लेख आणि कविता
रेल्वेमधे महिला डब्यातील सुरक्षा वाढविण्याची गरज
हल्ली बातम्यांमधे किंवा वृत्तपत्रांमधे वारंवार स्त्रीयांवर होणार्या अत्याचाराची बातमी दिसते. अशा बातम्या वाचून एका बाजूला त्या पिडीत स्त्री विषयी सहानुभूती, अनुकंपा तर वाटतेच; परंतु याशिवाय तिला नाहक त्रास देणार्या आणि तिच्यावर अत्याचार करणार्या त्या गलिच्छ आरोपीबद्दलही कमालीची चीड येते. हल्लीच CST ते मस्जिद बंदर दरम्यान महिला डब्यामधे एकट्या तरूणीला पाहून तिच्या जवळ जाणार्या त्या गुन्हेगाराविषयी वाचले. अकस्मात हा माणूस असा एकट्या डब्यात आपल्या जवळ येतोय हे पाहताच सहाजीकच कुणीही घाबरेल आणि नक्की काय करायचे हे सुचणारही नाही. पण प्रसंगावधानाने त्या तरूणीने रेल्वेची चेन खेचली. पण तरीसुद्धा भीतीने हिने चालत्या ट्रेनबाहेरच उडी घेतली. यावरूनच आपल्याला कळते की त्या असहाय्य तरूणीची काय बिकट अवस्था झाली असेल.
हा प्रसंग अक्षरश: डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्या नराधमाविषयी तीव्र संताप आला. अशा मोकाट आरोपींना लवकरच जेरबंद करायला हवे असे मनापासून वाटते आणि त्याला कठोर शिक्षा मिळावी असे वाटते; याशिवाय रेल्वेनेसुद्धा महिला डब्यातील सुरक्षितता वाढवावी असेही वाटते, नाहीतर यासारख्या आणि काही वर्षांपूर्वी घडलेल्या जयबाला प्रकरणासारख्या (जिने आपले पाय गमावले) अतिशय कटू बातम्या कानावर येतील. असे घाणेरडे आणि खालच्या पातळीचा गुन्हा करण्यासाठी माणसं धजाऊ तरी कशी शकतात याचेच आश्चर्य वाटते. जर आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होताना दिसली, की सहाजीकच अशी कृत्ये करायला कुणीही धजाऊ शकणार नाही. रेल्वे प्रशासन याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करेल अशी आशा वाटते.
0 comments:
Post a Comment