Adhyay 47 (अध्याय 47)

01:11:00 Nandan Bhalwankar 0 Comments



साईचरित्रातील साप आणि बेडूक कथेविषयी माझे विचार 


जन्म मृत्यूचा लपंडाव हा मायेचा सारा
मुक्त करा हो साईनाथा नको येरझारा 
साई नको येरझारा... धावा झणी साईनाथा  

आपल्या मानवाच्या कर्मस्वातंत्र्याची पण कामाल आहे...  काय चूक आणि काय बरोबर कळून सुद्धा हातून चुकाच घडतात आणि मग त्या साईबाबाला धावावे लागते.  कथेतील सापाच्या तोंडातून बेडकाला वाचवतो तसेच आपल्याला आपणच उत्पन्न केलेल्या या प्रारब्धरूपी सापाच्या जबड्यातून हा बाबाच वाचवू शकतो. 

सुकाराचे लेकुरे मस्त वोरडा घातिला 
चिखलाच्या नंदनवनी त्यासी आनंद जाहला  
तो हा मिळाला नरजन्म सांडू नको ऐसा व्यर्थ  

मानवाचे अंतिम उद्दिष्ट काय? तर 'त्या'च्या गोकुळात कायमचा निवास. पण या ऋण, वैर, हत्येमुळेच मानवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. सगळे पाप फेडावे लागते. अंतिम क्षणाला मन जे विचार करते त्यानुसारच पुढे जन्म मिळतो. 

मुखीचा गजर मनामध्ये जावो 
अरे सरत्या क्षणाला तूचि आठवो ..  

कथेतील दोघे जण साप आणि बेडूक झाले आहेत. पण तेव्हा हा परमात्मा सगुण साकार रूपात साई बनून आला आहे. साईबाबाने बेडकाला सापाच्या तोंडून वाचवून, त्याचे प्रारब्ध भोग आणि यातना कमी केल्या आहेत. म्हणजेच जेव्हा हा परमात्मा मानव म्हणून वावरत असतो, तेव्हाच आपण आपले भोग भोगून मोकळे होऊया. ह्याच्या कृपेमुळे ते भोग ९०% कमी होतात.      

आज आपल्याला बापू लाभला आहे, तर आपण पिपादा म्हणतात त्याप्रमाणे त्याला पुरे लुटून घेऊ. ३२ व्या  अध्यायात सांगितल्याप्रमाणे आजच्या काळातला खजिना म्हणजे बापूच. त्याचे बोट पकडून आपला उद्धार करून घेऊया. साधनाताई, मीनावैनी यांनी हा जन्म मृत्यूचा फेरा केव्हाच पार केला. आपणच अजून कथेतील साप आणि बेडूक होऊन फिरत आहोत. 

आपण स्वात:ला जेवढे ओळखत नाही तेवढा हा साईबाबा आपल्याला ओळखत असतो. हाच जन्म काय, तर आधीचे आपले कित्येक जन्म याला पाठ असतात. या दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी केवळ हाच मार्ग दाखवू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला या दुष्टचक्रातून बाहेरही काढू शकतो. 

बापू प्रवचनातून सारखा सांगत असतो. पण पालथ्या घड्यावर पाणी असते. बापू नर्मदेचे गोटे म्हणतो ते उगाच नाही. पण आपण आपल्याच वाईट कर्मामुळे साप झालो, बेडूक झालो किंवा अजून काही जरी झालो, तरी हा बापू आपल्याला तारून नेणारच आहे. त्याचीच ग्वाही आहे - मी तुला कधीच टाकणार नाही.

असो पाप किती किंवा पुण्य गाठी
 त्याची नाही गणना हो त्याला 
ऐकोनि पाझरे त्याचे अंतरंग
प्रेमे साद तयासी हो घाला 

मग कसा तो कुठूनही 
येईलच तो अवचित 
वासरांसाठी प्रेमे जशी 
धेनु येई हो हंबरीत 

0 comments: