अध्याय ४२ (Adhyay 42)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
विजयादशमीला बाबा कोपण्याची कथा
हा बाबा जरी परमात्मा असेल, तरीही तो खाली येताना एक मानव म्हणून जन्मास आला आहे. म्हणजेच मानवाला लागू होणारे सारे नियम त्याला लागू होतातच; किंबहुना हा बाबा स्वतःच ते पाळतो, जेणेकरून एक आदर्श मानव कसा असतो याचे सुंदर उदाहरण जगाला मिळू शकेल. प्रत्येक मानवाला मृत्यू हा आलाच. इथे कुणीच अमर नाही. ह्या साईचे शरीर म्हणजे पंचमहाभूतांनी नटलेला देह आहे. किंबहुना त्याने तो देह धारण केला आहे. बाबांच्या ह्या मानवी शरीराला मर्यादा आणि काळाचे बंधन आहे. बाबांना नाही. बाबा हे एक परमेश्वरी तत्व आहे आणि ते अमर्याद आहे. त्याला काळाची बंधने नसून काळाला वाकवण्याचीही ताकद त्याच्याजवळ आहे.
हे सारे सांगायची ही वेळ आहे कारण आता साईचरित्राच्या शेवटच्या अध्यायांकडे आपली कूच सुरू झालेली आहे. साईनाथांच्या निर्वाणासंबंधी कथा ह्या अध्यायांमध्ये येतात. इतक्या सगळ्या कथा आणि त्यांचा भावार्थ आपल्या अल्पबुद्धीने समजून घेतल्यावर निर्वाणाच्या कथा वाचल्या की जरा वाईट वाटू लागते. हे चरित्र आणि भावार्थगंगा अखंड सुरू राहावे असेच मनापासून वाटते. परंतु नुसते चरित्र समजून घेऊन उपयोग नाही; तर ते जीवनात implement करणेही तितकेच महतवाचे आहे. आणि म्हणूनच बाबांनी अध्यायांची मर्यादा घालून दिली आहे असे वाटते.
विजयादशमीचे महत्त्व आपण प्रत्येकजण जाणतोच. रावण, अशुद्धता यांची होळी, अशुभाचे दहन करण्याचा अत्यंत पवित्र दिवस. बाबांनी धारण केलेला हा पवित्र क्रोध आपल्यातीलच रावण मारण्यासाठी आहे. मातृवात्सल्यविंदानम मध्ये आपण वाचतो. रावणादि सारे राक्षस आता कलियुगात मानवाच्या मनामध्ये निवास करून आहेत. मनासारखी अगदी मोक्याची जागा ह्या दैत्यांनी निवडलेली आहे. माणसाला मनाने कमकुवत करायचा ठेकाच जणू घेतला आहे. ह्या राक्षसांनी केवळ त्या त्या माणसांनाच नाही; तर साक्षात बाबांनाही सोडले नाही. म्हणूनच बाबांना ते हिंदू आहेत की मुसलमान आहेत हे विचारण्याची कुबुद्धी होत आहे ना !
अशा मानवी मनावर कब्जा मिळवलेल्या दैत्यांनाच बाबा वठणीवर आणून त्यांचा नाश करण्यासाठी बाबा क्रोध धारण करीत आहेत. एकीकडे परामकारुणिक असणारे बाबा क्षणार्धात असुरांसाठी परमोग्र विनाशकारी झालेले आहेत. म्हणूनच ते जमदग्नीरूप धारण करीत आहेत.
परंतु पुढील सारे वर्णन वाचून कुठे ना कुठे मनात प्रश्न पडतो. बाबा विवस्त्र का झाले असतील ? थोडा विचार केल्यावर काही गोष्टी लक्षात येतात -
१) लोकांच्या मनात असलेल्या बाबांविषयीच्या प्रश्नाचे बाबांना चोख उत्तर द्यायचे असेल. प्रत्यक्षदर्शी असेच लक्षात येते.
२) तसे पाहाता बाबा कुणासाठीच कोणती कृती करीत नसत. त्यांच्या मनात जे आहे तसेच ते करीत असत. लोकांच्या मनातील शंकेचे उत्तर द्यायला बाबा बांधील अजिबात नाहीत; किंबहुना बाबा कुणाच्याही दबावाखाली येऊन काहीच करीत नसत. परंतु तो काळही जरा वेगळा होता. लोकांचे विचार सध्याच्या प्रवाहाच्या मागासलेले होते. त्याला छेद देण्यासाठीच बाबांनी हे कृत्य केलेले असेल असे वाटते. समाजप्रवाहाच्या विरोधात जाऊन बाबांना काहीच करायचे नव्हते.
३) प्रत्यक्ष देवाला जातीच्या बंधनात अडकवणे हे किती निर्लज्जपणाचे आहे हेच बाबा इथे दाखवून देत आहेत. देवाला प्रश्न विचारणे म्हणजे अशाप्रकारे सगळी लाज सोडून कमरेचे सोडून वावरणारा माणूस जसा निर्लाज्जासारखा फिरत असतो तसेच आहे हेच बाबांना सुचवायचे असेल
४) बाबा जरी एक मानव बनून आले तरी त्यांना साक्षात देवाप्रमाणेच मानणारे अनेकजण आहेत. अशांना बाबांचे असे अचानक देह सोडून जाणे अनेकांना मरणप्राय यातना देतील हे बाबा जाणून आहेत. परंतु मानव म्हंटले की देह सोडून जाणे आलेच. तसेच बाबाही एक ना एक दिवस देह ठेऊन जाणारच आहेत याची लोकांना जाणीव व्हावी हीच बाबांची इच्छा असेल; म्हणूनच बाबांनी हे सारे घडवून आणले आहे.
५) बाबांनी असे सारे कपडे आगीत भिरकावणे म्हणजे दोन वर्षांनंतर ते पंचमहाभूतात विलीन होणार असल्याची सूचनाच बाबांनी भक्तांना अगोदरच दिल्यासारखे आहे.
६) हा बाबा भक्तांची पापे आणि क्लेश स्वतःवर घेतो. त्यांची आगीत होळी करतो. हे कपडे म्हणजे ह्या पापांचेच एक प्रतीक आहे.
कोट्यवधी पापांचे करी हा भंजन
ह्याचे हे सामर्थ्य रक्षी जना ...
ह्या बाबाला पापाचा भयंकर क्रोध आहे. सर्वपापप्रशमनम श्री गुरुक्षेत्रम ... ही सारी पापे हा बाबा भस्म करीत असतो. त्याचेच प्रात्यक्षिक बाबांनी करून दाखविले आहे.
इतके सारे होऊनसुद्धा बाबांनी चावडीची मिरवणूक चुकवली नाही. नेम चुकवला नाही. एवढे सारे तापलेले वातावरण बाबा शांत झाल्यावर पार निवळले आहे. क्रोधाची परिसीमा ओलांडल्यावरही पुन्हा शांत कसे व्हावे याचे प्रत्यक्ष उदाहरण बाबा सर्वांसमोर ठेवत आहेत.
शेवटी एवढेच वाटते. आपण सारे इतक्या चुका करतो तरीही हा बाबा किती आपल्याला सांभाळून घेऊन आपल्या चुका पोटात घालतो. राग मनात ठेवत नाही. पुन्हा पूर्ववत होतो. आपल्या क्रोधाची गाडी मात्र एकदा सुरू झाली की सुसाट सुटते आणि थांबायचे नाव मात्र घेत नाही. क्रोधाच्या गाडीला कसा ब्रेक लावायचा याचे सुंदर उदाहरण बाबा सर्वांनसमोर ठेवत आहेत. ह्याची प्रत्येक कृती अनेक गोष्टी सुचवत असते. त्या गोष्टी ग्रहण करता आल्या पाहिजेत. त्याचीही बुद्धी देणारा हा बाबाच !
वज्रबाहू हा ताडण करता थरथरते आकाश
शत्रूंसाठी महंकाळ हा भक्तांसाठी श्वास ...
-----------------------
बाबांनी देह ठेवणे
ह्या साईनाथांची अगदी कुठलीही कृती सतत दुसऱ्यासाठी, त्याच्या भल्यासाठीच असते हे दाखवणारी ही कथा आहे. खरेच बाबांच्या चांगुलपणाची, त्यांच्या भक्तांवरील प्रेमाची हाईटच म्हणावी लागेल. अगदी देह ठेवेपरेंत हा बाबा कायम दुसऱ्यासाठीच झिजला. त्याचेच हे एक सुंदर उदाहरण आहे.
अगदी प्रत्येकालाच आपला प्रॉब्लेम तात्काळ सुटावा अशीच मनात आस असते. त्यात शरीराचे दुखणे असेल आणि लवकर बरे होत नसेल तर त्याचा फारच त्रास होतो. सहन होत नाही. मग सतत हा बाबा आठवतो. रामचंद्र दादाना सुद्धा असाच त्रास होत होता. साईंकडे दुखण्याला कंटाळून मला आता ने अशी याचना केली. बाबाचेही आपल्या भक्ताकडे अहोरात्र लक्ष असते. त्याच्या भक्ताला होणाऱ्या यातना ह्या साईला क्लेश देतात.
मग काय, आला हा बाबा अचानक त्याच्या भक्ताला वाचवायला ! दत्त म्हणून प्रकट झाला.
ताकद मिली हिम्मत मिली
अनिरुद्ध तेरे आने से
जीने की चाहत मिली
अनिरुद्ध तेरे आने से ...
... आणि मग गंडांतर असो वा इतर काही, ह्या बाबापुढे कसे काय टिकणार ? नाही का ? हा बाबा आला आणि रामचंद्र दादांचा वनवास संपला. परंतु तेव्हाच बाबांनी एक वेगळीच गुगली टाकली. तात्या पाटलाच्या पुढे भविष्यात येणाऱ्या मृत्यूची खबर बराच काळ आधीच रामचंद्र दादांना दिली. असे आपल्या मुलाविषयी साक्षात बाबांच्या तोंडाचे उदगार ऐकल्यावर कुणाच्या मनाला स्वस्थता येणार ? त्यात बाबा बोलले म्हणजे ती गोष्ट होणारच. अर्थातच त्यांच्या जीवाला तात्या पाटलांची काळजी लागून राहिली.
आपल्या मुलाबद्दल असे ऐकून त्यांचा जीव खाली वर होत असणार. कुणाशी मनातले बोलले की मन हलके होते. म्हणूनच बाळा शिंप्याच्या कानावर त्यांनी ही गोष्ट घातली.
तात्या कोते पाटलांची काळजी घेईन असे बाबांनी वचन दिल्यामुळे तसेच त्यांची आई बायजाबाई हिच्या सेवेचे फलित ह्यामुळे बाबानी तात्यांचे मरणसुद्धा स्वतःवर घेतले !!
जन्म माझा व्यर्थ ना हो
मृत्यू लागो सार्थकी
हे बाबांनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिले ! खरेच ग्रेट ! बाबानी स्वतःच्या मृत्यूमध्येही भक्ताला जगविले, त्याला पुनर्जन्माची सुंदर भेट दिली ! कोण करणारे आपल्यासाठी एवढं !! फक्त आणि फक्त बाबाच.
एवढेच नाही तर आपल्या वचनाप्रमाणे बाबांनी देह जरी ठेवला असला तरीही ते कायम अस्तित्वात असतील याचाही पुरावा दिला. वर सांगितल्याप्रमाणे हा बाबा मानवी देहाच्या चौकटीत अडकणारा थोडीच आहे ? दासगणूंच्या लगेच स्वप्नात आले.
इथेसुद्धा रोहिल्याच्या कथेत सांगितल्याप्रमाणे गुरुभजनाचे महत्त्व बाबा जगाला सांगत आहेत. ह्या कलियुगात गुरुभजनाचे कित्ती महत्त्व आहे हे याआधीच बाबांनी सांगितले आहे. देह ठेवल्याच्या पश्चात देखील बाबा पुन्हा पुन्हा हाच उपदेश करीत आहेत. आता देहरूपाने बाबा भक्तांना आधीसारखा उपदेश करू शकणार नाहीत हे जाणून देह ठेवल्यावरही बाबा अत्यंत काळजीपोटी भक्तांचे भले व्हावे यासाठी बाबा झटत आहेत. तेव्हाही बाबा भक्तांचाच विचार करीत आहेत ! काय म्हणावे याला !
बाबांना आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे हेदेखील इथे समजते. भक्ती आणि गुरुभजनरूपी पुष्पांचा सुवासच बाबाना मोहून टाकतो.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की बाबा तुझ्यासारखा कुणीच नाही ! तुस्सी ग्रेट हो !
-----------------
लक्ष्मीबाईची कथा
लक्ष्मीबाई. नावामधेच "लक्ष्मी" आहे. लक्ष्मीमाता म्हंटली की डोळ्यासमोर येते ती शेषनागावर पहुडलेल्या भगवान विष्णूचे पादसंवाहन करताना. अगदी प्रेमाने आणि आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडावा इतक्या तल्लीनतेने लक्ष्मीमाता चरणांची सेवा करताना आपण बघतो.
परि चरणे तुझ्या हाती
नंदामाते कृपा करी ...
बापूंचे चरण आई तुझ्या हाती
काय सांगू तव प्रेमाची महती
लक्ष्मीबाई शिंदे ही तिच्या नावाप्रमाणेच सुलक्षणी होती. माता लक्ष्मीचा पादसंवाहन भक्तीचा विशेष गुण तिच्याकडे होता. साईबाबांची पादसंवाहन भक्ती म्हणजेच लक्ष्मीबाई. सेवा आणि भक्ती यांचा पूर्ण मिलाफ म्हणजेही लक्ष्मीबाई. हा बाबा अशा भक्तांसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असतो. प्रेमे वाकवी तोचि बापूराय ! बाबांनी तिच्या भक्तीप्रेमासाठी काय म्हणून नाही केले !
१) मशिदीत रात्रीच्या वेळी यायला फक्त तिघांनाच मुभा होती. लक्ष्मीबाई ही त्यापैकीच एक !
२) बाबा लक्ष्मीबाईच्या हातच्या भाकरीसाठी जेवायचे थांबत असत. ह्या प्रेमाच्या भाकरीपुढे बाकीचे जेवणही त्यांना गोड लागत नसे.
बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या भक्तीचीच भूक !
ह्या प्रेमाच्या घासासाठी हा बाबा तळमळत असे. बाकीचे अन्न त्याच्या घशाखाली उतरत नसे.
३) दुपारी बाबांना लक्ष्मीबाईच्याच हातच्या शेवया लागत आणि अगदी आवडीने आणि प्रेमाने ते त्या खात. बघा ! ज्या कृतीने आपला देव संतुष्ट होत असेल तर त्यासारखं समाधान आणि पुण्याचं काम दुसरं कोणतं असू शकेल काय !
तुम ते प्रेमु
राम के दुना !
स्वामी समर्थ महाराज म्हणतात की माझ्यावर जो चिमूटभर प्रेम करतो, त्याच्यावर आम्ही पसाभर प्रेम करतो.
४) बाबांच्या निर्वाणाच्या क्षणी त्यांना फक्त लक्ष्मीबाईंचीच आठवण झाली आणि बाबांनी त्यांना देह सोडण्याआधी नवविधा भक्तीचे दान पदरात टाकले !
लक्ष्मीबाई ही सारी भक्तीसेवा कुठलीही अपेक्षा न करता अगदी मनोभावे करत असे. बाबांच्या सेवेची संधी मिळाली यातच ती पूर्ण अंबज्ञ होती. बाबांचा शब्द झेलण्यासाठी जीवाचे रान करायची. बाबांनी मागितले रे मागितले की त्याक्षणी कामाला लागून त्यांना ती भाकरी खाऊ घालण्यासाठी जीवापलीकडे जाऊन धडपड करायची ! आणि हे सारे अगदी निरपेक्ष भावनेने करताना तिने बाबांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.
आपल्याला मात्र आपण थोडे जरी ह्या बाबांच्या सेवेत श्रम केले की आपण कुणी तरी ग्रेट आहोत असेच आपल्याला वाटू लागते. मग अहंकाराचा वारा लागतो. आपल्या अल्प सेवाश्रमांसाठीही आपले मन ह्या बाबाकडे मोबदला मागू लागते. मनातील अपेक्षा वाढू लागतात.
ह्या लक्ष्मीबाईकडून खूपच शिकण्यासारखे आहे.
- तिला अहंकार नाही.
- मी बाबांसाठी एवढं केलं पण बाबांनी मला काय दिले ? असे बोल लावले नाहीत
- मुळात तीने जे जे काही केले ते ते सारे बाबांवरच्या प्रेमाखातर केले. त्याबदल्यात कुठला मोबदला मिळण्यासाठी नाही.
- बाबांचा शब्द झेलायला तिला आवडत असे. त्याचे कणाचेही ओझे कधीच तिला वाटले नाही.
- बाबांची सेवा करणे म्हणजे कष्ट नसून आनंद आहे हाच तिचा भाव होता
अशा लक्ष्मीसाठी ह्या बाबाने त्याच्या शेवटच्या क्षणी नऊ नाणी दिली. आपण म्हणतो की अखेरच्या क्षणी "त्या"चे स्मरण असावे. इथे तर बाबांना शेवटच्या क्षणी लक्ष्मीबाईंचेच स्मरण झाले आहे ! केवढी ही मोठी गोष्ट !
आणि हा बाबा प्रत्येकाचे क्रेडिट त्याला देतोच देतो ! त्याची उचित वेळ मात्र हाच जाणतो. उभ्या आयुष्यात बाबांनी जरी लक्ष्मीला काही दिले नसले तरी शेवटच्या क्षणी अगदी आयुष्यभराचे मौल्यवान दान दिले !
हेमाडपंत गोष्टीच्या आधी लक्ष्मीबाईबद्दल आणि तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगतात. लक्ष्मीबाईंच्या प्रत्येक कृतीतून साईप्रेम अगदी ओतप्रोत भरभरून वाहताना आपण बघू शकतो.
१) लक्ष्मीबाई ह्या कधीच हुरळून गेल्या नाहीत. सेवा आणि भक्ती करतानाही त्यांची सभानता कधीच सुटली नाही.
२) साक्षात बाबांना खाऊ घालायची संधी मिळाली म्हणून त्यांनी कधीच अरेरावी केली नाही. मशिदीत त्या नेमनिर्बंध पाळूनच वागत असत.
३) बाबांच्या तोंडून शब्द निघाला रे निघाला की लग्गेच त्या कामाला लागत असत. मागचा पुढचा कुठलाच विचार त्यांनी कधीच केला नाही. बाबाना ते आपले मानत असत; आणि म्हणूनच आपोआपच ही कृती त्यांच्याहातून घडत असे.
४) बाबा हेच कायम तिच्याकरता पहिली प्रायॉरीटी आहेत
५) बाबांसाठी झिजणे यातच तिला सुख वाटत होते. म्हणूनच बाबांसाठी केलेली चटणी-भाकरी बाबानी कुत्र्याला खाऊ घातली याचा तिला राग आला. हा राग तिचे श्रम वाया गेले म्हणून नाही; तर बाबा अजून उपाशीच आहेत आणि त्यांच्यासाठी आणलेले खाणे ह्या कुत्र्याने खाल्ले म्हणून आला आहे. तिच्या प्रेमाला काय बोलावे !
पण पुढे ह्या कुत्र्यातही बाबाचा निवास आहेच हे ही समजले. हा बाबा सर्वांमध्ये आहे याचाच दाखला ही कथा देते. बाबांना प्रत्येक जीवाची तेवढीच काळजी आहे.
दीन भुकेला दिसता कोणी
घास मुखींचा मुखी घालूनी
झाडाखाली त्यांच्यासाठी
देव अंथरी निज हृदयाला ...
लक्ष्मीबाई म्हणजेच पदसंवाहन भक्तीचे उदाहरण हे तर आपण बघितले. नवविधा भक्तीबद्दलही आपण जाणून आहोत. परंतु एक प्रश्न नेहेमी पडतो. मानवाला प्रपंचात राहून नवविधा भक्तीतील नऊ च्या नऊ भक्ती करणे हे शक्यच नाही. लक्ष्मीबाईनेही ह्यातील एकच भक्ती मनापासून केली. तरीही बाबांनी तिला नवविधा भक्तीचे दान दिले !
याचाच अर्थ आपण ह्या साऱ्या भक्ती एकाच वेळी करू शकत नाही हे जाणून त्यातील किमान एक भक्ती जरी मनापासून केली, तरीही हा बाबा नऊच्या नऊ भक्तीचे पुण्य आपल्या झोळीत टाकतो ! खरेच ! हा बाबा काहीही करू शकतो !
जगावेगळा याचक आणि जगावेगळा धनी
मूठभर पोह्यासाठी दिली का सुवर्णनगरी कुणी !
0 comments:
Post a Comment