Chapter / Adhyay 29 (अध्याय २९)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो. हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मद्रासी बाईची कथा
आपण नेहेमी ऐकतो. काम्यभक्ती ही भक्तीची पहिली पायरी आहे. मला काहीतरी मिळावे किंवा माझे काहीतरी काम व्हावे या दृष्टीने केलेली फायद्यापुरती भक्ती किंवा नमस्कार म्हणजेच ही काम्यभक्ती. आपण प्रत्येक जण नेहेमीच माझा फायदा कसा होईल हाच विचार करीत असतो. डोळ्यासमोर नेहेमी केवळ पैसाच दिसत असतो. जगण्यासाठी पैसा हा आवश्यकच आहे. नो डाउट. परंतु दर वेळेस सगळ्याच गोष्टी काही पैश्यासाठी करायच्या नसतात. लोभ अगदी मरेपरेंतही माणसाला सुटत नाही. ह्या लोभापुढेच आपण नेहेमी हरतो. त्यामुळेच आपण जे काही करतो ते बरोबर आहे की चूक याचेच आपल्याला भान राहात नाही. आपल्या कथेतील मद्रासी कुटुंब सुद्धा असेच.
साईबाबांची कानावर कीर्ती आली हे खरे. परंतु मद्रासी बाई सोडता बाकीच्यांनी त्यातील फक्त आपल्या फायद्याचेच घेतले. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ह्या बाबांच्याच वचनानुसार पुढे त्यांना तसाच अनुभव आला. साईबाबांच्या गुणसंकीर्तनातून त्यांनी "बाबा दक्षिणा देतात" एवढेच ग्रास्प केले. आणि केवळ दक्षिणा मिळण्याच्या लोभापायीच ते साईकडे आले. त्यातल्या मद्रासी बाईलासुद्धा लोभ जडला होताच; परंतु तो मात्र बाबांच्या पायाचा !!
हा बाबा प्रत्येकाच्या मनातले अगदी बरोबबर ओळखतो. कोण कुठच्या भावनेने माझ्याकडे आले आहे, त्यामागे त्याचा हेतू काय हे अगदी मनात शिरून अभ्यासल्याप्रमाणे बाबांना ठाऊक असतं. मद्रासी भजनी मंडळ बाबांसमोर नक्की कुठल्या उद्देशाने भजन गात आहेत हे बाबांपासून लपून राहिले नाही. खरे म्हणजे आपण बाबांना नीट ओळखतच नाही. त्यांना एक मानव म्हणूनच आपण पाहातो. बाबांना काय कळतंय हेच आपल्याला वाटत असतं. म्हणूनच हातून चुका घडतात.
मद्रासी बाईला इतरांच्या मनात नक्की काय चाललंय हे बहुतेक माहिती नाही. पण तिचे स्वतःचे मन मात्र साईप्रेमाने भरलेले आहे. म्हणून केवळ तिलाच बाबांमध्ये श्रीरामाचे दर्शन झाले.
प्रेमाचा हा घननीळ रंग
घेऊन आला गं
प्रेमासाठी आला खाली
सागरास मिळण्यास
भक्ताचे मन जेव्हा सद्गुरूप्रेमाने ओसंडून वाहात असते तेव्हाच असा सुंदर क्षण अनुभवायला मिळतो.
जो जो मज भजे जैशा जैशा भावे
तया तैसा पावे मी ही त्यासी
ह्या साईनाथांच्याच वचनाप्रमाणे ह्या बाईच्या मनातील शुद्ध भावामुळेच हा साई भुलला. बाकीच्यांच्या स्वार्थी आणि लोभी विचारामुळे त्यांना काही हे अहोभाग्य लाभू शकले नाही. केवळ ही मद्रासी बाईच ते मनोहारी दृश्य पाहू शकली.
शिरडीला आलेले हे मद्रासी भजनी मंडळ रामदासी संप्रदायाचे होते. समर्थ रामदास स्वामींच्या संस्कारात वाढलेला. रामदास स्वामी हे हनुमंताचे भक्त. आणि हनुमंत हा रामाला हृदयात बसवणारा रामाचा सर्वक्षेष्ठ दास. ह्या मद्रासी बाईच्या मनातील भावाला किती अन्यसाधारण महत्त्व आहे बघा ! ह्या प्रेमभावानेच अगदी गुरूंच्याही गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन तिला लाभले !
हावरा हा भक्तिप्रेमा
विके कवडीमोला ...
आपण अनेक कथांमधून वाचले असेल. परमात्म्याचे दर्शन होण्याकरता ऋषी-मुनीनी किती परिश्रम घेतले होते. खडतर तप, योग्य याग केले होते. परंतु ह्या शुद्ध भावाने त्या बाईला एकदाच नाही; तर अनेकदा व ते ही बराच काळ प्रभू रामचंद्रांचे दर्शन मिळवून दिले. म्हणेजच ह्याला प्राप्त करून घेण्यासाठी खडतर मार्ग तपश्चर्या वैगरे काहीही करायची गरज नाही; किंबहुना ते आपल्याला जमणारही नाही. ह्याला आपल्याकडून बाकी कसलीच अपेक्षा नाही. ह्याला फक्त प्रेम आणि भाव हवा. बास !! मग हा बाबा पिघळलाच !
हा भक्तीचा भूकेला
ह्याला नैवेद्य प्रेमाचा
आणि ह्या कथेत नमूद केल्याप्रमाणे हिला अगदी नखशिखांत रामाची आयुधे आणि खुणेसकट रामाने दर्शन दिले आहे. काय दृश्य असेल ते ! रघुकुलातील राम जशाच्या तसा तिच्यासमोर साईबाबांमध्ये तिने पहिला. यावरच प्रॅक्टिकल बुकमधील एक प्रयोग आहे. दर्शन. तो जरूर वाचावा. त्याने ही कथा अजून स्पष्ट होत जाईल.
"मला रामाचे दर्शन झाले" अशा गोष्टींवर कुणाचाच लगेचच विश्वास बसत नाही. सहाजिकच आहे. ह्या बाईच्या नवऱ्यासारखे अनेक अज्ञानी लोक जगात आपल्याला भेटत असतात. परमात्मा आला आहे, आपल्यात वावरत आहे हेच माहीत नसते. आणि ज्यांनी त्याला ऐकले असते, पाहिले असते, ते मान्य करायलाच कबूल होत नाहीत. पण योग्य वेळ आली हा बाबा त्याच्या लीलेने खेचून आणतोच; जशा ह्या बाईच्या नवऱ्याला खेचून आणला.
किती गमंत आहे बघा. हे रामदासी भजनी मंडळ. ज्या रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, त्यांच्याच समुदायातले. परंतु असे असतानाही ह्या शिरडीला आलेल्या लोकांचे मन ती बाई सोडता मात्र कोरडेच आहे. भगवंत प्रेमाचा ओलावाच नाही. दिव्याखाली अंधार. शिवाय भजन म्हंटले की डोळ्यासमोर आले ते परमात्म्याचे, त्याच्या गुणाचे कीर्तनरूपी वर्णन. परंतु जर ह्रदयात फक्त आणि फक्त लोभ असताना, भगवंत प्रेम नसताना त्याच्या गुणाचे गायलेले पोवाडे म्हणजे व्यर्थ शाब्दिक बुडबुडेच नाही का ?
ह्या भजनी मंडळाने साईनाथांना नीट ओळखले नाही हे समजू शकतो. कुणीच पहिल्या फटक्यात एका सामान्य मानवात दिसणाऱ्या परमात्म्याला मान्य करीत नाही. तसेच ह्या भजनी मंडळाचे झाले. परंतु इथे महत्तवाची गोष्ट ही आहे की भजने गाताना त्यामागे केवळ द्रव्यलोभाची जर अपेक्षा असेल, त्यामागे प्रेमाचा लवलेशही नसेल तर ते भजन साईनाथांसमोर करोत किंवा कुठल्या इतर ठिकाणी... ते फळेल का ?
परंतु तरीही हा साईनाथ टाकत नाही. तर योग्य मार्ग दाखवतो. आपण भक्त सामान्य आहोत, म्हणूनच चुका होतात हे त्या बाबाला माहीत आहे. केवळ तोच आपले मन समजून घेतो. कथेतील ती मद्रासी बाई सुद्धा सामान्य मानव आहे. तिलाही षडरीपूंची बाधा असणारच. म्हणूनच बाबांनी प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन देऊनसुद्धा पुढे हिला पैशाचा मोह सुटला. मनातले प्रेम संपले. त्या क्षणी तो प्रेमसेतू तुटला आणि कनेक्शन थांबले आणि बाबांमध्ये श्रीराम दर्शन होणे बंद झाले.
हे का झाले ? तर त्या बाईमध्ये सुधारणा व्हायलाच. त्याकरताच हा बाबा झटत असतो. आपल्या मनाची जागा षड्रिपूंनी कब्जा करू नये आणि त्या बाईला तिची चूक कळावी म्हणूनच बाबांनी ही लीला केली. पुढे ती सुधारल्यावर पुन्हा ह्या प्रेमळ साईनाथाने तिला रामरूपात दर्शन दिले ! वारंवार संधी देणारा आणि चुकल्यावर सख्ख्या बापाप्रमाणे ठोकून काढणारा हा बाबाच ! ग्रेट !
बेसिकली हा साईनाथ आपला "बाप" आहे. आपल्या मनात नक्की काय सुरू आहे हे तो अगदी बरोबर जाणून असतो. म्हणूनच त्या बाईच्या आणि इतरांच्या मनात काय भाव आहे हे बाबांनी ताडले. आपली प्रत्येकाचीच रांग वेगळी. म्हणूनच केवळ बाईला जिथे श्रीराम दिसले तिथे बाकीच्यांना बाबाच दिसत होते.
ह्या सद्गुरूतत्वाला जात-पात धर्म वैगरे काही नाहीच. ते ह्या सगळ्याच्या पार आहे. मला हल्लीच एक इसम भेटलेला. एका ठिकाणी साईनाथ आणि श्रीराम असा बाजू बाजूला फोटो लावलेला होता. ते पाहून तो इसम हसून म्हणाला, "हिंदूच्या बाजूलाच यवनास ठेवले आहे". खरे तर मला त्या व्यक्तीचेच खूप हसू आले. साई आणि राम हे एकच आहेत. फक्त देह भिन्न आहेत. ही गोष्टच त्या व्यक्तीला माहीत नाही. जातीधर्मामध्ये ज्याने ह्या सद्गुरुला अडकवले तो काय प्रगती करणार ? असो.
तर आधी अनेक वेळेला सांगितल्याप्रमाणे हा साई हाच राम आहे. सद्गुरुतत्वाची भिन्न रूपे. पण सामान्य मानव हा त्याच्या अज्ञानी तोकड्या बुद्धीनुसारच ह्या साईवरच संशय उत्पन्न करीत असतो. जसा ह्या बाईच्या नवऱ्याने केला. तिचा नवरा म्हणजेच मोह, कुतर्क, कुशंका ह्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे. हे सारे दुर्गुण आपल्यामध्येच निवास करून असतात. आपल्या साईनाथांप्रती असणाऱ्या भोळ्या भावाला कापून काढत असतात. अशा वेळेसच ह्या षड्रिपूंना थोपवून धरावे लागते. नाहीतर ही संशयाची कीड केव्हा आपल्या भावपुष्पांना खाऊन टाकेल याचा काहीच नेम नाही.
इतके सारे छान सुरू असताना, महतभाग्याने साईरामाचे प्रत्यक्ष दर्शन होत असताना त्या बाईलाही शेवटी पैश्याचा लोभ जडलाच. काय करणार ? शेवटी सारी सामान्य माणसे. संत नाही. त्यामुळेच एखाद्या क्षणी लोभ मनाचा ताबा घेतोच. परंतु त्यामुळेच तिला रामरूपात होणारे दर्शन बंद होते. साई सर्वकाही जाणतोच. मनातलेही जाणतोच. तिला साईमध्ये राम दिसत होता ते तिच्या मनातील निस्वार्थी, प्रेमळ भोळ्या भावामुळेच. हेच ते भक्तिभावचैतन्य. यामुळेच तो परमात्मा आणि आपण यामध्ये बाकी कुणी येतच नाही. डायरेकट कनेक्शन. हे फक्त या प्रेम आणि भावामुळेच जोडले जाऊ शकते.
परंतु ज्या क्षणी मनातील भावाची जागा लोभाने घेतली, त्या क्षणी हे कनेक्शन तुटले. हा लोभ असाच आपला घात करीत असतो. ह्या साईनाथाला सगळेच समजते. त्यामुळेच ती बाई शेवटी एक सामान्य मानव आहे, तिच्यात सुद्धा लोभ असू शकतो हे बाबा जाणतो. परंतु सद्गुरू आपल्या भक्तांच्या नेहेमीच प्रगतीचाच विचार करीत असतो. म्हणूनच ह्या द्रव्यलोभामुळे झालेली बाईची अधोगती साईनाथ सुधारू पाहात होता. त्या बाईला जेव्हा आपली चूक उमगली आणि तिने स्वतःमधे उचित बदल घडवून आणला तेव्हा पुन्हा बाबांमधे श्रीरामाचे दर्शन झाले.
म्हणजेच काय, तर आपण कितीही जरी चुकलो असलो, तरी हा बाबा आपल्याला कधीच टाकत नाही. आपल्यावर राग धरीत नाही. आपण सुधारावे हीच त्याची अपेक्षा असते.
ज्याप्रमाणे बाबांनी त्या बाईला सुधारलं, अगदी तसेच त्यांनी तिच्या नवऱ्याला देखील सुधारलं आणि आपल्या चरणी दृढ केलं. चांगली अद्दल घडल्याविना डोके ठिकाणावर येत नाही. बाबांनी त्याच्या संशयाला, साईनाथांविषयीच्या कुतर्काला आणि लोभाला चांगले जेरीस आणले आहे. पोलीस म्हंटले की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. मग ते स्वप्नात असो की प्रत्यक्षात. त्यात ह्या माणसाला तर पोलिसाने चांगलेच धारेवर धरले आहे.
अगदी कितीही मनात शंका कुशंका आणि संशय असला, तरीही हा साईनाथ नक्की कोण आहे हे प्रत्येकालाच माहीत असतं. त्याची ताकद काय आहे हे मनाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे समजतच असतं. म्हणूनच त्या माणसाने शेवटी संकटातून त्याला सोडावण्यासाठी, पोलिसाच्या पाशातून मुक्त होण्यासाठी साईनाथानाच गाऱ्हाणे घातले.
आपल्या प्रत्येकाच्याच मनात हा असाच कुतर्कांचा, मोहाचा पाश असतो. ह्या सगळ्या जाळ्यात आपणच स्वतः अडकत जातो. स्वछंदी मुक्त मन पिंजऱ्यात कैद होते. हे सोडावण्यासाठी शेवटी त्या बाबालाच धाऊन यावे लागते. असे हे पाश केवळ बाबांवरच्या विश्वासानेच तुटू शकतात.
वैनी सांगते अनुभवे
बापू पुरता दयाळू
पापियांसी ना न म्हणे
शिक्षेलाही हा मवाळू
सगळ्या नाड्या ज्याच्या हातात असा हा साईनाथच आहे. हे शेवटी त्या माणसाला पटले. सगळा अहंकार गळून पडला. ह्या बाबाच्या चरणातच, त्याच्याशी शरणागत राहण्यातच खरे सुख आहे हे त्याला उमगले.
पिपा म्हणे सोडा दंभ
ह्याचे पायी सर्व सुख
त्याने आता बाबांना केलेला नमस्कार हा लोभापायी नसून बाबांच्या पायी शरणागत झाल्यामुळे आहे. हा सद्गुरू जात आणि धर्म ह्याच्या पलीकडे आहे, हे त्याला उमगले आहे. रामदास स्वामी आणि साई हे भिन्न नाहीतच हे बाबांनी त्याला स्वप्नातही पटवून दिले. परंतु एवढे सारे अनुभव आलेले असतानाही तो गृहस्थ काही बाबांना नीट समजलाच नाही. बाबा अजून किती वर्षे जगणार हीच त्याची जिज्ञासा होती. हा बाबा ह्या देहाच्या चौकटीत अडकणारा आणि सामान्य मानवाप्रमाणे नाश पावणारा नाहीच मुळी; हे ही बाबांनी पुढे त्याला पटवून दिले.
हा बाबा अगदी स्वप्नात जरी आला, तरी जीवाचा उद्धारच करतो. पुढे बाबांनी त्यांना आशीर्वाद देऊन कृतकृत्य केले. यावरून एक गोष्ट समजली. कुटुंबातील एकाने जरी ह्या बाबाची प्रेमाने भक्ती केली, तरी हा बाबा सगळे काही सांभाळतो आणि अख्ख्या कुटुंबाला तारून नेतो. एवढेच नाही तर सर्वांनाच साई भक्तीची गोडी निर्माण होते. हा त्या साईचा महिमा.
शेवटी एवढेच वाटते. योग्य वेळी हा बाबा उचित ते आपल्याला देणारच आहे हा विश्वास हवा. बाबाला अगदी मनाच्या कोपऱ्यातलंही सारं कळत असल्यामुळे आपण वररून अगदी कितीही जरी खोटे प्रेम आणि भजने गायली, तरीही हा बाबा ते ओळखतोच. ह्यांच्यासमोर लबाडी चालूच शकत नाही. बाबा काहीतरी मोठी दक्षिणा देतील म्हणून बाबांसमोर खोटे खोटे भजन गाण्यापेक्षा जर बाबांकडे प्रेमाने आणि हक्काने मागितले असते तर बाबांनी अगदी सारे काही दिले असते. ह्या बाबाला काही कळत नाही असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा केलेली लबाडी ही आपलाच घात करते.
श्रीकृष्णाला प्रेमाने दिलेल्या मूठभर पोह्यासाठी त्याने सुवर्णनगरी बहाल केली. तर याउलट श्रीकृष्णाच्या नकळत (?) दाणे एकट्याने फस्त करून वर खोटे बोलणाऱ्याला त्याची मोठी किमंत भोगावी लागली. काय करायचे याचा निर्णय प्रत्येकाचा.
-------------------------
तेंडुलकर कथा 1 - मुलाची परीक्षेची कथा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी प्रत्येकालाच भविष्यकाळाची चिंता सतावत असते. आपल्याच पूर्वायुष्यात जर डोकावलं, तर प्रत्येकालाच शिक्षण घेत असताना कधी ना कधी एक प्रश्न जरूर पडला असेल, जो ह्या तेंडुलकरांच्या मुलाला पडला. "मी परीक्षेत पास होईन का?". भीती वाटणे किंवा भय हे मनुष्याकडे जन्मतःच आलेलेच असते. भय वाटूच शकत नाही असे होणे नाही.
परंतु जर मी योग्य तो आणि अगदी कठोर परिश्रम करून मेहेनत घेऊन अभ्यास केला असेल, तरीही मग असे भय का वाटावे? यावरून एक तर त्या मनुष्याचा lack of confidence तरी दिसतो किंवा स्वतः वरचा आणि पर्यायी देवावरचा विश्वास कमी आहे असेच दिसून येते.
तुम्ही जोर मारू लागा
दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा
वाटी घेऊन उभाचि मी माघारा ...
बाबांचेच वचन. परिश्रम केलेले ह्याला आवडतात आणि त्याने हा संतुष्ट होऊन उचित ते फळ हा देतोच ! नक्कीच ! केलेली मेहेनत वाया गेली असे होणे नाहीच. कुठल्या ना कुठल्या रूपात त्याचे फळ हे मिळतेच. आणि जरी माझ्या मनासारखे फळ मला नाही मिळाले, तरीसुद्धा याचा हाच अर्थ आहे की ते फळ मिळणे माझ्यासाठी उचित नव्हतेच. म्हणूनच ह्या बाबाने मला ते दिले नाही.
हा बाबा कायम माझ्या भल्याचाच विचार करतो आणि उचित तेच देतो. मी नेहेमीच win-win situation मध्ये असतो हे कायम मनात माहीत हवे, म्हणजे भीती उरतंच नाही.
प्रयत्न करणे माझे काम
यशदाता मंगलधाम
आपल्या हातात जे आहे ते आपण करावे. एका विद्यार्थ्याकडून योग्य तो अभ्यास आणि परिश्रम आवश्यक आहेत, जे ह्या मुलाने आधीच केले आहेत. परंतु तरीही तो मनातून परीक्षेला भीत आहे आणि भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाची वाट धरीत आहे.
ज्योतिषशास्त्र हे देखील महत्ववाचे आहे. नक्कीच. परंतु सद्गुरू पाठीशी असताना, त्याच्या सावलीत पहुडलेले असताना सुद्धा जेव्हा भविष्यकाळाच्या चिंतेने आपण ज्योतिषाचे मत घेतो, तेव्हा जरा वेगळे वाटते. ज्योतिषी आणि सद्गुरू मधला एक महतवाचा फरक म्हणजे ज्योतिषी पुढचे भविष्य फक्त पाहू शकतो. पण सद्गुरू भक्तांचे पुढचे नाथसंविध स्वतः ठरवत असल्यामुळे भविष्य नुसते जाणून न घेता ते बदलण्याची; इतकेच नाही तर ते त्या भक्ताच्या favour मध्ये करतो. एवढी ताकद फक्त त्या सद्गुरूमाउलीचीच.
आपण जर सगळे निर्णय भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे बघून करणार असू तर जगण्याला काहीच अर्थ नाही. वर्तमानाच्या परिश्रमांना महत्त्व न देता केवळ भविष्यावरच सगळे सोडले तर अंदाधुंद माजेल. त्यापेक्षा अंबज्ञ राहून स्वतःचे परिश्रम आणि सद्गुरूंची साथ असेल तर अशक्य ते काय ? "तू आणि मी मिळून शक्य नाही असे ह्या जगात काहीच नाही.. " बापूंची ग्वाही. बापूंचेच आवडीचे गाणे इथे आठवले.
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजूर
हा साईनाथ ब्रह्माण्डाचा स्वामी आहे. अगदी क्षणार्धात हातावरच्या रेषा बदलणारा जादूगार आहे. त्याला काय अशक्य ? त्याच्या एकदा मनात आले तर कोणता ग्रह आड येणार आणि येऊ शकणार? बाबांनी सांगितलेले सारे भविष्य खोदून टाकले, त्या मुलाच्या आईला धीर दिला. बाबांच्या सांगण्यानुसार तो मुलगा परीक्षेला बसला खरा; परंतु तरीही त्याच्या मनात भीती ही होतीच. त्यामुळेच निकाल लागताना तो बघायची त्याची हिमंत होत नव्हती.
हा बाबा सारे काही ओळखतो. त्या मुलाच्या मनाची स्थिती सुद्धा हा बाबा जाणतो. म्हणूनच त्या मुलाच्या मित्राला निकाल सांगायला पाठवले. ही सारी बाबाचीच किमया. हा बाबा सगळं काही नीट करीत असतो. फक्त ह्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. जर का भविष्य ऐकून हा मुलगा परीक्षेला बसलाच नसता तर खरेच नापास झाला असता.
जो माणूस स्वतःच्या हिंमतीवर विश्वास ठेवतो ना त्याला भविष्य बघायची गरजच वाटत नाही. ही हिमंत म्हणजेच मनाचे सामर्थ्य, जे हा बाबाच प्रदान करू शकतो. कारण हा बाबाच मन:सामर्थ्यदाता आहे. बाकी कुणीही नाही.
नको येरझाऱ्या बहूमूर्तीपाशी
अनिरुद्ध एकचि भार वाहे...
-----------------------------------
तेंडुलकर कथा २ - पेन्शन
आपण अनेक अनुभव ऐकतो. श्रद्धावानांच्याच favour मध्ये साऱ्या गोष्टी घडत जातात आणि त्यांनी इच्छिलेले त्यांना मिळते. ही सारी त्या बाबाचीच कृपा. त्याशिवाय हे शक्य नाही. विरुद्ध असलेली परिस्थिती अगदी चमत्कारिकरीत्या त्या भक्ताच्या बाजूने उभी राहते. तेंडूलकरांचेही काहीसे असेच झाले.
रिटायरमेन्ट जवळ आली की माणसाला आठवते ते पेन्शन. आयुष्याच्या उतारवयातील जगण्याची पुंजी. पुढील येणाऱ्या कठीण काळाची सोय. एकदा का मनाजोगे पेन्शन हातात पडू लागले की मन निश्चिन्त होते. आपल्याला काही हवे असेल तर आपण कुणाला सांगणार ? अर्थातच त्या बाबाला. आपल्या बापाकडे आपण हक्काने मागतो, अगदी तसेच.
त्या काळी पगाराच्या अर्धे पेन्शन मिळण्याचा नियम होता. त्यानुसार तेंडुलकरांच्या दीडशे रुपयांच्या पगाराला ७५ रू. पेन्शन कबूल व्हायला हवे होते. पण श्री व सौ तेंडुलकरांना पुढील आयुष्याकरता १०० रू इतके पेन्शन लागणार होते. झाले. साईने त्याची लीला करायला सुरुवात केली. आला बाबा स्वप्नात. ७५ रुपयेच नाही; तर तब्ब्ल ११० रु इतके पेन्शन अप्रूव झाले !! तेंडुलकरांच्या इच्छेपेक्षा १० रु जास्तीच !!
इच्छेप्रमाणे देई तो कल्पवृक्ष
अचिंत्यदानी गुरुमाय
ह्या सद्गुरूकडे सारे काही प्राप्त होते. आपल्याला सारे काही गुणाकाराने मिळत जाते. म्हणूनच सद्गुरूचे पाय धरूया.
तुझिया छायेत आम्हा कमी काही नाही
सरले कष्ट आमुचे सुखी झालो संसारी ...
-----------------------------
कॅप्टन हाटे कथा
आपण आत्तापरेंत अनेक कथा बघितल्या ज्यामध्ये त्या व्यक्तीने साईना कधीही बघितले नसताना साईनाथ स्वप्नामध्ये जाऊन आपल्याकडे बोलावून घेतात. पण ही कथा थोडी वेगळी आहे. हाटे बाबांचे आधीपासूनच भक्त आहेत. पण तरीही बाबांना विसरले आहेत.
जीवनामध्ये पुष्कळ वेळा असं होतं की कामाचा किंवा संसाराचा व्याप ह्यामुळे म्हणा किंवा सारं काही सुरळीत चालू आहे म्हणून म्हणा आपल्याला "त्या"चा विसर पडतो. अगदी नकळत. परंतु हा बाबा सदैव आपली आठवण काढीत असतो, आपण नाही काढली तरीही. गणपतीच्या उत्सवाला डॅड आलेले तेव्हाही असेच बोललेले. बाबांना आपल्या प्रत्येक लेकराची काळजी असते. प्रत्येकावरच त्यांचे समान लक्ष असते.
याद राहा प्रभू तुमको
मै भूला बिसरा
लगेच हा बाबा स्वप्नात आला. त्याद्वारे बाबा प्रत्यक्ष हाटेना भेटले. त्यांच्याशी बोलले. बर्याच कालावधीत एखाद्या जवळच्या व्यक्तीला भेटले नाही की जसे होते, तसेच बाबांना झाले आहे असे दिसते. किती हे प्रेम ! हाटेची बाबांना आठवण येत होती. हाटे सुद्धा बाबांना तितक्याच आपुलकीने आणि प्रेमाने सांगत आहेत. त्यांना नैवेद्य अर्पण करीत आहेत. परंतु बाबांची लीला अगाध. स्वप्न काही पुरे होऊ दिले नाही. हाटेंना मधेच जाग आली.
हाटेंनी स्वप्न थोडीच खरे असते म्हणून काही सोडून दिलेले नाही. लगेच त्यांनी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे बाबांकडे नैवेद्य पोचेल अशी व्यवस्था करायला घेतली. बाबानी अशा प्रकारे परीक्षाच घेतली आहे. हाटे अगदी व्यवस्थित त्यात पास झाले आहेत.
ह्या बाबासाठी आपण जर प्रेमाने आणि विश्वासाने काही करायला गेलो की हा बाबा ते पुरे करून घेतोच ! नक्कीच ! म्हणूनच जेव्हा वालपापडी शिरडीत कुठे मिळेना तेव्हा अगदी अचानक चमत्कारिकरीत्या एक बाई वालपापडीचे टोपलेच्या टोपले घेऊन समोर आली. अर्थात बाबांनीच ती उभी केली. इथे अमितराज चा एक अनुभव आठवतो. मड आयलंड सारख्या ठिकाणी जेव्हा लॅपटॉपच्या चार्जर चा कनेक्टर मिळत नव्हता तिथे एक बाई टोपलीभर तसेच कनेक्टर घेऊन बाजारात बसलेली दिसली !!!
हा बाबा काहीही करू शकतो. अगदी नसलेल्या गोष्टीही अगदी लीलया उभ्या करू शकतो ! खरेच ग्रेट !
शेवटी एवढेच वाटते. हा कधीच आपल्याला टाकत नाही. आपण त्याचे बोट घट्ट धरून ठेवायला हवे. आणि समजा जरी आपण विसरलोच, तरी हा आपल्याला बोलावून घेतोच !
बापूराया रे बापूराया
कधी न पडावा देवा विसर मला रे तुझा विसर मला
बापू अनिरुद्धा मज आठवावे
तू आठवावे जरी मी विसरलो
मज जावळी घे रे घे रे कृपाळा
-----------------------
वामन नार्वेकर - एक रुपयाची कथा
हाटेना बाबानी सुंदर अनुभव दिल्यावर आता त्यांच्याकरता सारे काही बाबाच. ही अनन्यता त्यांच्या ठायी रुजली. त्याचेच प्रतीक म्हणून त्यांच्या मनात बाबांचा हस्तस्पर्श झालेला एक रुपया घरी असावा असे मनात आले. हा बाबा सर्वांच्या मनात काय भाव आहे हे बरोबर जाणून आहे.
कथेतील वामन नार्वेकरांनासुद्धा असेच वाटत होते. परंतु हाटेना आपला रुपया बाबा स्वतःजवळ ठेऊन घेतील किंवा ना घेतील याने काहीच फरक पडणार नव्हता. त्यामागे बाबांचे प्रेमच होते. परंतु नार्वेकरांना जेव्हा बाबांनी रुपया ठेऊन घेतला तेव्हा त्यांच्या मनाची चलबिचल झाली. त्यांना तो रुपया परत हवा होता. कारणही तसेच होते. त्यावर श्रीराम, जानकी व लक्ष्मणाची आणि दुसऱ्या बाजूला हनुमंताची मूर्ती होती.
बाबांनी आपला रुपया त्यांच्या संग्रही ठेऊन घेतला ही किती भाग्याची गोष्ट आहे. परंतु नार्वेकरांना ते समजलेच नाही. प्रत्यक्ष श्रीराम समोर बसलेले असताना रुपयावर कोरलेले श्रीराम कशाला हवे ? परंतु मोहापुढे ते हरले. चक्क माधवरावांकरवी त्यांनी बाबांना तो रुपया परत मागितला. परंतु बाबा थोडीच ऐकणार ? त्यांनी तर अजून २५ रुपये मागितले. नार्वेकरांच्या मोहाला हरवले. त्यांचा तो रुपया तर गेलाच; आणि वरचे २५ रुपये पण गेले.
हा रुपया जो बाबांनी नार्वेकरांकडे मागितला तो नक्की कोणता ? तर प्रेमभावाचा. ह्याची तुलना कशाशीच करता येऊ शकत नाही. कारण तो अमूल्य आहे. ह्या बाबाला प्रेम हवे आहे. अनन्यता हवी आहे. त्याचाच नार्वेकरांकडे अभाव होता. त्यांचे साईपेक्षा त्या रुपयावर जास्ती प्रेम होते.
ह्या साईला जेवढे देऊ तितके कमीच आहे. इतके काही तो आपल्याही नकळत आपल्यासाठी करत असतो की त्याचे मूल्यमापन होऊच शकत नाही. बेसिकली ह्याला कशाचीच गरज नाही. परंतु हा प्रेमाने जे काही देऊ ते ते तो सगळं काही स्वीकारतो. ह्याला आपण काही दिले म्हणून आपण रिकामे होत नाही, तर पूर्ण भरलेलेच राहतो. शिवाय हा तर पूर्णच आहे. ह्याला आपण काय देणार ?
पुष्प उमलले जे माझे
वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही भरूनी मीचि राही
माझे तरी काय असे सर्व तुझेचि रे देवा
तुझे असो तुझ्यापाशी मीच होय तुझा
.
0 comments:
Post a Comment