्या कथेत बाबांच्या कमालीच्या प्लॅनिंग चा अंदाज येतो ! खरेच hats off ! हेमाडपंतांच्या घरी जी बाबांची छबी जायची होती त्याचे प्लॅनिंग कित्ती आधीपासून बाबांनी करून ठेवले आहे ! हे नाथसंविध साकार होण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक होते ते ते सारे या कथेत घडताना दिसून येते.
साईचरित्रातील अनेक कथा फिल्मी वाटतात ना ! अगदी चित्रपटात ज्याप्रमाणे घडू शकते अगदी तसेच घडताना दिसते. पण ह्या साईकथा काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडणाऱ्या आहेत. अशक्य गोष्टी केवळ हा बाबाच शक्य करू शकतो. काय लिंक आहे ह्या साऱ्याची ! गयावळच्या कथेत तर चक्क १२ वर्षे आधीपासून बाबांनी सारे प्लॅनिंग केलेले ! काय म्हणावे आता !
ह्या साऱ्याची सुरुवात अल्ली महंमद ला मुबईच्या रस्त्यावर त्या व्यापाऱ्याकडच्या साईंच्या छबीकडे पाहिल्यावर झाली. हा व्यापारी कोण ? तर हा बाबाच. त्यानेच अल्ली महंमद च्या डोक्यात ती तसबीर घेण्याची तीव्र इच्छा उत्पन्न केली. हा बाबाच सारे काही घडवून आणत असतो.
पण असे असतानाही अडचणी काही कमी होत नव्हत्या. आधी अल्ली महंमद आजारी असल्याने त्याचे त्याच्या मेव्हण्यांकडे जाणे, मेव्हण्याला नेमका त्यांच्या गुरूंचा मिळालेला ओरडा, त्यामुळे त्याने सारी चित्रे विसर्जन करायचा घेतलेला निर्णय, केवळ त्यांच्याच गुरूची नाही तर सर्वच तसबिरी विसर्जन करण्याचा आखलेला बेत हे सारे काही बाबांच्या नाथसंविध च्या विरुद्ध होते. पण हा बाबा असे कसे बरे होऊ देईल ?
बाकी साऱ्या गुरूंच्या तसबिरी भिंतीवर टांगलेल्या असताना नेमकी साईबाबांचीच तसबीर काढली गेली नाही ! केवढे हे आश्चर्य ! हा बाबा त्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी वाट्टेल ते करू शकतो ह्याचेच उदाहरण. विचार करा ! मेव्हण्याला चक्क डोळ्यांना ती तसबीरच दिसली नाही !
पण ही कथा वाचल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला. मेव्हण्याच्या गुरूंनी रागावून त्या साऱ्या तसबीरी पाण्यात विसर्जन करायाला का बरे सांगितल्या असतील ? मेव्हण्याने तर किती प्रेमाने त्या सर्व आप्तेष्टांना वाटल्या होत्या ! त्याचे उत्तर आहे की कोणत्याही गुरूला आपली दवंडी पिटवलेली आवडत नाही. गवगवा केलेला आवडत नाही. यासाठीच ते गुरू रागावले आहेत.
परंतु बाबांनी सारी फिल्डीन्ग लावलेली आहे. चक्क तसबीरच गायब केली. सर्व बाजू सांभाळून मस्त उपाय काढला. शेवटी तसबीर म्हणजे साक्षात बाबाच. ती जरी एक वस्तू म्हणून आपण बघत असू तरीही तसबीर म्हणजे प्रत्यक्ष बाबाच. त्याने त्याची लीला केलीच.
शेवटी एवढेच वाटते की हा बाबा काहीही घडवून आणू शकतो. त्याच्या हातात सारे काही आहे. आपण फक्त भोळ्या भावाने त्याला आळवूया.
भाव करुणेची साद वात्सल्याची
प्रेमे वाकवी तोचि बापुराय ...
---------------
चिंधीचोर कथा
देव मामलेदार म्हणजे बाबांचे लाडके बाळच. ही कथा म्हणजे बाबांचा आपल्या भक्तांवरील प्रेमाचा हक्कच. वरवर जरी रागे भरत असताना दिसत असले तरीही बाबा एखाद्या वडिलांप्रमाणे मामलेदारांना समजावून सांगत आहेत. भक्त आणि बाबा यांच्यात काहीच आडपडदा नाही. आणि भक्ताने तसा तो ठेवायची पण गरज नाही हेच इथे सांगायचा प्रयास केला आहे.
आपण आपल्या आईशी किती मोकळेपणाने वागतो ! मनातले सारे काही शेअर करतो. मनातल्या प्रत्त्येक प्रश्नाचे, शंकेचे उत्तर आपल्या आईकडे असते. आईसुद्धा आपल्याला परोपरी सांभाळून घेऊन समजावून सांगत असते, आपल्यासाठी झटत असते. हा साईनाथ म्हणजे सुद्धा आपली आईच आहे. गुरुमाय. आपल्या सख्ख्या आईसारखीच. मग तिला आपल्या मनातले सारे विचारायला काय हरकत आहे ?
मनातल्या गोष्टी थेट बाबांना न विचारता इतर भक्तांना बाबांनी तुम्हाला ह्याबाबतीत अनुभव कसा दिला हे विचारणे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसाच. इथे ह्या कथेत मामलेदारांच्या मनात प्रचंड गोंधळ आहे असे दिसते. माझ्या मनात जे आहे ते बाबांनी ओळखावे आणि जर बाबा मनातले ओळखतात तर त्यांनी मला 'ज्ञानेश्वरी वाच' असे स्पष्ट का बरे सांगत नाहीत ? अशी kind of बाबांची परीक्षाच घेतल्यासारखी वाटते. बाबांना अख्ख्या जगाचा व्याप आहे, त्यांना प्रत्येकाकडेच लक्ष द्यायचे असते. त्यामुळे आपण त्यांचा ताप अजून न वाढवता, त्यांचीच परीक्षा न घ्यायला जाता आपण स्वतःच बाबांना विचारावे आणि मनातील शंकेचे समाधान करून घ्यावे हे मामलेदारांना सुचले नाही.
"असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असे मामलेदारांचे झाले. बाबांना अट घालण्याइतके आपण मोठे नाही हे माहीत हवे. योग्य वेळ आली की बाबा देईलच; पण त्यासाठी आपणही एक पाऊल पुढे टाकून बाबांशी संवाद साधायला हवा.
सगळ्यात हास्यस्पद म्हणजे बाबा याची देही याची डोळा मामलेदारांच्या समोर आहेत. त्यांची भेटही होणे मामलेदाराना शक्य आहे. परंतु तसे असतानाही उगाचच गोष्टी complicated कशाला करायच्या ? सरळ मनातले बोलून टाकावे. खरे पाहाता बाबांशी असे डायरेकट बोलताना आदरयुक्त भीती ही असतेच. मान्य आहे. परंतु देव मामलेदार तर बाबांचे लाडके बाळ आहे. मग हा आडपडदा कशाला ? त्याची काय गरज ?
आपण कधीकधी बोलता बोलता "अरे काय चिंधीगिरी करतोयस?" असे बोलतो. त्याचा अर्थ आपण प्रत्येकजण जाणतो. बाबांनासुद्धा असेच काहीसे मामलेदारांना बोलायचे असावे. म्हणूनच त्यांना "चिंधीचोर" असे म्हंटले आहे. साईनाथरूपी भरजरी शेला हातात असताना कशाला इथे तिथे भटकून चिंध्या गोळा करायच्या ? असे करू नये हेच बाबा सांगत आहेत.
वरवर दिसता बाबा रागावलेले किंवा शिवीगाळ करताना, मामलेदारांना त्रास देताना दिसत असले, तरीही हा त्रास मामलेदारांनी शिकावे आणि त्यांची अध्यात्मिक प्रगती व्हावी याकरताच बाबांनी दिला आहे. ह्या कथेत बाबाही थोडेसे disappoint झाल्यासारखे वाटले. त्यांनाही देव मामलेदार असे वागले त्याने थोडे दुःख झाले असणार. मी इथे उभा असताना इतर ठिकाणी कशाला धावायचे ?
मामलेदारांना सुद्धा खरेच ज्ञानेश्वरी वाचण्यास अडचण येत होती. ते ही तितकेच खरे. अर्थात बाबांचा आशीर्वाद मिळणेदेखील तितकेच महत्ववाचे होते. त्यामुळेच पुढे मामलेदार शांत चित्ताने ती वाचू शकले आणि भावार्थ जाणून घेऊ शकले. आणि एकदा बाबा म्हणाले म्हणजे मामलेदाराना ज्ञानेश्वरी येणारच !
ही कथा घडून गेल्यावरही एका वर्षाने बाबांनी पुन्हा मामलेदारांच्या स्वप्नात येऊन प्रेमाने त्यांची विचारपूस केली आहे. ज्ञानेश्वरी वाचताना काही अडचण तर येत नाही ना असे प्रेमाने विचारत आहेत. बाबाच्या प्रत्येक शब्दात, कृतीत आपलेपणा जाणवतो. हे खरे प्रेम !
हात पसरुनि जवळी घेतले
आनंदाचे डोही बुडविले
पिपा विनवितो एकदा तरी
लुटून घ्यावे ह्याच्याकडूनी ....
0 comments:
Post a Comment