आवर्जून बघावा असा ’आनंदी गोपाळ’ चित्रपट

03:23:00 Nandan Bhalwankar 0 Comments

आवर्जून बघावा असा ’आनंदी गोपाळ’ चित्रपट
                             - नंदन भालवणकर, दादर

हा चित्रपट पाहून खरोखरच महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारताच्या इतिहासातला 'सुवर्णक्षण' अनुभवल्यासारखा वाटतो. आपल्यासमोर एखादं ध्येय असेल, स्वप्न असेल, मनामधे अनामिक ध्यास असेल आणि ते मिळवण्यासाठी काहीही करायची जर आपली तयारी असेल, तर ते यश आपल्याला कसे येऊन बिलगतं हे प्रत्यक्ष दाखवणारा हा चित्रपट आहे. खरोखर अवाक्‌ करणारा असा हा चित्रपट आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जातो. 

एकोणिसाव्या शतकातला ही कहाणी जिथे स्त्रीला साधं स्वखुशीने उंबरठ्याबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, तिथे ह्या आनंदी गोपाळ जोशी  अवघ्या १८ वर्षांच्या वयात बोटीने एकट्याच अमेरिकेला गेल्या. तिथे तब्बल चार वर्षं राहून त्यांनी वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला आणि त्या त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगूनच भारतात परतल्या. एवढेच नाही, तर त्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. पण हे सगळे मिळवण्यासाठी त्यांनी असंख्य प्रयास केले, अनेक संकटांचा, विरोधकांचा सामना केला, तत्कालीन सनातनी प्रवृत्तीशी जोरदार लढा दिला. हा लढा पडद्यावर बघताना हृदय अक्षरश: पिळवटून निघतं. तसेच आनंदीबाईंच्या शौर्याची कमाल वाटते. त्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणं, शिकणं, एवढंच काय स्वत:च्या नवऱ्याबरोबर बाहेर फिरणंदेखील धर्म बुडवण्याइतकं जहाल मानलं जायचं. पण अशा परिस्थीतीतही धीराने आणि धाडसाने त्यांनी पाऊले उचलली. केवळ अज्ञानापोटी आपले बाळ गेले या विचारांनी आक्रंदित झालेल्या आनंदीबाई पुढे डॉक्टर झाल्याच.

पण या त्यांच्या लढ्यामधे त्यांच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहणार्‍या गोपाळरावांचेही तितकेच कौतुक. केवळ स्त्रीयांना शिक्षण मिळावे, त्यांच्यातील कलागुणांनुसार, त्यांच्या योग्यतेनुसार त्यांची प्रगती व्हावी या त्यांच्या उदात्त हेतुसाठी त्यांना सलाम. यासाठी त्यांनी काय नाही म्हणून केलं. अख्या समाजाविरोधात उभे राहून त्यांनी चुकीच्या प्रथांना विरोध केला, त्यासाठी झगडले, इतकेच नाही, तर ते स्वत:चा धर्म बदलायलाही तयार झाले.          

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की ह्या चित्रपटाला कितीही चांगले म्हंटले तरी ते कमीच पडेल असे वाटते. एका वेगळ्याच उंचीवर हा चित्रपट गेला आहे. हा चित्रपट मनाची घट्ट पकड घेतो. हा चित्रपट बघताना प्रेक्षक आनंदीबाई आणि गोपाळराव दोघांनाही नकळतच सलाम ठोकतो. पुन्हा एकदा ह्या चित्रपटाला खूप सार्‍या शुभेच्छा आणि अशा उंचीचा चित्रपट आम्हा प्रेक्षकांपुढे आणल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शकांचे मनापासून शतश: आभार.

You Might Also Like

0 comments: