अध्याय ४८ (Adhyay 48)

04:47:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

सपटणेकर कथा 


बाबांनी त्यांच्याजवळ ओढलेल्या अनेक "चिड्या" आपण बघितल्या. सपटणेकरसुद्धा त्यापैकीच एक आहेत. शेवंड्यांची घडलेली गोष्ट ही सपटणेकरांसाठी नाथसंविधच आहे. माणसाला जेव्हा कशाचीच कमी नसते ना तेव्हा तो आपोआपच निगरगट्ट होतो. मानवी प्रवृत्तीच असते ती. त्यात व्यवसायाने तो जर वकील असेल तर काही बघायलाच नको. प्रत्येक बाबतीत शंका, खोट काढणे आणि स्वतःचेच मत योग्य आहे अशीच भावना हळूहळू बळकावायला लागते. मग त्यात जर साईबाबाच्या चमत्काराविषयी ऐकले तर काही बघायलाच नको. "हे कसे शक्य नाही" हीच गोष्ट असे वकील समोरच्यास पटवून द्यायला एका पायावर तयार असतात. आपल्या कथेतील सपटणेकरही असेच काहीसे. 

सगळी परिस्थिती आपल्या favour मध्ये असेपरेन्त ठीक आहे; पण एकदा का संकटे यायला लागली की भल्या भल्यांचा धीर खचतो. सगळी हुशारी क्षणार्धात नाहीशी होते. मग मात्र हा बाबा आठवतो. 

सपटणेकरांना पुत्रशोकाचे दुःख सहन करावे लागले. आपल्या जिवंतपणी पोटच्या पोराचा मृत्यू पाहण्याइतके दुर्दैव नाही. सहाजिकच मन:स्थिती ठीक नसते. लग्गेच देवाला बोल लावून आपण मोकळे होतो. आपल्या आयुष्यात जे जे म्हणून वाईट घडते ते ते सगळे हा बाबा करतो; परंतु चांगल्या गोष्टींचे सारे क्रेडिट आपण आपल्याकडे घेतो. ही सुद्धा मानवी प्रवृत्तीच. 

परंतु ह्या सगळ्यात सपटणेकरांच्या पत्नीचे विशेष कौतुक करायलाच हवे ! एक मातेला पुत्रशोक, त्याच्या मृत्यूची बातमी मिळूनदेखील तिने बाबांना बोल लावलेले नाहीत. म्हणूनच तिच्या विश्वासाखातर आणि प्रेमाखातर पुढे बाबांनी तिच्या स्वप्नात येऊन तिची रिकामी घागर रूपी पुत्रशोकाची पोकळी पाणीरूपी पुत्रलाभाने भरली. पुढे तर तिला एकूण ९ मुले झाली ! भगवान देता है तो छप्पर फाडके देता है ! आणि याच कारणासाठी बाबांनी सपटणेकराना "चल हट" असे संबोधले. 

आपण आपल्या लहानपणी "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" ही म्हण ऐकलेलीच आहे. बाबांनी "चल हट" म्हंटले नसते तर सपटणेकराना आपली चूक कशी कळली असती ? हा बाबा कधीच कुणालाच दुःख देत नाही, कुणाचेच कुठल्याही प्रकारे नुकसान करीत नाही; किंबहुना आपल्या आयुष्यात जो जो म्हणून आनंद येतो तो आनंद म्हणजेच हा बाबा हीच शिकवण सपटणेकराना मिळाली. 

ह्या ३ वेळा "चल हट" मुळे बाबांनी सपटणेकराच्या मनाची, कुतर्क विचारांची आणि संशयाची चांगलीच धुलाई केली आहे. हेच ते त्रिविक्रमाचे त्रिविध कार्य. आपल्या जीवनात पडलेली त्रिविक्रमाची ३ पावले. हा बाबा आपल्याला रागावतो यामध्येच आपले भले असते. आपण ज्याप्रमाणे केवळ "आपल्या" माणसांना हक्काने त्यांची प्रगती व्हावी म्हणून रागावतो, ओरडतो अगदी तसेच बाबा सपटणेकरना धिक्कारत आहेत. हे धिक्कारणे, हा शाब्दिक सपटणेकरना नसून त्यांच्या वृत्तीला आहे... त्यांची प्रगती व्हावी याकरताच आहे. 

काही रोग असे असतात की जे औषधाच्या एका मात्रेत ऐकत नाहीत, बरे होत नाहीत. अशांना अनेक डोस द्यावेच लागतात. सपटणेकरांचा रोगही असाच आहे. त्याला म्हणूनच ३ वेळा "चल हट" चा डोस द्यावा लागला, तेव्हा कुठे तो बरा झाला. साप चावल्यावर माधवरावाना जसा बाबांनी शाबरी मंत्र उच्चारलेला (चल नीघ जा खाली उत्तर) तसेच आहे. तेव्हा माधवरावांनी मशिदीची पायरी सोडली नाही. पण सपटणेकर बाबा नक्की कशाला धिक्कारत आहेत हे समजूच शकले नाही. म्हणूनच ते शिरडी सोडून पुन्हा आपल्या मुक्कामी गेले. दत्त आणि साई यांच्यात काहीच फरक नाही. परंतु बहुतेक दत्त महाराजांची हीच इच्छा असेल की वाट हरवलेल्या सपटणेकरना योग्य मार्ग मिळावा; म्हणूनच ते गाणगापूरला यात्रेसाठी गेल्यावर मन अजूनच भडकले.   

डॉ केशव नार्सिकरानी या "चल हट" विषयी प्रॅक्टिकल मध्ये छान मार्गदर्शन केले आहे. ते जरूर वाचावे. 

हा बाबाच मनसामार्थ्यदाता असल्यामुळे हरवलेली मन:शांती ही केवळ तोच प्रदान करू शकतो. पण हे आपण माहीत असूनही इथे तिथे भटकतो. मग त्या बाबालाच आपल्याकडे धाव घ्यावी लागते. म्हणूनच हा बाबा स्वप्नात आला आणि ते स्वप्न नुसते स्वप्न नसून तो प्रत्यक्षात आला होता हे ही सपटणेकर दांपत्याला बाबाने पटवून दिले. हा बाबा सर्वांचे सारे काही जाणून आहे याचेही दाखले त्यांना मिळाले. आणि नुसते इतकेच नाही, तर पुत्रशोकाचे दुःख ह्या बाबाने कायमचे मिटवले. 

पिपा म्हणे माझ्या रानी 
ह्याने फुलविला मळा... 
 
पुढे बाबांना विश्वास आणि अनन्यतेचे दोन रुपये दिल्यानंतर सपटणेकराचे जीवन फळफळलें. संसारवेलीला विविध फुले बहरली. सपटणेकरानीही कृतज्ञतेने मुलाला घेऊन बाबांचे पुन्हा दर्शन घेतले.   

या कथेमध्ये महत्तवाची गोष्ट म्हणजे सपटणेकर न मागताही बाबा त्यांना मुलगा देतात. म्हणजेच सद्गुरूचे आपल्यावर लक्ष असतेच. आपण काही न मागताही हा योग्य वेळ आल्यावर आपल्याला ती गोष्ट पुरवतोच ! पुरविणे ह्याचा गुण !

नितांत मधुरा याची वाणी 
कधीही न जाई वाया 
अमुचा एकची जीवनत्राता ... 

तर्क कुतर्का दूर सारा 
पिपा जाणतो हाच निवारा 
तारक हा आम्हा .. 






 

  




   






    








  

























 



 




     

0 comments: