Movie Reviews

Ranichi Baug (पाहिली राणीची बाग)

03:22:00 Nandan Bhalwankar 1 Comments

त्या दिवशी रविवार होता, सुट्टीचा दिवस असल्याकारणाने आमच्या फॅमिलीने कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. माझा पुतण्या - छोटा सुमेध हा बाहेर जाण्यासाठी सतत धडपडत असतो, त्यामुळे अम्ही त्याला घेऊन एखाद्या बागेत - राणीच्या बागेत जाण्याचा निर्णय घेतला... जिथे त्याला वेगवेगळे प्राणी-पक्षी पहायला मिळतील.... 


साधारणत: एका  तासानंतर आम्ही सगळे तिथे पोहोचलो. मला पुढे जाऊन तिकीट काढण्याची जवाबदारी दिलेली होती, किंबहुना मी स्वत:हूनच ती वाटून घेतली होती. गेटकीपरला तिकीट कुठे मिळणार ते विचारले. त्याने हातानेच एका दिशेला जाण्याची खूण केली. मला वाटले होते, बाssपरे, किती लाईन असेल नी काय; पण थोडं पुढे गेल्यावर पाहिलं तर काय रांगेत जेमतेम पाच लोकं! वाह! काय मस्त वाटलं तेव्हा!  
  

झरझर मी तिकीटे काढली आणि ’मी किती लवकर तिकीटे काढली’ या अविर्भावात बाकीच्यांची वाट बघत थांबलो. लगेचच बाकीचे आले. थोडं फोटो शूट झालं, पण बाग दीड तासात बंद होणार असल्याकारणाने स्वच्छंदी मनाला वेळीच लगाम घातला. नंतर थोडं पुढे गेलो तर बागेच्या आतमधे जाण्यासाठी हीss भलीमोठ्ठी रांग.... समोरच अजून एक तिकीट घर दिसलं. मला एकदम दचकायलाच झालं! मी नक्की तिकीटं तरी कसली काढली?? पाठी वळून बघितल्यावर कळलं की अरे मी चुकून बागेच्या प्रिमायसीस मध्येच स्थित ’भाऊ दाजी लाड’ या संग्रहलायाची तिकीटे काढली होती.... सगळे खो खो हसत सुटलो... आमचा छोटू सुद्धा याला अपवाद नव्हता बरं का... त्या तिकीटांचे पैसे अगदी थोडे असले, तरी थोडे का होईना वाया गेले या कल्पनेमुळे मी मनाशीच ठरवलं, बागेतून फेरी मारून आल्यावर या संग्रहालयाला भेट द्यायची. 


मग मी राणीच्या बागेची तिकीटे काढली आणि आम्ही त्या अजस्त्र लाईनीचा एक भाग झालो. थोड्या वेळाने रांग पुढे सरकल्यावर आम्ही आतमधे जायच्या गेटपाशी आलो. ह्या सगळ्या प्रकारानंतर आणि वेळ अगदी थोडा राहिल्यामुळे आम्हाला आत जाण्याची अगदी घाई लागून राहिली. गेटच्या बाजूला पाहिले तर सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या! जणू काही प्लास्टिकचेच गेट बनवले आहे की काय असे मनाला चाटून गेले. तिकीट दाखवून आम्ही आत जाणार, तेवढ्यातच एका लेडी पोलिसने आम्हाला अडवले! "पाण्याची बाटली तुम्ही नाही नेऊ शकत!", धुसफुसतच तिने सांगितले. आता आमच्या लक्षात आले, त्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या का ठेवल्या आहेत ते. पण छोट्या सुमेधसाठी पाणी तर लागणारच! मग काय करणार? पोलिस ऐकेचना. शेवटी थोडी हुज्ज्त घातल्यावर बहुदा तीही कंटाळली आणि आम्हाला टपरवेअरची बाटली नेण्याची परवानगी मिळाली. सुटलो बाबा... 



आत पहिले पाऊल टाकले आणि समोर पाहिलं तर तोंडाचा आsss झाला. एवढं मोठ्ठ पार्क, त्यात तीन ठिकाणी जाणारे तीन वेगवेगळे मार्ग, सगळं पाहून तरी कसं होणार? शेवटी जास्त विचार करण्यातच वेळ जाईल म्हणून जास्त लोकं ज्या मार्गाने पुढे जात होते, त्या गर्दीत आम्हीही नकळतपणे घुसलो. त्या बागेत अवाढव्य पिंजरे होते, पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्यात झाडांचच संवर्धन केलं आहे की काय असा प्रश्न पडला.... (अहो म्हणजे रिकामे पिंजरेच जास्त होते!) पुढे हत्ती दिसले. ते सुद्धा त्यांच्या घरात आरामच करीत होते. शरीर मोठ्ठ असेल, तरी नजरेस पडतच असं नाही. एवढा मोठ्ठा हत्ती सुद्धा सुमेधची नजर इतस्तत: शोधतच होती! नवलच आहे नाही! नंतर पुढे माणसांचे अनेक पूर्वज पिंजर्‍यात बंदिस्त दिसले; काही भलतासलता विचार करू नका, माकडांबद्दल बोलतोय मी. तिथे नेमकी त्यांची जुगलबंदी सुरू होती. काहीतरी हलत आहे या भावनेनेच सुमेध एकटक त्या माकडांकडे बघत राहिला... सुमेधच कशाला, आम्ही स्वत:सुद्धा त्यांच्याकडे पाह्ण्यात मग्न झालो होतो. खरं सांगायचे तर सुमेधला आम्हाला वाघोबा दाखवायचा होता. एकाने आम्हाला वाघाचा पिंजरा पुढे आहे असे सांगितले तरी, त्या वेड्या आशेवरच आम्ही त्या अजस्त्र बागेत फिरत होतो.... नंतर आम्हाला कोल्हा, अस्वल, एमू दिसले. पोपटासारखे सुंदर पक्षीही दिसले... त्यात एक अजब चालणारा प्राणीही दिसला... तो पक्षी होता की प्राणी हे अद्याप न कळलेलं गुढच आहे. सापही सुस्तावले होते. बहुदा त्यांचाही रविवार होता. त्यानंतर मात्र आम्हाला एक गंमत दिसली! पाण्यातून एक भला मोठ्ठा हिप्पो बाहेर आला, त्याला पाहून सुमेधबरोबर आमचे डोळे विस्फारलेलेच राहिले. एक हिप्पो बाहेर येतो न येतो तोच दुसरा हिप्पो बाहेर आला. काय धमाल आली ते दृश्य बघताना! लगेचच सुमेधलाही मी हिप्पो बोलायचे शिकवले... अगदी ’हिप्पो’ नाही पण ’पिप्पो’ बोलायला तो शिकला... (आत्ताही तो सारखा पिप्पो पिप्पोच करतोय!) 


आता मात्र उद्यानाचा शेवट आला... इतक्यात? हा प्रश्न तुमच्या मनात कदाचीत आला असण्याची शक्यता आहे, पण तुम्ही स्वत: या उद्यानाला भेट दिल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. आम्ही घरीच निघालो होतो, पण एक भन्नाट दृष्य दिसले. मगर आणि हरीण बाजूबाजूला बसलेले दिसल्यामुळे आमचे हसू आम्हाला आवरेनासे झाले. थोडे फोटो काढून आम्ही बर्ड केज कडे आलो. फोटो काढण्याची हीच जागा काय ती आवडली. पण फोटो सोडून त्या पक्ष्यांच्या सौंदर्याकडे आम्ही पाहातच बसलो. खूपच आवडले ते पक्षी! नंतर उद्यानाबाहेर पडलो! मला लगेचच आठवण झाली ती भाऊ दाजी लाड संग्रहालयाची! आम्ही त्या गेटकडे नुसतं पाहिलं आणि आमचा विरस झाला. ६ दारांपैकी केवळ एक दार उघडं होतं. आता हाच आपला चान्स हे लक्षात येताच आम्ही तिथे गेलो... एखाद्या खजिन्याच्या बाहेर एखादा विशाल सर्प फुत्कार टाकत बसावा तसा एक रखवालदार आतमधे जाणार्‍या व्हिजीटर्सना अडवत होता. मगाचसारखी ह्याच्याशीही आम्ही हुज्जत घालायचा आमचा प्रयत्न फसला. फक्त बाहेरूनच काय ते संग्रहालय पाहिले आणि मनात भडकणारी आग शांत करून घेतली. 


अशी ही आमची छोटी ट्रिप सक्सेसफूल झाली.... आम्ही घरी पोहोचलो ते पुढची ट्रिप ठरवूनच! मिशन तारापोरवाला मत्स्यालय!  

You Might Also Like

1 comments:

Nice Article Nandansinh.. Aavadali tumchi picnic :)