अध्याय ४९ (Adhyay 49)

04:48:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.   


हरी कानोबा 


जया मनी जैसा भाव 
त्या तैसा अनुभव ... 

ह्या बाबाकडे हवशे नवशे गवशे सारेच येत असत. याआधी अनेकदा सांगितल्याप्रमाणे एक मानवरूपात परमात्मा कसा काय येऊ शकतो ? हे शक्य आहे काय ? असेच प्रश्न प्रत्येकाला पडतात. एका हाडामांसाच्या आपल्यासारख्याच असणाऱ्या मानवी शरीरामध्ये परमेश्वर बघणे कुणालाच लगेच पचत नाही. देहाभिमान असल्यामुळेच असे प्रश्न पडतात. मग लगेचच आपण एखाद्या पोलिसाप्रमाणे "ह्याचा बुरखा फाडायचाच" असा मनात विचार पक्का करून बाह्या सरसावून ह्या बाबाकडे येतो. आणि मग जे होते ते कथेत आपण वाचतोच. आपल्या अहंकाराचाच हा बाबा बुरखा फाडतो आणि आपल्याला योग्य मार्गाला लावतो. 

डॉ विभूतेंनी याविषयी खरोखर सुरेख डायग्राम काढला आहे. तो जरूर बघावा - 

खरे पाहता आपण प्रत्येक जण स्वतःला ग्रेट समजत असतो. केवळ मलाच सारे कळते असेच आतून प्रत्येकालाच वाटत असते. म्हणूनच जो ह्या विश्वाचा राजा आहे अशा साईकडे येताना डोक्यावर जरीरूपी अहंकाराचा फेटा आणि पायात आत्मस्तुतीरूपी वहाणा परिधान करून मोठ्या ऐटीत आपण येतो. पण या साईकडे या दोन्हीगोष्टी कशा बरे टिकू शकतील ? नाही का ? हरी कानोबाच्या वहाणाच हरवल्या आणि त्या परत मिळवण्याच्या नादात त्यांच्या डोक्यावरचा फेटा त्यांना उतरवायलाच लागला. 

प्रत्येकाच्या मनात लोकांनी माझी वाहावा करावी असेच असते. कुठल्याही मंदिरात जाताना आपण डोक्यावर फेटा किंवा महागड्या चपला थोड्याच घालून जातो ? पण हरी कान्होबा तसे घालून गेले. म्हणजेच त्यांच्या मनात भक्तांचे लक्ष माझ्या नव्या कोऱ्या चपलांकडे जावे, भरजरी जरीच्या फेट्याकडे जावे असेच होते. अशा ठिकाणी आपण साईनाथांच्या दर्शनाला, त्याचे गुणसंकीर्तन करायला जातो. स्वतःचे नाही. पण हरी कानोबा ते समजूच शकले नाही. 

देवाच्या दरबारी आत्मस्तुतीरूपी चपला चोरीलाच जातात. तसेच देहाभिमानरूपी फेट्याचे ओझेच वाटते. ह्या बाबाला सर्वच समान. श्रीमंताला वेगळी वागणूक असे बाबांनी कधीच केले नाही. तसेच आपल्याकडे किती भरजरी फेटा आहे यामुळे बाबा इम्प्रेस होणे हे तर अजिबातच होणार नाही हे हरीने जाणले पाहिजे होते. 

हरी कानोबाच्या मनात अंबज्ञता नव्हतीच; उलट तो साईनाथांचीच परीक्षा घ्यायला आलेला आणि साईनाथांनीच त्याची परीक्षा घेतली. साक्षात बाबा समोर असतानाही त्याचे सारे लक्ष त्या नव्या चपलांकडेच लागून राहिले आहे. समोर ब्रह्माण्डाचा स्वामी बसलेला असताना मन मात्र शुल्लक चपलांमध्ये गुंतून राहिले आहे. साईंपुढे कसल्या वहाणा आणि काय ! 

गर्व अहंकार सोडा हो तुम्ही 
विठ्ठल सोयरा जोडा ... 

मनातली चिंता मानवाला अशीच पोखरते. देहाभिमान बाळगला की नको त्या ओझ्यामुळे असाच त्रास होतो. मग ह्या बाबालाच धावून यावे लागते. ह्या बाबाला माहीत नाही असे काहीच नाही. हरी कानोबा कशाला आला आहे हे बाबा पुरेपूर ओळखून आहेत. आपण पहिल्यांदीच बाबांकडे येऊनही बाबांचे "हरी का बेटा" (हरी का = कानोबा) हे ऐकून आणि बाबांनी परत मिळवून दिलेल्या त्या चपला बघून हरी मनात चमकलाच ! बाबांनी सुंदर अनुभव दिला.  
  
शेवटी एवढेच वाटते. ह्या बाबापुढे सारा मान-मरातब, पैसा-अडका वैगरे शुल्लकच आहे. मिळवायचेच असेल तर ह्या बाबालाच मिळवूया. धनाची देवताच ह्याची अर्धांगींनी असताना हा काय कुणाला भुलणार ! 

ह्या साईकडे येऊन वहाण शोधण्यापेक्षा आपणच साईची वहाण होण्यासारखे दुसरे सुख नाही ! कारण तेच नरजन्माचे उद्दिष्ट आहे.     

पिसाला कचरा ब्रह्माण्ड 
माझा आनंद अनिरुद्ध .. 




------------------------




सोमदेव स्वामीची कथा  



हरी कानोबासारखेच स्वामी सोमदेव. बाबांचे परीक्षण करायला आलेले. साईनाथ सुद्धा शेरास सव्वाशेर ! समोरच्यालाच असा काही मार्मिक अनुभव देत की तो गारच पडावा ! बाबांकडे येण्याआधी मनात अशीच कुतर्कांची जाळी असते. साईनाथ आपल्या शाब्दिक झाडूने ते पार साफ करतात. मग सारे स्वच्छ दिसू लागते. 

प्रथम पाहिले तुला आकर्ण नयन फाकले 
रोखून तू पाहता सर्व भान हरपले 

सोमदेव स्वामींच्या गुरूंनी त्यांना सांगितलेली खूण - "जेथे मन पूर्ण रंगले तेच आपले स्थान" ही स्वामींना साईनाथांकडे बघून पटली आणि ते कृतकृत्य झाले ! 

ह्या साईनाथाविषयी आपल्या कानावर आलेले गुणसंकीर्तन, अनुभव, उद्गार ही सारी बाबांचीच लीला असते. परंतु आपण बाबांना पूर्णपणे जाणून न घेताच आपले मत बनवून मोकळे होतो आणि बाबाकडे जाण्याच्या दिशेला विन्मुख होतो. सोमदेव स्वामी देखील मशिदीची नुसती निशाणे बघून गोंधळून मनात ग्रह करून बसले. पण बाबाना त्यांना स्वतःकडे खेचायचेच होते. म्हणूनच इतर भक्तांनी बाबांच्या इतक्या जवळ येऊन परत फिरू नका असा कळकळीचा सल्ला दिला. 

परमेश्वर प्राप्तीचे दोन मार्ग आहेत. भक्ती आणि ज्ञान. बघायला गेले तर सोमदेवाना "स्वामी" ही मानाची पदवी आधीच मिळालेली होती. म्हणजेच ते नक्कीच ज्ञानमार्गात पुढे गेलेले असणार. साईनाथांचा भक्तिमार्ग हा सर्वसामान्यांसाठी होता. म्हणजेच सोमदेव स्वामीना भक्तिमार्गही कळावा याकरताच बाबांनी ही लीला केली असू शकते. 

मोगऱ्याचा गंध 
दुरुनी न कळे 
परि येता जवळी
न कळे दुसरे .. 
  
ह्या बाबाकडे कुणी कशासाठीही येवो, बाबा त्याला उचित मार्गावरच आणून सोडत असे. त्यांचे कल्याणच करीत असत. हरी कानोबा, हे स्वामी ही सारी अशीच उदाहरणे आहेत. पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन ह्या साईचरित्रातील प्रत्येक कथेत दिसते.  

शेवटी एवढेच वाटते. ज्याप्रमाणे नदी नागमोडी वळणे घेत शेवटी सागराला जाऊन मिळते, अगदी तसेच स्वामी सोमदेव साईनाथाकडे जाऊन पोचले. अजून एक चिडी. मग नदीला कुठचे अस्तित्व राहाते ? ती तर समुद्राचाच एक भाग बनलेली असते ...  

आमचा आत्मा तुझाचि अंश 
तू अससी पूर्ण 
मनास लावी रंग तुझा रे 
तू श्यामलवर्ण ...    
















 






 










 










  

0 comments: