अध्याय ५१ (Adhyay 51)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
------
दीक्षितांची बाबांशी झालेली भेट
हा साई कुणी परका नसून आपल्यातीलच एक आहे. आपला पिता आहे. आपल्याप्रमाणे यालाही भावना आहेत. आपल्याला जशी याची आठवण येते, तसाच हा सुद्धा आपली आठवण काढतच असतो.
असो पाप किती किंवा पुण्य गाठी
याची नाही गणना हो त्याला
ऐकोनि पाझरे त्याचे अंतरंग
प्रेमे साद तयासी हो घाला ..
मग कसा तो कुठूनही
येईलच तो अवचित
वासरांसाठी प्रेमे जशी
धेनु येई हो हंबरीत ...
आपण बऱ्याच वेळा अनुभवतो. आपल्याला बाबाची आठवण येत असते.. आणि अचानक समोर गाडीवर लावलेला सद्गुरू जप बघायला मिळतो, किंवा अचानक समोर दुकानात लावलेला फोटो दिसतो किंवा आपल्या देवाचा फोटो असलेला बटन ब्रोच शर्टावर लावलेली व्यक्ती समोरून चालत येताना दिसते. हे सारे काय आहे ? त्याचे आपल्याकडे भेटायला येणेच आहे .. नाही का ?
दीक्षितांनाही असाच काहीसा अनुभव आला.. अतिशय आश्चर्यकारक रित्या साऱ्या गोष्टी योगायोगाने घडवून आणल्या जातात.. आणि हे योगायोग नसून ही 'त्या'ची इच्छा असते. माधवरावाना आलेली तार, त्यांचे मिरीकरांकडे जाणे, दीक्षितांची झालेली भेट, बाबांची तसबीर, त्याचे दीक्षितांना अचानकपणे झालेले दर्शन ह्या साऱ्या गोष्टींना चमत्कार असेच म्हणावे लागेल. नाही का ? एखाद्या सिनेमामध्ये घडणारे कथानकच जणू वाटावे असेच काहीसे इथे घडताना दिसत आहे. बाबा खरेच ग्रेट आहे !
दीक्षितांच्या मनातील भावाला सुद्धा सलाम ! पाय लंगडा झाला आहे. परंतु त्याहीपेक्षा लंगड्या मनाची त्याना चिंता आहे. माणसाचे मन हे खूपच पॉवरफूल असते. आणि तितकेच चंचलही. म्हणूनच त्याला सामर्थ्याची सर्वात जास्त गरज असते. प्रारब्ध म्हणजेच मन ! त्याला लगाम घालण्याकरता हा बाबाच हवा ! मनसामर्थ्यदाता ! हे लंगडे झालेले मन माणसाला टोटली पांगळे बनवते. याउलट सामर्थ्यशाली मन मानवाला बळकटी देते.
शेवटी एवढेच वाटते की हा साई आपल्याला भेटायला आतूर आहे. हा कायम आपली वाट पाहात उभा आहे, आपले बोट धरून आपल्यासोबत चालायला तयार आहे. प्रश्न आहे तो आपलाच ! आपण ह्याच्यासोबत चालायला तयार आहोत का ?
बढते ही रेहेना मुझे है यहा
मेरे बापू संग मेरे
मै जहाँ हू वो वहा ...
------------------
पुंडलिकराव कथा
इथे प्रेम कृपा आहे
मायेचा सोहळा ...
याआधीच्या अनेक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे हा बाबा म्हणजेच मूर्तिमंत क्षमा. याचा मार्गच वेगळा आहे. प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेमच. ह्या प्रेमापोटी हा बाबा आपल्या असंख्य चुका पोटात घालतो. "चूकीला माफी नाही" असा डायलॉग आपण बऱ्याच चित्रपटामध्ये, मालिकांमध्ये ऐकून आहोत. पण इथे हा बाबा लोण्याहूनही मऊ आहे. ह्याला चूक करणाऱ्याची घृणा नाही. हा बाबा अनेकविध संधी देत असतो. अगदी वारंवार. त्याच्या क्षमेला अंत नाही.
तू दयेचा अपार सागर
तू करुणेचे भाव सरोवर ..
आपण सारे सामान्य मानव आहोत. जे सामान्य आहेत तेच चूकतात. हा बाबाही हे जाणून आहे. म्हणूनच तो आपल्याला अनेकवार पोटात घालत असतो. पण त्याचसोबत आपण कुठे चुकलो आहोत याचीही तो जाणीवही करून देतो. म्हणजे पुन्हा आपण तशीच चूक करणार नाही. पण हेदेखील प्रेमाने आणि ममतेनेच. म्हणूनच भक्तिमार्ग साधा सोपा. जाचक नियम आणि त्रास नाही. हा बाबा स्वतः सारे नियम वाकवू शकतो आणि भक्तप्रेमापोटी वाकवतो देखील. देव कोपला असे इथे होणे नाही. बाबा क्रोधिष्ट जरूर होतात; परंतु ते त्या व्यक्तीच्या वाईट वागणुकीवर किंवा त्या चुकीवर, त्या व्यक्तीवर नाही. हा सर्वात मोठा फरक आपल्याला समजतो.
पुंडलिकरावांनी सुद्धा साऱ्या गोष्टी हलक्यात घेतल्या. एवढे मोठे कार्य करायची जबाबदारी जेव्हा आपल्याला सगुरू देतात तेव्हा त्यांचा आपल्यावर विश्वास असतो तेव्हाच. "हा माझा माणूस माझे हे काम करेल" ही खात्री असते तेव्हाच गुरू आज्ञा देतात. ती पूर्णपणे काहीही चूक न होता फत्ते करण्याची जबाबदारी ही आपली असते. म्हणूनच अशा कार्यावेळी आपण नेहेमी सावध असणे गरजेचे असते. साईनाथाना दिलेला नारळ चिवड्यात घालून खाल्ला हा विचारही मन मानायला तयार होत नाही.
तसे बघता पुंडलिकीरावांची चूक ही झालीच. ते बेभान आणि गाफील राहिले. परंतु ती चूक त्यांनी मुद्दाम केली नाही; तसेच त्याबद्दल त्यांना मनापासून पश्चात्तापही आहे. ते चूक सुधारण्याचाही प्रयास करायला तयार आहेत. परंतु 'तो' नारळ मात्र गेलाच. बिरबल म्हणतो त्यानुसार "जो बूंद से गयी वो हौद से कैसे आएगी.." परंतु तरीही पुंडलिकरावानी तयारी दाखवली. बघायला गेले तर ते चूक लक्षात आल्यावर दुसरा नारळही आणू शकले असते. आणि बाबांसमोर तोच नारळ आहे असे सांगूही शकले असते. परंतु अशी लबाडी त्यांनी केली नाही. बाबा सर्वसाक्षी आहेत हे जाणून भीतीमुळे नाही, तर प्रामाणिकपणे त्यांनी सारे बाबांपुढे कबूल केले आहे. बाबांना हेच आवडले. म्हणून त्यांना योग्य समज देऊन बाबांनी सारे काही accept करून पोटात घातले. हा आहे बाबा !
चुकलेल्या भक्तीलाही मानणारा
भक्तिवेड्या पामरांना तारणारा
हा बाबा आपल्यातच निवास करून आहे. आपल्या प्रत्येक कृतीच्या खबरा याला असतातच. पण केलेली चूक न लपवता याच्यासमोर कबूल केलेलीही याला आवडते. बाबांनी सारे काही पोटात घातले आहे. इतकेच नाही पुंडलिकरावाना वाईट वाटले आहे हे जाणून त्यांच्या मनावर फुंकरही घातली आहे. त्यांच्या मनातले guilt च काढून टाकले आहे.
असा आहे हा बाबा ! खरेच ग्रेट !
------------------
बाळाराम धुरंधर
कथेच्या सुरुवातीलाच धुरंधर बंधूंविषयी वाचायला मिळते. अख्खे कुटुंबच सुलक्षणी. भक्तीमार्गात पाय रोवलेले. पिढ्यानपिढ्या श्रीराम आणि विठ्ठलभक्ती करणारे. असे असल्यामुळेच त्यांची खूप भरभराट झालेली. ह्या भक्तीत रममाण झाल्यामुळेच पुढे साईदर्शनाचा लाभ घडला. हेच भक्तीचे फळ. पिढ्यानपिढ्या चालत असलेली भक्ती आज त्यांच्या कामी आली. त्यामुळेच त्या परमात्म्याने आपल्या साईरुपात जवळ बोलावून घेतले. इतकेच नाही तर त्यांना ओळख पटवून देऊन कृतकृत्य आणि समाधानी केले.
जनम जनम का नाता
है तेरा मेरा
याद रहा प्रभू तुमको
मै भूला बिसरा..
हा साई धुरंधराच्या ६० पिढयांविषयी बोलत आहे ! किती मोठी गोष्ट आहे ! बाबाना काय म्हणावे ! समोरच्याची एकदम विकेटच घेतात. खरोखर त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले असणार !
यांचाच दम्याचा अनुभव तर एक सो एक ! सूज आलेल्या डोळ्यात बिब्बे घातले ना, तसेच. हीच बाबांची उलटी खूण. ज्या माणसाला दम्याचा त्रास आहे तिला चिलीम ओढ म्हणून कोण सांगेल ? सगळे अनाकलनीयच म्हणायला हवे. ही गोष्ट अधिक समजण्यासाठी पुन्हा आपण डोळ्यात बिब्बे घातलेली गोष्ट आणि त्याचा भावार्थ वाचला तर अर्थ अधिक स्पष्ट होत जातो.
काय ताकद आहे बाबांची ! फक्त एका चिलीम पिण्यामध्ये चक्क दमाच घालवला ! इतकेच नाही तर आयुष्यभर साधा खोकलाही कधी त्यांना झाला नाही ! खरेच ग्रेट ! हा बाबा काहीही करू शकतो ना !
६० पिढ्या चालत असलेला त्यांचा संबंध बाबांनी देह ठेवतानाही संपू दिला नाही. आपल्या जाण्याची खबर खोकल्यारूपी करून देऊन धुरंधरांना पुन्हा आठवण करून दिली. बाबांना काय म्हणावे ! इतके चांगले कुणी कसे असू शकते हाच प्रश्न पडतो. पण हा कोण आहे हे लक्षात आल्यावर हात आपोआपच ह्याच्या पायाशी जातात.
अंबज्ञ ! नाथसंविध !
0 comments:
Post a Comment