Adhyay 7 (अध्याय 7)

05:57:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 

बाबांनी डोळ्यात बिब्बे घातले 


हा साईनाथ सद्गुरूंसोबतच एक डॉक्टरही आहे. मानवी मनाप्रमाणेच त्याच्या शरीराचाही तेवढीच काळजी घेतो. साईनाथ एक सद्गुरू म्हणून तर नावारूपाला आलेलेच होते, परंतु एक निष्णात डॉक्टर म्हणूनही ते तितकेच प्रसिद्ध होते. एकाच वेळी एवढ्या साऱ्या क्वालीटी फक्त या मानवरूपात आलेल्या परमात्म्याकडेच असू शकतात. बाकी कुणाकडेच नाही. 

कारण हा जरी मानव म्हणून वावरत असला तरीही हा शेवटी परमात्मा आहे. ह्याचे भक्तांना तारण्याचे सारे मार्गच न्यारे. ह्याच्या लीलांचा थांग आपल्यासारख्या मानवांना थोडीच लागणार !

बघायला गेलं तर बिब्बा हा पुरवीपासूनच त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. मग अशा गुणधर्माचा बिब्बा डोळ्यांसारख्या अतिनाजूक भागात कोण घालणार ? ही कथा वाचून कुणी म्हणेल असे कसे हे साईनाथ ? 

पण इथे ह्या बिब्ब्याने सुद्धा आपला गुणधर्म बदलला... हे कशामुळे झाले ? तर ह्या साईनाथांच्या इच्छेमुळे. ह्या साईंची अगदी सगळ्यांवरच सत्ता आहे. हा काहीही वाकवू शकतो. ह्याची ताकदच अमर्याद ! पण हे तो का करतो ? ही जादू आहे का ?

१) हा कोणतेही गोष्ट का करतो हे समजून घ्यायला अनेक जन्म घेतले तरी ते कमीच आहेत. ह्याचे मार्ग त्या त्रिनाथांनाच माहीत. ते आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचे आहेत. मुळात हा सामान्य दिसत असला तरी असामान्य आहे. मग ह्याचे मार्गही तसेच असामान्य असणार, नाही का ?

२) कुणाला वाटेल ही जादू आहे की काय ? तर नाही. मग इथे साईनाथांनी बिब्बेच का घेतले ? ह्याचेही उत्तर सोपेच आहे. ह्या कलियुगात मानवाने चुकीचं बघितल्यामुळे, वाईट नजर ठेवल्यामुळे आणि सतत अनुचीत तेच दिसत राहिल्यामुळे त्याच्या दृष्टीला अशीच सूज येते. मग ह्या सर्व अनुचित गोष्टींना हद्दपार करण्यासाठी उपाय देखील तेवढाच जालीम हवा... किंबहुना म्हणूनच साईनाथानी सेवा आणि भक्ती रूपी हे दोन बिब्बे मानवी डोळ्यात अगदी ठासून भरले आहेत... ह्या दोन गोष्टीमुळेच आपली जमा झालेली सारी पापे धुतली जातात आणि डोळे उचित तेच बघू लागतात. (जीवनात सगळे उचित तेच घडू लागते आणि जीवन आनंदी होते)

३) मानवी मन हे संशयी असते. चमत्काराशिवाय काहीच मानायला तयार होत नाही. कोणत्याही सामान्य माणसाकरता ही कथा म्हणजे एक खूप मोठा चमत्कारच आहे. आणि किंबहुना असा मोठा अनुभव पाहिल्यामुळेच अनेक जण साईनाथांचे भक्त बनले असतील... कदाचित त्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठीच साईनाथांनी ही लीला केली असावी. 

४) इथे साईनाथांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. सूजही बरी झाली आणि डोळ्यांनाही काहीच इजा झाली नाही. इतके नाजूक काम केवळ हा साईच हाताळू शकतो. 


अजून एक महत्तवाची गोष्ट म्हणजे ज्या भक्ताला हा आजार झाला आहे तो नक्कीच श्रेष्ठ भक्त असला पाहिजे. साईनाथांवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्या डोळ्यात बिब्बे घालून घ्यायला तो तयार झाला. हे खरेच खूप मोठी गोष्ट आहे. 

तसेच डोळ्यात बिब्बे घातल्यावरही आता माझे काय हाईल, डोळे वाचतील ना, आजार बरा होईल ना, ह्या बिब्यांमुळे माझ्या डोळ्यांना काही इजा होणार नाही ना ... असे कुतर्क सुद्धा आले त्याच्या मनात आले नाहीत. 

हा विश्वास आणि साईनाथांची ताकद यामुळे कुठेलेही संकट कसे बरे टिकू शकेल ? नाही का ?




-----------------------------------------------



लोहारणीची कथा  



ही कथा वाचून साईनाथाला प्रत्येकाचीच केवढी काळजी असते हे प्रकर्षाने जाणवले. बघायला गेलं तर 'साधी' लोहारीण. पण ती सुद्धा ह्या साईनाथाला कित्ती important आहे हे अगदी जाणवले. 

राजा रंक भेद नाही पाई 

.... याचीच प्रत्यक्ष प्रचिती आली. 

ह्या साईनाथाला सगळे भक्त सारखेच. मग ती लोहरीणीची पोर का असेना ह्याच्यासाठी सारखीच. आपण मात्र समोरच्याला तुच्छ लेखून मोकळे होतो. प्रत्येकाला स्वतःचे तेच मह्त्वाचे असते. दुसऱ्यासाठी झटणे तर सोडाच उलट दुसऱ्याच्या वाईटावरच आपण टपलेले असतो. पण हा एकटा साईनाथच अगदी सगळ्यांसाठी अहोरात्र झटत असतो, त्यांचे जीवन सुंदर करण्याकरता. बाकी कुणीही नाही. सगळेच तोंडदेखले. 

ह्या साईनाथाचे आपल्यावर किती बारीक लक्ष असते ते समजते. एक आईच असे करू शकते, आपली काळजी घेऊ शकते, प्रेमापोटी स्वतःचा विचार न करता आपले प्राण वाचवायला अगदी विस्तवातही हात घालू शकते. ही कथा वाचून खरे सांगतो,ह्या साईनाथाला मनाने एक सॅल्यूट ठोकला. हा साईनाथ आपला सदगुरू आहे याचा सार्थ अभिमान वाटला आणि हे हात आपोआपच त्याचा चरणाशी जाऊन पोहोचले. ह्या साईनाथाने कुठल्या लेव्हलचं आपल्याला प्रोटेक्शन दिलं आहे ह्याची अगदी जाणीव झाली. 

ह्या साईनाथांच्या alertness ला सुद्धा सलाम ! बघा ना, त्या लोहारणीच्या हातातून तिची मुलगी भट्टीत पडे परेंत अगदी एका निमिषाचाही अवधी लागणार नाही. पण तरीही ह्या साईनाथाने तिला वाचवले. हा साईनाथ ह्या काळालाही थांबवू शकतो. अशी अफाट ताकद त्याच्याकडे आहे. ह्या कथेत बापूंनी सांगितल्याप्रमाणे काम, काळ आणि वेग तिघांनाही वाकवलं आहे. विज्ञानाचे सारे नियम इथे फसले.  

बघायला गेलं तर साईनाथ तिथे physically present सुद्धा नव्हते. हे जरी मानलं की ते परमात्मा आहेत, त्यांना कुणाला वाचवायला काहीही करायला सुद्धा लागत नाही, परंतु त्यांनी मग स्वतः चे हात असे विस्तवात का बरे टाकले असतील ? प्रश्न पडतो.... 

१) कथेत दिल्यानुसार भागोजी शिंदेचे प्रारब्ध तेलमालीशची सेवा केल्यामुळे कमी करता यावे ही साईंची इच्छा असू शकेल 

२) लोहारणीला एक सुंदर अनुभव देऊन इतर भक्तांमध्ये साईभक्तीबीज रुजावे हा सुद्धा हेतू असू शकतो. 

३) याद्वारे साईनाथांनी AADM - Aniruddha's Academy of Disaster Management चे प्रशिक्षणच दिले असावे. (हे डॉ केशव नार्सिकारांनी मला सांगितलेलं ) 


ही कथा वाचून माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न आला... जर साईनाथांची पंचमहाभूतांवर सत्ता आहे तर मग त्यांचा हात भाजलाच कसा ? पण मग कथा वाचल्यावर समजले की ह्या साईने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भागोजी शिंदे चे आणि लोहारणीच्या पोरीचे प्रारब्ध / भोग स्वतः वर घेतले. हे साईनाथांखेरीज कुणाला जमणार आहे का ? 
.... इथे आपल्याला सद्गुरूंची ताकद समजते आणि आपल्या आयुष्यात सद्गुरू का हवा हे आपण जाणून घेऊ शकतो. 

