Adhyay 5 (अध्याय ५)

05:58:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

----      

चांद पाटील ची कथा 


इस बगिया का हर फूल खिला 
अनिरुद्ध तेरे आने से .....   

अध्याय ४ पासून आपण साईनाथ आपल्या जीवनात प्रकटणे म्हणजे काय हे आपण बघितलेच. ह्याच्या केवळ आपल्या आयुष्यात येण्याने सगळे जीवन सुंदर होते, त्याला उचित दिशा मिळते.. हे आपण प्रत्येकानेच अनुभवले आहे. 

आपणही कधी ना कधी या कथेतील 'चांद पाटील'च होतो. आयुष्याची गाडी रुळावरून घसरली होती. जीवनाची घडी विस्कटली होती. हताश व्हायला झालेले ....  आनंदरूपी घोडी कुठेतरी आपल्याच प्रारब्धामुळे हरवली होती...  आणि अशाच वेळी चांद पाटीलांच्या आयुष्यात आल्याप्रमाणेच हा बापूसाई आपल्या जीवनात आला ... आणि आपल्याला जवळ ओढले ते आपला उद्धार करण्यासाठी ....  

पिपा लोळत होता मळी 
त्यासी उद्धरिले झणी...  

प्रत्येकालाच आयुष्यात शेवटी काय हवं असतं ? तर सुख आणि आनंद, जो शांती आणि समाधान देतो. पण आयुष्य अनंत अडचणींनी ग्रासलेले असते... केवळ हा बापूच आपल्या जीवनातील वाळवंटाचे नंदनवनात रुपांतर करू शकतो... बाकी कुणीही नाही.    


आता कथेतील काही गोष्टींची नोंद घेऊया. 

१) आंब्याच्या झाडाखाली बसलेले साई :

साई हेच माधुर्य आहे, हाच जीवनात सुख आणि आंनदाचा गोडवा भरू शकतो. त्यांच्या अंगातील कफनीरूपी आल्हादिनी आणि सटकारूपी शेष सदैव सोबत आणि एकत्रच कार्य करतात. 

२) साई हीच प्रारब्धरूपी उन्हातली सावली. 

३) चांद पाटीलने तंतोतंत आज्ञापालन केले. इतके दिवस न सापडणारी घोडी त्या नाल्यात कुठे मिळणार वैगरे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. वास्तविक पाहाता त्यावेळी साई हे एक सद्गुरू म्हणून नावारूपाला आले नव्हते. तरीही चांद पाटील त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतात. 

शब्द तुझे जरी दुरून ऐकले 
नशीब आमुचे तरी फळफळले 
भिऊ कशाला मागू कुणाला 
तारक हा आम्हा ... 
४) ह्या साईनाथाची पंचमहाभूतांवरही सत्ता आहे. दिसताना जरी हा एक चमत्कार दिसला तरी ही साईप्रेमाची जादूच आहे, लीला आहे, जिच्यामुळे साईंनी चांद पाटलाचे प्रारब्ध नष्ट केले आणि जीवनात सुख शिंपले.     

५) ही कथा म्हणजेच साईनाथांचा शिरडीतला प्रवेश... साईनाथांचा कार्यारंभ !        

शेवटी एवढेच मला समजले... की हाच आपल्या आयुष्यातला आनंद. बापूनी भक्तीभाव चैतन्य कार्यक्रमात आनंद catch करायला सांगितला आहे.. ह्या बापूलाच आपण पकडूया... ह्याचे आपल्या आयुष्यातले पाऊलच आनंद घेऊन येते. कारण हाच आनंदाचा महासागर आहे...      

विश्वावरचे पाऊल तुझे 
चालतचि राही सतत 
जिथे ते पडेल तिथे 
आनंदवन फुलवत ... 

... आणि ह्याचे पाऊल आपल्या मनोभूमीवर पडले की ती आपोआप शिरडी झालीच.... मग तिथे  हा त्याचे गहूदळणरूपी कार्य आणि लीला आरंभीतो. हेच त्या महाविष्णूचे सुदर्शनचक्र !

आता कसली भीती कशाची 
चक्र सुदर्शन फिरते रे .... 




----------------------------------------



वामन तात्या - मातीच्या घड्यांची कथा 


याविषयी पंचशील च्या प्रॅक्टिकल बुक मध्ये चांगले explanation दिले आहे, ते जरूर वाचावे. 

हा साईनाथच केवळ आपल्या वाळवंटामध्ये नंदनवन फुलवू शकतो. बाकी कुणामध्येही ही ताकद नाही. आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि आकार देऊ शकतो. 

अशी ही उखऱ्या जागी (मनात) बाग फुलवायला (त्याला सामर्थ्यवान कारायला) हा साईनाथ स्वतः झटत असतो. केवळ आपले जीवन सुंदर आणि आंनदी करणे हा एकच साईनाथाचा छंद आहे.

जन्म माझा व्यर्थ जाणे 
हा तुझा अपमान ... 


ह्या साईनाथाला कच्चा घडाच लागे. ह्या साईनाथाला पाप्याची नाही तर पापाची घृणा आहे. ह्या कलियुगात जन्म घेतलेला प्रत्येक जण 'पानी कम' आहे. प्रारब्धाचे पुष्कळ ओझे जवळ बाळगून आहे. त्यामुळे गांजलेला आहे. या कथेत नमूद केलेले कच्चे घडे ते आपणच. अशानाच हा जवळ घेतो आणि त्यांचा उद्धार करतो. मदतीचा हात देतो. 

हा केवळ साईनाथच मोक्ष प्रदान करू शकतो. बाकी कुणीही नाही. म्हणूनच कथेमध्ये 'घडे जागच्या जागी फुटून जात' असा उल्लेख केला आहे. घडे फुटून जाणे हा मोक्षच. 


----------------------------------------



भाई - स्वामी समर्थ पादुका कथा 


साई चरित्रामध्ये दृष्टांताच्या अनेक कथा आहेत. ही त्यातलीच एक. इथे तर साक्षात स्वामी समर्थ स्वतः सांगत आहेत की शिरडीत राहणारा साई हा मीच. खरेच वाचून अंगावर काटा आला. Direct स्वामींनी खूण दिली. 

भाई खरेच भाग्यवंतच म्हणावे लागतील. आपल्या सद्गुरुंठायी पूर्ण निष्ठा असल्याखेरीज हे शक्य नाही. म्हणूनच स्वामी समर्थांनी स्वतः आपल्याच सध्याच्या युगातील सगुण साकार रूपाकडे भाईना खेचून घेतलेले आहे. भाईंचे आज्ञापालनही छान. साई हाच स्वामी आहे हे जाणून आहेत. साईमध्ये स्वामी समर्थाना बघतात. ग्रेट. 

         

      ----------------------------------------


कुस्तीच्या कथा



परमात्म्याला एका मानवी रूपात बघणे हे बऱ्याच जणांना पचत नाही. एक माणसाच्या रूपात देव असू शकतो ? मन मानायला लगेच तयार होत नाही. म्हणूनच हेमाडपंत साईनाथ कुठून आले, कसे प्रकटले याविषयी ४ थ्या अध्यायात सांगतात. मग साईनाथांचा हाच वेष का ? हा ही प्रश्न चिकित्सक लोकांच्या मनात येऊ शकतो....  आणि म्हणूनच ५ व्या अध्यायात ही कुस्तीची कथा येते, ज्यामुळे साईनाथांनी तो वेष धारण केला. 

वास्तविक पाहाता साईनाथांचा ह्या कुस्तीशी संबंधच काय ? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण ह्या परमात्म्याच्या अगदी छोट्यातल्या छोट्या कृतीमधेही खूप मोठा अर्थ दडलेला असतो. हे आपल्यासारख्या सामान्य मानवाला समजूच शकणार नाही. आपण साईनाथाला स्मरून हे जाणून घ्यायचा त्याच्याच कृपेने प्रयास करू. 


१) ह्या साईनाथाची ज्याच्याशी लढाई जुंपली आहे, तो टिकू शकेल काय ? ह्या साईनाथापुढे कुणीच जिंकू शकले नाही आणि यापुढे शकणारही नाही. (ह्याच्या आईचे - आपल्या मोठ्या आईचे नावच मुली 'जयंती' आहे ... शेवटी तिचाच विजय होणार !)

इथे एक बल च्या क्लास चे मी ऐकलेलं उदाहरण द्यावेसे वाटते. रससीखेच खेळात समोर १०० बल क्लासचे विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला बापू एकटे. तरीही बापूंना तसूभरही हलवू शकले नाहीत.            

पण मग कुणी म्हणेल की आपण ज्याला साईनाथ मोहीददीन पुढे हरलेच कसे ? इथे आपल्याला एक गोष्ट पक्की माहिती हवी. ह्या साईनाथाचे मोहीददीन पुढे हरण्याची लीला म्हणजे त्यांचे खरे जिंकणेच आहे. कसे ? 

- बाबांना कफनी घालायची होती, म्हणूनच ते कुस्तीत हरले, जेणेकरून ते  पेहेलवानाचा वेष त्यागू शकतील, आणि कफनी परीधान करू शकतील.     


- सदा आपली जीत झालीच पाहिजे असा अहंकारी अट्टाहास मानवासाठी चांगला नाही हे ही त्यांनी कुस्तीत हरून दाखवून दिले 


२) साईनाथांना वाटले असते तर त्या मोहददीनला हरवायला त्यांना वेळ नसता लागला. साईनाथांना काय अशक्य आहे ? वर सांगितलेल्या बापूंच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते. तसेच बाबा पटाईत पेहेलवान आहेत हे ही कथेत नमूद केलेलंच आहे. परंतु हा साईनाथ जेव्हा मानवी रूपात येतो, तेव्हा तो सगळ्या मर्यादा पाळतोच. मानवाला जिंकणे / हरणे हे आलेच. किंबहुना हेच बाबांना दाखवायचे असेल.  

रामानेही सीतेला शोधण्यासाठी कुठलीही अमानवी शक्ती वापरली नाही. त्याला काय ते शक्य नव्हते ? परंतु त्याने तसे केले नाही. साईनाथांनीही उगाचच प्रत्येक ठिकाणी विजय प्राप्त व्हावा म्हणून कुठलीही दैवी शक्ती वापरली नाही.     


३) मोहिददीन हा एक पटाईत पेहेलवान आहे, म्हणून त्याच्या मेहेनतीलाही साईनाथांनी उचित फळ देऊन त्याचा सन्मानच केला आहे. खरेच ग्रेट ! 

४) गंगागीराचाही या कुस्ती खेळाद्वारे बाबांनी उद्धार केला आहे. ही सुद्धा बाबांची लीलाच. हा ही कुस्ती खेळण्यामागचा बाबांचा हेतू असू शकतो. ह्याची लीला खरोखर अगाध ! 

५) आपल्यापैकी कुणालाही पडती बाजू घ्यायची सवयच नसते. मी म्हणेन तेच खरे, सदा माझाच विजय व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा असते. मी देखील त्यातलाच.  

या कथेमध्ये साईना, जो ब्रह्माण्डाचा स्वामी आहे, त्यांनी सुद्धा लघुरूप घेतलेले आपण पाहतो. 

असे हे लघुरूप घ्यायलाच आपण शिकायला हवे. काहीजण तर लघुरू घ्यायचे नुसते नाटक / दिखावा करतात. मनात तर स्वतः चे विशाल रूपच असते. त्याचा काहीच फायदा नाही. साईनाथांनी सांगितली तशी मनापासूनची लघुरुपता आणि साधेपण आपण घ्यायला हवे. 

फुकटची महानता हे unnecessary ओझेच आहे. असे तात्पुरते फुकाचे महत्त्व आणि खोटी वाहवा काहीच कामाचे नाही. असे हे क्षणिक सुख पुढे त्रासदायकच ठरते. 

निलाजरेपण कटीस नेसले 
निसुगपणाचा शेला 
आत्मस्तुतीचे कुंडल कानी 
गर्व जडविला भाळा 
उपभोगांच्या शतकामनांची 
कंठी घातली माना 
थकले रे नंदलाला ... 

साईनाथानी सांगीतलेली 'गरीबी' म्हणजे साधेपणा आणि लघुरुपताच. तोच अंगीकारला पाहिजे....     
  

साईनाथांनी शेवटी मोलाचा उपदेश दिला आहे .... "देवासोबत क्रीडा करून शरीर झिजवले पाहिजे..." याचा अर्थ काय ? ही क्रीडा कसली आहे ? तर साईनामाच्या प्रेमाची क्रीडा. ह्याच्या नामात रंगून जाऊन, ह्याच्या सेवेत शरीर झिजवून या नरजन्माची सार्थकता साधा; असेच बहुधा साईनाथ सांगू इच्छित आहेत असे वाटते.        

हा साईनाथ लीलाधर आहे. आणि ह्या लीला समजणे हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आपण फक्त ह्याच्यावर प्रेम करीत राहूया. म्हणजे आपला उद्धार झालाच म्हणून समजा ...   

किती वर्णू ह्याच्या लीला 
साऱ्या जगता ह्या व्यापीला 
सुख शांती देण्या आला 
माझा अनिरुद्ध .. 


----------------------------------------


डेंगळ्यांची पुत्रप्राप्तीची कथा

रतनजी पारशी यांच्या कथेमध्ये या कथेचा रेफ्रेन्स देता येऊ शकेल. आपल्याला पुत्रप्राप्ती , संतान असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हा साईनाथ सगळ्याचाच मुख्य स्रोत आहे. हा काही प्रदान करू शकत नाही असे ह्या जगात काहीच नाही. अशक्याचे शक्य करणारा केवळ हाच.   




----------------------------------------


साईनाथांनी पाण्याने दिवे पेटवले ... 


वैनी म्हणे डोळा राही 
इतुका लहान 
विश्व व्यापूनिया उरे 
इतुका महान ... 

खरे पाहाता या साईनाथाला आपण नीट ओळखलेच नाही. आपण स्वतः मधेच एवढे गुरफटून गेलेलो असतो की आपल्या समोर हा परमात्मा, ब्रह्माडाचा स्वामी आहे, हेच आपण विसरतो.... नकळतच शिरडीतले तेली वाणी होतो. दिसायला जरी हा 'लहान' असला, तरी तो कोण आहे, याचे सदैव भान आपण ठेवायला हवे. म्हणजे वाण्यांनी जशी चूक केली तशी आपण करणार नाही. 

i) इथे हे हा साईनाथ केवळ आपल्यासाठी 'लहान' झाला आहे. आपल्याला त्याचे निर्गुण रूप बघणे शक्य नाही आणि झेपणारही नाही, हे त्याला माहिती आहे. आणि म्हणूनच तो आपल्यासाठी, आपल्यावरच्या त्याच्या प्रेमामुळे 'लहान' होतो... हा त्याचा 'मोठेपणा' ..!! 

ii) हा साईनाथ आपल्याला 'लहान' दिसतो म्हणजे वास्तविक तो लहान आहे म्हणून नाही; तर आपली दृष्टी त्याचे विराट स्वरूप पाहू शकत नाही म्हणूनच. इथे आपली दृष्टी मर्यादित आहे, संकुचित आहे. पण तो अमर्याद आहे. हे आपण जाणून घ्यायला हवे. 

या कथेतील तेली वाणी साईनाथाला असे 'लहान'च समजले, आणि म्हणूनच साईनाथांनी त्यांच्या दिवे लावण्याच्या पवित्र कार्यात तेल देण्याची एवढी महान सेवा देऊनही चक्क साईनाथांचीच परीक्षा बघायला गेले....  

हा साईनाथ स्वत:च मूर्तिमंत तेज, प्रकाश. हाच आपल्या संकाटांच्या आणि दुख्खाच्या काळ्याकुट्ट अंधाराला त्याच्याकडील प्रकाशाने मिटवतो. हाच स्वयंप्रकाशी, स्वयंतेज आपले आयुष्य आनंदाने आणि सुखाने भरून टाकतो. हेच त्याचे कार्य आहे. 
... आणि अशा पवित्र कार्यात तो आपल्याला सेवेची संधी प्रदान करतो, ते ही आपलेच प्रारब्ध जाळण्यासाठी. परंतु हे सुद्धा आपल्याला समजत नाही... आणि म्हणूनच आपण कथेतील तेली वाण्यांनी केली तशी चूक करून बसतो. 

ह्या कथेतून काही गोष्टी शिकायला मिळाल्या - 

१) ह्या साईनाथांनी जो संकल्प केला तो पूर्णत्वास जातोच. ह्याचा संकल्प म्हणजेच त्या जागदंबेची / मोठया आईची इच्छा. ती अपूर्ण राहिलच कशी ? 

२) ह्या साईनाथाना त्याचे कार्य करायला कुणाचीही गरज लागत नाही. त्याने हाती घेतलेले कार्य पुढे सफल होणारच ही काळ्या दगडावरची रेघ. 

३) भौतिक दिसताना जरी ह्याचे कार्य / संकल्प छोटे दिसत असले, तरी त्याने कुठे काय होईल / काय होत असेल हे तोच जाणे. हे नुसते दिवे लावणे नाही, तर ह्यामुळे हा साई कित्येक जणांच्या आयुष्यात प्रकाश आणत असेल किंवा कुणाचे प्रारब्ध जाळत असेल हे तो साईच जाणे ! 

४) आपण 'क्षुद्र' मानवांनी त्याच्या कार्यात आड येण्याचा अगदी कितीही प्रयत्न केला, तरी हा "ठगास महाठग" आहे. हा सगळ्यांना बरोब्बर ओळखून असतो. मुळात आपली ताकद आणि बुद्धी ती किती ! आपण काय ह्याचे कार्य अडवणार आणि अडवू शकणार ! 

तू ठकाचा रे ठकू 
तू चोरांचाही ही चोरू     

अगदी अख्खे जग जरी लाबाडीने ह्याच्या विरोधात गेले, अगदी ह्याच्याविरोधात कितीही कट-कारस्थाने केली, तरीदेखील ती ह्याच्यापुढे शुल्लकच !      

५) ह्याची पंचमहाभूतांवरही सत्ता आहे. म्हणूनच पाण्याने दिवे पेटवले. विज्ञानाच्या सगळ्या नियमांना छेद देऊन साईंनी शेवटी त्यांना हवे ते केलेच ! ते ही अर्थात या विश्वाच्या भल्याकरताच ! ग्रेट !

६) ह्याच्या केवळ इच्छेने पाण्यानेही स्वतःचा गुणधर्म बदलला आणि ते तेलाचे कार्य करू लागले. म्हणजेच ही ताकद पाण्याची नाही, तर साईंच्या इच्छेची आहे. निर्जीव गोष्टींनाही याचे ऐकावेच लागते. म्हणूनच हा अरुंद फळीवर झोपू शकतो. 

रामाच्या इच्छेने समुद्राच्या पाण्यावरही पाषाण तरंगले. एवढेच नाही, तर चक्क अख्खी वानरसेना त्यावरून लंकेत जाऊ शकली. इथे पाण्यानेही स्वतःचा गुणधर्म विसरून रामाला सहाय्य केले. किंबहुना पाण्याला रामाच्या शब्दाला मान देऊन त्यास सहाय्य करावेच लागले. हीच ती परमात्म्याच्या इच्छेची ताकद. 

केवळ एवढेच नाही, तर रात्रभर हे पाण्याचे दिवे जळत राहिले. ह्या साईनाथाला काय अशक्य ! पण ही काही जादू नाही. वाण्यांना योग्य शिकवण मिळावी आणि ह्या साईनाथाला आता तरी ओळखावे आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करून घ्यावा हीच साईनाथांची पवित्र इच्छा होती ...    

७) हा पाप्यातल्या पापी माणसालाही वारंवार सुधारण्याची संधी देतच राहतो. अगदी महिषासुरालाही याने संधी दिलीच.                       

वैनी सांगते अनुभवे 
बापू पुरता दयाळू  पापियासी ना न म्हणे 
शिक्षेलाही हा मवाळू ...      

हा स्वत:च मूर्तीमंत क्षमा आहे. हा स्वत:च प्रेमस्वरूप आहे. आणि म्हणूनच हा unique आहे. 

तुझ्यासारखा तूच देवा ... 
       
म्हणूनच शिरडीतले वाणी असे वाईट वागूनही हा साईनाथ त्यांच्यावर रागावला, रुसला नाही. तर त्यांना त्यांची चूक दाखवून स्वतःला सुधारण्याची संधी सुद्धा दिली. खरोखर ग्रेट !     


बघा, ह्या परमात्म्याला आपल्याकडून काहीच नको. हा तर सदैव देतच असतो.    

बस चाहता है वो मेरी खुशी 
वो सारी बलायें लेता है 
योगी क्या जाने देना उसे वो ही सब कुछ निछावर करता है ... 

... असा आपला भाव हवा. योगेंद्रसिंह तर ग्रेटच. आपण कुठल्या कुठे ... पण तरीही कमीत कमी शिरडीतील तेली वाणी तरी नको व्हायला. 

हा परमात्मा एक गुणे घेतो आणि दशगुणे देतो. या वाण्यांनी बाबांना दिलेले तेल पुढे जाऊन त्यांची भरभराटच करणार होते... आपण ह्याला काही देण्याने आपले काहीच जात नाही ... उलट हाच आपल्याला त्याद्वारे देत असतो. ह्याचे नियमच वेगळे ! प्रेमाचे !        

पिपा दादांनी हे केव्हाच ओळखले आहे ... म्हणूनच तर ते लिहितात - 
  
पुष्प उमलले जे माझे 
वाहिले तुलाचि 
तुला तुझे देतानाही 
भरूनी मीच राही .... 



----------------------------------------



 जव्हारअलीची कथा  


ही कथा वाचल्यावर "अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" ही म्हण माझ्या डोक्यात आली.  लहानपणी आपण बैल आणि बेडकाची गोष्ट वाचलीच असेल. 

क बैल कुरणात चरत असता तेथे काही लहान बेडूक खेळत होते. त्यातील एक बेडूक बैलाच्या पायाखाली चेंगरून मरण पावला. ती हकीगत इतर बेडकांनी घरी जाऊन आपल्या आईस सांगितली. ते म्हणाले, 'आई, इतका मोठा प्राणी आम्ही कधी पाहिला नव्हता.' ते ऐकून बेडकीने आपले पोट फुगविले आणि म्हटले, 'काय, तो इतका मोठा होता का?' त्यावर तिची मुले म्हणाली, 'नाही आई, याहून मोठा.' पुन्हा आणखी पोट फुगवून बेडकीने विचारले, 'काय रे, तो इतका मोठा होता का?' त्यावर पिले म्हणाली, 'आई, तू जरी आपलं पोट फुटेपर्यंत फुगवलंस तरी तुझं मोठेपण त्या प्राण्याच्या पासंगालाही पुरणार नाही.' हे ऐकून बेडकी मोठ्या गर्वाने आणखी फुगू लागली व त्याच वेळी तिचे पोट फुटले व ती तेथेच मरण पावली.

गर्वाच्या नाहक धुंदीखाली ती बेडकी बैलापेक्षाही मोठे व्हायचा प्रयास करू लागली होती. शेवटी मरण पावली. जव्हारअलीचा भ्रमाचा भोपळा असाच फुटला.  

ज्याच्याशी आपली बरोबरी होऊच शकत नाही त्याच्याशी बरोबरी करणे हाच मूर्खपणा ! कथेतील जव्हारअलीने सुद्धा असाच मूर्खपणा केला. अशी बरोबरी करणारी क्षुद्र माणसे गर्वाने कुठलीही कृती करायला जातात आणि शेवटी अविचारी कृती करून स्वतःचाच विनाश ओढवून घेतात. 

डबक्यातला बेडूक समुद्राला डबकंच समजतो आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो !

घाणीमध्ये लोळणारे गाढव जोरजोरात ओरडून सांगायचा प्रयत्न करीत असते की मी हत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, मीच त्याच्यापेक्षा गुणवान आहे... असल्या साऱ्या गोंधळामुळे गाढव स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यास काही काळ यशस्वी सुद्धा होते, पण काही काळाने त्याच निरुपयोगी गोंधळाचा लोकांना कंटाळा येतो आणि लोक त्यालाच हाकलून लावतात. 

परंतु शारीरिक बळ असलेला आणि शांत आणि संयमी असलेला हत्ती रस्त्याने चालत असला की आपोआप त्याच्याकडे लक्ष जातेच. स्वतः कडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या हत्तीला आरडा ओरडा करून गोंधळ माजवण्याची काहीही गरज नसते. पण न्यूनगंडाने पछाडलेला आणि अहंकाराने भ्रमिष्ट झालेल्या गाढवाला मात्र स्वतः कडे लक्ष वेधून घ्यायला ओरडावे लागते. गाढवाने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून काही तो वाघ होत नाही.  

या दोन्ही उदाहरणानी जव्हारालीची कथा पाण्यासारखी पारदर्शक बनते. 

जव्हारअली म्हणजे भक्त कसा नसावा याचेच उदाहरण. फाजील अभिमान, अहंकार आणि पोकळ ज्ञान यामुळे माणूस स्वतःची पातळी सोडून वागू लागतो आणि स्वतःला त्या विश्वाच्या राज्यापेक्षाही मोठा समजू लागतो. या साईनाथापुढे सगळी लबाडी, हुशारी आणि अति चतुराई ही व्यर्थच आहे.    

आपल्यातील अहंकार म्हणजेच हा जव्हारअली. कधीकधी हा भगवंतापेक्षाही मोठा होतो. हा आपल्या आयुष्यात जेव्हा येतो, तेव्हाच आपल्या जीवनाची शोकांतिका होते. ह्याच्यामुळेच आपण आपल्या देवापासून दूर जातो. याउलट "भगवंत माझा स्वामी आहे आणि मी त्याचा दास आहे" ही भावना म्हणजेच देवीदास !  केवळ हाच माझ्या मनात उगवणारे भ्रम आणि अहंकार रूपी भ्रमाचे भोपळे फोडतो. 

कुणी कितीही जरी पापी का असेना, हा साईनाथ त्याला नक्कीच आसरा देतो. 

पापियासी ना न म्हणे 
शिक्षेलाही हा मवाळू 

जव्हारअलीसारखी माणसे विष साखरेच्या वर्खात लपेटून आपल्याला खायला देतात आणि तेव्हाच आपला घात करतात. इथे तर जव्हारअलीने साईनाथांना सुद्धा सोडले नाही. खरेच shameful        

कुणी कितीही मोठा का असेना, तो माझ्या साईनाथांपेक्षा मोठा असूच शकत नाही हे आपण मनाशी पक्के केले पाहिजे. हा साईनाथ ठगास महाठग आहे हे आपण विसरून चालणार नाही. बाबांनी या कथेत लघुरूप घेतलेले आहे. हे लघुरुपच घेणे जमायला हवे.   

शिरडी ग्रामस्थाप्रमाणेच ह्या साईशी आपल्याला मनाने जोडले जायला हवे.  

गर्व अहंकार सोडा हो तुम्ही 
विठ्ठल सोयरा जोडा ... 

जव्हारअलीने तर ह्या साईनाथालाच वश करण्याचा प्रयत्न केला. त्यामागे त्याचा स्वार्थच होता. हा साईनाथ असा तसा वश होणाऱ्यातला नाही. हा केवळ भावालाच भुलतो. 

भाव करुणेची साद वात्सल्याची 
प्रेमे वाकवी तोचि बापूराय 

प्रेमासाठी काय वाट्टेल ते करायला हा तयार होतो. 

शबरीची उष्टी बोरे मोहविती ह्याला 
हावरा हा भक्तिप्रेमा विखे कवडीमोला ... 

चुका कुणाकडून होत नाहीत ? पण ज्याला पश्चात्ताप होतो, त्यालाही हा मोठ्या दिलाने माफ करतो. जव्हारअलीचा बाबांनी शेवटी सन्मान केला. केवढे ही बाबांच्या मनाची विशालता !!

       



       
   





    

   


    










0 comments: