गुढीपाडव्याचे महत्त्व आणि माहिती मराठीमध्ये | gudi padwa information in marathi
गुढीपाडवा - अत्यंत शुभ मुहूर्त
साडे तिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा! (दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतिया हे तीन पुर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त).
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुढीपाडवा - २०२२ कधी आहे ?
या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.
प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी.
नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.
कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे.
गुढी कशी उभारावी?
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.
गुढीपाडवा - पोशाख आणि यात्रा
गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे साडी लूक्स परिधान केलेल्या दिसतात. . महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.
0 comments:
Post a Comment