लोहारीण ही एक मानवी माता आहे. तिला सुद्धा तितकीच आपल्या लेकराची काळजी असणारच. पण ->

१) लेकराचे भोग हा सद्गुरूच स्वीकारू शकतो. 
२) लेकरावर प्रत्येक क्षणी फक्त सद्गुरूचेच लक्ष असू शकते 
३) इतक्या निमिषार्धात फक्त सद्गुरूच वाचवू शकतो 
४) वाचवण्याची अफाट ताकद फक्त आणि फक्त सद्गुरूकडेच असू शकते 

... यासाठीच आयुष्यात सद्गुरू हवा. 

वाट चुकल्या जीवनी 
तू ध्रुवतारा 
भक्तिवेड्या पामराना  
तारणारा ...   
   
     ----------------------------------------------- 



खापर्डे बाईंची कथा  



माझ्यासारख्या अती सामान्य भक्ताला कधी ना कधी खालील प्रश्न पडतात. 

ह्या साईबाबाचे माझ्याकडे नक्की लक्ष आहे का ? 
मग असे असेल तर अशी संकटे माझ्यावर का बरे येत आहेत ? 
त्यातून मी बाहेर का पडत नाही ? 
माझ्यावर संकटे आहेत हे त्या साईबाबाला माहीत तरी आहे का ?     
हा साईबाबा मला तारून कधी नेणार ? 

खरे म्हणजे असे प्रश्न आपल्याला पडूच नयेत. 'त्या' बाबावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हवा. मी जरी हे लिहीत असलो तरीही मी ही त्यातलाच. एक अती सामान्य भक्त. लहान लहान संकटांची सुद्धा खूप भीती वाटते. ह्या कथेतील खापर्डे बाईंप्रमाणे मन काळजीने चिंताक्रान्त होते.

अशा वेळेस सबुरी संपते आणि श्रद्धा थोडी लटकी पडते. पण... हा साईबाबाच माझा तारणहार हे मात्र नक्की माहीत असते. संकट छोटे असो की मोठे, आपली धाव शेवटी त्या बापूसाईकडेच. दादांचे "काही काळजी करू नका" हे शब्द कानांनी ऐकले की काळजीने बेजार झालेला, कोमेजलेला जीव अगदी टवटवीत होतो. ही अर्थातच त्याच्या प्रेमाची आणि कृपेची ताकद. 

खापर्डे बाई जेव्हा बाबांच्या कानावर मुलगा आजारी असल्याची गोष्ट घालतात आणि प्रत्यक्ष बाबांच्या तोंडून "संकटे निघून जातील" हे ऐकतात तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडतो. सूचितदादांकडे जाऊन यायच्या आधीचे आपण आणि नंतरचे आपण यात केवढा फरक असतो हे आपण प्रत्येकानेच अनुभवले असेल. अगदी टेन्शन फ्री होऊन जातो आपण. 

आपली सगळी टेन्शन्स, काळज्या, संकटे (जी आपल्याच प्रारब्धामुळे निर्माण झालेली असतात) हा बापूसाई स्वत: वर घेतो. बाकी कुणालाच हे जमणे शक्य नाही आणि जरी ठरवले तरी कुणी तसे करूही शकत नाही. 

जळीताची आग बापूची सोसतो 
तरी कसा बापू माझा येतचि राहतो ... 

इथे हा साईबाबा आपल्याकरता सगळे काही करून सवरून मात्र मूकच राहतो. त्याचा अजिबात गवगवा करून स्वतः ला प्रसिद्ध करीत नाही. तसेच आपल्याला "मी तुझ्याकरता हे हे केले" असे सांगतही नाही. केवढा हा चांगुलपणा ! 

आपल्याला इथे नक्की माहीत हवे की ह्या साईनाथाचे आपल्यावर बरोब्बर लक्ष असते. आपण त्याला प्रत्यक्ष भेटलो काय किंवा नाही, आपण त्याच्याशी बोललो किंवा नाही, ह्याला आपली इत्थंभूत खबर असतेच. हेच त्याचे आपल्यावरचे लाभेवीण प्रेम, जे फक्त तोच करू शकतो. 

लव्ह यू डॅड ...



----------------------------------------------- 




पंढरपूराला जायाचं जायचं 
(नानासाहेब चांदोरकर कथा)


हा साईनाथ किती मनकवडा आहे ना ! आपण बाहेर बोललेलं सोडाच, पण मनात बोललेलं सुद्धा हा जाणतो. म्हणूनच तर म्हंटले आहे ना त्यांनी की ह्या साईनाथाला  आपल्या इत्थंभूत कृतीच्या खबरा असतात. 

कित्ती प्रेमळ आहे ना हा साईनाथ, आपल्या भक्ताच्या मनातले प्रेमळ विचार आधीच ओळखून त्याप्रमाणे त्यांनी नानासाहेबांसोबत पंढरपूराला येण्याचीही तयारी दर्शवली. अजून काय हवे ?  


मग जो गाई वाडेंकोडें  
माझें चरित्र माझे पवाडे  
तयाचिया मी मागें पुढें  
चोहींकडे उभाचि १२॥ (अध्याय ३)

हा साईनाथ आपल्या जीवनात active राहावा अशी ज्याची इच्छा असते, त्याच्याच आयुष्यात हा साईनाथ त्याची so called "ढवळाढवळ" करतो. आणि ज्यांना याची ही "ढवळाढवळ" आपल्या चांगल्याकारता आणि हीताकरता आहे हे पूर्ण माहिती असते केवळ तेच ह्या साईनाथाला नानासाहेबांप्रमाणे "माझ्याबरोबर पंढरपूरला चला" असे भोळ्या भाबड्या भावाने म्हणू शकतात. आणि अशांसाठी हा साईनाथ नेहेमी तत्पर उभा असतो. नक्कीच. खरेच ग्रेट !  हा बाबा नानासाहेब जायच्या आधीच पंढरपूरला जाऊन पोचला सुद्धा ! 

तुम्ही धावा रे सत्वर 
उभाची तत्पर बापू उभाची तत्पर 

हा साईनाथ प्रेमासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असतो. नानासाहेबांच्या मनातले प्रेम बाबांना भिडलं आणि हा बाबा पिघळला. "प्रेमे वाकवी तोचि बापूराय..." हा अभंग अगदी जाणवला.

बघायला गेलं तर हा साईनाथच पंढरपूरचा विठ्ठल. साईनाथांची मनोभावे सेवा केली म्हणूनच त्याचे फळ बाबांनी नानासाहेबांना दिले. मामलतदार म्हणून नेमणूक झाली आणि ती देखील विठोबाच्या पंढरपूरला.. जो स्वतःच एक साईचे रूप आहे. नानासाहेबांचा "शिरडी हेच प्रथम पंढरपूर" असा भाव आहे. म्हणूनच साईनाथांनी आपल्याच जवळ (पंढरपूरच्या विठोबाच्या जवळ) ठेऊन घेतले. 


ऐसी नाही कुठली जागा 

जिथे ह्याचा वास नाही ... 

इथे अजून एक गोष्ट लक्षात येते. नानासाहेब ज्याअर्थी "बाबा माझ्यासोबत पंढरपुरास चला" असे म्हणतात आणि प्रथम शिरडीचे दर्शन घेतात, त्याअर्थी त्यांना तिथे बाबांची खूप आठवण येणार आहे असे दिसते. म्हणूनच बाबांकडे धावत आले. बाबांनीही हे ओळखले आणि त्याप्रमाणे त्यांची अगदी प्रेमाने समजूत घातली आहे.  बाबांचे "पंढरपूरला जायाचे..  तिथेच मजला राह्याचे" किती लडिवाळपणे म्हंटले आहे... 


शुद्धभावाचें आमंत्रण  
बाबांनीं ऐकूनि घेतलें संपूर्ण  
म्हणती “जया माझें स्मरण  
निरंतर आठवण मज त्याची ३१॥ (अध्याय ४०)

ही ओवीच ह्या कथेचा भावार्थ आहे. गमक आहे.   


जिस जिस पथ पर भक्त साई का 
वहां खडा है साई     

हा साईनाथ आपल्या सोबत सतत चालत असतो. बाकी अगदी अख्ख्या जगाला जरी आवडत नसली तरी आपल्या प्रत्येकाचीच संगत ह्याला आवडते. हा तर आपल्याशी कनेक्टेड आहेच, असतोच. प्रश्न हा आहे की आपण ह्याच्याशी किती कनेक्टेड असतो ? ह्या साईनाथाने तर आपले बोट घट्ट पकडले आहे. प्रश्न फक्त हा आहे की आपली इच्छा आहे ना याचे बोट घट्ट धरून ठेवायची ....     



     
           

         





       

              

           

         




     
              


        


































0 comments: