लेख आणि कविता

पुस्तकाप्रमाणेच जबरदस्त असा फास्टर फेणे...

03:05:00 Nandan Bhalwankar 0 Comments


लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी पडली की आमची बच्चे कंपनीची जवळच्या वाचनालयात रोजचीच खेप असायची. दिवसा आदल्या दिवशी वाचनालयातून घेतलेलं पुस्तक वाचून पुढचं पुस्तक कधी एकदा हातात घेतो असं व्हायचं. आणि त्यात पण भा.रा. भागवतांचं फास्टर फेणे म्हंटलं की पुस्तक वाचायला अजूनच धमाल वाटायची. त्यावेळी आम्हाला वाटायचं ह्या पुस्तकासारखाच खर्‍या आयुष्यात एखादा फेणे आला तर काय मजा वाटेल त्याचे सगळे किस्से ऐकताना! पण तरीही कळायचं की अरे अशी पुस्तकातली पात्रं थोडीच खरी होतात? अजूनही त्या सुंदर आठवणी मनात ताज्या आहेत. एव्हाना शिक्षण संपल्यावर पुसटसा का होईना पण ह्या सगळ्या पात्रांचा विसर पडत चालला होता. पण अचानक एक दिवस टी.व्ही. चालू असताना फास्टर फेणेचे प्रोमोज लागले. ऐकून एक-दोन क्षण आम्ही एकमेकांकडे बघितलं सुद्धा. खरोखरच फास्टर फेणेचा चित्रपट येतोय का? आणि पुन्हा तोच प्रोमो बघून आणि नेटवर बघून स्वत:ची खात्री करून घेतली आणि तेव्हाच ठरवलं की हा चित्रपट आपण बघायचाच.  



फास्टर फेणे सारखा सुपर्ब ऍक्शनपट पाहण्यातली मजा औरच असणार आहे हे तेव्हाच कळलं होतं, आता उत्सुकता होती ती चित्रपट रिलीज होण्याची. दैनिक प्रत्यक्षमधे या चित्रपटाविषयी वाचलं आणि सिनेमा पाहिला देखील. पुस्तकाप्रमाणे हा चित्रपटही अफलातून आहे. नावाप्रमाणेच ’फास्टर’ असणारा फेणे एक मोठ्ठा घोटाळा सोडवतो आणि खरोखरच एक नायक ठरतो. या चित्रपटातील एक एक प्रसंग अक्षरश: आपल्या अंगावर येतात आणि प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवतात. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्या वेळचा पुस्तकातला बनेश फेणे आज टेक्नॉलॉजीच्या युगात कसा असेल, तस्साच  अगदी तो वाटतो. शीतावरून भाताची परीक्षा करणारा हा नायक म्हणजेच अमेय वाघ या भूमिकेला अगदी तंतोतंत न्याय देतो. या चित्रपटातील बाकीची पात्रं म्हणजे अंबादास, भू-भू ही सुद्धा फास्टर फेणे प्रमाणेच आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात राहातात. एकंदरीतच हा सिनेमा सुपर्ब आहे हे वेगळं सांगायला नकोच. मला हा सिनेमा प्रचंड आवडला. ह्याचा जर पुढचा पार्ट आला तर सोन्याहून पिवळच. 

You Might Also Like

0 comments: