Movie Reviews

एअरलिफ्ट - एक अद्भुत रेस्क्यू ऑपरेशन ....Airlift

04:05:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हल्लीच रिलीज झालेल्या ’एअरलिफ्ट Airlift’ या चित्रपटाविषयी वाचले, आणि त्याबद्दलचे रिव्ह्यूजही पाहिले, लगेचच चित्रपटही पाहिला. हा चित्तथरारक चित्रपट पाहताना अगदी प्रत्येक प्रेक्षक रंगून गेला आणि चित्रपटाच्या कथानकाच्या बरोबर प्रवाहात वाहात गेला. एक जबरदस्त विषय, तितकाच जबरदस्त चित्रपट, थ्रिलर आणि रोमांचकारी कथानक, जीवंत वाटणारे कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय या अशा सगळ्या उत्तमोत्तम गोष्टीत प्रेक्षक अलगद गुंफला जातो आणि या चित्रपटाच्या पार मोहात पडून त्याकडे ओढला जातो. चित्रपटाचे नाव वाचून साधारणत: एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनचे चित्रण असावे असा आपला अंदाज खरा ठरतो, पण हा अंदाज इतक्या थरारकपणे आणि परखडपणे मांडला आहे की त्याची भेदकता प्रेक्षक संपूर्ण चित्रपटापर्यंत अनुभवतो.       



’एअरलिफ्ट’ ही एका ’रणजीत कट्याल’ नामक भारतीयाची कहाणी आहे, ज्याचा कुवैतमधे स्वत:चा जम बसवलेला बिझनेस आहे. १९८० - १९९० च्या दशकामधे इराक आणि कुवैत या दोन्ही सत्तांमधील संघर्षामधे प्रत्येक कुवैती भरडला गेला. इराकमधील सैन्यदलाने अत्यंत क्रूरपणे आणि अमानुषपणे कुवैती नागरिकांवर सत्ता गाजवली आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया न दाखवता हल्ला चढवला. कुवैत मधे तेव्हा स्थायिक असलेल्या जवळपास पावणे दोन लाख भारतीयांना ’अचानक’ स्वदेश आठवला आणि त्यांना मायदेशी परतण्याची निकडीची गरज निर्माण झाली. पण इंडियन एंबसीचेसुद्धा इराकी सैनिकांनी हात बांधून ठेवले असल्यामुळे एवढ्या भारतीयांना स्थलांतरीत करणे हे निव्वळ अशक्य होऊन बसले. इकडे आड आणि तिकडे विहिर अशा विचित्र परिस्थितीत अडकलेल्या सार्‍या भारतीयांना आता या रणजीत कटियालचाच आधार वाटू लागला. स्वत:ला अगदी सहज भारतात परत जाणे शक्य असणार्‍या कटियालने तसे न करता संकटात अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला फिजीकली आणि मेंटली सपोर्ट दिला आणि नकळत त्यांचा तो लिडर बनला. एवढ्या सार्‍या भारतीयांना अशा आणीबाणीच्या परिस्थीतीत सुरक्षित ठेवणे हे जवळपास अशक्यप्राय होते, तरीही त्याने सगळ्यांना सांभाळलं, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या अडकलेल्या भारतीयांसाठी, त्यांना स्वदेशी परत पाठवण्यासाठी शक्य असेल ती सगळी मदत तो करत होता. मनात धगधगती जिद्द असल्यामुळे स्वत:च्या फसलेल्या प्रयत्नांनीही तो निराश न होता शेवटी त्याने हाती घेतलेले हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफूल करून दाखवले. 

या चित्रपटातील काही व्यक्तीरेखा आणि प्रसंगही जरूर नमूद करावेसे वाटतात. कटियालच्या ऑफिसात केवळ एक आसरा म्हणून घुसलेला, सदैव तक्रार करणारा आणि असमाधानी असलेला वृद्ध गृहस्थ, त्याचा चित्रविचित्र संवादामुळे नकळतच चित्रपटात घडणारे हलके विनोद, तसेच त्याच्या वर्तनामुळे आलेला राग प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटपर्यंत जाणवतो. कटियालच्या या रेस्क्यु ऑपरेशनमधे खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलेली त्याची बायको, तिचा ताकदीचा अभिनय, कटियालला परोपरी मदत करणारा आणि स्वत:ची नुकतीच लग्न झालेली बायको या आणीबाणीच्या प्रसंगात हरवली असतानाही केवळ एका कुवैती नागरीकाम्च्या सुटकेसाठी पासपोर्टवर तिचा पती दर्शवणारा साजीद; सगळ्या भारतीयांच्या सुटकेबरोबरच एका असहाय्य कुवैती स्त्रीच्याही पाठी खंबीरपणे उभा राहणारा आणि तिला कुवैतमधून सहीसलामत बाहेर काढणारा कटियाल; एकीचे बळ मिळते फळ या म्हणीप्रमाणे शेवटच्या चेकपोस्टला इराकी सैन्याला शस्त्ररहीत भारतीयांच्या सहाय्याने चारलेली धूळ; तसेच चित्रपटातील काही संवाद मनाला अतिशय भावतात आणि कायम लक्षात राहतात. 

’एअरलिफ्ट’ हा वॉर थ्रिलर सिनेमा खरोखरीच सुपर्ब आहे. सर्वांनी अवश्य बघावा असा आहे. हा चित्रपट चालू असताना काही प्रसंगांना टाळ्या वाजवायला आपसूकच हात पुढे सरसावले. हा चित्रपट संपल्यावर काही प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावलेल्या जाणवल्या - नक्कीच देशप्रेमामुळे. प्रेक्षक बाहेर जाण्यासाठी उभे तर राहिले, पण पार शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे पाय थिएटरबाहेर निघेना. हे या चित्रपटाचे यश आहे असे वाटते. तर हा असा सुंदर चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी कोणत्याही प्रेक्षकाने दवडू नये असे मनापासून वाटते.   

You Might Also Like

0 comments: