गुरुचरित्र अध्याय पन्नासावा
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्रीगुरुंनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका रजकाला 'तू पुढच्या जन्मी बैदुरनगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यतिरूपाने तुला भेटेन' असा वर दिला होता. ही कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवनधर्मात जन्मास आला व बेदरचा राजा झाला. तो सर्वप्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता. तो हीन जातीत जन्मास आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील, सुसंस्कृत, उदार अंतःकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानीत असे. सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राम्हणांवर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यात अनेक मठ-मंदिरे होती; पण तो यवन असूनही कुणाला कसलाही त्रास देत नसे. उलट, मठ-मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत. 'आपण यवन आहोत. आपला धर्म वेगळा, हिंदूंचा वेगळा. आपण त्यांच्या देव-ब्राम्हणांची निंदाच केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो.आपण आपल्या जातीधार्माप्रमाणेच वागले पाहिजे. त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते. ते ब्राम्हण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्यांची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष, पाषाण, लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात. ते मंद बुद्धीचे ब्राम्हण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधःपात होतो." यवन पुरोहित असे बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, "अहो, तुम्हीच उपदेश करता, की परमेश्वर अणुरेणुतृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो; सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे.
सर्व प्राणी, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी एकाच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी-मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गाई वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच, पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकाच आहे. 'नाना देही देव एक विराजे' हे सर्व सामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे मानून इतरांची निंदा कशासाठी करावयाची ? म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा -स्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो, म्हणून "आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांचे चूक असे माणू नये." असे बोलून राजानें यवनपुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला.
पुढे काही दिवसांनी त्या यवनराजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले; पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवनराजा आपल्याला भेटावयास येईल त्यांना असे वाटले. तसे झाले तर येथील ब्राम्हणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल म्हणून आपण आता गुप्त राहावे हेच योग्य. असा विचार करून श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, "यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा." श्रीगुरुंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले.
इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने फारच त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडीमात्र दुखणे बरे होईना. काय करावे, त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राम्हणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राम्हणांना म्हणाला, "माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य-हकीमांनी हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोस झाला आहे. आता यावर काय इलाज करायचा ?" त्यावर ते ब्राम्हण म्हणाले, "राजा, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात, त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषाच्या दृष्टीने कोटीजन्माची पापे नाहीशी होतात, तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार ?" त्यावर तो यवनराजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राम्हणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्रीगुरूचरणांची सेवा केली होती; पण काही पापांमुळे मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला आहे. त्याला माझा इलाज नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. " राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राम्हण म्हणाले, "महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थास जा व त्या तीर्थात स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल."
ब्राम्हणांनी असे सांगितले असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता, एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावने स्नान केले. त्याचवेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, "यतिमहाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरे होईल ?" त्यावर तो संन्यासी म्हणाला, "एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल." असे बोलून त्या सन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली.
पूर्वी अवंतीनगरीत एक ब्राम्हण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राम्हण. अत्यंत दुराचारी होता. मदोन्मत्त होता. ब्राम्हणकुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी ब्याभिचार करीत असे. तो स्नानसंध्या-पूजापाठ इत्यादी जो ब्राम्हणाचा आचारधर्म त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याकडे भोजन करीत असे.
एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभनावाचा एक महायोगी तेथे आला. त्याला पाहताच त्या ब्राम्हणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासंग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम भोजन दिले व पलंगावर झोपविले. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वाराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राम्हणाला व पिंगला वेश्येला वार्धक्याने मृत्यू आला.
त्या वृषभ योग्याची मनोभावे सेवा केल्यामुळे तो ब्राम्हण दशार्ण राजा वज्रबाहू व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले. त्या विषाने ती मेली नाही. पण तिच्या सर्वांगाला फोड झाले. तशाच स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्याने मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर व राजपुत्रावर औषधोपचार केले; पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मायलेकरे असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहवेनात. त्या फोडांनी तय दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलाबून सांगितले, "या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडून या." राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री-पुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी दुराचारी म्हणून लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसवून निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडले. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, यामुळे ती आक्रोश करत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन रानावनात भटकू लागली. अन्नपाण्याविना तिचे फार हाल होत होते. त्या घोर अरण्यात भटकत असता तिला काही गुराखी दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली, तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले, "तू अशीच पुढे जा. तेथे तुला एक मंदिर दिसेल. तेथे तुझी खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होईल." असे त्या गुराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरे वाटले. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन 'या गावाचा राजा कोण आहे ?' असे विचारले असता त्या स्त्रिया म्हणाल्या, 'पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील श्रीमंत आहे. तू त्याला भेट. त्याला आपली परिस्थिती सांग. तो तुला नक्की आश्रय देईल." त्या स्त्रिया असे सांगत होत्या, त्याचवेळी पद्माकाराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकाराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्नवस्त्राची, राहण्याची अवस्था केली.
त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी तय राजपुत्राला- म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला; पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तेथे प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगीशाला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासंग पूजा केली.
त्यावेळी त्या योगीशाने विचारले, "घरात कोण बरे रडत आहे ? काय झाले आहे ? " पद्माकाराने त्या मायलेकरांची हकीगत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, "तू विनाकारण का बरे शोक करतेस ? या जगात कोण जन्मास आला ? आणि कोण मेला ? सांग बरे. या जगात चिरंजीव कोण आहे ? जो जन्मास येतो त्याला एक न एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगुर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यातील बुडबुडा, त्याप्रमाणे दे जग क्षणिक आहे, म्हणून शहाण्या मनुष्याने जन्म-मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई-वडील, पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रम्हदेवाने लिहिलेली ललाटरेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस ? कोणाची तू माता होतीस ? कोण तुझा पुत्र होता ? सांगता येत नाही ना ? मग तू विनाकारण शोक का बरे करतेस ? तेव्हा शोक आवर व भगवान सदाशिवला शरण जा." त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजाविले तरी, सुमतीचे दुःख कमी झाले नाही. ती म्हणाली, "योगीराज, मी या व्याधीने मरणयातना भोगत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र मरण पावला आहे. अशा परीस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू ? मला आता मरण आले तर बरे होईल ."
सुमतीचे दुःख पाहून ऋषभ योग्याला तिची दया आली. त्याने थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले व त्याच्या मुखातही घातले. त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकरांच्या शरीराला लावले. आणि काय आश्चर्य ! दोघेही रोगमुक्त झाली. शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली.
दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभ योग्याने दोघांना वर दिला, "तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल." त्या योग्याने सुमतीला वर दिला, 'तुझा पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला फार मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षा अधिककाळ राज्य करील." असा वर देऊन तो ऋषभ योगी एकाएकी निघून गेला.
ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, "हे राजा, चिंता करू नकोस. सत्पुरुषाच्या कृपाप्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल, यावर तू पूर्ण विश्वास ठेव." त्या संन्याशाने असे सांगितले असता यवनराजाने नमस्कार करून विचारले, "ते सत्पुरुष कोठे आहेत ? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो." त्यावर तो संन्यासी म्हणाला, "गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा व त्यांचे दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल." हे ऐकताच तो यवनराजा श्रीगुरुंच्या दर्शनाला निघाला. मजल-दरमजल करीत गाणगापुरात आला. त्याने गावातील लोकांना विचारले, "येथे एक थोर संन्यासी आहेत असे ऐकतो. आता ते कोठे आहेत ?" असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, "अहो, आता काही खरे नाही. हा यवन श्रीगुरूंची चौकशी करतो आहे. आता हा काय करील सांगता येत नाही." अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, "अरे, बोला ना ! मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ते आता कोठे आहेत ते सांगा." मग लोक म्हणाले, "श्रीगुरू नित्य मध्यान्हकाळी भीमा-अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की मठात परत येतात. आता ते संगमावर आहेत." हे ऐकताच यवन राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेण्यात बसून श्रीगुरुंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्रीगुरुंना पाहताच तो मेण्यातून खाली उतरला, पायी चालत चालत श्रीगुरुंच्या समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "काय रे रजका ! तुमची माझी भेट पूर्वी झाली होती. आता खूप वर्षांनी परत आला आहेस !" श्रीगुरू असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतली. त्याचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरे केलीत ? मी अनाथ झालो. मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो. मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होतात तेव्हा मी आपणास ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही, अशी माझी पूर्ण खात्री होती मग आपण मला अज्ञानसागरात का बरे लोटून दिलेत ? आता माझा उद्धार करा. यासाठी मी आपणास शरण आलो आहे. आता मला हा जन्म पुरे !
श्रीगुरू त्याला म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व इच्छा, वासना पूर्ण होतील. " तेव्हा राजा म्हणाला, "स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे. त्याच्या असह्य वेदना होत आहेत. आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे." राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, "अरे, तो फोड कोठे आहे दाखव बरे !" राजा पाहतो तो काय ? तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, "स्वामी, मला आपण रोगमुक्त केलेत. मला राजपद व सर्व ऐश्वर्ये देऊन माझी गत्जान्मातील इच्छा पूर्ण केलीत, ही सगळी केवळ आपली कृपा ! आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "अरे, आम्ही आहोत तापसी संन्यासी ! आम्ही तुझ्या नगरात कसे येणार ? तेथे तर हिंसादी पापकर्मे चालू असतात. तेथे गोहत्या होत असते. जीवहिंसा हे महापाप अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही." राजा म्हणाला, "हे सर्व घडते. माझा पूर्वीचा जन्म रजकाचा, पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले, अनेक प्रकारची सुखे मला मिळाली; पण एकदा मला पुत्रपौत्र समजून आलात तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करीत राहीन." राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्रीगुरुंनी विचार केला, "आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार तेव्हा आता या कलियुगात जास्त काऴ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा येथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील. तेव्हा आता गुप्त होणेच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीयात्रा करू व या राजाचीही इच्छा पूर्ण करू." असा विचार करून ते मठाकडे निघाले. राजाने त्यांना मेण्यात बसविले. त्यांच्या पादुका हातात घेऊन तो पायी चालू लागला, तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तू ब्राम्हणाची सेवा करतो आहेस असे तुझ्या लोकांनी पहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यात बस." पण राजाने ते मानले नाही. 'मी आपला दासानुदास आहे.' असे म्हणून तो चालतच निघाला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर्य दाखविले. श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तुझ्या या लवाजम्याबरोबर जायचे तर उशीर होईल माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल. तू पुढे जा. मी तुझ्या नगरीत येईन." असे सांगताच राजा निघून गेला. मग श्रीगुरू शिष्यांसह अदृश्य झाले व मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले.
श्रीगुरू आल्याचे समजताच सायंदेव साखरेचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते. नागनाथाने श्रीगुरुंना आपल्या घरी नेउन त्यांची यथासंग पूजा केली व मोठी समाराधना केली. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवन राजा मला पापविनाशी तीर्थावर भेटावयास येणार आहे. मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल. तुम्हा ब्राम्हणांना त्याचा उपद्रव होईल." असे सांगून व त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तेथे आला. त्याने श्रीगुरुंना पालखीत बसवून वाजतगाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राम्हणादी हिंदूंना आनंद झाला; पण यवनांची राजाची निंदा केली. राजाने श्रीगुरुंना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राम्हणांना व याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्रीगुरुंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले, "आता तू संतुष्ट झाला आहेस न ? तुझी आणखी काही इच्छा आहे काय ? असेल तर सविस्तर सांग." राजा म्हणाला, "स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान मला द्या." श्रीगुरू म्हणाले, "तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल्य पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल." असे सांगून श्रीगुरू गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले. श्रीगुरुंना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्रीगुरू त्यांना म्हणाले, "माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजानही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व ब्राम्हणांना त्रास होईल, म्हणून मी प्रकटरूपाने श्रीशैल्य यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त, सूक्ष्म देहाने मी येथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा." असे सांगून लौकिकार्थाने ते श्रीशैल्य यात्रेला निघाले. असे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला सांगितले.
ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, "श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना, आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छाकामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापुर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरास जावे. तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथे गेले असता मनातल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतात. धन, धान्य, पुत्र-पौत्र इत्यादी जे हवे असेल ते प्राप्त होते."
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्रीगुरूचरित्राचे भक्तिभावाने, निष्ठेने श्रवण-पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'पूर्वजन्मातील रजकाची कथा' नावाचा अध्याय पन्नासावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
0 comments:
Post a Comment